November 22, 2024
Ghazal writing workshop in Mumbai
Home » मुंबईत रंगलेल्या मुशायऱ्यात गझलकारांनी भरले रंग
काय चाललयं अवतीभवती

मुंबईत रंगलेल्या मुशायऱ्यात गझलकारांनी भरले रंग

  • शेकडो नवोदितांनी घेतले गझलेचे धडे
  • मुंबईत रंगलेल्या मुशायऱ्यात गझलकारांनी भरले रंग

मुंबईः येथील गझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या निःशुल्क गझल लेखन कार्यशाळेत ८० पेक्षा अधिक नवोदितांनी गझलेचे धडे घेतले. यासोबतच महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा बहारदार मुशायरा देखील रंगला.

मकरसंक्रांतीच्या शुभमुहुर्तावर दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात गझल मंथन साहित्य संस्थेच्या मुंबई शाखेतर्फे मराठी गझल लेखन कार्यशाळा आणि मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड, श्याम खामकर आणि प्रमोद खराडे यांनी गझल कार्यशाळेच्या प्रशिक्षकपदाची धुरा अतिशय समर्थपणे पेलली.

या गझल प्रशिक्षण कार्यशाळेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच सिलवासाहून देखील सुमारे ८० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. गझलमंथनच्या मुंबईत झालेल्या या पहिल्याच ऑफलाइन विनामूल्य गझल लेखन कार्यशाळेला प्रशिक्षणार्थींनी भरघोस प्रतिसाद दिला. सकाळच्या पहिल्या सत्रातील काही तासांच्या प्रशिक्षणानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींनी एक मथला आणि २ शेर लिहिण्यापर्यंत मजल मारली. त्यातील पाच निवडक प्रशिक्षणार्थींचा गझलमंथन साहित्य संस्थेमार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

दुपारच्या सत्रात प्रमोद खराडे(पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा रंगला. त्यात डॉ. कैलास गायकवाड (नवी मुंबई), शांताराम खामकर (शाम) (अहमदनगर), प्रदीप तळेकर (पुणे), पूर्णिमा पवार (रत्नागिरी), बा. ह. मगदुम (पुणे), मानसी जोशी (ठाणे), सुनेत्रा जोशी (रत्नागिरी), ॲड. मुकुंदराव जाधव (जळगाव), यशश्री रहाळकर (नाशिक), डॉ. सुभाष कटकदौंड (रायगड), डॉ. मंदार खरे (पुणे) आणि एस.जी. गुळवे (पालघर) हे महाराष्ट्रातील विविध भागातील सुमारे १५ नामांकित गझलकार उपस्थित राहून मुशायऱ्यात रंग भरला. आणि त्यांनी आपल्या एकापेक्षा एक अशा अप्रतिम गझला सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

नंदुरबारच्या विष्णू जोंधळे आणि मुंबईच्या सुजाता मराठे यांनी मुशायऱ्याचे व कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या गझल मुशायऱ्याला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. आणि वर्षाच्या सुरुवातीलाच असा देखणा आणि सुंदर कार्यक्रम दिल्याबद्दल मुंबई जिल्हा कार्यकारिणीचे सर्वच उपस्थितांनी तोंड भरून कौतुक केले.

यावेळी गझल मंथन साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे, पनवेल शाखेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे, ठाण्याच्या मानसी जोशी, पुण्याचे बा. ह. मगदूम उपस्थित होते. कोरोना टाळेबंदी काळात विनामूल्य ऑनलाईन गझल लेखन कार्यशाळा घेणाऱ्या उर्मिला बांदिवडेकर आणि डॉ. शरयू शहा ही जोडगोळी देखील आवर्जून उपस्थित होती. पुढच्या महिन्यात नवीन ठिकाणी नव्या उत्साहाने भेटण्याचे निश्चित करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading