वर्तमानपत्रांनी
कविता, कथा, समीक्षा
छापण्याचे
एक युग होते
आता
ते सारे त्यांनीच
गारद करण्याचे
युग आहे
लेखन ही कला आहे,
शब्द तिचे माध्यम आहे,
निराकाराला आकार देणारा, साकार करणारा त्याला
तो एक कलाकार आहे,
तोही ती साकारतो,
शब्दातूनच सादर होते ती, रंगमंचावर नंतर
येते ती
हे समजण्याचे
एक युग होते
लेखकाला
सादरकर्त्यांमधून
ठरवून बाहेर काढण्याचे
हे युग आहे
कलेला न कला आणि
न कलांना कला
ठरवण्याचे हे युग आहे
संपत्तीच्या, समृद्धीच्या
चुकीच्या,लुटीच्या,
गैरमार्गाच्या वाटा अडवण्याचे,
एक युग होते
आता
गैरमार्गींनाही साऱ्याच
भाग्यविधाते
ठरवण्याचे युग आहे
सावल्याही न घेण्याच्या
अंगावर त्यांच्या कुट्टकाळ्या,
झिडकारण्याचेच
त्यांना
एक युग होते
त्यांच्याच आश्रयाने
जगत जगत
आपलेही तोंड काळेच
करत करत,
आपणही आपल्याला
सोबतीने त्यांच्या,समृद्ध
करून घेण्याचे
आता युग आहे
जाहिरातीही माध्यमातून
वर्ज्य असण्याच्या
बाजारू, बाजाराच्या,
लोकाश्रयानेच चालतील माध्यमं लोकांसाठी
तेवढीच, तशीच
चालवण्याचे
एक युग होते
माध्यमेच आता सारी
मालकीची
त्यांच्याच असण्याचे
हे युग आहे
शील, प्रज्ञा, करूणा,
अपरिग्रहाची उपासना
साकारण्याचे, अनावश्यक ते
साठवणूक ठरवण्याचे, ठरवण्याचे तो गुन्हा,
अधिकांच्या अधिक
कल्याणासाठीची शक्ती कमावण्याचे पुनः पुन्हा
एक युग होते
आता ते सारेच
मातीत गाडून
अधिकांचे अधिकच
अकल्याण करत,
आपणच तेवढी
महावर्चस्वाची महाशक्ती
होण्याचे युग आहे
भय, दहशत, हिंसामुक्त,
अहिंसक करण्याचे समाज
एक युग होते
त्याचीच तेवढी निर्मिती,
त्याचाच तेवढा व्यापार
बाकी साराच
अव्यापारेषु व्यापार
ठरवण्याचे
आता युग आहे
आधी
बोलत, उठून उभी होत
ज्या विरोधात माणसे,
त्याच्याच संरक्षणात
त्यांनाच
मूक करण्याचे युग आहे
आता सतत
यातच सारे समाज
जगवण्याचे युग आहे…
श्रीपाद भालचंद्र जोशी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.