डॉ. शंकर हांगिरगेकर, डॉ. नवनाथ वळेकर, अक्षय गुरव, ललित भोसले यांची कामगिरी
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांच्या अनुषंगागने केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनास जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. या संशोधन कार्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्यासह डॉ. नवनाथ वळेकर आणि संशोधक विद्यार्थी अक्षय गुरव, ललित भोसले यांनी सहभाग घेतला.
या संशोधनासंदर्भात डॉ. हांगिरगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बायोमासमधील नैसर्गिक घटकांचा वापर करून फुरफुराल हा घटक वेगळा करून हायड्राझिनिल थायाझोल हे संयुग बनविण्यात संशोधनांतर्गत यश आले. हे संयुग स्तनाच्या कर्करोगावरील आधुनिक आणि प्रभावी उपचारांसाठी मोलाचे ठरणार आहे. या संशोधकांनी विकसित केलेल्या संयुगामुळे स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवणे शक्य होणार असून पारंपरिक उपचार पद्धतीच्या दुष्परिणामांना आळाही बसेल.
बदललेल्या जीवन शैलीमुळे स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढत चालला आहे. यामुळे मृत्यूदरही अधिक आहे. सध्या या कर्करोगाच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी, हार्मोनथेरपी, इम्युनोथेरपी अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धती वापरात आहेत. परंतु या पद्धतींमध्ये रूग्णाला उपचारादरम्यान होणाऱ्या दुष्परिणामांना (साईड इफेक्ट्स) सामोरे जावे लागते. या संशोधनामुळे स्तनाच्या कर्करोगावरील उपचार पद्धती अधिक प्रभावी आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे, असे डॉ. हांगिरगेकर यांनी सांगितले.
गत वर्षी डॉ. हांगिरगेकर, गुरव आणि भोसले यांनी ग्राइंडस्टोन केमिस्ट्री वापरुन बायोमासपासून हायड्रॉक्झी मिथाईल फुरफुराल या मूलद्रव्यापासून नवीन हायड्राझिनिल थायाझोल संयुग तयार करण्याच्या शोधलेल्या पद्धतीला संयुक्त राष्ट्रांचे (यूके) पेटंटही प्राप्त झाले आहे. त्यापुढील टप्पा म्हणजे हे स्तनाच्या कर्करोगावरील त्याचे उपयोजन ठरले आहे.
या संशोधनाबद्दल कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनावणे यांनी संशोधक चमूचे अभिनंदन केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.