May 30, 2024
A look at the issue of adoption in Sansthan
Home » करवीर संस्थानमधील दत्तक प्रकरणावर एक दृष्टिक्षेप…
काय चाललयं अवतीभवती

करवीर संस्थानमधील दत्तक प्रकरणावर एक दृष्टिक्षेप…

लोकसभा निवडणूकीमध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे उतरल्याने विरोधकांनी दत्तक विधानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. खरंतर यावर स्वतः शाहू महाराज यांनीच भूमिका स्पष्ट करायला हवी. हेही तितकेच खरे आहे. पण सध्या सोशल मिडियावर या संदर्भात उलटसुलट व चुकीचा संदेश पसरवला जात आहे. साहजिकच या संदर्भात संस्थानच्या भावना दुखावल्या जात आहेत. यासाठीच माननिय माधुरी कदमबांडे यांच्या सांगण्यावरून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरून आम्ही या प्रकरणातील एक बाजू मांडत आहोत. तत्कालिक प्रसिद्ध झालेले काही संदर्भ आम्ही आपल्या माहितीसाठी देत आहोत. या प्रकरणातील खरी माहिती देणे हाच या मागचा उद्देश आहे..
– संपादक, इये मराठीचिये नगरी

बाबुराव धारवाडे यांनी लिहिलेला लेख…

पद्माराजे दत्तक प्रकरण

आमचे ज्येष्ठ मित्र आणि दैनिक ‘समाज’ चे संपादक सर्जेराव पाटील आणि ‘गर्जना’ कार ग. ह. पाध्ये यांनी १९६२ मध्ये ‘कोल्हापूरचे दत्तक प्रकरण’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. परंतु त्यात त्यांनी छत्रपती शहाजी महाराज यांची बाजू मांडली आहे. तथापि पद्माराजे साहाय्यक समितीची बाजू हाही एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या दोन्ही बाजूंचा समग्रपणे अद्याप कोणी इतिहास लिहिला नाही. हे दत्तक प्रकरण म्हणजे काय ? ते आपण पाहू.
– बाबुराव धारवाडे

साभार – जुने कोल्हापूरमधून

पद्माराजेंचा जन्म पाच ऑक्टोबर १९४० ला त्र्यंबोली यात्रेदिवशी (ललित पंचमी) झाला. त्यांचा जन्मोत्सव साऱ्या संस्थानभर अतिशय जल्लोषात साजरा झाला. परंतु २६ नोव्हेंबर १९४० रोजी त्यांचे पिता राजाराम महाराज यांचा अचानक मृत्यू झाल्याने त्यावर दुःखाची दाट छाया होती. त्यांचे लालनपालन तज्ज्ञ युरोपियन डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी वर्षभर येथे कोल्हापुरातच केले. साजणी-तिळवणीचे क्रिकेटिअर बाबा मुळीक हे त्यांचे गार्डियन होते. तसेच १९४१ मध्येच पद्माराजेंसाठी पंधरा लाख रुपयांचा ट्रस्ट स्थापन केला होता. त्यात ताराबाई राणीसाहेब, अकौंटंट जनरल नारायणराव देसाई आणि पंतप्रधान ए. डी. सुर्वे मॅनेजिंग ट्रस्टी होते.

ऐतिहासिक विवाह समारंभ

पद्माराजेंचा विवाह १६ फेब्रुवारी १९५९ रोजी धुळ्यातील तोरखेडचे जहागीरदार रघुजीराव कदमबांडे यांच्याशी कोल्हापुरात भवानी मंडपात अतिशय वैभवात आणि शाही थाटात झाला. त्यांच्या माताजी ताराबाई राणीसाहेब यांचे १९५५ मध्ये निधन झाले होते. त्यामुळे पद्माराजेंना जनतेचे अपार प्रेम लाभले.. सायंकाळी लग्न समारंभ, तर सकाळपासूनच नव्या राजवाड्यापासून जुन्या राजवाड्यापर्यंतचा सारा भाऊसिंगजी रोड आबालवृद्ध, स्त्री-पुरुषांनी फुलून गेला होता. लोक दाटीवाटीने दुतर्फा उभे होते. लग्नासाठी नवरा-नवरी उघड्या मोटारीने जातील आणि त्यांना पाहता येईल, असे लोकांना वाटत होते. परंतु बंद मोटारीतूनच नवरा-नवरी भवानी मंडपात गेल्याने लोकांचा विरस झाला. रात्री आठपर्यंत रस्त्यावर लोक गर्दी करूनच उभे होते. वर पक्षासाठी जानवसघर म्हणून राजवाड्याजवळच इचलकरंजीकरांचा बंगला दिला होता.

या शाही विवाह समारंभानंतर पद्माराजे ज्यावेळी सासरला जायला निघाल्या. रवींद्र सबनीस नगराध्यक्ष होते. त्यांनी पद्माराजेंना आम करवीर जनेतच्यावतीने जाहीर पाठवणी समारंभ करून निरोप दिला. हा समारंभ फारच भावनोत्कट झाला. प्रत्येकाच्या मनाला चटका लागला. ‘जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा’ अशीच भावना सर्वांच्या मनात होती.दत्तक प्रश्नाचा जन्म

या विवाह समारंभाने पद्माराजे यांच्याबद्दल जनतेत अपार सहानुभूती निर्माण झाली. तत्पूर्वीच्या काही काळ अगोदर शहाजी महाराज यांच्या नंतर कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी लोकांत अशी बोलवा होती, की पद्माराजे यांचे लग्न शहाजी महाराज आपला मुलगा देवासचे युवराज कृष्णराव महाराज यांच्याबरोबरच करून देणार आहेत आणि मग त्यांच्या मुलास करवीरच्या गादीवर दत्तक म्हणून आणणार आहेत. परंतु तसे काही घडले नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या दत्तक प्रकरणाचा प्रश्न पुन्हा नव्याने ऐरणीवर आला.

तोवर इकडे धुळ्यात पद्माराजेंना पुत्रलाभ होऊन ‘राजवर्धन’ असे त्याचे नामकरण झाले होते. त्यामुळे कोल्हापूरच्या गादीच्या वारसाच्या प्रश्नाने नव्याने उचल खाल्ली. पद्माराजे यांच्या मुलासच दत्तक घ्यावे, ही मागणी प्रबळ होऊ लागली.

१९६२ च्या सुरुवातीला पद्माराजे यांच्या मुलासच दत्तक घ्यावे, अशी चळवळ कोल्हापूर शहरात सुरू झाली. त्यात छत्रपतींचे भूतपूर्व दरबारी मेजर दादासाहेब निंबाळकर यांचा प्रामुख्याने पुढाकार होता. त्यांनी प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम अशा उत्सवांतून ही मागणी लोकांकडून पुढे रेटण्यास सुरुवात केली. हा हा म्हणता या मागणीला गल्लीबोळांतूनही पाठिंबा मिळू लागला. तालमींतून आणि तिकटी तिकटीवर कोपरासभा सुरू झाल्या. त्यासाठी पद्माराजे साहाय्यक समितीची स्थापना झाली होती. दादासाहेब निंबाळकर समितीचे अध्यक्ष होते आणि एच. डी. पाटील सेक्रेटरी होते. शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष त्यात अधिकृतपणे सहभाग होते. रवींद्र सबनीस, भाई आनंदराव साळोखे, रंगराव पाटोळे, हरुणसाहेब फरास, दत्तोबा चव्हाण, भाई एम. के. जाधव, नारायण लक्ष्मण जाधव हे कार्यकर्ते आघाडीवर होते. त्यांच्या कोपरासभा यशस्वी होऊ लागल्या. त्यास राजवाड्यातील जुने राजकारणही कारणीभूत ठरले. राजाराम
महाराजांच्या द्वितीय पत्नी छत्रपती विजयमाला महाराणीसाहेबही यात सक्रिय झाल्या. त्यांनी बिंदू चौकातील जाहीर सभेत भाषण केले. ज्यांचे नखही कधी दिसायचे नाही, त्या राजस्त्रिया बिंदू चौकात उतरल्याने या चळवळीचे रूपांतर प्रखर आंदोलनात झाले.

२४ जूनचा ऐतिहासिक मोर्चा

२४ जून १९६२ रोजी या प्रश्नावर नवीन राजवाड्यावर लाखाचा मोर्चा गेला होता. त्यात महिलांचा सहभाग फार मोठा होता. मोर्चा गेटवरच अडविल्यावर तेथे दंगलीस सुरुवात झाली. लोक राजवाड्याच्या परिसरात घुसले. दंग्याला सुरुवात झाली. बहुसंख्य पैलवानही त्यात सहभागी होते. त्यातील काहींनी एक पोलीस जीप उलटी करून पेटवून दिली.

त्यावेळी खासदार भाऊसाहेब महागावकर राजवाड्यातच होते. ते शहाजी महाराज यांच्या बाजूचे होते. ते बाहेर मोर्चासमोर आले आणि मोर्चाच्या नेत्या छत्रपती विजयमाला महाराणीसाहेब यांना त्यांनी राजवाड्यात येऊन शहाजी महाराजांची भेट घ्यावी, अशी विनंती केली. परंतु महाराणीसाहेबांनी त्यास नकार दिल्यावर दहा पंधरा लोकांचे एक शिष्टमंडळ महाराजांना भेटण्यासाठी राजवाड्यावर गेले. त्यात मेजर दादासाहेब निंबाळकर, भाई आनंदराव साळोखे, रवींद्र सबनीस, हरुणसाहेब फरास आदी होते. त्यांनी एक निवेदन महाराजांना दिले आणि ही आमची दत्तकाबद्दलची मागणी आहे, असे सांगितले.

त्यावर महाराज म्हणाले, ‘दत्तकासंबंधी माझा निर्णय जाहीर झाला आहे.’ त्यावर एकजण म्हणाला, ‘हा आपला खासगी प्रश्न आहे, पण आमच्या भावना आपण विचारात घ्याव्यात.’ ‘हा प्रश्न माझा खासगी आहे,’ असे म्हणून महाराजांनी शिष्टमंडळाने व्यक्त केलेल्या निरनिराळ्या मतांवर ‘नो कॉमेंट्स’ असे सांगितले. तथापि महाराज दादासाहेब निंबाळकरांना उद्देशून म्हणाले, ‘तुम्ही आमच्या राजघराण्यातील एक सोडून दोन दत्तक पाहिले आहेत, सांगा या मंडळींना दत्तक कसे निवडतात ते!’ परंतु निंबाळकरसाहेबांनी त्यास काही उत्तर दिले नाही. त्यावर कोणीतरी महिला त्वेषपूर्ण भाषेत म्हणाली, ‘महाराजांनी बिंदू चौकात सभा घेऊन आपली बाजू मांडावी.’ परंतु महाराजांनी त्यावर सांगितले,’ घरगुती भांडणे घेऊन बिंदू चौकात उतरण्याची पद्धत आमच्या छत्रपती राजघराण्यात नाही.’ तोवर बाहेर दंगा सुरू होता. लोक राजवाड्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होते.

दरम्यान, एक तरुण राजवाड्याच्या टॉवरवर चढला नि त्याने तेथील भगवा झेंडा काढून त्या ठिकाणी. काळा झेंडा लावला.दत्तक विधान पारही पडले

छत्रपती शहाजी महाराज बुद्धिमान, त्यांच्या भूमिका स्पष्ट आणि विचार परिपक्व असायचे. त्यांनी ही सारी परिस्थिती लक्षात घेतली. १२ जुलै १९६२ ला जो दत्तक विधान समारंभ व्हायचा होता, तो त्यांनी मोठ्या गुप्ततेने २८ जून १९६२ ला बेंगलोर येथे जाऊन पार पाडला. नागपूरचे राजे राजारामसिंह आणि आपल्या कन्या शालिनीराजे यांचा मुलगा दिलीपसिंहराव यांना आपला वारस म्हणून दत्तक घेतले आणि त्यांचे ‘युवराज शाहूराजे’ असे नामकरण केले. तेच हे विद्यमान छत्रपती शाहू महाराज !

त्यानंतरही पद्माराजे साहाय्यक समितीने महाराष्ट्र सरकार, दिल्ली सरकार यांच्याकडे शिष्टमंडळे नेऊन न्याय मिळावा, असे खूप प्रयत्न केले. परंतु त्यात पुढे काही निष्पन्न झाले नाही.

‘पद्माराजेंच्या मुलालाच दत्तक घ्या,’ ही जी मागणी होती, त्यातील हा मुलगा कोण ? याची नव्या पिढीला उत्कंठा आहे. तो मुलगा म्हणजे धुळ्याचे विद्यमान आमदार राजवर्धन कदमबांडे हे होत. ते धुळ्याचे नेते आहेत. धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचेही संचालक आहेत. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. आपल्या परिचय पत्रात ते स्पष्ट म्हणतात, ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आपण थेट वारस आहोत. ‘

Related posts

गावातील वास्तवाचे दर्शन घडवणारी कादंबरी

जीवनात दुरदृष्टी ठेवून नियोजन हवे

सुंडी धबधबा…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406