अंगाची काहिली करणारी जवान चंदू चव्हाणची कथा
पाकिस्तानातील लष्करी तुरुंगात चंदूवर झालेल्या छळावर आधारीत असलेले हे पुस्तक, पत्रकार संतोष धायबर यांनी लिहिले आणि ईश्र्वरी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले. अंगावर रोमांच उठवणारे हे छोटेखानी पुस्तक आवर्जून वाचायलाच हवे.
स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्र्चिम सीमा कायमच तणावाखाली असते. जवळजवळ रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उखळी तोफांचा भडीमार करत असतात. अर्थात भारताकडूनही त्यांच्या या आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यात येते. पाकिस्तानातील वेगवेगळ्या जहालमतवादी संघटनांचे दहशतवादी मिळेल त्या मार्गानं घातपात करण्याच्या उद्देशानं भारतात लपतछपत घुसखोरी करत असतात. भारतीय लष्कराची ही कायमची डोकेदुखी बनली आहे. तथापि, ही घुसखोरी पूर्णपणे जरी नाही, तरी अल्पांशाने का होईना, बंद व्हावी आणि पाकिस्तानला परस्पर धडा मिळावा, यासाठी भारत सरकारच्या मंजुरीनंतर लष्कराने 29 सप्टेंबर 2016 चा मुहूर्त साधून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश करून त्यांच्या सीमेवरील चौक्यांवर यशस्वी हल्ला केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जवान चंदू चव्हाण दिशाहीन झाल्यानं हद्द ओलांडून पाकिस्तानात गेला. तिथं त्याला पकण्यात आलं आणि त्यानंतर सुरू झाली पाकिस्तानच्या लष्करी तुरुंगातील क्रौर्याची मालिका.
कोणत्याही देशात शत्रूचा एक किंवा अनेक सैनिक पकडण्यात आले, तर जिनीव्हा करारानुसार प्रिझनर ऑफ वॉर म्हणून समजले जाते आणि त्यांना तुरुंगात टाकले जाते. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याचा छळ करण्याचा अधिकार त्या देशाला किंवा त्यांच्या लष्कराला नसतो. तरीही अनवधानाने पाकिस्तानच्या हद्दीत शिरलेल्या चंदू चव्हाणचा पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या तुरुंगात अतोनात आणि अमानुष छळ केला. चंदूने तो निधड्या छातीने सहन केला. बेदम मारहाण होऊनही तो भारत माता की जय असा जयघोष करत या छळाला सामोरे जात होता. तब्बल 3 महिने 21 दिवस त्याने हा छळ सहन केला. अखेर 21 जानेवारी 2017 रोजी त्याची या नरकयातनांतून सुटका झाली.
अत्यंत गरीब परिस्थितीत वाढलेल्या चंदू चव्हाण, त्याचा मोठा भाऊ आणि बहीण, आई-वडिलांच्या निधनानंतर आजोळी राहू लागले. मोठा भाऊ लष्करात भरती झाल्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेऊन, चंदूही लष्करात दाखल झाला. लष्कराच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्याची रवानगी सांबा सेक्टरमध्ये झाली. याच परिसरातील एका सीमेवर असताना, चंदूबाबत वरील घटना घडली. सुबुद्ध माणूस विचारही करू शकणार नाही, अशा क्रूर पद्धतीने त्याच्यावर विविध प्रकारचे अत्याचार करण्यात आले. मारहाण करण्यात आली. शरीरभर सिगारेटचे चटके देण्यात आले. अंधाऱ्या काळकोठडीत असताना त्याच्यासारखेच बंदीवान झालेल्या इतर कैद्यांना होत असलेली मारहाण आणि त्यांचे भयकंपित करणारे ध्वनी त्याच्या कानांवर नित्य पडत होते.
पाकिस्तानच्याच एका सैनिकाच्या एका बेसावध वक्तव्यामुळे, चंदू चव्हाण पाकिस्तानी लष्कराच्या कैदेत असल्याचं, त्या देशातील एक प्रथितयश द डॉन या दैनिकानं त्याची बातमी प्रसिद्ध केली आणि दबाव आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा इन्कारही केला. मात्र बाण सुटला होता. भारतात हे वृत्त पसरताच देशभर संतापाची लाट उसळली आणि चंदूच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची मागणी जोर धरू लागली. सरकारी पातळीवर हा प्रश्न गांभीर्याने घेतला गेला. पाकिस्तान सरकारवरील दबाव वाढल्यानंतर चंदूची सुटका करण्याशिवाय त्यांच्यापुढे अन्य पर्यायच उरला नाही आणि अखेर त्याची सुटका झाली. त्याच्या सुटकेसाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी विशेष प्रयत्न केले.
पाकिस्तानातील लष्करी तुरुंगात चंदूवर झालेल्या छळावर आधारीत असलेले हे पुस्तक, पत्रकार संतोष धायबर यांनी लिहिले आणि ईश्र्वरी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले. अंगावर रोमांच उठवणारे हे छोटेखानी पुस्तक आवर्जून वाचायलाच हवे. आंतरराष्ट्रीय नियमांची पाकिस्तानात कशी पायमल्ली होते, हे या पुस्तकामुळे पुन्हा एकदा स्पष्ट होते. हे पुस्तक मराठीबरोबरच हिंदीतूनही प्रसिद्ध करण्यात आले आहे. पाकिस्तानातील तुरुंग आणि त्यातील कैद्यांची अवस्था काय होते याचा ज्वलंत अनुभव घेण्यासाठी, प्रत्येक भारतीयाने ते वाचलेच पाहिजे.
पुस्तकाचं नावः जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)
लेखकः संतोष धायबर
प्रकाशनः ईश्वरी प्रकाशन, पुणे. 9881242616,
पानं: 108, मुल्यः 150 रुपये.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.