चंद्र हा कलेकलेने वाढतो. आज छोटा असेल उद्या तो आणखी थोडा मोठा झालेला पाहायला मिळतो. कलेकलेने तो पूर्णतेला जातो. तसे छोट्या छोट्या अनुभुतीतून स्वतःच्या आयुष्यात ज्ञानाची पौर्णिमा आणण्यासाठी नित्य साधना करायला हवी.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल – 9011087406
तैसे विश्व येणें नांवे । हे मीचि पैं आघवे ।
घेई चंद्रबिंब सोलावें । नलगे जेवीं ।। 377 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें विश्व म्हणून जें म्हणतात, तें सर्व मीच आहे. पाहा, चंद्रबिंब जसें सोलावें लागत नाही, (चंद्र पाहणे असल्यास) चंद्राच्या कला वेगवेगळ्या करण्याची जरूरी नाही.
विश्व हे विविधतेने नटलेले आहे. या विविधतेमध्ये मात्र ऐक्य आहे. साम्य आहे. ज्यामुळे हे विश्व एकसंघ झाले आहे. हे ऐक्य जाणणे गरजेचे आहे. त्याची अनुभुती घेणे गरजेचे आहे. तरच या विश्वाच्या विविधतेत सुख, शांती, समाधान नांदेल. विश्वाच्या ऐक्यातच सुख-समाधान आहे. तसे आपल्या या पंचमहाभूताच्या शरीरात सुख-शांती नांदण्यासाठी या देहाची ओळख, अनुभुती होणे गरजेचे आहे. देहात आलेल्या आत्म्याची ओळख यातून होईल. या आत्म्याचे आणि विश्वातील जीवाचे साम्य जेंव्हा अनुभवास येईल तेंव्हा आपणात एका वेगळ्याच शांतीची अनुभुती येईल.
अध्यात्म हे अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. या विश्वातील जीवांची, वस्तूंची अनुभुती घेऊन स्वतःला ज्ञानी करणे. स्वतः ज्ञानी होणे तोच खरा समस्त मानव जातीचा धर्म आहे. धर्म म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये जे योग्य कर्म केले जाते किंवा करवून घेतले जाते त्याला धर्म असे म्हणतात. मानव जन्म प्राप्त झाल्यानंतर मानवजातीचा धर्म जाणून घेणे गरजेचे आहे. हा जन्म का झाला याचा विचार होणे गरजेचे आहे. जन्माचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणजेच स्वतःची ओळख करून घेणे गरजेचे आहे. मी कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे. या विश्वात आपण कोण आहोत. हे जाणणे हा समस्त मानवजातीचा धर्म आहे. त्याची अनुभुती आल्यानंतर आपल्या आचरणात फरक पडतो. कारण मी आत्मा आहे. हा आत्मा प्रत्येक जीवात आहे याची अनुभुती आल्यानंतर आपण विश्वस्वरूप कसे आहोत याची अनुभुती येते. संपूर्ण विश्वात आपण कसे सामावलेलो आहोत याची अनुभुती घेऊन त्याची नित्यता जीवनात आणण्यासाठी साधना आहे. हे ओळखून नित्य साधना करायला हवी. यातूनच ज्ञान प्रकट होते. नित्यतेची अनुभुती येते. यातूनच मग आत्मज्ञान प्राप्ती होते. आत्मज्ञानी झाल्यानंतर इतरांनाही याची अनुभुती देऊन आत्मज्ञानी करणे हा धर्म आहे.
चंद्र हा कलेकलेने वाढतो. आज छोटा असेल उद्या तो आणखी थोडा मोठा झालेला पाहायला मिळतो. कलेकलेने तो पूर्णतेला जातो. तसे छोट्या छोट्या अनुभुतीतून स्वतःच्या आयुष्यात पौर्णिमा आणण्यासाठी नित्य साधना करायला हवी. चंद्रबिंबाच्यावर आवरण नाही. किंवा त्यावर साल, टरफल नाही. जे सोलून आपण त्याला पूर्णता आणू शकू. तर ते आपोआप कलेकलेने मोठे होत जाते. तसे स्वः ची अनुभुती हळूहळू येत राहाते. स्व च्या अनुभुतीतून चंद्राच्या कलेप्रमाणे आपोआपच आपली वाटचाल ही पूर्णतेकडे, सर्वज्ञ होण्याकडे होत राहाते. आयुष्यात अनुभुतीने एकदा पूर्णता आल्यानंतर पून्हा त्यामध्ये अज्ञान राहात नाही. त्या अनुभुतीत राहून इतरांनाही अनुभव देणे. जागे करणे, ज्ञानी करणे हे ज्ञानी मानवाचे कर्म आहे. यातून समस्त विश्व या ज्ञानाने उजळवायचे आहे.