डॉ. आलोक जत्राटकर यांचे हे लेखन मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे आहे. आत्मपरता आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे विशेष नोंदवणारे तसेच त्यांच्या विचारदृष्टीचे सम्यकचित्र या लेखनात आहे. व्यापक सामाजिक दृष्टी, समतोल विवेक, चिंतनशीलता आणि सामाजिक हस्तक्षेप ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. आपले सामाजिक व नागरी जीवन अधिकाधिक सुखकारक व वर्धिष्णू व्हावे, अशा व्यापक तळमळीतून ते निर्माण झाले आहे. वाचक आणि मराठी समूहाचे समाजभान विस्तारविण्यामध्ये अशा लेखनाचे मोल निश्चित महत्त्वाचे ठरते.
प्रा. रणधीर शिंदे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
डॉ. आलोक जत्राटकर यांच्या या लेखसंग्रहाविषयी काही आरंभीचे शब्द. डॉ. जत्राटकर हे शिवाजी विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते विद्यापीठात रूजू झाल्यानंतर दहा-एक वर्षांपूर्वी त्यांच्याशी माझा परिचय झाला. प्रथमदर्शनी वैयक्तिक संदर्भात आरंभीच्या काही महिन्यांत मला त्यांचा वावर काहीसा शिष्ट वाटला, ते त्यांच्या बाह्यरूपामुळे. वेशभूषा, केशभूषा आणि त्यांचा वावर नागरी वळणाचा असल्यामुळे. त्यानंतर विद्यापीठातील विविध कार्यक्रम आणि काही कामानिमित्त आमच्या भेटी होऊ लागल्या. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, स्वभावाचे आणि कार्यपद्धतीचे काहीएक जवळून दर्शन झाले. कामाच्या बाबतीत नेहमी कर्तव्यदक्ष, कल्पक दृष्टी आणि कामावरील अतोनात निष्ठा हे त्यांचे वैशिष्ट्य. लेखन, तंत्रज्ञानामधील पारंगतता आणि लोकाभिमुखता ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये! व्यक्तिगत आवड तसेच सामाजिक आवडीसाठी तंत्रज्ञानाचा किती चांगला उपयोग करता येऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. जत्राटकर. या आवडीपोटीच त्यांनी स्वतःचे ‘आ’लोकशाही’ नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू करून अनेक मान्यवरांच्या मुलाखती आणि भाषणे प्रसारित केली. तसेच विद्यापीठाच्या ‘शिववार्ता’ वाहिनीवरून देखील मुलाखती, भाषणे प्रसारित करण्यात त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. याबरोबरच सांगितिक विश्व हा त्यांच्या आवड आणि छंदाचा महत्त्वाचा भाग. समाजमाध्यमांवर आणि अन्यत्रही जत्राटकर यांनी उत्तम गाणी गायिली आहेत.
समाजमाध्यमांवर सामाजिक, सांस्कृतिक व ग्रंथांविषयीच्या नोंदी घेत राहणे हा त्यांचा चांगला गुण. या आवड-अभ्यासाचाच एक भाग म्हणून त्यांनी मध्यंतरी ‘गुलामी’ (१९८५) चित्रपटातील ‘जिहाल-ए-मस्कीं मकुन-ब-रन्जिश, बहाल-ए-हिजरा बेचारा दिल है’ या मिठास आणि लोभस गाण्याचे केलेले रसग्रहण आणि विश्लेषण. ते त्यांच्या सांगितिक प्रेमाची साक्ष आहे. अनेकदा गाण्यांचे मुखडे आणि मधुर नादबंधांच्या सुरावटी आपल्या कानावर आणि मनावर आंदोलत असतात, त्या अर्थाशिवाय. अशी गाणी आपला माग काढत असतात. त्यातील शब्दार्थ मात्र अनाम राहतात. वयाच्या एका टप्प्यावर अशा गाण्यांच्या अर्थशोधयात्रेतून त्याचे उत्खनन केल्यास त्यातील अर्थसमजुतीतून वेगळा आनंद मिळतो. असा आनंद ते कायम मिळवतात.
पत्रकार मित्र सचिन परब हा आमच्यातला समान संवाददुवा. सचिन कोल्हापुरात आला की, गप्पांना उधाण येते. या संवादात आडपडदा नसतो. डॉ. जत्राटकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि विचारदृष्टीचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे, व्यक्ती, विचारांबद्दलची सकारात्मक समन्वयदृष्टी. तसेच त्यांच्या विचारदृष्टीत सर्व प्रकारच्या मानवी गुणांवर आणि सद्भावावर असणारा विश्वास, हेही त्यांचे वैशिष्ट्य. वगळण्याचा भाग जत्राटकर यांच्या दृष्टीत नसतो. सर्व प्रकारच्या संगतीगुणांमुळे त्यांची दृष्टी ही उदार आणि सर्वसमावेशक इन्क्लुजिव्ह झाली आहे. ती उदार आणि उमदी आहे. ती एकारलेली नाही. सामाजिक जीवनाबद्दल अशी दृष्टी आणि गाढ आस्था आजच्या एकारलेल्या सार्वजनिक जीवनात अभावरूपानेच पाहायला मिळते. या लेखसंग्रहात डोकावण्याआधी पार्श्वभूमीदाखल हे शब्द महत्त्वाचे वाटले. कारण डॉ. जत्राटकर यांच्या या स्वभावदृष्टीचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पाहायला मिळते.
लॉकडाऊन कालखंडातील एकांतकाळाने आणि नंतरच्या काळातील काही घटना, प्रसंग, घडामोडींवरून स्फुरलेले हे लेखन आहे. ते संमिश्र स्वरूपाचे आहे. त्याचे स्वरूप हे प्रतिक्रियात्म व प्रासंगिक स्वरूपाचे आहे. संग्रहातील पहिलाच लेख ‘मेरे अंदर मेरा छोटासा शहर रहता है’. या लेखावरून वाटले की जत्राटकर यांचा हा सर्व लेखनप्रांत हा ललित स्वरूपाचा आहे. मात्र पुढे पुढे वाचत गेल्यानंतर ते समाजचिंतनशील स्वरूपाचे आहे, हे लक्षात येते. आजघडीला मराठी ललितगद्याचा बहुल असा विस्तार झाला आहे. एकेकाळी व्याजरोमँटिक आणि भाबडे भावविवश अलंकरणशील असे मराठी ललितगद्य मोठ्या प्रमाणात लिहिले जात होते. नव्वदनंतर मात्र महाराष्ट्राच्या विविध भागातील लेखकांनी लिहिलेले ललितगद्य हे समाज-संस्कृती, निसर्गनिष्ठ स्वरूपाचे आहे. मानवी जीवनातील विविध अंगांचा त्यास स्पर्श झाल्यामुळे ते व्यापक झाले आहे. त्यामुळे या ललितगद्याच्या धमन्यांचा विस्तार झाला. त्यामध्ये अनिल अवचटांसारख्या मातब्बर लेखकाचा आवर्जुन उल्लेख करायला हवा.
‘मेरे अंदर मेरा छोटासा शहर रहता है’ या लेखात निपाणी गावाचे स्वभावशब्दचित्र आहे. त्यांचे गावाविषयीचे गतस्मरणरंजन आहे. गावकृतज्ञता आहे. स्थानिक लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती आणि या गावातील माणसांविषयीच्या आस्थानोंदी आहेत. गावप्रेम आणि आत्मपरतेच्या अंगाने जुने गाव आणि आताचे गाव हा ‘बदल’ही टिपला आहे. बालपणातील ‘न दुनिया का गम था, ना रिश्तों के बंधन, बडी खुबसूरत थी वो जिंदगानी’ या बालगावभावना गतकातरतेशी नाते सांगणारे हे लेखन आहे. ‘आई माझा गुरू’ या लेखात आईच्या संस्काराच्या हृद्य आठवणी आहेत. लेखकाच्या बालपणातील ‘घडवणुकी’ची ही मातृसंस्कारकथा आहे.
डॉ. जत्राटकर यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक प्रकारच्या संवेदनशीलतेचे पैलू आहेत. या त्यांच्या संवेदनशीलतेतून स्फुरलेले विषय या लेखनात आहेत. परिसरचित्र आणि इतिहासदृष्टी हा त्यापैकीच एक. कर्नाटकातील यादवाड येथील शिवरायांच्या शिल्पाविषयीच्या नोंदी ‘शिवरायांचं शिल्प’ या लेखात आहेत. तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा शिवशिल्प पाहणीचा त्यांच्या मनावर जो ठसा उमटला, त्याचे वर्णन आहे. यादवाड या गावाशी निगडित, शिवाजी महाराजांशी निगडित कर्तबगार अशा मल्लाबाईची या वीरांगनेचा इतिहास त्यामध्ये आहे. अगदी या शिल्पावर या इतिहासकथेचा असणारा प्रभाव टिपला आहे. या शिल्पाच्या ‘एक चतुर्थांश भागात मल्लाबाईची कथा आहे. या शिल्पात शिवाजी महाराज आसनावर बसलेले आहेत. त्यांच्या मांडीवर एक मूल आहे. त्याला ते दूधभात भरवताहेत. (‘भरवताहेत’ असे क्रियापद वापरणे हा देखील त्यांच्या स्वभावदृष्टीचा भाग आहे.) समोर मल्लाबाई एक वाटी घेऊन उभ्या आहेत. हे मूल मल्लाबाईंचे असून त्याच्या दूधभातासाठी म्हणून महाराजांनी त्यांना बेलवडी दोन गावांच्या इनामासह परत केली.’ इतिहास, दंतकथा आणि लोकव्यवहाराच्या स्मृती अशा प्रकारच्या नोंदींमधून लक्षात येतात. तर, ‘विरासत को नजरअंदाज न कर…’ सारख्या लेखात ऐतिहासिक स्थळांचा वारसा जतन, संवर्धनाची जाण प्रकटली आहे. अजिंठा परिसरातील लेणी शिल्पांचे जतन गंभीरपणे केले पाहिजे, याविषयीचे हे कथन आहे.
‘जिताडा फ्राय अन् अलार्मिंग मुंबई’ या कथनात प्रवासातील एक मजेशीर अनुभव कथन केला आहे. रात्रभर झोप नसल्यामुळे, रेल्वेत डुलक्या घेत असताना प्रवासात पहाटे अलार्म वाजतो आणि अर्धवट झोपेत असलेल्यांना तो बॉम्ब वाटतो. या प्रवासक्षणाचे हे कथन आहे. हा लेख रंजक कथनात्मतेच्या अंगाने जाणारा आहे. तसेच स्थानिक इतिहासाचा भाग म्हणून निपाणी येथील देवचंद महाविद्यालयातील सात तरुण प्राध्यापकांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात घेतलेला धाडसी सहभाग आणि त्यांना झालेल्या तुरुंगवासाचा इतिहास कथन केला आहे. (‘नामांतर सत्याग्रहातील सात भारतीय’) त्यातूनच ‘नामांतर समता संघर्षाचे नवे पर्व’ असा छोटेखानी इतिहासलेखन आकाराला आल्याची नोंद त्यांनी घेतली आहे.
डॉ. जत्राटकर यांच्या या समाजविचारशील लेखनात एक प्रभावी सूत्र आहे ते स्त्रीस्वातंत्र्याचे व स्त्रीसमतेचे. भारतीय समाजव्यवस्था पुरुषप्रधान चौकटी आहेत. स्त्रीवर अनेक बंधने आहेत. त्यामुळे तिच्या स्वातंत्र्याचा व अस्तित्वाचा संकोच झाला आहे. भारतीय परंपरा स्त्रीला विषम वागणूक देत आली आहे. तसेच आधुनिक काळातही नवी भांडवली बाजार व्यवस्था स्त्रीचे पारंपरिक प्रतिमान रचते. याबद्दलचा नकारसूर जत्राटकर यांच्या लेखात आहे. ‘पणती तेवत आहे’ सारख्या दीर्घलेखात महाराष्ट्रातील स्त्रियांच्या चळवळी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ब्राह्मणेतर चळवळी, राजर्षी शाहू महाराज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीप्रश्नासंबंधी केलेले कायदे व सुधारणा याबद्दलची मांडणी आहे. या पार्श्वभूमीवर आजघडीला रूढी, परंपरा व पारंपरिक स्त्री प्रतिमांना उठाव मिळत आहे. हा विरोधाभास जत्राटकर यांना हितावह वाटत नाही. मानवी अस्तित्व क्षीण करणाऱ्या परंपराचे पुनरुज्जीवन होत आहे, याबद्दल त्यांना खंत वाटते.
स्त्री-पुरुष समतेचे तत्त्व त्यांच्या अनेक लेखांचे विषय झाले आहे. ‘सर, फ्यामिली हय क्या?’ लेखात स्त्री पुरुष समतेचा विचार आहे. कुटुंब, सार्वजनिक जीवनातील स्त्रियांचा वावर मात्र त्यातही भेददृष्टी आहे. मानवी जीवनाला स्त्रीशिवाय अपूर्णत्व आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्याच्या अखेरच्या काळात ‘कौटुंबिक उपासना मंडळी’ स्थापना केली होती. जीवनाच्या हरएक प्रसंगात स्त्रीचा सहभाग आवश्यक असतो. यात समभाव आहे. किंवा महात्मा फुले यांच्या विचारदृष्टीतही नर-नारी समतेचे भान होते. या विचारदृष्टीचा प्रभाव जत्राटकर यांच्या लेखनावर आहे.
आजचे सार्वजनिक जीवन हे फार कलुषित एकांगी आणि हट्टाग्रही अस्मितावादी झाले आहे. तात्कालिक प्रतिक्रियावादी माहौल आणि त्याला मिळणारी प्रतिष्ठा जत्राटकर यांना अस्वस्थ करणारी वाटते. कोणत्याही घटनेवर सारासर विचार न करता उत्स्फूर्त प्रतिक्रिया देणे, ट्रोल करणे, एकांगी बाजू मांडणारा समूह सर्वत्र दिसत आहे. याबद्दल जत्राटकर यांची विशिष्ट भूमिका आहे. ती नीट समजून घ्यायला हवी. ‘अजीब दास्ताँ है ये’ या लेखात लता मंगेशकर यांच्या निधनानंतर ज्या एकांगी प्रतिक्रिया तरुण पत्रकारांनी नोंदवल्या ही बाब जत्राटकर यांना अस्वस्थ करणारी वाटली. ‘व्यक्ती गेल्यानंतर तिच्या चांगल्या बाबी आठवाव्यात. त्यातील अधिक चांगल्याचा स्वीकार करावा आणि माणूस म्हणून तिच्या हातून झालेल्या चुकांचा पाढा वाचत न बसता, त्या पाठीवर टाकून पुढे चालत राहावे.’ अशी समज आणि समाजदृष्टी जत्राटकर यांची आहे. ती व्यापक आणि सहिष्णू आहे.
तरतमभाव, सारासारविवेक हा नेहमीच महत्त्वाचा ठरतो, याचे भान त्यामध्ये आहे. विचारांमधील एकांगी अभिप्राय हा धोकादायक ठरू शकतो, याचे भान यात आहे. ‘श्यामच्या आईचा अस्वीकार आणि आपण’ या लेखातही हीच दृष्टी आहे. नागराज मुंजळे यांच्या ‘श्यामची आई मला माझी आई वाटत नाही.’ या विधानामागील भूमिका आणि त्याच्या पडसादाचा विचार लेखात मांडला आहे. अशा प्रकारच्या अस्वीकारामागं सामाजिक विषमता आणि माणसाची संधी नाकारणं, ही बाब आहे. त्यामुळे असे नकार एका मोठ्या चित्रफलकावर समजावून घ्यावे लागतात, असे त्यांना वाटते. ही विधाने एकांगी समजून घेणे त्यांना धोकादायक वाटते. तशी ती घेतली तर सार्वत्रिक नकार निर्माण होईल, अशी धोक्याची सूचना ते देतात. त्यासाठी ‘माणसाच्या सहृदयतेला साद घालत राहण्याची त्यांची क्षमता आपण सातत्यानं अधोरेखित करायला पाहिजे,’ असे त्यांना वाटते.
आजच्या सार्वजनिक जीवनातील काही प्रश्नांची मांडणी काही लेखांत आहे. विशेषतः समाजातील अनेक प्रकारचे भेद जत्राटकर यांना अस्वस्थ करतात. माणूसपण नाकारणारे किंवा त्याला गौणत्व देणारे भेद आजच्या काळातही आहेत. ‘युनिफॉर्म’ सारख्या लेखात शालेय मुलांचे वेगवेगळ्या शाळांमधील (कॉन्व्हेट, इंग्रजी, सी.बी.एस.सी., सेमी व मराठी) गणवेश हे भेद निर्माण करतात. गणवेश हे जणू काही प्रतिष्ठा व भेददर्शक आहेत, ही जाणीव त्यांना अस्वस्थ करते. आजही माणसांना ‘डि-कास्ट’ होता आलेले नाही. आधुनिकता आणि सामाजिक प्रगतीतील अंतर्विरोध अवतीभवती दिसतात. याचाच एक भाग म्हणजे औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनावरून समाजात जे ध्रुवीकरण झाले, ते या आधुनिकतेतील अंतर्विरोधाचेच द्योतक आहे, असे जत्राटकर यांना वाटते. त्याच्या नोंदी जत्राटकर यांच्या लेखनात आहेत.
‘अजीर्ण, खाणं आणि जगण्याचं’ सारख्या लेखात अन्नाच्या होणाऱ्या अपरिमित नासाडीवरील चिंता त्यांनी मांडली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कॉपी नियंत्रणासाठी एका शाळेत त्यांची वस्त्रे काढून उलटी वस्त्रे परिधान करण्याची घटना त्यांना अस्वस्थ करणारी वाटते. ती मानवी स्वातंत्र्यावर, अधिकारांवर गदा आणणारी वाटते. तसेच मोबाईल एंटरटेनमेंट जगाने आपला भोवताल व्यापला आहे. त्यातून व्यक्तिकेंद्री (Personal) जग अवतीर्ण झाले आहे. तसेच मुखवट्यांच्या जगात विविध झुली पांघरून माणसं वागतात. त्यामुळे जगण्यातील खऱ्याखुऱ्या आनंदाला आपण मुकतो. सत्ता, प्रतिष्ठा, श्रेणी, राहणीमान, पद या तात्कालिक गोष्टींमुळे माणूस आपल्या आनंदी जीवनाला पारखा झाला आहे. हा विचार ‘एक चेहरे पे कईं चेहरे’सारख्या लेखातून मांडला आहे.
दूरचित्रवाणीवरील पैसे घेऊन मुलाखती निश्चित करण्याची बाबही त्यांना गैर वाटते. ‘सेल्फ अप्रायझल’ सारख्या लेखात लॉकडॉऊन काळातील कुटुंबचित्रे आहेत. विशेषतः स्वतःचे केस कापण्याचा प्रसंग रेखाटला आहे. जीवनातले असे छोटे प्रसंग या आधीही मराठी ललितगद्यात आलेले आहेत. गुजगोष्टी किंवा वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्या ललितगद्यात असे अनुभव प्रकटलेले होते. दाढीतल्या पहिल्या पांढऱ्या केसावरही लेख लिहिले गेले आहेत.
‘शहर में शायद दंगा होनेवाला है’ या लेखात आजच्या भीषण उत्स्फूर्ततावादी, अस्मितावादी समाजकारणाची अस्वस्थ नोंद आहे. घटनांचा मागचा पुढचा विचार न करता ‘दंगली’ कशा निर्माण होतात, कशा घडवल्या जातात, याच्या नोंदी या लेखात आहेत. जत्राटकर यांचे समाजभान चौफेर आहे. अगदी लोकांना न आवडणाऱ्या विषयावरही त्यांनी लिहिले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे ‘सवलतीच्या देशा’सारखा लेख. भारतातील राजकारण हे लोकप्रिय समूहशरण झाले आहे. ते मतपेढीकेंद्रित आहे. त्यामुळे लोकांना आवडेल अशा लोकप्रिय सवलतींच्या धोरणांचा आणि घोषणांचा पाऊस पडत असतो. मात्र या सवलती शासनाची तिजोरी क्षीण आणि कमकुवत करणारी ठरतात, याचा राज्यकर्त्यांना विसर पडतो आहे. या विषयीची खंत या लेखात आहे आणि ती रास्तही आहे. एक प्रकारे आजचे आपले नागरी जीवन स्वास्थ्यहारक झाले आहे. याचा हा नोंदपट आहे किंवा एका अर्थाने समाजाचा एक्सरे रिपोर्टच.
डॉ. जत्राटकर यांच्या या लेखनाचा विशेष म्हणजे, या सर्व लेखनामागे संविधानाची चौकट आहे. तो त्यांचा दर्शनबिंदू आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता बंधूभावाची मागणी करणारे हे लेखन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारदृष्टीची छाया त्यांच्या लेखनावर आहे. माणूसपण अबाधित राहावे, अशी दृष्टी त्यामागे आहे. तसेच नागरी समाजातील नवे अंतर्विरोध व ताणतणाव त्यांना अस्वस्थ करतात. त्याचा विचार या लेखनात आहे. डॉ. जत्राटकर हे मूळचे पत्रकार असल्यामुळे सामाजिक जीवनाकडे चौफर पाहण्याचा त्यांचा डोळा हा जागृत पत्रकाराचा आहे.
डॉ. जत्राटकर यांचे हे लेखन मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे आहे. आत्मपरता आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे विशेष नोंदवणारे तसेच त्यांच्या विचारदृष्टीचे सम्यकचित्र या लेखनात आहे. व्यापक सामाजिक दृष्टी, समतोल विवेक, चिंतनशीलता आणि सामाजिक हस्तक्षेप ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. आपले सामाजिक व नागरी जीवन अधिकाधिक सुखकारक व वर्धिष्णू व्हावे, अशा व्यापक तळमळीतून ते निर्माण झाले आहे. वाचक आणि मराठी समूहाचे समाजभान विस्तारविण्यामध्ये अशा लेखनाचे मोल निश्चित महत्त्वाचे ठरते.
पुस्तकाचे नाव – ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे
लेखक – डॉ. आलोक जत्राटकर
प्रकाशक – भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे – १४६
किंमत – रु. २५०/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.