मराठीतील कृषिविषयक नियतकालिकांवरील गजेंद्र बडे यांचे ठरले राज्यातील पहिले संशोधन
पुणे : कृषिमित्र गजेंद्र प्रभाकर बडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच. डी.) ही पदवी जाहीर केली आहे. बडे यांनी ‘मराठीतील कृषिविषयक नियतकालिकांचा अभ्यास’ या विषयावर संशोधन करुन पुणे विद्यापीठाला शोध प्रबंध सादर केला होता. विद्यापीठाने हा शोध प्रबंध स्विकारला आहे. मराठीतील कृषिविषयक नियतकालिकांचा अभ्यास’ या विषयावर राज्यात याआधी एकही संशोधन झालेले नाही. त्यामुळे या विषयावरील बडे यांचे हे संशोधन राज्यातील एकमेव संशोधन ठरले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर येथील मराठी संशोधन केंद्रात हे संशोधन करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गजेंद्र बडे यांनी हे संशोधन पूर्ण केले. पीएच. डी. ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी जाहीर झाल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस आणि अहमदनगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राचे विभागप्रमुख डॉ. सुधाकर शेलार यांनी गजेंद्र बडे यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, गजेंद्र बडे हे मागील २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. बडे यांनी आतापर्यंत विदर्भातील दैनिक देशोन्नतीचे मंत्रालय विशेष प्रतिनिधी, दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीत बातमीदार, उपसंपादक आणि दैनिक सकाळमध्ये बातमीदार व प्रिन्सिपल करस्पॉंडंट या पदांवर काम केलेले आहे. बडे यांची आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यापैकी एका पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाड्मय तर, एका पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय पुण्याच्या पत्रकारितेत मानाचा समजल्या जाणाऱ्या पत्रकार वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कारासह केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांचे मिळून १३ पुरस्कार मिळालेले आहेत.
याआधी गजेंद्र बडे यांना कृषी क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कृषिमित्र या पदवीने गौरविलेले आहे. याशिवाय बडे हे देशातील पहिल्या पत्रकार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
बडे यांच्या संशोधनातील काही ठळक मुद्दे –
- देशातील मराठीतील पहिले शेतकी हे कृषिविषयक नियतकालिक सन 1876 मध्ये पुणे येथे सुरु झाले, महादेव काशिनाथ थत्ते हे या नियतकालिकाचे संपादक होते. यामुळे महादेव थत्ते हे कृषिविषयक नियतकालिकाचे जनक आहेत.
- १८३२ ते १९५० या कालावधीत मराठीतील ५५ कृषिविषयक नियतकालिके प्रकाशित होत होती.
- यामध्ये शेतकी सुधारणा पुणे (1876 ), शेतकरी अमरावती ( 1883 ), शेतकऱ्यांचा कैवारी मुंबई ( 1893 ), कृषिकर्म प्रकाश कोल्हापूर ( 1901 ), शेत-शेतकी व शेतकरी ( 1904 ), शेतकी आणि शेतकरी पुणे ( 1910 ). शेतकरी अहमदनगर ( 1911 ), शेतकरी हिंदुस्थान ( 1921 ), शेतकरी अहमदनगर ( 1922 ), शेतकी शेतकरी अमरावती ( 1925 ) आणि ग्रामणी नागपूर व पुणे ( 1932 ) आदींचा समावेश आहे.
- भारतीय स्वातंत्र्यापासून ते सन 2022 च्या अखेरपर्यंत ७५ वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रात सुमारे ७० हून अधिक मराठीतील कृषिविषयक नियतकालिके सुरू झाली आहेत.
- यामध्ये राज्याच्या कृषी व सहकार विभागाचे सहकरी महाराष्ट्र ( 1946 ), शेतकरी ( 1965 ), बळीराजा ( 1970 ), आपले आदर्श गाव ( 1997 ), वनराई ( 1988 ) कृषी पणन मित्र ( 2008 ) शेती प्रगती ( 2005 ), कृषी भूषण ( 2011 ) आदी प्रमुख नियतकालिकांचा समावेश आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.