October 6, 2024
Hindi language is a symbol of Indian identity and pride
Home » Privacy Policy » हिंदी भाषा भारतीय अस्मिता अन् अभिमानाचे प्रतीक
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

हिंदी भाषा भारतीय अस्मिता अन् अभिमानाचे प्रतीक

14 सप्टेंबर हिंदी दिवस या निमित्ताने….
दिवस साजरा करण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदीला राजभाषा म्हणून मान्यता मिळाल्याचा आनंदोत्सव, हिंदीचे महत्त्व आणि त्याची समृद्धी वाढवणे व हिंदीला जागतिक भाषा म्हणून जगासमोर सादर करणे होते. यानंतर केंद्र शासनाची कार्यालये, संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हिंदी दिवस साजरा केला जाऊ लागला.

डॉ. प्रकाश राजाराम मुंज,
सहायक प्राध्यापक, हिंदी विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. मो. 9552338189

देश स्वातंत्र्यानंतर, 14 सप्टेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदीला राष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले. याचबरोबर इंग्रजीला ही अवघे 15 वर्षांसाठी राजभाषा म्हणून स्वीकारली, मात्र ती कायमस्वरूपी राज्य करून राहिली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1953 पासून दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

भाषातज्ज्ञ काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून पहिल्यांदा साजरा केला. हा दिवस साजरा करण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदीला राजभाषा म्हणून मान्यता मिळाल्याचा आनंदोत्सव, हिंदीचे महत्त्व आणि त्याची समृद्धी वाढवणे व हिंदीला जागतिक भाषा म्हणून जगासमोर सादर करणे होते. यानंतर केंद्र शासनाची कार्यालये, संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हिंदी दिवस साजरा केला जाऊ लागला.

जागतिक भाषांचा अभ्यास करणारी संस्था इथनोलॉग (ethnologue)च्या सर्वेनुसार हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. मात्र भारतीय भाषातज्ज्ञ डॉ. जयंतीप्रसाद नौटियाल यांच्या यांनी केलेल्या जागतिक सर्वेक्षणात हिंदी पहिल्या स्थानी मानली आहे. सर्वे कोणताही असो मात्र संयुक्त राष्ट्र संघाने त्यांची माहिती हिंदीत प्रसारित करण्याचा निर्णय इंटरनेटच्या युगात हिंदीला जागतिक महत्त्व प्राप्त करण्यासाठी हे एक नवे आकाश मिळाले आहे. सध्या 200 देशांत हिंदी शिकवली जात आहे. जागतिक महासत्ता बनू पाहत असलेले भारत देशात आपले स्थान निर्माण करण्याच्या हेतुने अमेरिका 816 कोटी खर्च करून एक हजार शाळांमध्ये हिंदी शिकविण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच ब्रिटनही डिसेंबर 2023 पासून 1500 शाळांमध्ये हिंदीचे धडे देते आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही मशीन ट्रान्सलेशन, हिंदी भाषेतील चॅटबॉट्स, शिक्षण व आरोग्य सेवा आधारित प्रणालीद्वारे हिंदी भाषेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. जगातील बहुसंख्य लोकसंख्येने हिंदीचा स्वीकार करणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. केंद्र शासनाच्या राजभाषा विभागाने ई-महाशब्दकोश, ई-सरल, लीला हिंदी प्रवाह, कंठस्थ सॉफ्टवेअरसह डिजिटल सेवेसाठी भाषिणी मिशन सुरू केले आहे. हिंदीच्या विकासात ही भरीव कामगिरी आहे.

भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. हा उत्सव साजरा करताना आपल्याला राष्ट्रभाषेचा विसर पडला. राष्ट्रीय अस्मितेचे आणि अस्तित्वाचे प्रतीक असलेल्या आणि सांस्कृतिक-राष्ट्रीय स्वाभिमानाची सांगड घालणाऱ्या हिंदीकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्षित केले. यामागची मुख्य कारण भारतातील भाषिक विविधता व इतर भाषांशी भेदभाव होऊ नये, दक्षिण भारतातून होणारा हिंदीला विरोध व हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांमध्ये असणारे मतभेद असावेत. मात्र देशाची एकता आणि अखंडता राखण्यात आणि स्वातंत्र्य मिळवण्यात हिंदीचा सिंहाचा वाटा असल्याचे आपण विसरून चालणार नाही.

अनेक मान्यवरांनी राष्ट्रभाषा स्थापन करण्यासाठी आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले, त्यापैकी सुमित्रानंदन पंत, महादेवी वर्मा आणि वेदप्रताप वैदिक हे प्रमुख आहेत. आग्राचे खासदार सेठ गोविंददासजी यांनी इंग्रजी भाषेच्या निषेधार्थ त्यांची पद्मभूषण पदवी केंद्र सरकारला परत केली. याचा विचार करता हिंदी हा भारतीय नागरिकांचा स्वाभिमान आणि स्वावलंबनाचा भक्कम आधार असल्याचे स्पष्ट होते. शेवटी जागतिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी, यूनोने दखल घेतलेली व जगभरात लोकप्रिय होत चाललेली हिंदीला तिच्या मातृभूमीत राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा. हीच अपेक्षा…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 comment

द ब्रिज September 14, 2024 at 1:45 PM

मराठी असो हिन्दी असो,
एक दिवस लक्ष्मी फटाका बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस सुतकी टिकल्या पण इल्ले.

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading