आंतरजालाच्या विकासासोबत या ॲप्लिकेशन्सनी लोकप्रियता मिळवल्याने आंतरजालांचा वापर ही आता लोकांची सवय आणि गरज बनले. त्यातून आता पत्ता विचारण्यासाठी लोकांशी संवाद साधण्यापेक्षा गुगल मॅप अधिक विश्वासार्ह वाटू लागले. त्यासाठी लोकांना डाटा महत्त्वाचा वाटू लागला. ‘आटा’पेक्षा लोक ‘डाटा’ खरेदी करण्यास प्राधान्य देऊ लागले. आंतरजालामध्ये खरी क्रांती आणली ती गुगलने गुगल सर्च इंजिनने जगातील सर्व माहिती एकत्र आणायला सुरुवात केली. आंतरजालामध्ये आलेल्या प्रत्येक माहितीची पडताळणी करून एखाद्या वापरकर्त्याने विचारलेली माहिती या शोधयंत्रातून उपलब्ध होऊ लागली.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
काही वर्षांपूर्वीपर्यंत पत्र येणे म्हणजे आनंदाचा क्षण असायचा. लोक पोस्टमनची आतुरतेने वाट पहायचे. आपले पत्र यावे, असे प्रत्येकाला वाटे. सीमेवरचा जवान असो, मुले शिकायला, नोकरीला दूरगावी असणाऱ्या कुटुंबातील माता-भगिनी पोस्टमनने यावे आणि आपल्या नातलगाची ख्यालीखुशाली कळावी, असे वाटे. मात्र पुढे फोन आले, फोन पाठोपाठ पेजर आणि नंतर मोबाईल आले आणि सपर्क साधण्याचा मार्ग सोपा झाला. त्यातच आंतरजालाचे आगमन सर्व प्रकारच्या संवादासाठीचे अत्यंत उपयुक्त साधन बनले. आज नेटवर्क नसणे म्हणजे माणसाला हातपाय गळाल्यासारखे वाटते.
आंतरजालाची म्हणजेच इंटरनेटची कल्पना १९६२ मध्ये अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठातील प्राध्यापक जे. सी. आर. लिकलायडर यांच्या मनात आली. संगणक तोपर्यत अमेरिकेसारख्या देशात समाजातील अनेक घटकांपर्यंत पोहोचला होता. लोक त्याचा वापर करू लागले होते. हेच संगणक एकमेकांना जोडता आले तर… ही मूळ संकल्पना लिकलायडर यांची होती. अमेरिकेत संरक्षण खात्याला उपयुक्त असणाऱ्या संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असे. लिकलायडर यांनीही अमेरिकन संरक्षण दलासाठी हे संशोधन कसे उपयुक्त ठरू शकेल, हे दाखवत यासाठी पैसे मागितले. त्यांना तो प्रकल्प मंजूरही झाला. त्यातून अर्पानेट हे पहिले आंतरजाल तयार केले. सुरुवातीच्या काळात हे काम टेलिफोन तारांच्या माध्यमातून साध्य करण्यात आले. यामध्ये दोन संगणकांच्या माध्यमांतून सर्व प्रकारचा संवाद अपेक्षित होता. पुढे १९६५ मध्ये याच संस्थेतील संशोधक लॉरेन्स रॉबर्ट यांनी मॅसॅच्युसेटस आणि कॅलिफोर्निया या दोन टोकावरील विद्यापीठांना जोडणारे नेटवर्क निर्माण केले. यातून दोन संगणक प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधण्याची लिकलायडर यांची संकल्पना अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसू लागली.
यासाठी संवादशील संगणक परस्परांना जोडणे आवश्यक होते. असे सर्व संगणक परस्परांना जोडायचे तर जगभर नुसते तारांचे जाळे झाले असते. हे टेलिफोन कॉल करणे, परस्परांशी संवाद साधणे आणि नंतर तो कॉल संपवणे यासारखेच होते. त्याकाळात अमेरिकेतील संगणकही असे परस्परांना जोडलेले नव्हते. यावर एमआयटीतील संशोधक लिओनार्ड क्लाईनरॉक यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या सहाय्याने पॅकेट स्विचिंग तंत्रज्ञान विकसित केले. जी माहिती एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकापर्यंत पोहोचवायची आहे, त्या माहितीची छोटी पाकिटे तयार करून ती पाठवायची, अशी ती संकल्पना. ही पाकिटे योग्य संगणकापर्यंत पोहोचवण्यासाठी राउटर हा पोस्टमन बनला. अशा राउटरची यंत्रणा म्हणजेच आंतरजाल किंवा इंटरनेट. प्रत्येक संगणक हा एकाच तारेने जोडलेला असतो. राउटर माहिती पाठवणाऱ्या संगणकाला माहिती कोणत्या संगणकापर्यंत पोहोचवायची आहे, ते सांगतो. पहिला राऊटर आणि नंतरचे राउटर, नेमका पत्ता पहातात आणि ती योग्य आणि अचूक ठिकाणी पोहोचवतात.
हे तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर १९६६ मध्ये रॉबर्टस संरक्षण दलाकडे गेला आणि अर्पानेट प्रकल्पाला गती मिळाली. आंतरजालाची शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, पत्रकारिता, कला, वाणिज्य इत्यादि क्षेत्रातील महत्त्व ओळखून अनेक उद्योजकांनी या क्षेत्रात गुंतवणूक करायला प्राधान्य दिले. त्यामुळे केवळ संरक्षण दलासाठी नाही तर समाजासाठी, सर्वांसाठी अशी यंत्रणा विकसित करण्यास सुरुवात झाली आणि आर्पानेटचे इंटरनेट झाले. अगदी सुरुवातीला अमेरिकेतील चार विद्यापीठे आणि संरक्षण दलातील काही संगणक या जाळ्यात घेण्यात आले. दरवर्षी यात भर पडत गेली. १९७१ पर्यंत अमेरिकेतील अनेक विद्यापीठे यामध्ये जोडण्यात आली. या क्षेत्राचे महत्त्व जास्तच स्पष्ट दिसू लागले. यामध्ये बोल्ट बर्नाक अँड न्यूमन इनकॉर्पोरेशन कंपनीही सहभागी झाली. पुढे नासा, इलिनॉय विद्यापीठ अशा संशोधन आणि शिक्षण संस्थाही जोडल्या गेल्या.
यातच १९७२ मध्ये रे टॉम्नसिन यांनी इ-मेल म्हणजेच विरोप सुविधा आंतरजालामध्ये समाविष्ट केली. आता आंतरजाल प्रगल्भ होऊ लागले. विद्यापीठाच्या पाठोपाठ ग्रंथालये, प्रयोगशाळा आंतरजालामध्ये सहभागी होऊ लागल्या. संवादसंकेताच्या म्हणजेच प्रोटोकॉल्स्च्या शोधानंतर खऱ्या अर्थाने संवादसाधन सहज आणि सर्वदूर झाले. त्यामुळे आंतरजालाचा प्रसार जगभर वेगाने झाला. १९८० पासून अमेरिकन संरक्षण दलांने खऱ्या अर्थाने इंटरनेटचा संवादसंकेतासह मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला. याच वर्षांत संगणक आंतरजाल खाजगी क्षेत्रानाही उपलब्ध करून देण्यात आले. भारतातही या तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन १९८६ मध्ये शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी संगणक आंतरजाल उपलब्ध करून देण्यात आले. तरीही भारतात इंटरनेट सर्वांपर्यंत पोहोचण्यास १९९५ साल उजाडावे लागले.
लवकरच अमेरिकेत वर्ल्ड वाईड वेब संकल्पना अस्तित्वात आली. त्यातून आपल्या कंपनीची, संस्थेची, व्यवसायाची आणि वैयक्तिक संकेतस्थळे अस्तित्वात येऊ लागली. इंटरनेट हे सर्व कारणांसाठी उपयुक्त असल्याचे दिसून आल्याने प्रत्येकांने आपल्या फायद्यासाठी या क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आजचे आंतरजाल विश्व अवतरले. यामध्ये सुरुवातीला विरोपापुरते संवादमाध्यम होते, ते आता व्हिडिओ कॉन्फरंसपर्यंत विकसित झाले आहे. यासाठी आंतरजालात गतिमानता आणणे गरजेचे होते. यासाठी उपग्रहांनी मोठी मदत केली. उपग्रहाच्या सहाय्याने आंतरजाल जोडणे शक्य झाल्याने गतिमानता आली. त्याचसोबत विविध ॲप्लिकेशन्स विकसित होऊ लागली. यु-ट्युब, फेसबुक, इंस्टग्राम, ट्वीटर आताचे एक्स, टेलिग्राम, व्हाटसअप अशा अनेक ॲप्लिकेशन्सनी आंतरजालाच्या सहाय्याने आपला विकास साधत आंतरजालामध्ये प्रवेश केला आणि ती समाजमाध्यमांच्या रूपातून लोकांच्या गळ्यातील ताईत बनली.
आंतरजालाच्या विकासासोबत या ॲप्लिकेशन्सनी लोकप्रियता मिळवल्याने आंतरजालांचा वापर ही आता लोकांची सवय आणि गरज बनले. त्यातून आता पत्ता विचारण्यासाठी लोकांशी संवाद साधण्यापेक्षा गुगल मॅप अधिक विश्वासार्ह वाटू लागले. त्यासाठी लोकांना डाटा महत्त्वाचा वाटू लागला. ‘आटा’पेक्षा लोक ‘डाटा’ खरेदी करण्यास प्राधान्य देऊ लागले. आंतरजालामध्ये खरी क्रांती आणली ती गुगलने गुगल सर्च इंजिनने जगातील सर्व माहिती एकत्र आणायला सुरुवात केली. आंतरजालामध्ये आलेल्या प्रत्येक माहितीची पडताळणी करून एखाद्या वापरकर्त्याने विचारलेली माहिती या शोधयंत्रातून उपलब्ध होऊ लागली.
त्यानंतर विकीपिडिया हा इनसायक्लोपिडियाच्या धर्तीवर विकसित झाला आणि ज्ञानक्षेत्रामध्ये माहितीचे भांडार खुले झाले. आंतरजालाचे तंत्रज्ञान हे गरजेतून विकसित झाले. एक संवादाचे माध्यम म्हणून विकसित झाले. मात्र आज ते मनोरंजनाचे साधन बनले आहे. या ॲप्लिकेशनचा वापर अतिशय घातक पद्धतीने होत आहे. यातून एखाद्याचे समाजातील स्थान आणि सन्मान संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अपप्रचार करून एखाद्याला समाजात बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर अनेक लोकांचा मोठा वेळ या माध्यमांच्या वापरात वाया जातो. अनेक फसवणारे गेम आणि डिजिटल अरेस्टच्या माध्यमांतून आर्थिक लुटीच्या घटनांमुळे आंतरजाल शाप की वरदान असा प्रश्न निर्माण होत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.