December 11, 2024
ShriGurukurpa Amrut Varshav article by Rajendra Ghorpade
Home » Dnyneshwari : श्रीगुरूंच्याकृपेचा अमृतमय वर्षाव
विश्वाचे आर्त

Dnyneshwari : श्रीगुरूंच्याकृपेचा अमृतमय वर्षाव

अवघड वाटणारी कामेही सद्गुरुंच्या अनुभूतीमुळे सहज होतात. या सहज बोधातूनच श्रद्धेत वाढ होते. सहजतेतून मनाला समाधान वाटते अन् सद्गुरुप्रती विश्वास, प्रेम वाढते. प्रेम हे नित्य अतृप्त असते. त्यामुळे प्रेमाचा वर्षाव हा अखंड अन् अविरत सुरू राहातो. हा निसर्ग नियम आहे. यातूनच शिष्याची आध्यात्मिक प्रगती होत असते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

ते सत्वशुद्धी साहाकारें । गुरुकृपामृत तुषारे ।
सासिन्नलेनि बोधें वोसरे । द्वैतदैन्य ।। २५९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – तेंव्हा त्यांना अंतःकरण शुद्धीचे साहाय्य मिळून, त्यावर श्रीगुरूंच्याकृपेचा अमृतमय वर्षाव झाला म्हणजे भरभराटीला आलेल्या बोधाच्या जोरावर, भेदामुळे उत्पन्न होणारी दीनता पारच हटते.

सद्गुरुंची कृपा कशी असते ? शिष्याची अंतःकरण शुद्धी करणारी ही कृपा असते. शिष्यातील काम, क्रोध, वासना आदी विकार नष्ट करणारी ही कृपा असते. सद्गुरुंच्या नित्य अनुभुतीतून हे सर्व विकार हळूहळू कमी होऊन सद्गुरुंच्या प्रती प्रेमभाव उत्पन्न होत असतो. बोधातूनच सद्गुरु शिष्याला जागे करत असतात. शिष्याच्या चुका ते पोटात घालत शिष्याच्या प्रगतीसाठी नित्य झटत असतात. शिष्याच्या संसारीक जीवनातील अडअडचणी दूर सारून अनुभुतीतून पारमार्थिक ओढ त्याच्यात उत्पन्न करत असतात.

अवघड वाटणारी कामेही सद्गुरुंच्या अनुभूतीमुळे सहज होतात. या सहज बोधातूनच श्रद्धेत वाढ होते. सहजतेतून मनाला समाधान वाटते अन् सद्गुरुप्रती विश्वास, प्रेम वाढते. प्रेम हे नित्य अतृप्त असते. त्यामुळे प्रेमाचा वर्षाव हा अखंड अन् अविरत सुरू राहातो. हा निसर्ग नियम आहे. यातूनच शिष्याची आध्यात्मिक प्रगती होत असते. सद्गुरु शिष्याला आधार देत असतात. विश्वास देत असतात. प्रसंगी ते परीक्षाही घेत असतात. पण यातून शिष्याचा आध्यात्मिक विकास त्यांना साधायचा असतो.

शिष्याची मानसिक तयारी झाली तरच शिष्याची अंतःकरण शुद्धी होईल. यासाठी गुरूंचे प्रयत्न सुरु असतात. जीवनात येणाऱ्या अडीअडचणीवर गुरुंचे बहुमोल मार्गदर्शन शिष्याला मानसिक आधार देत असते. पण अंतःकरण शुद्धी ही शिष्याला स्वतःच करावी लागते. शिष्याला स्वतःच स्वतःचा विकास हा करावयाचा असतो. यासाठी शिष्याला स्वतःच स्वतःमध्ये बदल हा घडवावा लागतो. स्वतःमधील विकारांशी लढा हा शिष्याला स्वतःच लढायचा असतो. विकारांवर मात करण्यासाठी सद्गुरु हे शिष्याला फक्त अनुभूती देत असतात. मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. गुरुंच्या कृपेने अंतःकरण शुद्धी होत असली तरी ही कृपा होण्यासाठी शिष्यालाच सर्वांगिण तयारी करावी लागते.

दैनंदिन जीवनात अपेक्षा ह्या कधीही संपत नसतात. कधी काही मिळते, कधी काही मिळतच नाही. यामुळे सुख-दुःखे ही जीवनात येतच राहातात. पण यापासून अलिप्त राहण्याची अनुभूती सद्गुरु देतात. जीवनातील सुख-दुःखांनी हुरळून जायचे नाही किंवा खचायचेही नाही. त्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन सम ठेवायचा. हा सम विचार स्वतःमध्ये विकसित करायचा असतो. यातूनच शिष्याला सद्गुरुंची कृपा होते. हा बाह्य जीवनातील तयारी अंतर्बाह्य असायला हवी. ही साम्यता अंतःकरणातही प्रकट व्हायला हवी. साधनेतही ही साम्यता साधायची असते. श्वासातही ही साम्यता मिळवायची असते. या सम विचाराच्या विजयानेच सद्गुरुंचा आत्मज्ञानाचा प्रसाद प्राप्त होतो. या प्रसादकल्लोळात भिजलेला जीव आत्मज्ञ होतो. बोधाच्या जोरावरच भेदामुळे उत्पन्न झालेली दीनता निघून जाते. देह आणि आत्म्याची ओळख आपणाला होते. गुरुंच्या प्रेमानेच, कृपेनेच ही अनुभुती येते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading