March 27, 2023
Srujangandh Bahinabai Choudhari Creation Chandrakant Potdar Book
Home » बहिणाबाई चौधरी यांच्या निर्मितीचा ‘सृजनगंध’
काय चाललयं अवतीभवती

बहिणाबाई चौधरी यांच्या निर्मितीचा ‘सृजनगंध’

मुखपृष्ठावरील चित्रातून जात्यातील धान्याचे अंकुरून येणे खूपच सुंदर आहे. त्याच्यातील चिवटपणाची नाळ खास बहिणाबाई यांच्या कवितेशी भिडते. काळोख्या पार्श्वभूमीवरील हिरवी पालवी बहिणाबाईंच्या कवितेतील आशावाद दाखवणारीच आहे.

डाॅ. कैलास रायभान दौंड

email : kailasdaund@gmail.com
मोबाईल : 9850608611

बहिणाबाई चौधरी यांची कविता माहिती नाही असा माणूस शक्यतो महाराष्ट्रात सापडायचा नाही. त्यांच्या कवितामधील कित्येक ओळींना लोकोक्तीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. तरल संवेदनशीलता आणि त्यांच्या ठायी वसलेली मातृत्वाची भावना त्यांच्या कवितेतून सतत पाझरतांना दिसते. आपल्या भोवतीच्या निसर्गाशी स्वतःला अकृत्रिमरित्या जोडून घेत मानवी परिप्रेक्षात त्याचा कार्यकारणभाव शोधण्याची बहिणाबाईंची वृत्ती आहे. निसर्गरूपातून, निसर्गघटकातून त्या माणसाला नवे काही शिकायला भाग पाडतात. लोकजीवन आणि लोकाचार याचे नेमके आकलन, डोळस निरीक्षण आणि माणसाच्या स्वार्थी, ढोंगी स्वभावाचे अचूक विश्लेषण त्यांच्या कवितेतून अनुभावयास मिळते.

मराठी माणसाला आपलीशी वाटणारी कविता

निसर्ग आणि मानवी जीवनमूल्ये याची मनोज्ञ सांगडच बहिणाबाईंच्या अंतर्यामी असल्याचे त्यांच्या कवितांच्या ओळी ओळी मधून दिसते. निसर्ग घटकाशी मानवी वर्तनाला जोडणे त्यांना सहज ,उत्स्फुर्तपणे जमते. त्यातूनच ‘पाहिसनी रे लोकाचे । यवहार खोटे नाटे । तव्हा बोरी बाभयीच्या । अंगावर आले काटे ।’ असे त्या सहजपणे सांगुन जातात. कमालीचा आशावाद, उत्कट माणूसपण, मूल्यांवरील अतिव निष्ठा यांच्या बळावर ही कविता मराठी मनामनात सुभाषितांचे रूप घेत रुतून बसलेली आहे. त्यामुळे प्रत्येक संवेदनशील मराठी माणसाला बहिणाबाई चौधरी यांची कविता ‘आपली’ कविता वाटते.

आस्वादक समीक्षेतून बहिणाबाईंच्या कवितांचा धांडोळा

‘बहिणाबाई चौधरी यांची कविता सृजनगंध’ नावाचे प्रसिद्ध कवी आणि समीक्षक प्रा. डाॅ. चंद्रकांत पोतदार यांचे बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या रसास्वादाला उपयुक्त ठरेल असे आस्वादक समीक्षेचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ऐंशी पृष्ठाच्या या छोटेखानी पुस्तकातून बहिणाबाई यांच्या कवितांचे अनेक पैलू त्यांनी उलगडून दाखविले आहेत. पोतदार मूळातच कवी असल्याने या पुस्तकातील सर्वच लेख अतिशय वाचनीय झालेले आहेत. या पुस्तका मागील त्यांची भूमिका ‘आस्वादक समीक्षेच्या माध्यमातून बहिणाबाईंच्या कवितांचा धांडोळा घेणे हा आहे. हे खरेच.

कवितेचा सुस्पष्ट मागोवा

‘…सृजनगंध’ मधील प्रकरणावर नजर टाकल्यास बहिणाबाईंच्या कवितेतील – प्रापंचिकता, अध्यात्म, कृषिजाणीव, निसर्ग, स्रीचित्रण, लोकसंस्कृती, तत्वज्ञान, समाजप्रबोधन याचा स्वतंत्र प्रकरणात विचार केलेला दिसतो. अखेरीस बहिणाबाईंच्या कवितेतील आकलन आणि समारोप ही प्रकरणे येतात. यावरून लेखक प्रा. डाॅ. चंद्रकांत पोतदार यांनी बहिणाबाईंच्या कवितेचा घेतलेला बहुआयामी मागोवा लक्षात येतो. या प्रत्येक प्रकरणातून विवेचनासह सौदाहण त्या त्या घटकाला केंद्रस्थानी ठेवून कवितेचा सुस्पष्ट मागोवा त्यांनी घेतला आहे. प्रकरणवार मांडणी करून, संशोधकीय शिस्त बाळगून आणि कुठल्याही पदवीसाठी सादर न केलेला बहिणाबाई यांच्या कवितेवरील हा एकमेव ग्रंथ असावा.

हेही सृजनगंधचे यश

चांगली समीक्षा किंवा संशोधन हे पुढील समीक्षेची किंवा संशोधनाची दारे किलकीली करत असते. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील मूल्यनिष्ठा, मनोविश्लेषक बहिणाबाई, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील कार्य प्रेरणा, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील लोकतत्व, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेची प्रासंगिकता आदी बाबींना विचारात घेऊन माय मराठीतील या कवितेवर आणखी लिहीले जाऊ शकते असे सृजनगंध वाचल्यावर वाटते. अर्थात असे वाटणे हेही सृजनगंधचे यश म्हणावे लागेल.

काव्यपंक्ती समर्पक आणि नेमक्या

सृजनगंध ची भाषा झर्‍यासारखी अकृत्रिम आणि प्रवाही आहे. अवघड अवघड शब्दांचा प्रयोग करून तिला रूक्ष बनण्यापासून लेखकाने वाचवले आहे. त्यामुळे संपूर्ण लेखांमधील भाषेला ललित बाज प्राप्त झालेला आहे. हे लेखकाचे मोठेच यश आहे. लेखांमध्ये निवडलेल्या काव्यपंक्ती समर्पक आणि नेमक्या आहेत. बहिणाबाई चौधरी यांच्या अभ्यासकांना हा सृजनगंध टाळून पुढे जाता येणार नाही.

कविता वाचनाची प्रेरणा देणारे पुस्तक

मुखपृष्ठावरील चित्रातून जात्यातील धान्याचे अंकुरून येणे खूपच सुंदर आहे. त्याच्यातील चिवटपणाची नाळ खास बहिणाबाई यांच्या कवितेशी भिडते. काळोख्या पार्श्वभूमीवरील हिरवी पालवी बहिणाबाईंच्या कवितेतील आशावाद दाखवणारीच आहे. कवी लक्ष्मण महाडिक यांची प्रस्तावना .. सृजनगंध च्या अंतरंगावर प्रकाश टाकणारी आहे. वाचकांना काव्यास्वादाचा आनंद देतांनाच मूळ कविता वाचनाची प्रेरणा या पुस्तकातून मिळते.

पुस्तकाचे नाव : बहिणाबाई चौधरी यांची कविता सृजनगंध : समीक्षा.
लेखक : डाॅ. चंद्रकांत पोतदार
प्रकाशक : ऋतू प्रकाशन, नगर
प्रथमावृत्ती : १६ नोव्हेंबर २०२०
पृष्ठे : ८०. मूल्य :१०० ₹
( मुखपृष्ठ : विनोद पोतदार )

Related posts

पूरबुडीत क्षेत्रामध्ये उसाला सक्षम पर्याय शर्कराकंद उत्पादनाचा

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफमधून प्रेरणादायी जीवनाचे चित्रण – डॉ. यशवंत थोरात

Leave a Comment