April 22, 2025
Dr. Sunil Pawar speaking at a workshop on climate change and monsoon research, highlighting its economic impact.
Home » भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सूनविषयी संशोधन महत्त्वाचे: डॉ. सुनील पवार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सूनविषयी संशोधन महत्त्वाचे: डॉ. सुनील पवार

कोल्हापूर : मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास आणि संशोधन महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात ‘हवामान बदल आणि भारतीय मान्सून’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाचा भूगोल अधिविभाग, हवामान बदल आणि शाश्वत केंद्र, पर्यावरण शास्त्र विभाग, संख्याशास्त्र अधिविभाग आणि पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. पवार म्हणाले, भारतीय उपखंडाच्या दृष्टीने मोसमी वारे आणि मोसमी पावसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास आणि अंदाज या बाबी आवश्यक आहेत. तो केवळ हवामान अगर पर्यावरणाचा घटक नाही, तर भारतीय अर्थकारणाचा प्रमुख स्रोत म्हणूनच आपण त्याकडे पाहिले पाहिजे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी मान्सून हा आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एका अर्थाने आपले संपूर्ण जीवन त्यावर अवलंबून आहे. हवामान बदलाचेही तीव्र परिणाम जगभर दिसून येत आहेत. औद्योगिकीकरण, वायू प्रदूषण आणि वाढते तापमान यामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. वाढते तापमान, बेभरवशाचे वातावरणीय बदल, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर या साऱ्या बाबींचे शेती, जलसंपत्ती आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. या हवामान बदलाचे परिणाम भारतीय मान्सूनवरही होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास आणि संशोधन यांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. आय.आय.टी.एम.मध्ये विद्यार्थ्यांचे सदैव स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी शिवाजी विद्यापीठ आणि आय.आय.टी.एम. यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत चांगले काम सुरू असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, हवामान बदल हा आता काही केवळ भूगोल किंवा पर्यावरणशास्त्राचा विषय राहिलेला नाही. कोणताही विषय अथवा क्षेत्र त्यापासून अस्पर्शित राहिलेले नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रांतील अभ्यासक, संशोधकांनी त्यासाठी पुढे येणे आवश्यक बनले आहे. समाजाच्या विद्यापीठाकडून अनेक अपेक्षा असतात. त्यांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने आयआयटीएमसारख्या राष्ट्रीय संस्थेसोबत जोडले जाणे महत्त्वाचे असते. आज गतीने बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज तितक्याच गतीने वर्तविण्याचे आव्हानही आपल्यासमोर आहे. तसे झाल्यास आपण जिवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात रोखू शकतो. विद्यार्थी व संशोधकांनी त्या दृष्टीने आपल्या अभ्यासाच्या दिशा केंद्रित कराव्यात. विद्यापीठाचे पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्र आणि भूगोल अधिविभाग येथे आयआयटीएम काही अत्याधुनिक उपकरणे बसविणार आहे. त्या डेटाचाही संशोधन व विश्लेषणासाठी मोठा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भारती विद्यापीठाचे डॉ. दादा नाडे प्रमुख उपस्थित होते. डॉ. सचिन पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले, डॉ. आसावरी जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर डॉ. शशीभूषण महाडिक यांनी आभार मानले.

या कार्यशाळेत पुढे दिवसभरात झालेल्या विविध सत्रांत आयआयटीएमचे प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ डॉ. हाफजा वरिकोडण, डॉ. सुरज के.पी. आणि डॉ. प्रशांत पिल्लई यांनी मान्सूनवरील हवामान बदलाचा प्रभाव, संभाव्य परिणाम आणि त्यावरील वैज्ञानिक उपाययोजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading