
पहिल्या भेटीतच “माझीये जातीचा मज भेटो कोणी…’ अशी आस लावणारे. या माणसात सत्त्वयुक्त असे काहीतरी आहे, भौतिक सुखदु:खाच्या चौकटीत न बसणारा हा माणूस आहे. मूल्ययुक्त जगणे जगताना सवंग तडजोडी न स्वीकारणारा, काहीसा फटकून वागणारा, आतल्या आवाजाशी समांतर वर्तन व्यवहार करणारा निष्पाप आणि निष्कलंक माणूस म्हणून नाना उत्तरोत्तर अधिकच आकळत गेला.
– रमेश साळुंखे, मराठी विभाग देवचंद महाविद्यालय,अर्जुननगर, जि. कोल्हापूर.9403572527
आधुनिक कालखंडात आपल्या आचार, विचार, उच्चाराने आणि विशेष म्हणजे शरीरयष्टीने “हाडाचा शिक्षक’ असे नामाभिधान सार्थ ठरविणारे नानासाहेब जामदार हे एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व आहे. हे असे एकमेवाद्वितीयत्व त्यांनी आपल्या अनेक प्रकारच्या कामांमधून मूकपणे ठामपणाने सिद्ध केले आहे.
वर्तमान वास्तवाच्या कर्कश कोलाहलात स्वत:चे मूल्ययुक्त जगणे प्राणपणाने जपणारा नाना हे एक अत्यंत शांत, समंजस आणि दुर्मिळ असे व्यक्तीमत्व आहे. दुर्मिळता ही अशासाठी की नानांसारखी माणसं आता औषधालाही मिळेनाशी झाली आहेत. आपल्या कामाबद्दल अव्यभिचारी निष्ठा, कुटुंबाप्रती ममत्व दुसऱ्याच्या आनंदाने आनंदून जाणे, आणि दु:खाने गलबलून जाणारे मनस्वीपण या माणसाला त्याच्या जगण्यातून लाभले आहे. आयुष्यभर ज्याच्या मित्रत्वाची मिरासदारी अभिमानाने मिरवावी असा अंतर्बाह्य हा साधा पण उत्कट माणूस आहे.
आठवणीत राहणारी ग्रेट भेट !
नानाची गाठभेट जवळपास वीस वर्षांपूर्वी झाली. देवचंद महाविद्यालयात रुजू झाल्यानंतर सहजच एकदा कुणीतरी नानाच्या घरी मला घेऊन गेले. सायंकाळची वेळ. विरळ वस्तीतील एका गल्लीतले शेवटचे घर. आतबाहेर दोन तीन ऐसपैस खोल्या. फर्निचर म्हणावे असे काहीच नाही. एखादी खुर्ची, सारवलेल्या स्वच्छ जमिनीवर सतरंजी अंथरलेली, समोर भिंतीतल्या कोनाड्यात लहानगे कपाट. त्यालाही दार नसलेलं. त्यात खच्चून भरलेली पुस्तकं. तुकोबाची गाथा, ज्ञानेश्वरी स्पष्ट आणि लखलखीत दिसणारी. दारात साखरेचा आजार घेऊन उरल्यासुरल्या एका पायावर हात फिरवत नानाशी अधूनमधून संवाद साधणारे नानाचे चुलते. माजघरात नानाच्या वहिनीने चुलीवर नुकतेच ठेवलेले चहाचे आधण. या साऱ्या पार्श्वभूमीवर आमच्याशी किंचित सीमावर्ती भागातील कानडी हेल काढत मनापासून – जिव्हाळ्याने बोलत बसलेले नाना. आधुनिक काळातला हा असा “मास्तर’ मी प्रथमच पाहत होतो. हे काहीतरी वेगळेच रसायन आहे, असे सतत जाणवत होते. नानाची व माझी ही पहिली आणि कायमस्वरूपी आठवणीत राहणारी ग्रेट भेट !
नानाचे पहिल्या भेटीतच अनुभवलेले वागणे – बोलणे या माणसाविषयी उत्सुकता, प्रेम, आदर आणि करुणा निर्माण करणारे. पहिल्या भेटीतच “माझीये जातीचा मज भेटो कोणी…’ अशी आस लावणारे. या माणसात सत्त्वयुक्त असे काहीतरी आहे, भौतिक सुखदु:खाच्या चौकटीत न बसणारा हा माणूस आहे. मूल्ययुक्त जगणे जगताना सवंग तडजोडी न स्वीकारणारा, काहीसा फटकून वागणारा, आतल्या आवाजाशी समांतर वर्तन व्यवहार करणारा निष्पाप आणि निष्कलंक माणूस म्हणून नाना उत्तरोत्तर अधिकच आकळत गेला. नाना जसा शाळा महाविद्यालयात शिकला तसा आणि त्याहूनही जास्त जगाच्या उघड्यावाघड्या विद्यापीठात अधिक शिकला. त्यामुळे अनुभवाने मिळालेले समृद्ध शहाणपण या माणसाला लाभले असल्यामुळे त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
सायकल चालवत महाविद्यालयात
ऊन, वारा, पाऊस ऋतु कोणताही असो अथवा लग्न, मुंज, बारसे किंवा बारावे तेरावे प्रसंग कोणताही असो नाना शांतपणे आपल्या स्वभावाला साजेशा वेगाने सायकल दामटीत सर्वत्र संचार करताना दिसतात. नानाच्या रूपाने सायकल चालवत महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना शिकविणारा प्राध्यापक हे देखील एकविसाव्या शतकातील अभावानेच सापडणारे उदाहरण. कुणी त्यांना “एखादी फटफटी घ्या की राव!’ असा अनाहूत सल्लाही देणार नाहीत. कारण असा सल्ला दिलाच तर नाना ते मनावरही घेणार नाहीत. हे त्यांना ओळखणाऱ्या सर्वांनाच चांगले ठाऊक आहे. ते अशा सुखासीनतेच्या सवयी मनावर घेत नाहीत तेच बरे आहे. कारण दुचाकीवर काळा गॉगल डोळ्यांवर चढवून जोराने हॉर्न् वाजवत समोरून येणारे नाना ही कल्पनाच करवत नाही.
ताठ मनाने सायकलवरून प्रवास
1980 – 90 च्या दशकात स्वत:ची चारचाकी गाडी असणे हे जसे श्रीमंतीचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात होते. तसे 21 व्या शतकात निपाणी परिसरात सायकल चालविण्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या असामींमध्ये नानाचे नाव अग्रेसर म्हणून घ्यावे लागेल. कोणत्याही खोट्या प्रतिष्ठेला आणि बेगडी श्रीमंतीला बळी न पडता नानांनी हा जो “सायकल योग’ जपला आहे; तो केवळ त्यांनाच खुलून दिसतो. कारण यात त्यांनाच साधलेला जो सहजयोग आहे; तो इतर कुणा चवचाल माणसाने अंधपणाने स्वीकारण्याचा प्रयत्न केलाच, तर तो हास्यास्पद ठरण्याचीच श्नयता अधिक! नाना पूर्वी ताठ कण्याने सायकलवर बसायचे आता अलीकडे पाठीच्या दुखण्याने डोके वर काढल्याने ते ताठ मनाने सायकलवरून प्रवास करतात; फरक असलाच तर तो इतकाच. पण पूर्वीपासूनच सायकलीशी त्यांनी अव्यभिचारी निष्ठा बाळगली आहे. अगदी आपल्या लहानग्या मुलांनाही पुढे बसवून नित्याचा बाजारहाट ते मन लावून करताना दिसतात. मग बाजारात कुणीतरी हटकते, “नाना, झाला का बाजार? आज काय नातवंडांना घेऊन…’ नाना त्यांनाही हसून दाद देतात. ही अशी मुले आणि तीच नातवंडे असा चमत्कारिक पण वास्तव नातेबंध निर्माण झाल्याचा आनंदही ते मनापासून घेतात; आणि हा अनुभव आपल्या मित्रमंडळींमध्ये दिलखुलासपणे शेअरही करतात.
“आपुलाची वाद आपुणाशी’ असा बाणा
चारचौघांना जशा मिळतात तशा सर्वच गोष्टी नानांना मिळाल्या आहेत; घर, नोकरी, लग्न, मुलेबाळे इत्यादी. पण हे सारे तसे उशीरानेच. योग्य ती योग्यता जगाच्या बाजारात सिद्ध केल्यानंतरही. प्रचंड हालाखीतून शिक्षण, मग नोकरीसाठी वणवण, खेटे, हातउसणे, आर्थिक टंचाई पाचवीला पुजलेली, हातात आलेल्या कोकणातल्या नोकऱ्यांवर कायमची टांगती तलवार, अंधातरीपण, शरीर, मन, भावना यांची कुतरओढ, आईचं आजारपण, तरुणपणाल्या मृत्यूमुळं वाट्याला आलेला बहिणीचा विरह अशा या उमेदीच्या वयात आलेल्या वावटळीपुढे संवेदनशील, प्रामाणिक माणूस हतबल न होईल नाहीतर काय? या अशा हतबलतेला नानांनी आपल्या अभ्यासात वाचन, चिंतन – मननात मुरविण्याचा प्रयत्न केला. “आपुलाची वाद आपुणाशी’ असा बाणा जपत स्वत:चे दु:ख स्वत:लाच सांगितले असावे. त्यामुळेच या दु:खातून तरंगत वर आलेल्या अलौकिक आनंदमार्गी नवनीताने या मस्तमौला फकीराची झोळी शिगोशीग भरून गेलेली आहे. तीच त्याची खरी साथसोबत करते आहे.
सदैव “ना’ “ना’…
योगायोग असेल कदाचित, याच्या नावातच एकदा नव्हे तर दोनदा “ना’ आहे. कुठेही हो नाही. सदैव “ना’ “ना’. या माणसाच्या उभ्या आयुष्यात पहिल्या झटक्यात कधीच इच्छिलेले काम झाल्याचे ऐकिवात नाही. सदा “ना’ “ना’ च. डोळे, मन, मनगट अवघे शरीरच आता थकून गेलेले आहे. हा “ना’च काही थांबण्याचे नावच घेत नाही.
नाना नोकरीत खूप उशीरा स्थिरावले. मग उशिरानेच लग्न, मुले, घराची डागडुजी असे सगळेच उशिरा. पण याची कोणतीच खंत, खेद वा सल नानांच्या वागण्या – बोलण्यातून किंचितही डोकावत नाही. या अप्रियाची सहजपणाने हसून बोळवण. नोकरीत स्थिरावल्यावर “आता इथून पुढे तरी मला निवांतपणाने ग्रंथालयात बसून काही वाचता – लिहिता येईल.’ अशी प्रतिक्रिया. पगाराची, टी.ए.डी.ए., एच.आर.ए., कसले कसले फंड, झालेच तर कुठेतरी साठवून ठेवलेली रक्कम, व्याज अशी मध्यमवर्गीय संकोची बकबक अक्षरानेही नाही. इथेही “जोडोनिया धन उत्तम वेव्हारे…’ अशीच वृत्ती. कारण या गोष्टी आवश्यक असल्या तरी त्यात किती गुंतायचे? हे नानांनी नेमके ओळखले असावे. ठरावीक मर्यादेनंतर या गोष्टीतले फोलपण जाणवू लागते माणसाला. पण अंगांगी मुरलेला स्वार्थ या जाळ्यातून सुटका करू देत नाही. घुसमट जाणवते पण जाळ्यातून पाय निघत नाही तो नाहीच. अशा या गोष्टींमधील वैयर्थ्य नानांनी केव्हाच जोखले आहे. या पल्याड त्यांना आयुष्यातील कडवट अनुभवांनी केव्हाच पार नेले आहे. हातातोंडाशी आलेला घास नियती कसा निर्दयीपणाने ओरबाडून घेते; याचा पत्ताच लागत नाही. असे चिमटीतले कितीतरी घास नियतीने निष्ठूरपणाने नानाकडून हिसकावून घेतलेले आहेत. अशा अवस्थेत हताश हतबलतेने त्याकडे पाहण्यावाचून काहीच करू शकत नाही माणूस. नानाही मग “घेऊन जातेस बाई? जा ! तुझे तरी पोट भरू दे एकदाचे…’ असे म्हणत खेचून घेतलेल्या ताटावरून संथपणे उठतात. खरकटलेले हात स्वच्छ करत पुन्हा एकदा नवी उमेद गोळा करत आपल्या वाटेने हसत हसत शांतपणे निघून जातात.
मूळ स्वभावाला न साजेसा स्वर
लौकिकार्थाने आयुष्यातील अल्पस्वल्प आनंदाला सुरुवात झाल्याचे समाधान कोणाला नाही वाटणार. नानांनाही ते वाटले. केव्हा तर नोकरीत काहीसे स्थिरस्थावर झाल्यावर. आता माझ्याबरोबरच माझ्या मुलाबाळांच्याही उर्वरित आयुष्याची काळजी उशिराने का होईना पण कायमची मिटेल असे कृतार्थतेचे उद्गार नाना अधूनमधून काढत असत. पण ही माफक इच्छाही काळाच्या कराल चक्रात फसत चालल्याची पाहून नाना पुन्हा हतबल होतात की काय असे वाटू लागले आहे. “निवृत्तीवेतनाचा निकाल आता आमच्या विरोधी लागला आहे. काय होते ते कळत नाही.’ असा काळजीचा त्यांच्या मूळ स्वभावाला न साजेसा स्वर पुन्हा एकदा नानांच्या तोंडून ऐकू येऊ लागला आहे. हे ऐकून त्यांच्यासोबत आपणही हतबल असल्याची उदासवाणी जाणीव होते आहे. सन्मानाने, प्रामाणिकपणे जगणाऱ्या माणसांची कोणतीच हमी, सुरक्षितता घ्यावी त्याचे केवळ जगणेच नव्हे तर मरणेही सुखासमाधानाचे; व्हावे अशी माफक अपेक्षाही आता सर्वदूरची गोष्ट ठरते आहे. अशा अपेक्षांचा नाना हा पहिला प्रातिनिधिक बळी असावा असे वाटते.
कामाविषयीचे मातृवत प्रेम
दुर्दैवाचे दशावतार पचविलेल्या नानांची इतके सारे होऊनही आपल्या कामांप्रतीची निष्ठा अभंग आणि अव्याहत आहे. भौतिक बजबजपुरीत अख्ख्या आयुष्यालाच बाजारू मूल्य आलेले असताना यात आपले जगणे, चाचपडणे, स्थिर होणे संपता संपत नसल्याची प्रखर जाणीव ध्यानात घेऊनही नाना मोठ्या संयमाने परिस्थितीशी दोन हात करताहेत. स्वत:च्या कुरबुरणाऱ्या शरीराचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे सवंग प्रदर्शन न मांडता, लंगडे समर्थन न करता आपल्या भागधेयाचे अदृश्य जू ख्रिस्ताच्या करुनेने ते वागवत राहिलेले आहेत. महाविद्यालयात सर्वात आधी येऊन काम करत बसलेले नाना अनेकदा शिपायांसोबत सायंकाळी दारे खिडक्या बंद करून कुलूप लावून शांतपणे सायकलीचे पायंडल दाबत घरी परतताना दिसतात. घरोघरी सर्वांच्या आधी आई उठलेली असते; आणि सारे घर रात्रीचे झोपी गेले की मगच ती अंथरूण पसरते. नानांचे आपल्या सर्वच प्रकारच्या कामाविषयीचे प्रेम हे असेच मातृवत आहे.
आयुष्यभर प्रसिद्धिपराङ्मुख
नानांच्या वृत्तीप्रवृत्तीला आणि व्यासंगाला साजेसे कोणतेही काम निश्चिंतपणाने सोपवावे आणि ते काम नीटनेटके, परिपूर्ण झाले म्हणून खुशाल समजावे. कार्यक्रमाच्या नियोजनापासून पाहुण्यांची सरबराई, ते बातमी लिहिण्यापासून ते वर्तमानपत्र स्वत:च्या खिशाला खार लावून विकत आणून एका स्वच्छ कागदावर डकवून संबंधितांकडे दिल्याशिवाय नाना स्वस्थ बसणार नाहीत. इतर अनेकप्रकारच्या कामाबरोबर प्रसिद्धी विभागाची धुरा नानांच्या खांद्यावर दिलेली आहे. हा ही एक विचित्र योगायोग समजला पाहिजे. कारण हा माणूस आयुष्यभर प्रसिद्धिपराङ्मुख राहिला. आपले कुठे नाव छापून यावे, कुठे एखादे छायाचित्र प्रसिद्ध व्हावे अशा सवंग लोकप्रियतेपासून नाना कायमच चार हात दूर राहिले. त्यामुळे “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन’ या गीतेतल्या उक्तीप्रमाणे नानांनी स्वत:ला असल्या क्षुल्लक प्रलोभनांपासून दूरच ठेवले आहे. ज्या कामाचा चांगला गवगवा व्हावा, कौतुक व्हावे असे निश्चितच वाटत होते; त्याबाबतीतही नाना तटस्थच. दहावी, बारावीच्या अभ्यासमंडळावर मराठी विषय तज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेले काम उदाहणादाखल सांगता येईल. या कामाकरिता त्यांची उभ्या महाराष्ट्रातून निवड झालेली. अभ्यासक्रम तयार करण्याच्या कामीही त्यांचे भरीव काम, सतत वरिष्ठांशी आणि इतर तज्ज्ञांशी वैचारिक देवाणघेवाण, बैठका, प्रवास, अभ्यागत व्याख्याने पण या साऱ्यांचाही ना बडेजाव ना दडपण ना कौतुकाची अपेक्षा! कितीही कष्ट पडोत हाती दिलेले काम नीटनेटके, निर्दोष आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे हाच ध्यास. जी वृत्ती राज्यपातळीवर काम करताना तीच अगदी स्थानिकपातळीवरही. प्रमाणलेखनाबाबत तर नानांचा इतका कटाक्ष की या माणसाच्या शरीरात रक्त वाहते की शुद्धलेखन? असा प्रश्न पडावा.
हे “नानाउद्योग’ !
नानांसोबत काम करताना एकप्रकारची अदृश्य सुरक्षितता, निश्चिंतपणा सतत जाणवत असतो. त्यांच्यासमवेत काम करणे म्हणजे जणूकाही एकप्रकारचा आनंददायी सोहळाच असतो. ते एकदा वकृत्त्व स्पर्धेचे समन्वयक होते. मी परीक्षक. संध्याकाळी पारितोषिक वितरणाकरिता पाहुणे यायचे होते. तोपर्यंत मुलांपुढे – स्पर्धकांपुढे बोलत राहून वेळ काढणे गरजेचे होते. नानांनी मला, “सर, पाहुणे गावातून येतच आहेत; एवढ्यात येतील ते. तुम्ही तोपर्यंत मुलांना काहीतरी सांगत गुंतवून ठेवा !’ असे सांगितले. “नानाज्ञा’ म्हणून मीही नाही म्हणालो नाही. मी बोलत राहिलो. खूप वेळ झाला. पाहुणे यायचा पत्ता नाही. मी बोलतोच आहे. मुलेही बिचारी ऐकत होती. जवळपास चाळीसएक मिनिटे झाली असतील. मग पाहुणे आले. व्यवस्थित कार्यक्रम पार पडला. मी नानांना मग म्हणालो, “नाना, निपाणीहून महाविद्यालयात यायला पाहुण्यांना इतका वेळ कसा लागला ? तर नाना गगनभेदी हसत सांगत होते. “अहो, पाहुणे निपाणीतून नव्हे; तर कोल्हापुरातून येत होते. तुम्हीही बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका मस्तच रंगविलीत…’ आता यावर काय बोलावे? असले हे “नानाउद्योग’ !
“सुवर्णसंचित’
नानांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे कामही गेली कितीतरी वर्षे आनंदाने आणि मन लावून केले आहे. महाविद्यालयाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक विशेषांक प्रकाशित करण्याची जबाबदारी प्रशासनामार्फत अर्थातच अस्मादिकांवर सोपविण्यात आली. या कामाच्या प्रसंगी नानांसोबतचे काही प्रसंग अजूनही चांगलेच स्मरणात राहिले आहेत. काही किरकोळ कामे वगळता “सुवर्णसंचित’ जवळपास पूर्ण झालेला. मुखपृष्ठ अत्यंत बोलके होते; तरीही मुखपृष्ठावर कवितेच्या चार ओळी आवश्यक होत्या. कुणीतरी मग मला “अहो, तुमचे एवढे वाचन, चिंतन आहे म्हणतात लोक, कवितेच्या चार ओळी लिहायला मग तुम्हाला अडचण पडू नये.’ असे काहीसे म्हणाले. जातिवंत कवितेसाठी आपल्याला आतले काय काय जाळायला लागते, याचा चांगलाच अनुभव घेऊन कविता लिहिण्याचा नाद मी केव्हाच सोडून दिलेला होता. असो! रात्रीचे दहा वाजले असावेत. कोल्हापूरचे बस स्टॅंड, नाना व मी एसटीची वाट पाहतो आहोत. घरी वाट पाहणारी मुले. माझे कशातच लक्ष नाही. दोघांच्याही भुका विरून गेलेल्या. दोघेही गप्प गप्पच. माझ्याबरोबर नानांनाही हे कुठेतरी सलत असावे. नानांना निपाणीच्या गाडीत बसवून मग मीही घरी निघून गेलो.
नाममुद्रा उमटविण्याची सुवर्णसंधी !
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच नाना महाविद्यालयात हजर. नानांमधील उपसंपादक चांगलाच जागा झालेला. चहाच्या वेळेत नानांनी स्टाफरूममधील समस्त कवींना जणू काही आवाहन केले. “””सुवर्णसंचित’च्या मुखपृष्ठावर कवी म्हणून नाममुद्रा उमटविण्याची सुवर्णसंधी ! संस्थेची समग्रता अधोरेखित करण्याऱ्या चार ओळी अंकाच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात येणार असून दुपारपर्यंत महाविद्यालयातल्या कवींनी आपल्या स्वरचित काव्यपंक्ती संपादक मंडळाकडे सुपूर्द कराव्यात.” झाले ! जागृत, निद्रिस्त, आपण केव्हातरी कवी होतो; हेही विसरलेले अनके बिचारे कवी खडबडून जागे झाले. यात खरोखरच चांगल्या कविता लिहिणारेही कवी होते. तेही प्रयत्नाला लागले. भराभर त्यांची कविता कागदावर प्रसवू लागली. दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत आश्चर्य वाटेल पण जवळपास संख्येने नव्वदच्यावर चारोळ्या जमा झाल्या. इतकी जबरदस्त काव्यप्रतिभा आपल्या महाविद्यालय सुप्तावस्थेत असलेली पाहून अचंबित व्हायला झाले. कविता घेऊन नानाकडे गेलो. हे सारे त्यांच्या पुढ्यात धरले तेव्हाचा दाढेखालील तंबाखूची गोळी जिभेने घट्ट घरून गालातल्या गालात हसत माझ्याकडे पाहणाऱ्या नानांचा चेहरा अजूनही लख्ख दिसतो आहे.
एका दगडात नव्वद पक्षी !
केवळ नानांच्या ह्या अशा सक्तीवजा प्रेमळ हिकमतीमुळे कवितांचा हा असा मुसळधार पाऊस पडलेला होता. आणि माझ्याही चेहऱ्यावर आधल्या रात्री जमा झालेले मळभ अंशत: दूर होऊन पावसाच्या पाण्याचे चार दोन टपोरे थेंब स्पष्ट दिसू लागले होते. नानाच्या व्यक्तिमत्त्वातला हा पैलू आठवून मी आजही अनेकदा आश्चर्यचकित होऊन जातो. माणसे एका दगडात दोन पक्षी मारतात हे ऐकले होते; पण एका दगडात हे असे नव्वद पक्षी किंचितही घायाळ न होता नानांनी सहजपणाने पकडले होते.
उतरली असेल तर बोलू का?.
सुवर्णसंचित प्रकाशित होण्यादरम्यानची आणखी एक हकीगत इथे सांगितल्यावाचून राहवत नाही. एका भल्या सकाळी सांगलीहून मला आमच्या एका गुरुवर्यांचा फोन आला. फोनवर ते तावातावाने असे काहीसे बोलत होते; “”उतरली असेल तर बोलू का?… तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. बरं, प्यायचीच होती तर त्या सज्जन माणसाला कशाला नादी लावतो आहेस. तंबाखू सोडली तर त्या नानाला कशाचे व्यसन नसेल, असे मी समजत होतो. पण तीही माझी घोडचूकच. तुम्ही दोघांनीही माझा घोर अपेक्षाभंग केला आहे. त्या जामदारमुळे तू बिघडला आहेस की तुझ्यामुळे तो? लाज नाही वाटत स्टॅंडवर भर चौकात ढोसताना… वर प्राध्यापक म्हणवून घेता स्वत:ला? तुमचे तोंडही पहायची इच्छा नाही माझी…(खाड्कन् फोन ठेवत.) वगैरे वगैरे… सर थांबतच नव्हते. त्यांचा चांगलाच काहीतरी गैरसमज झाला होता. मला नेमके काय झाले आहे काहीच कळेना. खूप विचार केला काय झाले असेल ते. मग हळूहळू लक्षात येऊ लागले. अंकाचे दररोजचे काम झाले की नाना व मी दोघे स्टॅंडवर एका टपरीवजा दुकानात चहा घेऊन निघत असू. ती टपरी होती मुख्य रस्त्यापासून थोडी आतील बाजूस. लहानमोठ्या दुकानांची ही गर्दी. तिथेच कुठेतरी एक देशी दारू विक्रीचे दुकानही आहे. बहुतेक सरांनी आम्हाला तिथेच कुठेतरी पाहिले असावे. कारण आत शिरताच रस्त्यावर मोठ्या अक्षरात देशी दारूचे दुकान अशी कमानवजा पाटी लावलेली आहे. गंमत म्हणजे त्या कमानीखालूनच चहाही प्यायला जावे लागते. आमच्या ध्यानात मनातही नाही. पण सरांना काही भलतेच वाटले आणि त्यांनी थेंबालाही स्पर्श न करणाऱ्या दोन निष्पाप जिवांना अट्टल बेवडे ठरविले. नंतर सरांना हे सारे यथावकाश समजावून सांगितले नशीब त्यांचीही खात्री पटली. त्या अवधीत सरांनीही कदाचित ते अजब ठिकाण पाहून घेतले होते की काय कुणास ठाऊक ?
बाई ! या फकिराच्या नादी का लागते आहेस?
नाना तसा अट्टल निपाणीचा. निपाणी पूर्वापार तंबाखूचे गाव. त्यामुळेही असेल नाना तंबाखूशीही अत्यंत एकनिष्ठ माणूस. त्याने कुणा मुलीवर प्रेम केले होते का ? किंवा त्याच्यावर कुणा सुंदर मुलीने प्रेम केले होते का? ते दोघे एकमेकांशी कितपत एकनिष्ठ होते ? या तपशीलात जाण्याचे मुळीच कारण नाही. नानाचे एकूण आयुष्य पाहता; नाना या आडवाटेला कधी गेले असतील; असेही म्हणता येत नाही. एखादी बिचारी आलीच चालून आणि तिने धाडसाने एक लिहिलेच प्रेमपत्र तर नानांनी तिला प्रथम शांतपणे बोलावून घेतले असते; आणि प्रेमपत्रातल्या शुद्धलेखनातल्या चुका समजावून सांगितल्या असत्या. मग चारचौघातच शांतपणे तिला सांगितले असते, “”बाई ! या फकिराच्या नादी का लागते आहेस? सोड हा नाद! कुणा भल्या पुरुषाच्या गळ्यात माळ घालून सुखाचा संसार कर. माझे आशीर्वाद तुझ्या आणि तुझ्या होणाऱ्या मुलाबाळांच्या सदैव पाठीशी आहेत!” तर ही अशी प्रेमाबिमातली एकनिष्ठता नानाच्या वाट्याला येणे श्नयच नाही. त्यामुळे आयुष्यातल्या संघर्षाशी झटाझोंबट करताना नानांना केव्हातरी अजाणतेपणाने तंबाखूचे व्यसन लागले. माणसांची तोंडपुंजी सहानुभूती, लंगडी कणव, लटके समर्थन हे नानांना कळत असावे म्हणून या साऱ्यांच्या नादी न लागता कदाचित ते तंबाखूशी हे असे एकनिष्ठ राहिले असावेत.
पीठाक्षरं’च्या निर्मितीत मोलाचं योगदान
“पीठाक्षरं’च्या निर्मितीत नानाचं मोठे मोलाचं योगदान राहिलं आहे. महादेव मोरे यांचं जीवन आणि साहित्य यावर आधारित एक लघुपट करण्याची कल्पना नानांनी लगेच उचलून धरली. ती पूर्ण करण्याकामी पूर्ण सहकार्य त्यांनी दिलं. केवळ सहकार्यच नाही तर या योजनेत ते सहभागीही झाले. मोरेमामांच्या घरी जाताना खाण्याचे साहित्य कापडी पिशव्यामध्ये भरून घेऊन नाना माझ्या अगोदर स्टॅंडवर वाट पाहत उभे होते. मी सहज म्हटले, “अहो नाना, हे सारे काय घेतले आहे?’ तर हसत हसत म्हणतात कसे, “अहो, आपण हे असे पहिल्यादांच मोरेमामांकडे चाललो आहोत. आणि असे कुठेही जाताना रिकाम्या हाती जाणे बरे दिसेल का?’ इतके सौजन्य समजूतदारी आणि सहजता पाहून मलाही भरून आले. माझ्या लक्षातही न आलेली गोष्ट नानांनी ही अशी सहजपणाने साधलेली होती. महादेव मोरे यांच्याविषयी नानांच्या मनात आदर आणि भक्ती आहे, अव्यभिचारी निष्ठा आहे. मोरेमामांशी संवाद साधताना ती ठायीठायी ठिबकत होती.
अनोखी श्रद्धांजली
अशीच काहीशी निष्ठा त्यांची त्यांच्या गुरुवर्यांसंदर्भातही आहे. प्रा. पी. डी. गुमास्ते, डॉ. आर. एन. कुलकर्णी आणि प्रा.अशोक परीट ही मोजकीच पण महत्त्वाची अशी नानांची श्रद्धास्थानं. “या सर्वांचे आपण विद्यार्थी आहोत !’ अशी सार्थ मिरासदारी नाना नेहमी अभिमानाने मिरवत असतात. गुमास्तेसरांचे निधन झाल्यावर नाना पोरकेपणाच्या भावनेने मूक होऊन गेलेले अनेकदा दिसत असत. त्यांच्या आठवणी सांगताना त्यांचा स्वर कातर झाल्याचे जाणवत असे. नानांनी गुमास्तसरांना खऱ्या अर्थाने अनोखी श्रद्धांजली वाहिली; ती त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मरणिका प्रकाशित करून. नानांनी त्यांना अशाप्रकारे जी आदरांजली वाहिली ती आधुनिक गुरुशिष्य संबंधांवर वेगळाच प्रकाश टाकणारी आणि खचितच अनुकरणीय ठरली आहे. जिथे स्वत:च्या जन्मदात्यांचा सोयीस्कर विसर पडतो; त्या कालखंडात हे नातेबंध माणुसकीतला ओलावा जपणारे वाटतात. हे नानांना कुणी सांगितले नाही; की आर्थिक सहकार्यही कुणी केले नाही. त्याची अपेक्षाही नानांना नव्हती. होता तो केवळ गुरुंप्रती आदर आणि नि:स्वार्थी प्रेम ! एकूणच आपल्या समाजात सुसंवादाचं, नातेसंबंधांचं वैराण वाळवंट होत असताना ही अशी मरूद्यानं मनाला शांतवत असतात-दिलासा देत असतात.
स्वत:च स्वयंप्रकाशी
नानांनी अशा मरूद्यानांच्या अनेक बागा फुलविलेल्या आहेत. नानांनी फुलविलेल्या या अशा मरूद्यांनांच्या हारीने फुललेल्या झाडावेलींची फार मोठी गरज आज आपल्या समाजाला आहे. कधी नव्हता इतका आपला समाज दुभंगल्याची, विखंडित होत असल्याची जाणीव अस्वस्थ करते आहे. ही दुर्गती अस्वस्थ, निराश करणारी प्रसंगी उद्वेगजनक ठरते आहे. स्वकेंद्रितता, मतलबीपणा, निर्लज्ज वाचाळता, विद्वत्तेचा पोकळ बडेजाव, सवंग लोकप्रियतेचा हव्यास, वडीलधाऱ्यांविषयीची तुच्छता, सत्ता आणि मत्ता यासाठी संघटन शक्तीचा सुनियोजित ऱ्हास, कष्टाची लाज, संधिसाधूपणा, अनाठायी अहंकार, विसंवादित्व ही अशी यादी खूपच लांबविता येईल. अशा आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक गदारोळात नानांसारख्या खूप साऱ्या माणसांची गरज असते. दुर्दैवाने आपल्या शिक्षणव्यवस्थेतून अशी माणसे घडविण्याची संधी दिसामाजी कमी कमीच होते आहे. अपवाद वगळता आपल्या एकूणच शिक्षणव्यवस्थेला सवंग बाजारू मूल्य निर्माण झाले आहे की काय ? अशी शंका घेण्यास पुरेसा अवसर निर्माण होऊ घातला आहे. माणूस आणि त्याचे उपजतच असणारे निष्पाप, निष्कलंक मन याकडेही पैसा मिळवण्याचे साधन म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. अशा अवस्थेत नानांसारखी माणसे घनघोर अंधारात मोठ्या संयमाने सद्विचाराचे आणि सुविचाराचे दीप पाजळत असतात. आपल्या भोवतालचा परिसर उजळत असतात. हा दीप, ही समई, हे निरांजन निगुुतीने सांभाळायचे असते ते तुम्ही आम्ही. परवाच कुणीतरी म्हटलं; नानाला आणि त्याच्या कामाला प्रकाशात आणलं पाहिजे. मी मनात म्हणालो, “अहो, जो स्वत:च स्वयंप्रकाशी आहे त्याला प्रकाशात आणणारे तुम्ही आम्ही कोण?’
“नानाको इतना घुस्सा क्यों आता हैं ?’
नाना देव नाही. निखळ माणूस आहे तो. माणसांमधील सारे षड्विकार नानाच्याही पाचवीला इतरांसारखेच पुजले गेले आहेत. प्रश्न हा आहे की या नित्याच्या कसोटीत आपण खरे किती उतरतो ? नानांनी मात्र या परीक्षेत आपल्यापेक्षा निश्चितच अधिक गुण मिळविलेले आहेत. उज्जल यश संपादन केलेले आहे; असेच म्हणा ना ! कित्येकदा नानाच्या रागाचा पारा चढतो. समोरच्या व्यक्तीचे चूक असेल तर पद, प्रतिष्ठा मानमरातब अगदी कशाचाही मुलाहिजा न बाळगता नाना समोरच्याला असे काही फैलावर घेतात; की कडाक्याच्या थंडीतही घाम पुसता पुसता समोरच्याला एक रुमाल पुरू नये. त्यामुळे “नानाको इतना घुस्सा क्यों आता हैं ?’ या प्रश्नावर आम्हा नानाप्रेमी मंडळींचे आजतागायत विचारमंथन सुरू आहे. म्हणूनच नानाला देवत्व बहाल करून आपण पळवाटा शोधू नयेत. ह्या माणसाच्या आचार, विचार आणि त्याला साजेशा कृतींमधूनच या माणसाला जाणून घ्यावे. यातील चार गोष्टींचा स्पर्श आपल्याला होऊन या माणसासारखंच आपणही आपला भवताल निष्ठेने उजागर करावा. नाना आपल्यासारखाच चारचौघांसारखाच आहे; फरक असलाच तर तो इतकाच की लौकिक संधिसाधूंच्या कळपात स्वत:च्या उपजत शहाणपणामुळे चार अंगुळे वेगळेपण त्याच्या वाट्याला आलेले आहे. आणि ते वेगळेपण त्याला शोभूनही दिसते. ते त्याला जपावे लागत नाही; कारण तेच त्याच्या र्नतातून, पेशीपेशींमधून अव्याहतपणे प्रवाही आहे. या शहाणपणाला उथळ खळखळाट नाही; तर ते झऱ्यासारखे उन, वारा, पाऊस-निसर्गाच्या नाना तऱ्हा रिचवून माणसांच्या जंगलामधून शांतपणे वाहते आहे.
एक अश्राप जीव
हा एक अंतर्बाह्य साधेपणा मिरवणारा उत्कट माणूस आहे. तो परिस्थितीच्या कराल दाढेत फसलेला, नाडला गेलेला एक सर्वसामान्य माणूस आहे . कोणत्याही व्यक्तीप्रती, कुटुंबाप्रती आणि समाजाप्रती इतके सारे घडून गेल्यानंतरही किंचितसाही कडवटपणा आपल्या वागण्या-बोलण्यात न येऊ देणारा हा तुमच्या आमच्यातला एक अश्राप जीव आहे. अशी माणसे तथाकथित चवचाल सामाजिक चौकटीत बसत नाहीत. त्यांना तसे बसूच दिले जात नाही. न्वचित अशांना एकटे, एकाकी पाडले जाते. अशांचे अरण्यरुदन संवेदनशून्यांच्या काळजापर्यंत पोचत नाही. पोहोचलेच तर सोयीस्कर नजर अंदाज केले जाते. अर्थातच याचे कोणतेच सोयरसुतक अशांना नसते. ती आपली “आहे मनोहर तरी…’ या वृत्तीने जगत असतात. अशा मतलब्यांच्या जंगलात नानांसारखी माणसे निर्भयपणे वावरत असतात. कारण त्यांना लौकिकाची कसलीच कांक्षा नसते.
प्रश्न उरतो तो अशा नानासाठी आम्ही देणार आहोत? कारण या मस्तमौला फकिराची सत्कर्माची झोळी केव्हाच शिगोशीग भरून गेली आहे. त्याला कोणता मार्ग आम्ही दाखविणार आहोत? कारण त्याने स्वत:चीच काठाशी हिरवळ असलेली देखणी पायवाट निर्माण केलेली आहे. आम्ही त्याला लौकिकातले कसले पद देणार आहोत? कारण त्याने नक्षत्रासारखे अलौकिक असे अढळ स्थान निर्माण केले आहे. त्याला कशाने शृंगारणार आहोत ? कारण त्याने अंतरीच्या सहज साधेपणाने आपले तन-मन केव्हापासूनच झगझगगीत ठेवले आहे. त्याला कोणत्या परीने साद घालणार आहोत? कारण ज्याने आयुष्यभर आपल्या आतल्या आवाजाशी इमान बाळगले आहे…!!!
म्हणूनच केवळ नानांसाठी खूपखूप दिवसांपूर्वीपासून एक अवतरण कोंदणात जपून ठेवले आहे –
जेथे जातो तेथे “तो’ तुझा सांगाती / चालवील हाती धरोनिया //
1 comment
नानांसारखी साधी माणसे अगदी मनाला भावणारी . खूप छान अलंकारिक वर्णन.