October 18, 2024
Indian Foreign Trade Organization to open its first overseas complex in Dubai
Home » Privacy Policy » भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था दुबईमध्ये आपले पहिले परदेशी संकुल उघडणार
काय चाललयं अवतीभवती

भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था दुबईमध्ये आपले पहिले परदेशी संकुल उघडणार

  • भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था दुबईमध्ये आपले पहिले परदेशी संकुल उघडणार
  • इन्व्हेस्ट इंडिया संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे उघडणार कार्यालय
  • दुबई येथील भारत मार्ट प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

मुंबई – भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था (आयआयएफटी) दुबईतील एक्स्पो सिटीमधील प्रतिष्ठित अशा इंडिया पॅव्हेलियन मध्ये आपले पहिले परदेशी संकुल उघडणार आहे. या संदर्भातील एका सामंजस्य करारावर आयआयएफटी चे कुलगुरू प्रोफेसर राकेश मोहन जोशी आणि संयुक्त अरब अमिरातचे आंतरराष्ट्रीय सहकार राज्यमंत्री आणि एक्सपो सिटी दुबई प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रीम अल हाशिमी यांनी 03 ऑक्टोबर 2024 रोजी स्वाक्षरी केली. आयआयएफटी 2025 च्या सुरुवातीला आपले संकुल उघडणार असून त्या माध्यमातून अल्प आणि मध्यम कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन आणि एमबीए (आंतरराष्ट्रीय व्यवसाय) या त्यांच्या महत्वाकांक्षी अभ्यासक्रमासह  काही प्रमुख उपक्रम सुरु करणार आहे.

आयआयएफटी हे आंतरराष्ट्रीय व्यवसाय संशोधन, प्रशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील एक शैक्षणिक उत्कृष्टता केंद्र म्हणून ओळखले जाते. आयआयएफटी पहिल्यांदाच पूर्वीच्या एक्स्पो 2020 इंडिया पॅव्हेलियन मध्ये भारताबाहेर संकुल  स्थापन करेल. यूएईमध्ये राहणाऱ्या 3.5 दशलक्ष भारतीय समुदायासाठी हे संकुल  म्हणजे एक वरदान ठरेल. हे आयआयएफटी या ब्रँडच्या परदेशातील विस्तारासाठी आणि मान्यतेसाठीचे प्रवेशद्वार ठरेल.

आयआयएफटी  आणि दुबई एक्स्पो सिटी यांच्यातील सामंजस्य करार भारत आणि यूएईमधील द्विपक्षीय करारांच्या श्रेणीवर आधारित आहे, ज्यामध्ये स्थानिक चलनांमध्ये व्यापार तडजोडीची यंत्रणा, व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA), द्विपक्षीय गुंतवणूक करार आणि इतरांचा समावेश आहे. 2 सप्टेंबर, 2024 रोजी, अबू धाबीचे युवराज  शेख खालेद बिन मोहम्मद यांनी आयआयटी दिल्ली-अबू धाबी मध्ये पहिला बी टेक अभ्यासक्रम सुरु करून या कॅम्पसचे उद्घाटन केले.

या संस्थेचे अभिनंदन करताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की दुबई मधील आयआयएफटीच्या नवीन संकुलाबाबतच्या या निर्णयामुळे या संस्थेचा खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाच्या संस्थेत कायापालट होईल. एवढेच नव्हे तर परकीय व्यापार क्षेत्रातील आयआयएफटीचे नैपुण्य लक्षात घेता केवळ युएईमधील विद्यार्थी, व्यावसायिक आणि सरकारी अधिकाऱ्यांनाच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात प्रशिक्षण आणि संशोधन करू इच्छिणाऱ्या जगभरातील लोकांना त्याचा लाभ होणार आहे.

आयआयएफटीने दुबईत एक्स्पो सिटी येथे आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन केल्याबद्दल वाणिज्य सचिव आणि आयआयएफटी संस्थेचे कुलपती सुनील बर्थवाल यांनी आनंद व्यक्त केला.  संस्थेचे दुबईतील संकुल हे केवळ आयआयएफटीच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठीच नव्हे तर युएई सोबतच संपूर्ण आखाती प्रदेशात आणि त्यापलीकडे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दुबई येथे परदेशातील पहिले संकुल आयआयएफटीला अत्याधुनिक संशोधन, प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रमांसह जागतिक दर्जाच्या संस्थेत रूपांतरित करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असे आयआयएफटीचे कुलगुरू, प्रा. राकेश मोहन जोशी म्हणाले.

आयआयएफटी  बद्दल:

वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून 1963 मध्ये  स्थापन झालेल्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (आयआयएफटी) ने अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त केला आहे आणि परकीय व्यापारावर लक्ष केंद्रित करणारी ही भारतातल्या प्रमुख व्यावसायिक संस्थांपैकी एक आहे.  व्यवसाय संशोधन, प्रशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्टतेचे शैक्षणिक केंद्र म्हणून आयआयएफटी ओळखली जाते. आयआयएफटी एक्स्पो सिटी दुबईसोबत संशोधन प्रकल्प आणि शाश्वतता आणि नावीन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित केलेल्या इतर ज्ञान केंद्रित सहकार्य विषयक उपक्रमांमध्ये सहकार्य करणार आहे.

इन्व्हेस्ट इंडिया संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे उघडणार कार्यालय

भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीतील संभाव्य गुंतवणूकदारांसाठी  एका समर्पित संपर्क केंद्राच्या रुपात काम करण्यासाठी भारत सरकारने संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे ‘इन्व्हेस्ट इंडिया’चे कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यालय संयुक्त अरब अमिराती आणि आसपासच्या  प्रदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीचा स्रोत आणखी विस्तृत आणि दृढ बनवेल. इन्व्हेस्ट इंडियाचे मध्य पूर्व आशियातील अशा प्रकारचे हे पहिले परदेशातील कार्यालय असेल तर हे सिंगापूरनंतरचे एकूण दुसरे परदेशातील कार्यालय असेल.

7 ऑक्टोबर, 2024 रोजी मुंबईत झालेल्या भारत – संयुक्त अरब अमिरात यांच्यातील गुंतवणुकीवरील उच्च-स्तरीय संयुक्त कृतिगटाच्या    12 व्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीचे सहअध्यक्ष पद भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल आणि अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमद बिन झायेद अल नाह्यान यांनी भूषविले

“सरकारने इन्व्हेस्ट इंडियाच्या अधिकारांचा विस्तार केला आहे जेणेकरून ते जागतिक विस्तारावर लक्ष केंद्रित करू शकतील आणि गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक माहिती आणि मंजुरी मिळवून वन-स्टॉप सोल्यूशन सुविधा प्रदान करतील” असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल याप्रसंगी बोलताना म्हणाले.

‘इन्व्हेस्ट इंडिया’ ही भारताची राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा प्रदाता संस्था आहे, जी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत ‘ना-नफा’ तत्त्वावर चालणारा उपक्रम म्हणून स्थापित केली  आहे. ही संस्था ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत सर्व गुंतवणूकदारांना भारतात त्यांचे व्यवसाय स्थापित करण्यासाठी, कार्यान्वित करण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी सुलभता प्रदान करते आणि सक्षम बनवते.

संयुक्त अरब अमिरात हा भारतातील सर्वात मोठा अरब गुंतवणूकदार देश म्हणून कायम असून या देशाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतात सुमारे 3 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणुक केली आहे. संयुक्त अरब अमिरात हा भारतासाठी आर्थिक वर्ष 2023-24 साठी सहाव्या क्रमांकाचा थेट परदेशी गुंतवणुकीचा स्रोत होता तर 2000 पासून एकूण सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्रोत होता. भारतात, एकूण खाडी सहकार्य परिषद (GCC) गुंतवणुकीपैकी 70% पेक्षा जास्त गुंतवणूक संयुक्त अरब अमिराती मधून केली जाते.  31 ऑगस्ट 2024 रोजी अंमलात आलेला नवीन भारत- संयुक्त अरब अमिरात द्विपक्षीय गुंतवणूक करार दुतर्फा गुंतवणूक प्रवाह अधिक मजबूत करेल, अशी अपेक्षा आहे.

दुबई येथील भारत मार्ट प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमेद बिन झायेद अल नह्यान यांच्या सहअध्यक्षतेखाली आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत भारत-युएई उच्च स्तरीय संयुक्त कृतीदलाची 12 वी बैठक पार पडली. भारत मार्ट प्रकल्पाच्या उभारणीच्या कामातील प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युएई  भेटीदरम्यान, त्यांनी आणि दुबईचे राज्यकर्ते, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी दुबई येथील जबेल अली फ्री ट्रेड झोन येथे  14 फेब्रुवारी 2024 रोजी भारत मार्ट  प्रकल्पाची पायाभरणी केली होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यावेळी, जबेल अली बंदराचे धोरणात्मक स्थान आणि लॉजिस्टिक्सची क्षमता यांचा वापर करून भारत मार्ट भारत-युएई द्विपक्षीय व्यापार भरभराटीला आणेल आणि भारतातून जगाला होणाऱ्या निर्यातीला मोठी चालना मिळेल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला होता. भारत मार्टच्या विहित जागी उभारणीचे काम सुरु झाले असून किरकोळ विक्री दुकाने तसेच गोदामे यांच्या लेआउटच्या आखणीचे काम वेगाने पुढे जात आहे.

युएईमधील डीपी वर्ल्ड या प्रमुख लॉजिस्टिक्स कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेले भारत मार्ट, भारतीय व्यापारी, निर्यातदार तसेच उत्पादकांना मध्य-पूर्व, आफ्रिका आणि युरेशियातील बाजारपेठांमध्ये प्रवेश  मिळवण्याची सोय करून देईल अशी या मार्टची संकल्पना आहे. या मार्टमध्ये फ्री झोन आणि मुख्य भूमीवर किरकोळ दुकाने असतील तसेच येथे व्यवसाय करणाऱ्या भारतीय कंपन्यांना डीपीवर्ल्डच्या जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक्स सेवा वापरता येतील. हा प्रकल्प 2026 मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. आतापर्यंत 1 लाख चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या 1400 दुकानांसाठी डीपी वर्ल्डकडे आतापर्यंत 9000 ईओएलएस सादर झाले आहेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading