May 28, 2023
विषरुपी विषयापासून मुक्ती
Home » विषरुपी विषयापासून मुक्ती
विश्वाचे आर्त

विषरुपी विषयापासून मुक्ती

मन बुद्धी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. यात आपण यशस्वी झालो, तर विषय आपणावर परिणाम करू शकणार नाहीत. साधना करताना हे विषय आपणास प्रचंड अडथळा करतात. मन विचलित करतात. साधनेत मन रमत नाही. अशावेळी गुरूंचे स्मरण झाले, तर हे विषय आपोआप आपल्या मनातून निघून जातात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे 

विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।
ते तुझिये गुरूकृपादृष्टी । निर्विष होय ।। 2 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – विषयरुपी सर्पाने दंश केला असतां मूर्च्छा येते, ती कांही केल्या जात नाही. हे गुरूकृपादृष्टी, तुझ्या योगानें ती मूर्च्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या त्या प्राण्याची त्या (विषय) विषापासून सुटका होते.

साप चावल्यानंतर सापाचे विष सगळ्या शरीरभर पसरते. विषाने मनुष्य बेशुद्ध होतो. अशा घटनेत वेळ लागला तर त्याचा मृत्यूही होतो. सापाच्या या विषा सारखेच हे विषय आहेत. जे आपल्या मनावर बिंबवले जातात. त्यात आपण अडकतो. आपली शुद्धी आपण विसरतो. आपण काय करत आहोत याचेही भान आपणाला नसते. यातून योग्यवेळेत बाहेर पडले तर ठिक अन्यथा आपण त्यात नष्ट सुद्धा होऊ शकतो. इतके हे विषय घातक आहेत. हे विषरुपी विषय आपल्या मनात कालवले जातात. दुसऱ्यांचे मने भडकावून समाजात अशांतता पसरवणारी ही मंडळी स्वतः मात्र त्यापासून दोन हात लांब असतात. हे विषय घातक आहेत याचे भान ठेऊन आपण जागरूक असायला हवे. ही जागृती सद्गुरु आपणास देतात. या विषयांची ओळख सद्गुरु करून देतात. त्यांच्या कृपेने हे विषय नष्ट होतात. त्यापासून आपली ते सुटका करतात. फक्त त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडायला हवी. 

मन बुद्धी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. यात आपण यशस्वी झालो, तर विषय आपणावर परिणाम करू शकणार नाहीत. साधना करताना हे विषय आपणास प्रचंड अडथळा करतात. मन विचलित करतात. साधनेत मन रमत नाही. अशावेळी गुरूंचे स्मरण झाले, तर हे विषय आपोआप आपल्या मनातून निघून जातात. सध्याच्या धकाधकीच्या युगात विषयांचा मारा प्रचंड होत आहे. माणसाच्या मनामध्ये विषयांची कालवाकालव होत आहे. विषय दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते डोके वर काढतातच. बदलत्या जीवनशैलीमुळे आपण त्यांना टाळणेही अशक्य झाले आहे. पूर्वी यासाठी संन्यास घेऊन हिमालयात जात. पण आता हेही शक्य नाही. बदलते जीवनचक्र आपण स्वीकारात आहे. त्या परिस्थितीवर मात करत आपण विषयांनाही टाळू शकतो. हे विचारात घ्यायला हवे. वाईट विचार मनात येतात. येत राहातात. पण त्यात न गुंतता. सत् संगाने, सत् विचाराने यावर मात करता येते. 

सतत चांगले विचार मनात घोळत ठेवले तर विषयांपासून आपली सुटका होऊ शकते. विषयांचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होत असतो. साहजिकच अनेक व्याधी, आजार यातून होत असतात. हे विचारात घेता या विषयांचे विष नष्ट करायचे असेल तर चांगल्या विचारांची संगत करायला हवी. चांगल्या विचारांनी मनाची जडणघडण करायला हवी. यासाठी तर ज्ञानेश्वरी पारायणे करायची असतात. वाईट विचार नष्ट करणे शक्य नाही पण ते टाळता येणे शक्य आहे. त्यापासून दूर राहीले तर ते आपणास त्रास देऊ शकत नाहीत. ते विषय दंश करणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. जरी दंश झाला तरी त्यावर मात करण्यासाठी सत् विचारांची संगत आपण करायला हवी. चांगले विचारच आपणास यातून  सोडवू शकतात. 

सद्गुरुंच्याकृपेने हे विचार मनात उत्पन्न होतात. यासाठी गुरूंची कृपादृष्टी आपणावर असायला हवी. जीवन आता कठीण झाले आहे. पावलापावलावर मानसिकतेला धक्का पोहोचत आहे. घरातल्या कटकटी असोत की कामातील कटकटी असोत. सर्वत्र आपण स्थिर बुद्धी ठेवून कार्य करायला हवे. प्रत्येकाने याचे पालन केल्यास वाईटावर सहज मात करणे शक्य होणार आहे. विष शरीरात पसरू नये यासाठी सापाने दंश केलेल्या भागातील रक्त अन्य भागात पसरू नये यासाठी पट्टी बांधली जाते. यामुळे विष अन्य भागात पसरत नाही. तसे आपण चांगल्या विचारांची पट्टी बांधून अन्य भाग विषयापासून दूर ठेवायला हवा.

Related posts

आध्यात्मिक तेज कशाला म्हणतात ?

अमरत्वाची अनुभुती देणारे अक्षर

मनातच अहिंसा असेल तर…

Leave a Comment