‘विद्येविना मती आणि मतीविना गती’ जात असल्याचे महात्मा जोतिराव फुले यांनी सांगितले आहे. बौद्धिक आणि त्याअनुषंगाने सांपत्तिक, प्रापंचीक प्रगतीची गती यावर त्यांचे हे भाष्य व्यक्तींपासून समाजापर्यंत अगदी खरे आहे. मात्र भौतिक गतीबाबत आजमितीला चाकाविना मानवाची गती गेली, हे मात्र खरे.
डॉ, व्ही. एन. शिंदे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
सारखे फिरत असतोस, काय पायाला चाक लागले आहे का, तो सारखा फिरत असतो, जणूकाही पायाला भिंगरी लागली आहे, अशी वाक्ये सारखे फिरणाऱ्यास उद्देशून उच्चारलेली ऐकावयास मिळतात. या वाक्यामागे, प्रत्यक्ष चाकाचा शोध लागल्यामुळे माणसाच्या फिरण्याचा वेग वाढला हे अप्रत्यक्ष मान्य किंवा सूचीत करावयाचे असते. हे खरेही आहे. प्रत्यक्ष चाकाचा शोध लागल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाने गती पकडली. अनेक वाहने निर्माण झाली. चाक आणि अक्षाच्या शोधाने मानवाच्या हालचाली गतीमान झाल्या. मानवाची जीवनशैली बदलली. त्यामुळेच चाकाचा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे.
पूर्वी मानवाच्या दैनंदिन हालचाली मर्यादित होत्या. अन्नाच्या शोधातही चालत जाऊन् त्याच दिवशी परतता येईल एवढेच अंतर जायचा. स्वत:ला पेलवेल एवढेच ओझे न्यायचा. पुढे ओझे वाहण्यासाठी जनावरांचा वापर सुरू झाला. त्याचदरम्यान चाकाचा शोध लागला आणि आज स्वंयचलित वाहनांपर्यंतचा टप्पा मानवाने गाठला. चाकाचा शोध आणि विकासाचा इतिहासही मोठा रंजक आहे.
ख्रिस्तपूर्व ४५००च्या दरम्यान केव्हातरी, कोणीतरी उतारावरून गडगडत जाणारा दगड पाहिला. त्यातून माणसाला चाकाची संकल्पना सुचली, असे मानले जाते. पुढे ओंडक्याचा गोलाकार तुकडा वापरून चाके बनवली गेली. त्याच्या मध्यावर छिद्र पाडून दोन चाकांना सरळ लाकडाने जोडून गाडा बनवला. यासाठी अनेक प्रयोग केले गेले असणार. प्रयोग, निरीक्षणे याचा कोणताही लेखाजोखा न ठेवता असा पहिला गाडा तयार झाला. या सर्व घडामोडी ताम्रयुगात घडल्या. मात्र चाकाच्या अस्तित्वाच्या खुणा मिळाल्या आहेत, त्या ख्रिस्तपूर्व ३१०० मधील. यापूर्वीच्या चाकाच्या अस्तित्वाचे अवशेषही मिळाले आहेत, मात्र त्याचा वापर नेमका कशासाठी होत असावा, हे संशोधक ठामपणे सांगू शकत नाहीत.
ख्रिस्तपूर्व ३६८१ मध्ये चाकाचा वापर गाड्या बनवल्या असल्याचे पोलंडमधील उत्खननामध्ये पुरावे मिळाले आहेत. चीनमध्ये चाकाचा वापर झाल्याचे ख्रिस्तपूर्व २२०० मधील पुरावे आहेत. वाहतुकीसाठी चाकांचा वापर ही संकल्पना चीनमध्ये पाश्चात्य राष्ट्रातून आल्याचे संशोधकांचे मत आहे. इंग्लंडमध्ये चाकाचा वापर झाल्याचे पुरावे ख्रिस्तपूर्व ११०० मधील मिळतात. साधारण एक मीटर व्यासाच्या चाकाचे अवशेष आढळून आले आहेत. युरोपियन लोकांनी अमेरिकेत वसाहती निर्माण केल्यानंतरच्या कालखंडात, अमेरिकेत चाकाचा वापर सुरू झाला. भारतात अर्थात हिंद द्विपकल्पात चाकाचा वापर हा अगदी सुरुवातीपासून करण्यात येत असावा. मोहेंजेदडो आणि हडाप्पा संस्कृतीत चाकाच्या वापराचे पुरावे मिळाले आहेत.
चाकाचा वापर आपले कष्ट कमी करण्यासाठी करता येतो, हे लक्षात आल्यानंतर सर्वप्रथम त्यापासून गाड्याची निर्मिती आणि शेतातील कामासाठी चाकाचा वापर करून उपकरणे बनवण्यात आली. घोडागाडी, बैलगाडी, बर्फावरून कुत्र्यांनी ओढायची गाडी बनवण्यात आल्या. अर्थात या सर्व गोष्टीसाठी लाकडांचा प्रामुख्याने वापर करण्यात येत होता. दोन चाकांना जोडण्यासाठी अक्षाचा म्हणजेच ॲक्सलचा वापर करण्यात येत असे. चाक निखळू नये म्हणून ॲक्सलला खुंटीसुद्धा लाकडाचीच बसवली जात असे. अर्थात यासाठी कठीण आणि टिकाऊ लाकडाचा वापर केला जाई. लाकडाच्या गाड्या लवकर नादुरूस्त होत असत. लाकडाची झीज वेगाने होणे आणि ओझ्याने लाकडाचे भाग मोडणे नेहमीच घडत असे.
पुढे धातूंचा वापर सुरू झाला. धातूंचे ॲक्सल किंवा लाकडावर धातूच्या पत्र्याचे आवरण घालून लाकडाचे झीज टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातून ॲक्सलच्या लाकडाची झीज कमी झाली. मात्र चाकाची झीज होतच होती. पुढे त्याठिकाणीही पत्रा बसवण्याची कला अवगत झाली. तरीही पत्र्याची झीज होऊन काही दिवसात चाकाचा बिघाड होत असे. पुढे त्या पत्र्याला तेल लावले तर झीज कमी होते, हे लक्षात आल्यानंतर ॲक्सल आणि चाकाच्यामध्ये तेल घालण्यात येऊ लागले. तरीही तेल नितळून चाकाची झीज होत असे. पुढे वंगणाचा परिणाम दिर्घकाळ टिकावा यासाठी ग्रीससारख्या पदार्थाचा वापर सुरू झाला.
पंधराव्या शतकापर्यंत चाकाचा वापर उद्योगात मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यातून आधिक गती मिळवण्यासाठी आणि झीज कमीत कमी व्हावी, यासाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू झाले. धातूंचा वापर जसजसा वाढत गेला, तसतसा लाकडाच्या चाकाऐवजी धातूच्या चाकांचा विचार सुरू झाला. त्यातून अगदी सुरुवातीला एकचाकी सायकल अस्तित्वात आली. मात्र या सायकलचा वापर प्रवासासाठी करणे शक्य नव्हते. सायकलचे पहिले संकल्पचित्र लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या जियान काप्रोती या विद्यार्थ्यांने सन १५०० मध्ये काढले होते. मात्र आज वापरात असणाऱ्या सायकलप्रमाणे रचना अस्तित्वात येईपर्यंत १८१७ साल उजाडले. जर्मनीतील ब्रॅओन कार्ल सोब्रन यांने १८१७ मध्ये पहिली सायकल बनवली. त्यांनंतर आजवर सायकलमध्ये सुधारणा होतच आहेत आणि या बदलामध्ये चाकातील बदल हे महत्त्वाचे आहेत.
उद्योगामध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध न्युकोमन याने लावला होता. त्याचवेळी इंधनाचा वापर करून सजीवांची ऊर्जा खर्ची न पाडता यांत्रिक ऊर्जेचा वापर करून रस्त्यावर वाहन कसे चालवता येईल याचा विचार सुरू झाला. त्यानंतर चारचाकी आणि दुचाकी वाहनांची निर्मिती झाली. या सर्वांमध्ये बदल होत आहेत, अधिक गतीमान आणि ऊर्जा कमीत कमी वापरणाऱ्या यंत्रावर प्रामुख्याने संशोधन होत आहे. त्यामध्ये चाकांची झीज हा मुद्दा आजही विचारात घेण्यात येतो. त्यासाठी वंगण म्हणून वापरता येतील अशा नव्या पदार्थांचाही शोध घेण्यात येत आहे. आज चारचाकी आणि दुचाकी वाहनाशिवाय मानवाच्या जगण्याची कल्पनाही करवत नाही.
हे एकिकडे होत असताना दुसरीकडे चाकांचा वापर कोठेकोठे शक्य आहे याचाही शोध संशोधक घेत होते. यातून अनेक नवनव्या वस्तूंची, उपकरणांची निर्मिती होत आहे. पूर्वी केवळ शेतामध्ये मोट, नंतर इंजिनच्या रूपात चाकाचा वापर मानवाने आपले कष्ट कमी करण्यासाठी करण्यात यश मिळवले. पुढे सर्वच बाबींसाठी विचार झाल्याने चाक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले. पूर्वी वेळ समजावी म्हणून वाळूच्या घड्याळाचा उपयोग केला जात असे. आज वेळ दाखवणारे यंत्र आले. त्यातही चाक आहेच. अगदी किचन ट्रॉलीसुद्धा चाक घेऊनच फिरते. सायकल, दुचाकी, चारचाकी वाहनेच नाही तर अगदी विमान असो वा रॉकेट प्रत्येक स्थलांतरीत होणाऱ्या यंत्रात चाक आवश्यक बनले. माणसाचे जणू पाय बनले. ‘विद्येविना मती आणि मतीविना गती’ जात असल्याचे महात्मा जोतिराव फुले यांनी सांगितले आहे. बौद्धिक आणि त्याअनुषंगाने सांपत्तिक, प्रापंचीक प्रगतीची गती यावर त्यांचे हे भाष्य व्यक्तींपासून समाजापर्यंत अगदी खरे आहे. मात्र भौतिक गतीबाबत आजमितीला चाकाविना मानवाची गती गेली, हे मात्र खरे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.