February 29, 2024
Gandulashi Maitri Vandana Hulbatte Book
Home » मुलांनो, चला तर करूया गांडुळाशी मैत्री
मुक्त संवाद

मुलांनो, चला तर करूया गांडुळाशी मैत्री

अलीकडेच ‘गांडुळाशी मैत्री’ हे पुस्तक हाती लागले. नाव जरा हटके वाटले. त्यामुळे पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण झाले. मुखपृष्ठ मस्तच वाटले आणि मी पुस्तकाची पाने उलटत गेले. इतकी सुरेख, रंगीत, गुळगुळीत पाने की मी पुस्तकाच्या मोहातच पडले. प्रत्येक पानावर कथेशी संबंधित मोहक चित्र. मनात आलं, पुस्तकाचं हे विललोभनीय दर्शन, मलाच इतकं मोहात पाडतय, तर मुलांना ते किती आवडेल. पुस्तक उघडून कथा वाचायला सुरुवात केली आणि सगळ्या कथा वाचूनच पुस्तक खाली ठेवले.

उज्ज्वला केळकर
पत्ता – १७६/२ ‘गायत्री’ प्लॉट नं १२, वसंत दादा साखर कामगारभवनजवळ सांगली – ४१६४१६
मो. 9403310170 , e-id – kelkar1234@gmail.com

‘गांडुळाशी मैत्री’ या पुस्तकाच्य्या लेखिका वंदना हुळबत्ते या शिक्षिका आहेत. मुलांशी त्यांचा सातत्याने संबंध येतो. पण एवढंच नाही. त्या अतिशय संवेदनाशील आहेत. त्यामुळे बालमनाची त्यांना ओळख आहे. मुलांना काय आवडतं, काय आवडत नाही; काय हवसं वाटतं, काय नकोसं वाटतं; काय करावसं वाटतं, काय करू नयेसं वाटतं; याचं त्यांना नेमकं आकलन आहे. मुलांच्या अनुभवविश्वाशी त्या परिचित आहेत.

पुस्तकाला मोजक्या शब्दात प्रस्तावना लिहिताना नीलमताई लिहितात, ‘ मुलांचं अनुभव विश्व समृद्ध करणाऱ्या या कथा आहेत. यातली पहिलीच कथा आहे, ‘गांडुळाशी मैत्री. इथे झाडा-फुलांशी बोलणारी मृणाल आपल्याला भेटते. तिने गांडूळ पाहिल्यावर तिची आई तिला गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र कसा, हे सांगते. गांडुळ खत कसं तयार करतात, हे दाखवायला सुलभा वहिनींच्या घरी घेऊन जाते. मृणाल ते पहाते. तिचं अनुभव विश्व समृद्ध होतं. मुलं सगळं वाचतात. त्यांचंही अनुभव विश्व समृद्ध होतं.

‘निसर्गाचा मित्र’मध्येही गांडुळ खत प्रकल्पाचा उल्लेख आहे. शाळेत मुली डबा आणतात. त्यात काही अन्न उरतं. उष्ट- खरकटं सांडतं. शाळा अस्वच्छ होते. म्हणून मग बाई शाळेत गांडुळ खत प्रकल्प सुरू करतात. मुलींना त्यात उष्ट- खरकटं टाकायला सांगतात. झाडांची गळून पडलेली पाने, कचरा टाकायला सांगतात. शाळा स्वच्छ होते आणि बागेलाही चांगलं खत मिळतं.

‘आम्ही ठरवलय’ कथेत मुले भारद्वाज पक्षी घरटे कसे बांधतात, त्यासाठी किती कष्ट करतात, हे पाहतात. आपण लवकर कंटाळतो, हे त्यांच्या लक्षात येते. आई त्यांना जे पाहिलं, ते लिहून काढायला सांगते. लेखिका म्हणते, ‘ त्यांच्या आत ऊर्जा होतीच, ती बाहेर काढण्याची पद्धत सापडली पाहिजे.’ हे सारेच लेखन श्रम संस्कार करते. निरीक्षण शक्ती वाढीला लावण्याचा प्रयत्न करते आणि व्यक्त होण्याची प्रेरणा देते.

मुलांना अद्भुताची ओढ असते. ‘पुस्तके हसली’ या कथेत, पेटीत बसून कंटाळलेली पुस्तके पंख लावून पेटीच्या बाहेर येतात आणि मुलांच्या हातात पडतात, असे वर्णन केले आहे. ‘विश्वास’ या कथेत मोठी माणसेदेखील कधी कधी चुकतात, हे संगितले आहे. अनयाकडे भारीचे पेन बघून आईला वाटते, आपल्या मुलीने पेन चोरले. ती सातत्याने संगत असते, ‘मी पेन चोरले नाही. मला पेन दिले.’ आई नीट ऐकून न घेता तिला मारते. दुसऱ्यादिवशी आई शाळेत येते. तिथे उलगडा होतो. कला शिक्षिका सहलीचे पैसे मोजत असताना दोन हजाराची खाली पडलेली नोट, अनयाला दिसते. ती नोट बाईंना नेऊन देते. तिच्या या प्रामाणिकपणाबद्दल बाईंनी तिला पेन दिलेले असते. आईला आपली चूक कळते. मुलीच्या प्रामाणिकपणाचा अभिमानही वाटतो. अनेक पालकांना आपल्या मुलाचे-मुलीचे म्हणणे न ऐकता त्यांना रागावायची, शिक्षा करायची सवय असते. ही कथा जशी प्रामाणिकपणाचे संस्कार करणारी आहे, तशीच ती पालकांनाही काही शिकवणारी आहे.

मुलांना नाटक करायला आवडतं. ‘क्लीन मॅन’मधील अमेयही नाटक करतो. तो ‘क्लीन मॅन’ म्हणजे ‘स्वच्छ माणूस’ होतो. सबणाने हात धुण्याचं आणि मास्क वापरण्याचं महत्व तो नाटकातून सांगतो. करोना ऐन भरात असताना लिहिलेली ही कथा. अनेक मुलांना अभ्यास केल्यानंतर पसारा तसाच टाकून जायची सवय असते. राणीही तशीच. पसारा टाकायचा. वहीतली अधली-मधली पाने फाडायची, पेन्सील चावायची असल्या तिच्या सवयी. या वस्तु तिच्याविषयी तक्रार करतात. तिला अद्दल घडावी म्हणून लपून बसतात. तिला सापडायचच नाही, असं ठरवतात. मग राणीला आपली चूक कळते. ती वस्तू नीट वापरायचं आणि सांभाळायचं कबूल करते.

जाणीव’ कथेत जंगलातील झरा, झाडे, प्राणी अक्षयशी बोलतात. माणसाने गरज म्हणून झाडे तोडली, प्राण्यांची निवासस्थाने नष्ट केली, हे तो कबूल करतो. आता आम्ही ही चूक सुधारू. आम्हाला संधी द्या,’ असेही म्हणतो. यातला ‘मामाचा गाव’सगळ्याच मुलांना लोभावणारा. हवाहवासा वाटणारा. वाऱ्यावर उडणाऱ्या पांढऱ्या तंतूंच्या म्हातारीचाही मुलांना लोभ असतो. तिला पकडण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करतात. ती उडणारी म्हातारीही इथे भेटते.

‘चला ईकोफ्रेंडली होऊयात’मध्ये चिन्मय गणेशोत्सवासाठी स्वत: केलेला मातीचा गाणपती वापरतो. प्लॅस्टिकच्या पाना-फुलांच्या माळांऐवजी नैसर्गिक पाना -फुलांची सजावट करतो. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींऐवजी शाडूच्या मूर्ती वापरा असे सांगतो. आपले समारंभ ईकोफ्रेंडली असले पाहिजेत, असा आग्रह धरतो. ‘सांग सांग भोलानाथ’ हे सगळ्याच मुलांचे आवडते गाणे. त्यात सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून तीनदा रविवार आले, तर मज्जाच मज्जा….. खेळच खेळ… पण जेव्हा कोरोनामुळे शाळा बंद होतात आणि सुट्टीच सुट्टी लागते, तेव्हा मात्र या सुट्टीचा कंटाळा येऊन गण्या म्हणतो, ‘सांग सांग भोलानाथ सुट्टी संपेल काय?
कोरोनाचा विळखा सुटून मुक्ती मिळेल काय ?…’

निसर्गाची ओळख, निसर्गाचे निरीक्षण, निसर्गाशी मैत्री, पर्यावरण रक्षणाची प्रेरणा, मुलांमध्ये असलेल्या वाईट सवयींची जाणीव करून देणं, त्या दूर करण्याची प्रेरणा देणं, प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे संस्कार करणं, उपक्रमशीलता – जसे गांडूळ खत प्रकल्प, आपल्या हाताने गणपतीची मूर्ती बनवणं या सारखी अनेक शैक्षणिक मूल्ये वंदना हुळबत्ते यांनी या लेखनातून रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक प्रकारची माहिती संवादातून आकर्षकपणे आपल्यापुढे ठेवली आहेत. मुले हे पुस्तक आवडीने वाचतील. यातील आशय, मूल्ये, आपल्या व्यक्तिमत्वात रुजवतील याची खात्री आहे.

मुलांनो, चला तर – करू या ना ‘गांडुळाशी मैत्री’.

पुस्तकाचे नाव – गांडुळाशी मैत्री
लेखिका – सौ. वंदना हुळबत्ते
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
पृष्ठे – ४८ , मूल्य – १४० रु.

Related posts

कुठे चुकतेय का ?

शास्त्राला अनुसरूनच कर्म करण्याची गरज

श्रावण

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More