स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी लूट करणाऱ्यांचे आयुष्य हे कधीच सुखी समाधानी राहिलेले नाही, हा इतिहास आहे. हे वास्तव आहे. हे जाणणारे या वाटेला कधीच जाणार नाहीत, हेही खरे आहे, पण मोहाचा हा रोग बळावला आहे. यासाठी मोहावर आवर हा घालायलाच हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तरी कृपाळु तो तुष्टो। यया विवेकु हा घोंटो।
मोहाचा फिटो। महारोगु ।। ४१२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा
ओवीचा अर्थ – तरी तो कृपाळू (श्रीकृष्णपरमात्मा) संतुष्ट होवो आणि यास (धृतराष्ट्रास) हा आत्मनात्मविचार सेवन करण्याचे सामर्थ्य देवो ! आणि याचा मोहरुपी महारोग नाहीसा होवो.
पूर्वी प्लेग, देवी यांसारखे महारोग होते. कोरोनाचा कहर आता नव्यापिढीनेही पाहीला आहे. या साथीच्या रोगांत अनेक माणसे मृत झाली आहेत. काही वर्षांपूर्वी स्वाइन फ्लू या रोगाने थैमान घातले होते. हे साथीचे रोग झपाट्याने पसरतात. त्यात जगभरात हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. असाच माणसास मोहाचाही रोग होतो. हा रोग लागला तर लवकर सुटत नाही. या मोहाच्या जाळ्यात जर माणूस अडकला तर त्याचे आयुष्यही वाया जाऊ शकते.
अनेक जणांना संपत्ती जमा करण्याचा मोह लागला आहे. पैसा इतका जमा केला आहे की, तो जवळ ठेवायलाही जागा नाही. देशात पैसे ठेवायला सुरक्षित जागा नाही म्हणून आता पैसे स्विस बँकेत ठेवले जातात. हा सगळा काळा पैसा आहे. मोहाने जमा केलेली ही माया आहे, पण मोहाचे हे जाळे त्यांना कोणत्याही क्षणी संपवू शकते, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
जाळ्यात अडकल्यानंतर जाणीव होऊन काय उपयोग ? गळाला आमिष आहे हे न पाहताच तो मासा त्या आमिषाचा बळी पडतो. भ्रष्टाचारही या अशा मोहानेच वाढत चालला आहे. एवढी संपत्ती मिळवूनही करायचे तरी काय, हा प्रश्न या मोहसम्राटांना का पडत नाही? समाधान नष्ट करणारी ही संपत्ती नेमकी जमवितात तरी कशासाठी ? या संपत्तीने अनेकांचा तळतळाट मागे लागलेला असतो. लुटीचा हा रोग वाढतच चालला आहे. यामुळे देशात लुटारूच वाढले आहेत.
पूर्वी स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने लूट केली जात होती. हा पैसा चांगल्या कामासाठी वापरला गेला. काहींनी मंदिर, मठामध्ये चोरी केली आणि तो पैसा शाळा काढण्यासाठी वापरला. त्या काळात शिक्षणाची सुविधा होणे ही गरज होती. हे ओळखून त्यांनी हे पाऊल उचलले. यात धर्म पाळला गेला आहे. गरज फार महत्त्वाची असते. हे काम देशासाठी होते. स्वतःसाठी नव्हते. यात स्वार्थ नव्हता व वेळप्रसंगी यात बलिदानही त्यांना द्यावे लागले. ते अमर झाले. उद्देश चांगला होता. सर्वमान्य उद्देश होता. हेतू चांगला होता. यातून समाधान मिळणार होते, पण स्वातंत्र्यानंतर ही लूट कायम राहिली; मात्र ती स्वतःच्याच देशातील जनतेची असल्याने ही लूट ही चोरी ठरत आहे. हा लुटीचा रोग बळावल्यास पुन्हा नव्या स्वातंत्र्यासाठी उठाव होईल, हे निश्चित.
स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी लूट करणाऱ्यांचे आयुष्य हे कधीच सुखी समाधानी राहिलेले नाही, हा इतिहास आहे. हे वास्तव आहे. हे जाणणारे या वाटेला कधीच जाणार नाहीत, हेही खरे आहे, पण मोहाचा हा रोग बळावला आहे. यासाठी मोहावर आवर हा घालायलाच हवा. मोहामुळे मोठ मोठी साम्राज्येही उद्ध्वस्त झाली आहेत. हा महारोग नियंत्रणात येऊ शकतो. यासाठी विवेकाचा काढा प्यायला हवा. विवेकानेच हा रोग बरा होऊ शकतो. म्हणजे मठांना दान दिले म्हणजे आपण या लुटीतून सुटलो असा काहींचा ग्रह असतो. पण तसे नाही. मठामध्ये कशासाठी हा पैसा वापरला हे महत्त्वाचे आहे. कारण आजकाल मठ, मंदिरे हे सुद्धा व्यावसायिक झाले आहेत. याचाही विचार दान देणाऱ्यांनी करायला हवा अन् दान करायला हवे.
मोहाच्या या महारोगाला आत्मसंतुष्ट होऊनच आवर घालता येतो. यासाठी स्वतः आत्मसंतुष्ट राहाण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वतः आत्मसंतुष्ट राहील्यास मोह सुटणारच नाही. मग महारोग होण्याचा संभवच नाही. स्वतःमध्येच महारोगाला मारण्याची शक्ती निर्माण झाल्यास हा मोहाच्या विषाणूचा महारोगच होणार नाही. यासाठी स्वतःमधील रोगप्रतिकारशक्ती वाढवायला हवी, आत्मसंतुष्ट राहण्याची वृत्ती वाढवायला हवी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.