October 6, 2024
redwattled-lapwing says it will rain in October this year too
Home » Privacy Policy » टिटवी सांगते यंदा ऑक्टोबरमध्‍येही पाऊस !
संशोधन आणि तंत्रज्ञान

टिटवी सांगते यंदा ऑक्टोबरमध्‍येही पाऊस !

पाऊस ऑक्टोबरमध्‍येही !
निसर्गाचे बदलणे नियमीत नाही. मानवाच्या आकलनापलिकडे हे बदल आहेत. या बदलांची जाणीव होईल असे अभ्यासक बोटावर मोजावेत इतके कमी आहेत. या जाणकारांपैकी काही तज्ज्ञांनी जाणीव करून देण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. इंटरगव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज या संस्थेच्या माध्यमातून अनेकदा निसर्गाच्या पर्यावरणाच्या बदलत्या रूपाबद्दल सांगण्यात येत आहे.

पाणी, जीवन, पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे कारण. हे पाणी मिळते पावसातून. त्यासाठी पावसाळा महत्त्वाचा. पावसाळा वेळेवर सुरू झाला. पाऊस व्यवस्थीत पडला की पृथ्वीवरील जीवसृष्टी फुलून जाते. पाणी हे द्रव अवस्थेतील ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे एक संयुग आहे. दोन हायड्रोजनचे अणू एका ऑक्सिजन अणूशी संयोग पावल्यानंतर एक पाण्याचा रेणू तयार होतो. या पाण्याच्या रेणूकडे भरपूर ऊर्जा असते, त्यावेळेस तो एकटा राहू शकतो. मात्र ज्यावेळी त्याच्याकडे असणारी ऊर्जा कमी होत जाते, तसा तो द्रवावस्थेत येण्यासाठी आपल्यासारखेच इतर पाण्याचे रेणू शोधत राहतो. मात्र त्यांना असेच कोठे एकत्र येता येत नाही. त्याला आवश्यकता असते, एका आधाराची. आधार देण्याचे काम हवेतील परागकण, धुलीकण करतात. त्यावेळी पाण्याचे रेणू परस्परांना संसजी बलांआधारे पकडून ठेवतात. असे बरेच कण एकत्र आल्यानंतर पाण्याचा थेंब तयार होतो. हवेतील ढगात असे पाण्याचे थेंब तयार झाले की ते गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे पृथ्वीकडे खेचले जातात आणि पाऊस पडतो. द्रवरूपातील पाणी पृथ्वीवर येते.

हे पाणी द्रवावस्थेत असल्याने उताराकडे वाहते. हे पाणी एका चक्रामध्ये अडकलेले असते. यालाच जलचक्र म्हणतात. पृथ्वीवर द्रवरूपातील पाणी सर्वाधिक प्रमाणात आहे. मात्र तरीही चांगले पाणी अपूरे आहे, असे ऐकावयास मिळते. दुर्दैवाने हे खरेही आहे. मात्र यामध्ये निसर्गाचा दोष नसून मानवाचा हलगर्जीपणा जास्त कारणीभूत आहे. पाणी द्रवावस्थेत उताराकडे वाहत असताना त्याचा सुरुवातीस ओढा बनतो. ओढे परस्परांना मिळून नदी बनते. नदीतील पाणी वाहत जाऊन समुद्राला मिळते. पावसातून मिळणारे पाणी हे अत्यंत शुद्धरूपात असते. असे पाणी मानवाने वारंवार प्राशन केले, तर त्याचे आरोग्य नीट राहत नाही. कारण पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवर येते, वाहते, तेव्हा त्यामध्ये अनेक क्षार मिसळतात. या क्षारातील मर्यादित स्वरूपात अनेक क्षार मानवाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

हे खरे असले तरी पुढे मानव हेच पाणी स्वच्छतेसाठी वापरतो. वापरलेले पाणी सर्व घाण घेऊन नागरी वस्तीतून बाहेर पडते. नदीच्या पात्रात मिसळते आणि पुढे समुद्रात मिसळते. समुद्रात पाणी मुबलक आहे. या पाण्याची सूर्य प्रकाशातून मिळणाऱ्या ऊर्जेने वाफ बनते. वाफ हलकी असल्याने हवेत वर जाते. अशी वाफ ढग बनवते. हवा किती वाफ सामावून घेऊ शकते, यालाही एक मर्यादा असते. संपृक्तावस्थेपर्यंत वाफ हवेत राहू शकते. त्यापेक्षा जास्त वाफ हवेत राहू शकत नसल्याने ती बाहेर पडणे आवश्यक असते.

वाफेचे संपृक्तीकरणापेक्षा झाले की ढग बनतात. ढग वातावरणात खूप उंचावर असतात. त्या ठिकाणी तापमान कमी असते. तापमान कमी असल्यामुळे वाफेचे रूपांतर जलकण आणि नंतर जलबिंदूमध्ये होते. निसर्गात कोट्यावधी वर्षांपासून अहर्निष सुरू आहे. त्यामध्ये कधीही मोठा फेरबदल संभवत नसे. काही वर्षे अवर्षणाची असत. मात्र निसर्गातील काही संकेतानुसार या दुष्काळाचा अंदाज अभ्यासकांना येत असे. त्यानुसार पुढील वर्षांचे, दुष्काळ काळाचे नियोजन करण्यात येत असे. मात्र आज सर्व काही बदलत चालले आहे.

निसर्गाचे बदलणे नियमीत नाही. मानवाच्या आकलनापलिकडे हे बदल आहेत. या बदलांची जाणीव होईल असे अभ्यासक बोटावर मोजावेत इतके कमी आहेत. या जाणकारांपैकी काही तज्ज्ञांनी जाणीव करून देण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. इंटरगव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज या संस्थेच्या माध्यमातून अनेकदा निसर्गाच्या पर्यावरणाच्या बदलत्या रूपाबद्दल सांगण्यात येत आहे. पाऊस कधीही, कोठेही आणि कितीही पडू शकतो. कुठे दुष्काळ, तर कोठे अतिवृष्टी. मात्र आपण म्हणतो, पावसाळा पुढे गेला आहे. मात्र तसे नाही. तो कधी येणार हे निसर्गातील अनेक घटक मात्र अचूक ओळखतात. यावर्षी पावसाळा उशिराने सुरू होणार असेच निसर्गसंकेत होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा नेहमीप्रमाणे येणार आणि सरासरीइतका पडणे आपेक्षित आहे. निसर्गसंकेतातून अल्पकालीन तसेच दिर्घकालीन पावासाचा अंदाज येतो. यावर्षीच्या निसर्गसंकेतानुसार पावसाळा उशिराने सुरू होणार आणि दिर्घकाळ राहणार हे सांगणारा पक्का संकेत होता तो म्हणजे टिटवीचा.

टिटवी अंडी किती घालते, कोठे घालते आणि कधी घालते, यावरून पावसाचा नेमका अंदाज येतो. यावर्षी टिटवीची अंडी मे महिन्याच्या अखेरीस दिसू लागली. जुलैच्या मध्यापर्यंत शेवटच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडली. त्यानंतर पाऊस खऱ्या अर्थाने सुरू झाला. टिटवी साधारण मार्चच्या अखेरीस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंडी घालते, तेव्हा पावसाळा नियमीत जूनच्या पहिल्या सप्ताहात सुरू होतो. हल्ली अशा प्रकारे मार्चच्या अखेरीस क्वचितच अंडी घातलेली आढळतात. यावर्षी अंडी तलावाच्या, नदीच्या पात्रातही घातलेली होती. मात्र ती पात्राच्या केंद्रस्थानी नव्हती, थोडी बाहेर, पूररेषेजवळ होती. म्हणजेच या अंड्यातून सर्व पिल्ली बाहेर पडेपर्यंत पूराच्या पाण्याची पातळी टिटवीच्या घरट्यापर्यंत येणार नाही. तसेच पात्राच्या वरच्या बाजूला असल्याने पात्र वाहते होणार आहे. पिकापुरता पाऊस येणार आहे. टिटवीची अंडी किती आहेत त्यावरून पावसाळा किती महिने राहणार याचा अंदाज येतो.

यावर्षी टिटवीची चार अंडी आढळून आली होती. अपवादानेही चारपेक्षा कमी अंड्याचे घरटे आढळून आले नव्हते. म्हणजेच पाऊस किमान चार महिने टिकणार आहे. पाऊस जुलैच्या मध्यानंतर सुरू झाला यावरून तो ऑक्टोबरपर्यंत टिकणार, हे दिसून येते. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपल्याकडील पावसाळा हा ऑक्टोबरपर्यंत टिकणार आहे. अल निनाच्या प्रवाहातील बदलत्या संकेतानुसार सप्टेबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरण पावसासाठी अनुकूल बनेल आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

कमी दाबाचा पट्टा तयार झाला की, त्या दिशेने थंड हवा वेगाने जाऊ लागते. यामध्ये पूर्वीच थंड असलेले ढग या वेगाने होणाऱ्या हालचालीमुळे जलकणांची आणि जलबिंदूची निर्मिती वेगाने होऊ लागते आणि पाऊस जोरात पडतो. असेच काहीसे यावर्षीही अपेक्षित आहे. शेतकऱ्याची खरीपाची पिके काढणीला आलेली असताना हा पाऊस पडणार असल्याने शेतकरी बंधू सावध रहा…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading