शांतता पुरस्काराची रक्कम..!!!
मानवाच्या सुखी जीवनासाठी भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,शरीरशास्त्र व वैद्यकशास्त्र,साहित्य आणि शांतता या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वोत्तम व्यक्ती किंवा संस्थेस पुरस्कार देण्यासाठी ९४ टक्के संपत्ती ठेवली. २००८ मध्ये या संपत्तीचे मूल्य १८६० लाख अमेरिकन डॉलर इतके होते. स्वीडनच्या सरकारने १८९७ मध्ये या मृत्यूपत्रास मान्यता दिली. यानंतर नोबेल फाउंडेशनची स्थापना केली. स्फोटासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाच्या धंद्यातून मिळालेली रक्कम शांततेसाठी कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी वापरण्यात येते.डॉ. व्ही.एन. शिंदे
इ-मेल – vilasshindevs44@gmail.com
भ्रमणध्वनी – ९६७३७८४४००
कठीण दगडाला, पाषाणाला फोडणे, पूर्वी फारच अवघड काम होते. त्यावरूनच ‘दगडावर डोके आपटणे’ हा वाक्प्रचार आला. मात्र एकोणिसाव्या शतकातील एका शोधाने हे काम सोपे केले. आज मोठमोठे दगड नियंत्रित पद्धतीने फोडणे शक्य झाले. या शोधाने विहीर खोदणे, मोठमोठे पर्वत खोदून रस्ते, लोहमार्ग बनवणे, तसेच शत्रू सैन्याची दाणादाण उडवणे सोपे झाले. स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांनी १८६६ साली शोधलेल्या डायनामाईटने या स्फोटकाने मानवाचे कष्ट कमी केले. त्याचसोबत मानवाच्या जीवावर उठणारे बाँब बनवण्यासाठीही ते वापरले जाऊ लागले.
इमॅन्युअल नोबल हे स्वीडनमधील मोठे उद्योजक, अभियंता आणि संशोधक होते. ते पूल आणि इमारती बांधत असत. त्यांनीच स्वीडनमध्ये पहिला रबराचा उद्योग उभारला होता. बांधकामाच्या निमित्ताने त्यांना अनेकदा स्फोट घडवावे लागत. त्यांचा औषधांचा व्यवसायही होता. अल्फ्रेड यांचा जन्म स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे २१ ऑक्टोबर १८३३ रोजी झाला. मात्र उद्योगांमध्ये धोका खाल्ल्यानंतर त्यांनी सेंट पीटरबर्गला स्थलांतर केले. अल्फ्रेड आणि त्यांच्या भावांचे शिक्षण खाजगी शिक्षकांकडून झाले. वयाच्या सतराव्या वर्षी अल्फ्रेड यांना परदेशी पाठवण्यात आले. अमेरिकेत त्यांची जॉन इरिक्सन या अभियंत्याशी भेट झाली. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. फ्रांसमध्ये ज्युल पेलॉउझ आणि अस्कानिओ सोब्रेरो यांच्याकडून शिक्षण घेतले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले तरी, त्यांना खरा रस होता, रसायनांचा वापर करण्यामध्ये. रसायनासोबत वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये ते बराच वेळ घालवत. त्यांच्या मोठ्या भावाचे निधन एका स्फोटामध्ये झाले होते. त्यामुळे अल्फ्रेड यांना नियंत्रित स्फोट होवू शकणारे स्फोटक शोधायचे होते. सोब्रेरो यांनी १८४७ मध्ये नायट्रोग्लिसरीन शोधले होते. पेलाउझ यांनी अल्फ्रेडना नायट्रोग्लिसरीन व्यावसायिक कारणासाठी वापरू नये, कारण ते धक्का सहन करू शकत नाही, असा इशारा दिला होता.
मात्र ऐकतील ते अल्फ्रेड कसले? त्यांनी परदेशातून परत येताच संशोधनाला सुरुवात केली. दहा वर्षातच त्यांनी शेकड्याने हवेचा दाब, दाब मापी इत्यादी विषयातील स्वामित्व हक्क मिळवण्यासाठीचे अर्ज केले होते. मात्र नायट्रोग्लिसरीनबद्दलचे त्यांचे आकर्षण कमी झाले नव्हते. वडील आणि भाऊ इमील यांच्यासमवेत त्यांनी काळी पावडर आणि नायट्राग्लिसरीनचा वापर करून शेकडो प्रयोग केले. अखेर त्यांना डिटोनेटर तयार करण्यात यश मिळाले. डिटोनेटर ‘स्फोट टोपी’ (Blasting Cap) यामुळे नियंत्रित स्फोट करणे शक्य झाले होते. डिटोनेटरमुळे दूर अंतरावरून फ्युजच्या सहाय्याने नियंत्रित स्फोट करता येऊ लागले. १८६३ मध्ये अल्फ्रेडने तांब्याची टोपी आणि मर्क्युरी फल्मीनेट वापरून शुद्ध नायट्रोग्लिसरीनचा नियंत्रित स्फोट घडवला. १८६४ मध्ये अल्फ्रेड यांनी स्फोट टोपीसाठी आणि ग्लिसरीन, नायट्रीक आम्ल, सल्फ्युरिक आम्लापासून नायट्रोग्लिसरीन बनवण्याची पद्धत यांचे स्वामित्व हक्क मिळावेत, यासाठी स्वतंत्र अर्ज केले. दरम्यान ३ सप्टेंबर १८६४ रोजी अल्फ्रेड यांचा भाऊ इमिल आणि त्यांच्यासमवेत शेकडो कामगार हेलेनबर्ग येथील कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मरण पावले.
यानंतर अल्फ्रेड यांनी शहरापासून दूर अंतरावर नायट्रोग्लिसरीन तयार करणारी कंपनी सुरू केली. पुढच्याच वर्षी ते जर्मनीमध्ये गेले. तेथे त्यांनी ‘डायनामाईट नोबेल’ ही कंपनी स्थापन केली. स्फोट टोपी वापरली तरीही नायट्रोग्लिसरीनचा स्फोटक म्हणून व्यावसायिक वापर करणे अत्यंत धोकादायक होते. नायट्रोग्लिसरीनची वाहतूकही त्यामुळे करता येत नव्हती. हा प्रश्न सोडवण्यासाठी अल्फ्रेड यांनी आपले संशोधन सुरू केले. नायट्रोग्लिसरीनच्या स्फोट क्षमतेवर परिणाम न करता हे साध्य करावयाचे होते. असा पदार्थ जो मिसळला तर नायट्रोग्लिसरीन तितकाच परिणामकारक स्फोट घडवू शकेल, मात्र त्याला हाताळणे सोपे होईल, अशा पदार्थाचा त्यांनी शोध सुरू केला. त्यांनी सिमेंट, कोळसा, लाकडाची भुकटी असे अनेक पदार्थ नायट्रोग्लिसरीनमध्ये मिसळून पाहिले. मात्र यातील कोणताही प्रयोग यशस्वी झाला नाही. अल्फ्रेड यांचा शोध सुरूच राहिला. अनेक प्रयोगानंतर अखेर त्यांना खनीज शैवालाच्या भुकटीचा शोध लागला. यालाच डायॲटोमासिअस या नावाने ओळखले जाते. जर्मनीतील हॅम्बर्ग शहरातील त्यांच्या कारखान्याजवळून जाणाऱ्या अल्बे नदीच्या कडेला हे शैवाल त्यांना आढळून आले होते. या शैवाल भुकटीला नायट्रोग्लिसरीनमध्ये मिसळल्यानंतर ते अगदीच शांत झाले. त्याला हाताळणे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणे, सुरक्षित झाले होते. इंग्लंडमध्ये या सर्व शोधांसाठी त्यांना ७ मे १८६७ रोजी स्वामित्व हक्क देण्यात आले. स्वीडनमध्येही त्यांना त्याच वर्षी १९ ऑक्टोबर रोजी स्वामित्व हक्क देण्यात आले.
डायनामाईटच्या शोधानंतर नायट्रोग्लिसरीन आणि काळ्या पावडरला जबरदस्त पर्याय लाभला. अल्फ्रेड नोबेल यांच्या रक्तातच व्यवसाय होता. त्यांनी स्वामित्व हक्कांची नोंदणी इतकी छान पद्धतीने केली होती, की त्यांच्या या शोधाची नक्कल करू पाहणाऱ्या कंपन्यांना त्या तत्काळ बंद कराव्या लागल्या. काही अमेरिकन उद्योजकांनी नायट्रोग्लिसरीनमध्ये, डायॲटोमासियस अर्थपेक्षा वेगळे, रेझीनसारखे पदार्थ मिसळून डायनामाईटची नक्कल करण्याचा प्रयत्न केले. मात्र त्यांना डायनामाईटचे व्यावासायिक यश लाभले नाही. सुरुवातीला डायॲटोमासियस अर्थला, अल्फ्रेड यांनी ‘नोबेल ब्लास्टिंग पावडर’ असे नाव दिले होते. मात्र पुढे डायनामीस म्हणजेच शक्ती या ग्रीक शब्दावरून डायनामाईट हे नाव दिले. त्याच्या उत्पादन आणि विक्रीतून त्यांना मोठा फायदा होत होता. इतक्या पैशाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण व्हावा इतके पैसे मिळाले.
अल्फ्रेड यांनी अनेक मृत्यूपत्रे बनवली. अखेरचे मृत्यूपत्र २७ नोव्हेंबर १८९५ रोजी स्विडीश-नॉर्वेजियन क्लबमध्ये केले. मानवाच्या सुखी जीवनासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र व वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वोत्तम व्यक्ती किंवा संस्थेस पुरस्कार देण्यासाठी ९४ टक्के संपत्ती ठेवली. २००८ मध्ये या संपत्तीचे मूल्य १८६० लाख अमेरिकन डॉलर इतके होते. स्वीडनच्या सरकारने १८९७ मध्ये या मृत्यूपत्रास मान्यता दिली. यानंतर नोबेल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. स्फोटासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाच्या धंद्यातून मिळालेली रक्कम शांततेसाठी कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी वापरण्यात येते.
डोंगर फोडून रस्ते, रेल्वेमार्ग बनवणे, बोगदे तयार करणे डायनामाईटमुळे सोपे झाले. इमारती, पूल पाडण्यासाठीही डायनामाईटचा वापर करण्यात येऊ लागला. अल्फ्रेड यांनी डायनामाईटचा हिंसेसाठी वापर करण्यात येऊ नये, असे वारंवार सांगितले. पुढे याचा उपयोग युद्धात करण्यात येऊ लागला. भुसुरुंगामध्ये डायनामाईट वापरले गेले. विशेषत: दहशतवादी हल्ल्यात ते मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. डायनामाईट शोधण्यामागे खोदकाम सोपे करणे, मानवाचे कष्ट कमी करणे, हा हेतू होता. मात्र आज हाच शोध भस्मासूर बनत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
