May 20, 2024
bjp-target-maharashtra-in-loksabha-election-why
Home » अब की बार; महाराष्ट्र मोलाचा…
सत्ता संघर्ष

अब की बार; महाराष्ट्र मोलाचा…

गेल्या साडेचार वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण कमालीचे बदलले. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा सहा राजकीय पक्षांच्या दोन आघाड्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी ‘करो या मरो’ असा संघर्ष पेटलेला आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी या लढाईत कोणाच्या किती जागा कमी होणार, याचीच चर्चा आणि सर्व्हेची आकडेवारी सर्वत्र ऐकायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर सर्वाधिक ८० खासदार निवडून जातात, त्यानंतर महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडले जातात. म्हणूनच मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅटट्रीक संपादन करण्यासाठी महाराष्ट्र हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक डझनपेक्षा जास्त प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या आहेत. आणखी सभा व रोड शो होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही अनेक सभा झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेते महाराष्ट्रभर फिरताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकायच्या असे भाजपने प्रारंभी जाहीर केले. नंतर काहींनी उत्साहाच्या भरात सर्व ४८ जागा महायुती जिंकणार असेही म्हटले. राज्यात व केंद्रात भाजपाप्रणीत एनडीएची सत्ता आहे म्हणून शंभर टक्के टार्गेट साध्य करता येईल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे.

भाजपच्या सभांमध्ये फडणवीस आत्मविश्वासाने भाषण करीत आहेत. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी व शिवसेनेचे आजी-माजी मंत्री महायुतीच्या मंचावर दिसत आहेत. ज्यांनी पाच वर्षांपूर्वी भाजपच्या विरोधात राणाभीमदेवी थाटात भाषणे केली, भाजपचा पराभव म्हणून प्रचार केला ते नेते आता भाजपच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे जोरजोराने सांगत आहेत. गेल्या दोन-अडीच वर्षांत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी तोडफोड झाली. दोन्ही पक्षांतील ताकदवान गट भाजपच्या आडोशाला गेला. जे भाजपचा पराभव करून आमदार-खासदार झाले, ते सुद्धा भाजपचा हिरीरीने प्रचार करताना दिसत आहेत. हा सर्व चमत्कार मोदी करिष्म्याने घडवला आहे.

यंदाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना डझनभर मतदारसंघांत एकमेकांना पाडण्यासाठी लढत आहेत. तसेच काका-पुतण्या, भाऊ-भाऊ, नणंद-भावजय सुद्धा एकमेकांना आव्हान देऊन निवडणूक रिंगणात आहेत. एकेकाळी महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा गड होता. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने ४२ जागा जिंकल्या तेव्हाच काँग्रेसचे बुरुज कोसळले. २०१९ च्या निवडणुकीतही ४८ पैकी ४१ खासदार सेना-भाजप युतीचे निवडून आले व चंद्रपूरमधून काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला. त्यानंतर काँग्रेसचे अस्तित्व नावापुरते राहिले.
सन २०१९ ची विधानसभा निवडणूक अविभाजित शिवसेना-भाजपने एकत्रपणे लढवली. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला दूर ठेवून थेट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला व मुख्यमंत्रीपद स्वत:च्या पदरात पाडून घेतले. ठाकरे मुख्यमंत्री झाले पण त्यांना सरकारवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यांच्या नेतृत्वाच्या विरोधात पक्षाच्या आमदारांत मोठी खदखद आहे हे कळूनही ते शांत राहिले.

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अपक्षांसह ५० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावला व ठाकरे सरकार कोसळले. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी त्यांच्या काकांच्या विरोधात रणशिंग फुंकले व तेही आमदारांची फौज घेऊन बाहेर पडले. भाजपच्या हायकमांडचे आशीर्वाद, पाठबळ व संरक्षण असल्यामुळेच एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे एवढे मोठे महाधाडस करू शकले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे व अजित पवार यांनी शरद पवार यांचे नेतृत्व जाहीरपणे झुगारले व विकसित भारतासाठी मोदींचीच गरज असल्याचे ते सांगू लागले. म्हणूनच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे काय होणार, त्यांचे किती खासदार निवडून येणार व त्यांच्यामागे जनाधार किती आहे, याचा कस लागणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात आमदारांनी पक्षांतर केल्याच्या अनेकदा घटना घडल्या. पण एका वर्षांच्या अंतराने दोन प्रमुख पक्षांत उभी फूट कधी पडली नव्हती किंवा एवढी मोठी तोडफोड झाली नव्हती. पक्षात बंड करायचे, नेतृत्वाला आव्हान द्यायचे व आपलाच गट हा खरा पक्ष आहे, असा दावा करायचा हे महाराष्ट्राला नवीन होते. एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा राज ठाकरे यांनी आपल्या भूमिका बदलून भाजपबरोबर घरोबा केला हे त्यांना सोयीस्कर व फायदेशीर झाले असले तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या ते किती पचनी पडले आहे ते ४ जूनला मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. अजित पवार किंवा अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले होते. पण त्यांचे भाजपाने लाल गालिचा अंथरून स्वागत केले हे जनतेला आश्चर्यकारक होते.

सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान झाले होते मग २०२४ मध्ये पाच टप्प्यांत का? याचेही उत्तर कोणी देऊ शकलेले नाही. सर्व्हे अनुकूल नाही म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही मावळत्या खासदारांना उमेदवारी नाकारली, हे जसे धक्कादायक होते तसेच भाजपने आपल्या मावळत्या खासदारांचे तिकीट का कापले याचे कारण कोणाला समजले नाही. विशेषत: मुंबईतील मनोज कोटक, गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन या जनाधार व लोकसंपर्क असलेल्या तीनही खासदारांची उमेदवारी का नाकारली हे पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही उमजले नाही. एकनाथ शिंदे यांना एनडीएमध्ये घेतल्यावर अजित पवारांना घेण्याची गरज का भासली तसेच शिंदे व अजित पवार आल्यानंतरही राज ठाकरे यांना का निमंत्रित करण्यात आले याचे रहस्य कुणालाच कळले नाही. केवळ विरोधी पक्ष कमकुवत करणे एवढेच उद्दिष्ट असेल, तर त्याचा लाभ मतदानाच्या टक्केवारीत किती मिळेल, हे ४ जूनला समजेल.

महाआघाडीतही सर्व काही अलबेल आहे, असे मुळीच नाही. सांगली व भिवंडी हे काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ, तिथे आघाडीतील मित्रपक्षांनी परस्पर उमेदवार जाहीर केले म्हणून उबाठा सेना व राष्ट्रवादी पवार गट यांच्याविरोधात नाराजी आहे. आघाडीत येणार येणार म्हणून गाजावाजा बराच काळ झाला त्या प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी स्वतंत्रपणे लढत आहे, शेतकरी नेते राजू शेट्टी यांचाही पक्ष आघाडीत न जाता स्वतंत्रपणे मैदानात आहे. इंडिया आघाडीचा गाजावाजा मोठा झाला पण महाराष्ट्रात सर्व विरोधी पक्ष एका बॅनरखाली एकत्र येऊ शकले नाहीत.

महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षांपासून एक अतृप्त आत्मा भटकतोय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर शरसंधान साधले, पण चार दिवसांतच त्यांना काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा, शिंदे आणि अजितदादांना साथ द्या असा सल्ला दिला, यातून मतदारांनी काय बोध घ्यायचा? ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले आणि राज्याचे राजकारणच बदलले. पक्ष फुटीचे खापर दोन्ही पक्ष भाजपवर विशेषत: मोदी व फडणवीसांवर फोडत आहेत. पण या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला आपले पक्ष सांभाळता आले नाहीत, याचे आत्मपरीक्षण कुणी करायचे? मोदींची लोकप्रियता घसरते आहे, मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत, एनडीएला पंचवीसपेक्षा जास्त जागा महाराष्ट्रातून मिळणार नाहीत, अशी गणिते रोज सोशल मीडियावर मांडली जात आहेत, पण मोदी-मोदी जयघोष करणाऱ्या मतदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे.

सन २०१४ व २०१९ मध्ये मोदींना देशात पर्याय नव्हता व २०२४ मधेही देशपातळीवर पर्याय नाही. पण इंडियाकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण या प्रश्नाचे उत्तर आघाडीतील २६ पक्षांना देता आलेले नाही. तसेच मोदींची लोकप्रियता उत्तुंग असताना भाजपला राज्यात दोन मोठे पक्ष का फोडावे लागले, याचे उत्तरही कोणी देत नाही. ‘अब की बार…’ घोषणा सत्यात उतरावयाची असेल, तर महाराष्ट्रातील खासदारांचे संख्याबळ भाजपच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

Related posts

डॉ. अपर्णा पाटील यांच्या कावेरी कादंबरीचे शनिवारी प्रकाशन

आळसाचाच आळस करायला शिका

भाताचे देशी वाण संवर्धनाचा सूर्याजी पाटलांनी घेतलाय वसा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406