कोल्हापूर : चित्रपटांमध्ये संगीताला जसे महत्व आहे तसे ध्वनीला आहे. चित्रपटातील वस्तुनिष्ठता वाढवण्यासाठी ध्वनी महत्त्वाची भूमिका पार पाडते. यासाठी ध्वनीचे सौंदर्यशास्त्र समजून घ्यावे, असे आवाहन ध्वनी आणि संगीत दिग्दर्शक ऐश्वर्या मालगावे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या बी.ए फिल्म मेकिंग कोर्स वतीने आयोजित केलेल्या ध्वनी आणि कलादिग्दर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आर्ट डिझायनर विपुल हळदणकर उपस्थित होते.
मालगावे म्हणाले, नाटक किंवा चित्रपटांमध्ये ध्वनी संयोजकाचे कार्य व जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. घटना आणि वातावरणानुसार ध्वनी प्रभाव आवश्यक आहे. ध्वनी व संगीतामध्ये भावना ओतल्याशिवाय आशयामध्ये जिवंतपणा येत नाही. आवाजासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. चित्रपटाच्या अनेक दृश्यांमध्ये ध्वनी असल्याशिवाय दृश्य प्रभावी होत नाहीत. काही घटनांचे ध्वनी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करावे लागतात तर काही मूळ स्वरूपात घ्यावे लागतात. यातून चित्रपटांची प्रक्रिया पूर्ण होते.
आर्ट डिझाईन विषयी बोलताना विपुल हळदणकर म्हणाले, चित्रपटात कला दिग्दर्शन स्थळ-काळाचे अवकाश निर्माण करते. चित्रपटांना प्रवाही ठेवण्यासाठी कला दिग्दर्शन अनिवार्य आहे .दिग्दर्शकाची आणि कथेची भूक कलादिग्दर्शकाला ओळखता आली पाहिजे. विविधता, उत्सर्जन, ताल, लय, श्रेणीक्रम, प्रमाण, प्राधान्य आदी दृश्यकलेचे मूलभूत घटक आहेत. बिंदू, रेषा, आकार, छाया, भेद, रंग आदींची माहिती कला दिग्दर्शकाने करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
स्वागत आणि प्रस्ताविक फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. पाहुण्यांची ओळख अनुप जत्राटकर यांनी करून दिली. सूत्रसंचालन साक्षी वाघमोडे हिने केले तर आभार प्रवीण पांढरे याने मानले. यावेळी जयप्रकाश पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, जयसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.