शैक्षणिक व्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. तथापि, प्रत्येकाने वास्तववादी दृष्टिकोन राखला पाहिजे. जसे शिक्षणात अद्यावत तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे दोन्ही असताना फक्त, तोट्यांवर सतत लक्ष केंद्रित केल्यास पारंपारिक शिक्षणाकडे परत येण्याची मागणी करण्यास भाग पडता कामा नये. जगभरातील तंत्रज्ञानयुक्त शिक्षण प्रणाली वेगाने वाढत असताना, भारताने आपले विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी जलद गतीने पावले उचलली पाहिजेत.
प्रा डॉ संजय छाया त्रिंबकराव खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य विदर्भ वैधानिक विकास मंडळ,
मोबाईल क्रं: ७२७६६१४२६०
शाळा म्हटले की शिक्षक, खडू,फळा आणि विद्यार्थांच्यासोबत पाटी, पेन्सिल वही, पेन, पुस्तक हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते. परंतु आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जगभरातील शिक्षणात लक्षणीय बदल होताना दिसतात. खडू, फळा व डस्टरव्दारे शिकविण्याची पारंपरिक वर्ग व्यवस्था आता वेगाने जुनी होताना दिसते. आता तंत्रज्ञानाचा वापर करून वर्ग खोल्यांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधा विकसित होण्याचे दिवस येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), स्मार्ट बोर्ड, परस्परसंवादी डिस्प्ले व इतर ऑगमेंटेड रिॲलिटी साधने यांच्या एकात्मिकतेमुळे शिक्षणाचा अनुभव अधिक वैयक्तिक,आकर्षक आणि सर्वसमावेशक होताना दिसतो.
तंत्रज्ञान हे परस्पर संवादी असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवून ठेवते व त्यामुळे त्यांचा शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढतो. वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना त्याद्वारे व्यापक माहिती मिळू शकते. पारंपरिक पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे अभ्यास साहित्य मिळवता येते. विद्यार्थांना मूलभूत,महत्वाच्या व कठीण संकल्पना समजणे आणि आत्मसात करणे सहजरित्या शक्य होते. तंत्रज्ञानामुळे वर्गातील भौतिक सीमा दूर होऊन वास्तविक जगाचे अनुभव थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्ट्या उपयुक्त येणाऱ्या तंत्रज्ञानाचा, साधनांचा व पद्धतींचा शिकताताच परिचय होतो, जो त्यांना कौशल्यक्षम बनवितो, व जीवनात या कौशल्यांने त्यांची उपयुक्तता वाढते. सर्वच विद्यार्थी एकाच प्रकारचे किंवा एकाच वेगाने शिकत नसतात. परंतु शिक्षणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने शिकणे शक्य होते. दूर राहणाऱ्या शिक्षक व सहयोगी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणे सुलभ असल्याने त्यांच्या परस्पर सहयोगाने शैक्षणिक प्रकल्पावर काम करणे विद्यार्थ्यांना सहज शक्य होते.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद सुलभ झाला आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती,वर्तन व अभ्यासातील प्रगती याबाबतची माहिती शिक्षक पालकांना संदेश व सूचनाद्वारे सहजरित्या पाठवू शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी हा शिक्षक- पालक संवाद उपयुक्त ठरू शकतो.डिजिटल संसाधनांमुळे शैक्षणिक संस्थांचा कागद व छपाईच्या खर्च व वेळ यात मोठ्या प्रमाणात बचत होते.
शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापर केल्याने होणाऱ्या फायद्यांसोबतच त्याचा तोट्यांकडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचा ‘स्क्रीन’ वेळ वाढू शकतो, जो मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम करू शकतो. डोळ्यांवर ताण, कमी शारीरिक हालचाली, जास्त स्क्रीन टाईम म्हणून होणारा ताण, मान किंवा पाठदुखी यासारख्या आरोग्यविषयक समस्यांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. डिजिटल उपकरणावरील जाहिराती,खेळ, बातम्या, मजेशीर वेबसाईट्स, सोशल मीडिया, टेक्स्ट मेसेज अशा बऱ्याच गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ शकते. तंत्रज्ञानाच्या गैरफायदा पण विद्यार्थी घेऊ शकतात. एकामेकांचे काम त्यांच्या स्वत:च्या असाइनमेंटमध्ये कॉपी व पेस्ट करू शकतात. इंटरनेटवरून दुसऱ्याचे काम चोरून विद्यार्थी स्वतःचे म्हणून दाखवू शकतो. तंत्रज्ञानामुळे समोरासमोरील संवाद कमी होऊन प्रभावीपणे संवाद साधण्याची विद्यार्थांची क्षमता कमी होऊ शकते. आज इंटरनेटवर बरीच खोटी सामग्री उपलब्ध असते. विद्यार्थांना विश्वासार्ह आणि बनावट स्त्रोतांमध्ये फरक करणे कठीण जाऊ शकते. त्याचप्रमाणे डिजिटल गॅजेट्सवर विद्यार्थ्यांची अति अवलंबित्वता त्यांची सर्जनशीलता कमी करू शकते.
काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन छळले जाते किंवा छेडले जाते. त्यामुळे ऑनलाईन वर्गात सामील होण्यास त्यांना भीती व अस्वस्थता वाटू शकते. विद्यार्थ्यासंबंधीचा डेटाची (विदा) सुरक्षितता ही एक गंभीर समस्या प्रामुख्याने उपस्थित होताना दिसते.अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणात करताना शिक्षकांना पण अद्यावत तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देणे तेवढेच महत्त्वाचे. त्यात त्यांची मानसिकता पण सकारात्मक असणे आवश्यक.
सर्वात मोठी समस्या म्हणजे सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे तंत्रज्ञानाची समान उपलब्धता. सार्वजनिक शैक्षणिक संस्थांसाठी किंवा छोट्या शिक्षण संस्थांसाठी तंत्रज्ञान युक्त पायाभूत सुविधा व उपकरणे विकत घेणे, ती खर्चिक असल्याने,अशक्यप्राय बाब आहे. भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात या समस्येवर मात करणे कठीण जाऊ शकते.आर्थिकदृष्टा कमकुवत पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना उपकरणे किंवा इंटरनेटची सुविधा असणे अशक्यप्राय गोष्ट आहे.त्यामुळे शिकण्याच्या संधीमध्ये असमानता निर्माण होणे स्वाभाविक आहे. चांगले तंत्रज्ञान उपलब्ध नसलेले विद्यार्थी इतरांच्या तुलनेत शिकण्यात मागे पडू शकतात. या उपलब्धतेच्या असमानतेमुळे शैक्षणिक दरी निर्माण होणे स्वाभाविक आहे.
सुरुवातीला, तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही एक मोठी आर्थिक गुंतवणूक असल्याचे दिसून येईल, परंतु दीर्घकालीन फायदे या खर्चांपेक्षा जास्त आहेत. तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणाऱ्या शैक्षणिक संस्था डिजिटल आणि पेपरलेस प्रणालींकडे वळून कागद, शाई आणि शारीरिक श्रम यासारखे ऑपरेशनल खर्च कमी करू शकतात. कालांतराने, तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने चांगले संसाधन वाटप, सुधारित कार्यक्षम कार्यक्षमता आणि खर्च वाचवण्याच्या संधी देखील मिळतात.तंत्रज्ञानाचा प्रतिकार करणाऱ्या शैक्षणिक संस्था दीर्घकालीन खर्च वाढण्याचा धोका पत्करतात, विशेषतः जेव्हा अकार्यक्षमता, चुका आणि जास्त प्रशासकीय भार येतो.
शैक्षणिक व्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. तथापि, प्रत्येकाने वास्तववादी दृष्टिकोन राखला पाहिजे. जसे शिक्षणात अद्यावत तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे दोन्ही असताना फक्त, तोट्यांवर सतत लक्ष केंद्रित केल्यास पारंपारिक शिक्षणाकडे परत येण्याची मागणी करण्यास भाग पडता कामा नये. जगभरातील तंत्रज्ञानयुक्त शिक्षण प्रणाली वेगाने वाढत असताना, भारताने आपले विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी जलद गतीने पावले उचलली पाहिजेत. हे शिक्षणात नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे आव्हान म्हणजे केवळ नवीन डिजिटल साधने स्वीकारणे नाही तर पायाभूत सुविधा,शिक्षकांचे अद्यावत प्रशिक्षण आणि शैक्षणिक अभ्यासक्रम हे आधुनिक शिक्षण गरजांशी सुसंगत आहेत याची खात्री करणे पण आहे व ते आव्हान काळाची गरज म्हणून जितक्या लवकर स्विकारू तेवढ्याच लवकर देशाची भावी पिढी ही विकसित भारत निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
