January 26, 2025
Science behind the accident article by V N Shinde
Home » जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान
संशोधन आणि तंत्रज्ञान

जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान

जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान

उतारावर वाहनाला गती मिळाल्यानंतर वाहनाचे इंजीन बंद करणे, हे आगीशी खेळण्यापेक्षा भयंकर असते. कारण यामध्ये आपण केवळ आपला नाही, तर इतरांचाही जीव धोक्यात आणतो. त्यामुळे हे धाडस कोणीही आणि कोणत्याही रस्त्यावर करू नये.

डॉ. व्ही. एन. शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

कोणतीही वस्तू खरेदी केली की तिच्याशी नाते जोडले जाते. मग ती गाडी असो, नाही तर मोबाईल. आपली वस्तू आपण जपतो. तिला इजा पोहोचू नये, म्हणून काळजी घेतो. गाडी घेतली तर तिच्यावर जरासा ओरखडा उठला, तरी जीव हळहळतो. तो घालवण्यासाठी धडपडतो. गाडी चालवताना काळजी घेतो. एक दिवस प्रवासाला निघतो. नियमांचे पालन करत प्रवास सुरू असतो आणि दुसरे वाहन आपल्याला धडकते. आपल्याला झालेल्या जखमा पहाव्यात का, गाडीचे नुकसान? असा प्रश्न पडतो. अर्थात सर्वांना जीव प्र‍िय असतो. प्रथम आपल्या जखमा पाहतो. त्या वेदनांमध्ये गाडीच्या झालेल्या अवस्थेमुळे भर पडते. शेवटी त्या वस्तूशी किंवा वाहनाशी आपले भावनीक नाते जडलेले असते. मूळात आपण सुरक्षीत वाहन चालवतो, ते ५० टक्के अपघात टाळू शकते. बाकी ५० टक्केमध्ये वाहनाची अवस्था, टायरची अवस्था, रस्त्याची परिस्थिती आणि रस्त्यावरील इतरांचे वाहन चालवणे, कारणीभूत ठरते.

असाच एक मोठा ट्रक पुण्याजवळील नवले पुलावर ४८ वाहनांचा चुराडा करत गेला. यामध्ये अनेक वाहने, प्रवासी वाहने असल्याने गांभीर्य वाढले. गाड्यांची अवस्था पाहून किती गेले असावेत, असा प्रश्न पडावा, इतके वाहनांचे नुकसान झाले होते. या अपघातात अनेकजन जखमी झाले, पण सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. बेफाम वेगाने जाणारे वाहन उतारावर होते. पुढे गर्दी असल्याने एकतर पुढची वाहने उभा होती किंवा त्यांचा वेग कमी होता. धडकणारे वाहन मालाने भरलेले होते. मूळात त्याचे वजन, ज्या वाहनांना ते धडकत होते, त्यांच्या वजनाच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त होते. त्यामुळे त्याचा संवेग हा कमी वेगाने धावणाऱ्या किंवा थांबलेल्या वाहनांच्या तुलनेने कितीतरी जास्त होता. त्यामुळे लहान वाहनांचे जास्त नुकसान होणे स्वाभावीक होते.

सुरुवातीला हा अपघात वाहनाचे ब्रेकफेल (गतीनियंत्रक यंत्रणा निकामी) झाल्याने झाला असावा, असा अंदाज व्यक्त होता. मात्र ब्रेकफेल झाल्यानंतर गियर यंत्रणा कार्यान्वीत असेल, तर काही अंशी वाहनावर नियंत्रण मिळवता येते. मात्र वाहन उतारावर असल्याने, त्याचा वेग म्हणावा तसा कमी होणे शक्य नव्हते, म्हणून सुरुवातीला ही शक्यता खरी वाटली. तरीही चालकांने असे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असता, तर पाच-सहा वाहनांना धडकल्यानंतर थांबायला हवे होते. मात्र हा ट्रक एकदोन वाहनांना नाही तर तब्बल ४८ वाहनांना धडकल्याने, त्या अपघाताचा विषय डोक्यातून जात नव्हता. ज्या वाहनाने धडक दिली, त्याची राज्य वाहतूक नियंत्रण शाखेने तपासणी केल्यानंतर खरे कारण समोर आले.

ज्या वाहनाने धडक दिली, ते वाहन न्यूट्रलवर घेतले होते. अनेक चालक उतार आला की वाहन न्यूट्रलवर घेऊन इंजीन बंद करतात. यातून त्यांना इंधन वाचवल्याचे समाधान मिळते. काही हमरस्त्यावर असे उतार अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत आहेत. अशा रस्त्यावर अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक हे ‘नको ते धाडस’ करतात. हे पूर्णत: अवैज्ञानिक आहे. असे करणे नियमबाह्यही आहे. वाहन न्यूट्रलवर, इंजीन बंद करून चालवणे, हे मृत्यूशी खेळण्यासारखे आहे. मात्र खर्चात बचत करण्याच्या नावाखाली अनेकजन हे धाडस करतात आणि ते अशा अपघातात निर्दोष माणसांच्या जीवावर बेतते.

कोणत्याही वस्तूला किंवा वाहनाला स्वत:चे वस्तुमान असते. विशेषत: वाहनाला गती दिल्याशिवाय ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही. गती देण्याचे कार्य इंजीन करते. जे गती देते, तेच गती नियंत्रण करते. मात्र आपण जर उतारावर गती घेतली, तर गती नियंत्रण करणारी एकच यंत्रणा कार्यरत राहते, ती म्हणजे ब्रेक. पण ब्रेकची यंत्रणा सपाट भागावर मदत करू शकते. उतारावर ती कार्यक्षम ठरत नाही आणि चढावर आपण न्यूट्रलमध्ये गाडी चढवू शकत नाही. त्यामुळे अनेकदा उतारावर न्यूट्रलवर बंद करून पळणारी वाहने ब्रेक लावल्यानंतर पलटी होतात. उतारावर वाहनाला गती मिळाल्यानंतर वाहनाचे इंजीन बंद करणे, हे आगीशी खेळण्यापेक्षा भयंकर असते. कारण यामध्ये आपण केवळ आपला नाही, तर इतरांचाही जीव धोक्यात आणतो. त्यामुळे हे धाडस कोणीही आणि कोणत्याही रस्त्यावर करू नये.

याला विज्ञानातच कारण दिलेले आहे. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार ‘पदार्थावर एखादे बाह्य बल कार्यान्वीत झाल्याखेरीज तो आपली स्थिती बदलत नाही’. म्हणजे गतीमान पदार्थ हा गती कायम ठेवतो, तर स्थीर असणारा पदार्थ आपली जागा सोडत नाही. म्हणजे न्यूट्रलवर घेतलेला ट्रक हा एक यंत्र न राहता, तो केवळ एक पदार्थ बनतो. ट्रक किंवा असे वाहन हे गोलाकार चाकावर गतीमान असते. त्यामुळे उतारावरून घरंगळत येणारा दगड आणि ट्रक किंवा वाहन सारखेच वर्तन करते. दगडाला थांबवण्याइतका मोठा अडथळा समोर येईपर्यंत जसा तो पुढे जात राहतो, तसेच असे न्यूट्रलवर बंद केलेले वाहन कार्य करते. त्याचे वस्तुमान म्हणजेच वजन जितके जास्त तितका त्याचा संवेग जास्त. जितका संवेग (वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार) जास्त, तितके त्याला थांबवण्यास जास्त बळ लागते. त्यामुळेच असे वाहन चालवू नये, असा नियम असूनही तो पाळला जात नाही. काही रूपयांचे इंधन वाचवण्यासाठी आपण, स्वत:चा आणि इतरांचा लाखमोलाचा जीव धोक्यात घालतो.

हे सर्व न्यूटनने सतराव्या शतकात शोधले. मांडले. पुढे अभ्यासक्रमात आले. शाळेत शिकवले गेले. आम्ही ते शिकतो. अभ्यास करतो. परीक्षेत लिहितो. उत्तीर्ण होतो. पण जे अभ्यासले ते आचरणात आणत नाही. या अपघातामुळे म्हणूनच प्रश्न मनात आला, आपण खरंच शिकतो का?


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading