कुठे शोधीशी रामेश्वर अन् कुठे शोधशी काशी देहातील भगवंत राहीला देहातच उपाशी. यासाठी या देहातील भगवंत, देव जाणावा, तो जाणणे. त्याचा अनुभव घेणे. त्याची अनुभुती येणे हेच तर अध्यात्म आहे.
– राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर ।श्रुति जयाचें घर । गिंवसीत आहाती ।। 307 ।। अध्याय 11 वा
ओवीचा अर्थ – देवा, आपण परब्रह्म आहात, आपण ( ओमकाराच्या) साडेतीन मात्रांच्या पलिकडे आहात. आपले ठिकाण वेद शोधीत आहेत.
सोऽहम हा स्वर आहे. स्वराचे अक्षर सोऽहम आहे. हे अक्षरच परब्रह्म आहे. देव आहे. या स्वरात आत्मा आहे. हा आत्मा अमर आहे. म्हणजेच हा स्वर म्हणजे आत्मा नव्हे. आत्मा हा त्या स्वराच्या पलिकडे आहे. या आत्म्यावर या स्वराने नियंत्रण मिळवता येते. ॐ काराने नियंत्रण मिळवता येते. म्हणजेच या ॐकाराच्या पलिकडे आत्मा आहे. तो मुक्त आहे. पण शरीरात आल्यानंतर तो शरीरात अडकल्यासारखा आपणास वाटतो. आत्मा आहे देह हे वेगळे आहेत. याची अनुभुती आपण सोहम आणि ओमकाराने येते. आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. तो अनुभवायचा आहे. या अनुभवानेच आत्मज्ञानी होता येते. म्हणजेच आपणाला या आत्म्याचे ज्ञान होते. हे ज्ञान नित्य असणे म्हणजेच हा देह आत्मज्ञानी होणे असे आहे. हा आत्मा देहात आल्याने तो आपल्याला देहाचा वाटत आहे. देहातील मोह, माया, अहंकार, मत्सर यांनी त्याची ओळख आपणास होत नाही. पण तो देहापासून वेगळा आहे. देहातून तो मृत्यूसमयी निघून जातो. म्हणजेच नेमके तो कोठे जातो ? या अनंतात तो विलिन होतो. या ब्रह्मांडात त्याचे राहण्याचे ठिकाण कोठे आहे. कोठे तो सामावला आहे. वेदांना सुद्धा याचा ठावठिकाणा लावला आलेला नाही. वेद सुद्धा त्याच्या ठिकाणाचा शोध घेत आहेत. पण तो तर सर्वत्र सामावलेला आहे. प्रत्येक जीवात त्याचे अस्तित्व आहे. या जीवातील आत्मा वेगळा त्या जीवातील आत्मा वेगळा असे काही नाही. सर्व जीवामध्ये असणारा आत्मा हा एकच आहे. कुठे शोधीशी रामेश्वर अन् कुठे शोधशी काशी देहातील भगवंत राहीला देहातच उपाशी. यासाठी या देहातील भगवंत, देव जाणावा, तो जाणणे. त्याचा अनुभव घेणे. त्याची अनुभुती येणे हेच तर अध्यात्म आहे. ॐकाराने, सोऽहमने त्याची ओळख करून घेणे गरजेचे आहे. त्याच्यावर नियत्रण मिळवायचे आहे. ते शक्य झाले तर आपण जग जिंकल्यासारखे आहे. कारण या जगात या विश्वात तो सर्वत्र सामावलेला आहे. तो एकच आहे. फक्त आपणास तो वेगवेगळा वाटत आहे. या विजयातच खरे आत्मसुख आहे. आत्मानंद आहे. त्याचे ज्ञान होणे हेच आत्मज्ञान आहे. या ज्ञानाने आपणाला जगाचे ज्ञान होते. जगाची ओळख करुन घेण्यासाठी प्रथम आपण आपली स्वतःची ओळख करुन घेणे गरजेचे आहे. स्वतःच्या ओळखीसाठीच साधना करायची आहे. स्वतःच्या ओळखीतच जगाची ओळख आहे. म्हणून स्वतःपासून याची सुरुवात करायची आहे. साधनेने हे शक्य आहे.
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा. https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.