जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ३
३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज अर्चना देशमाने यांच्या कार्याचा परिचय…ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते आणि ती स्त्री आपला त्याग व समर्पण भावनेने झोकून देऊन काम करते, अगदी त्याप्रमाणे पुण्याजवळ कोयाळी, ता. खेड येथील स्नेहवन या संस्थेचे सर्वेसर्वा अशोक देशमाने यांची पत्नी अर्चना ही वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी तब्बल ७० मुलांची आई झाली. तिचे लग्न झाले तेव्हा ती केवळ १९ वर्षांची होती व तेव्हाच ती १७ मुलांची आई झाली होती.
दारिद्र्यामुळे किंवा पित्याचे छत्र हरपल्याने ज्यांचे भविष्य अंधःकारमय होण्याची भीती होती, अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालनपोषण करून, त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवून, त्यांना परिस्थितीशी लढण्याचे बळ देत त्यांचे आयुष्य उजळवून टाकणारी ही माऊली…अर्चना अशोक देशमाने ! जणू सरस्वती, दुर्गा आणि अन्नपूर्णचेच रुप…!
अर्चना ही मूळची परभणी जिल्ह्यातील हट्टा या छोट्याशा गावातील गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगी. घरची परिस्थिती बिकट असली, तरी तिला लहानपणापासूनच शिक्षणाचा ध्यास होता. सावित्रीबाई फुले या तिच्या आदर्श आहेत. पाचवीला पूजलेला जीवघेणा दुष्काळ, थोरल्या बहिणीला हुंडा द्यावा लागल्याने लग्नात मोठा खर्च झाल्याने निर्माण झालेली आर्थिक चणचण, लहान भावाचे शिक्षण अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिने आपले शिक्षण थांबू न देता पदवीपर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण केले. तिला शिलाई, बागकाम अशी अनेक कामे येत होती. तिला कुठेही नोकरी मिळाली असती.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अन्य मुलींप्रमाणे स्वाभाविकच तिचेही स्वप्न होते सुंदर संसाराचे, छोट्याशा कुटुंबाचे व घरकुलाचे. त्यातच तिला स्थळ आले आयटी इंजिनिअर अशोक देशमाने यांचे. पण अशोकने आपल्या घरच्यांना अट घातली होती की मी हुंडा घेणार नाही. कोणतीही वस्तू घेणार नाही. यावर नातेवाईक व समाजाने वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण तो ठाम राहिला. आयटीत नोकरी म्हणजे ऐटीत जीवन हे आजचे समीकरणच पण या तरुणाच्या बाबतीत ही गणिते वेगळीच होती.
अशोक देशमाने यांनी आयटीतील नोकरी सोडून वयाच्या २६ व्या वर्षी सन २०१५ मधे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी आणि शैक्षणिक पुनर्वसनासाठी स्नेहवन नावाचा सामाजिक प्रकल्प पुण्याजवळ सुरू केला होता. स्वतः गरीब शेतकरी व वारकरी कुटुंबातील असल्यामुळे आणि महाविद्यालयीन जीवनापासून थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या विचारांनी प्रेरीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना पाहून त्यांचे मन पिळवटून जायचे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे भवितव्य काय ? या प्रश्नाने ते अस्वस्थ व्हायचे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आणि हे सांभाळणारी अशी पत्नी आपल्याला मिळावी अशी मनोमन इच्छा बाळगली.
हा सर्व संस्थेचा संसार ओढण्यासाठी गरज होती एका प्रेमळ आईची. जी अशोकसारख्या ध्येयवेड्या तरुणाला निःस्वार्थ भावनेने स्वीकारेल. अशोक यांच्याकडे ना धन होते, ना मोठे घर, ना गाडी. पण डोळ्यांत गरीबांच्या लेकरांना शिकवायची प्रबळ इच्छा होती. एका नातेवाईकाच्या माध्यमातून अर्चनाची माहिती त्यांना मिळाली. अशोक यांनी अर्चनाला लग्नाची मागणी घातली. ‘स्नेहवन’चे काम समजावून सांगितले. यावर अर्चनाने वयाच्या १९ व्या वर्षी ‘आयुष्यभर कोणतीही तक्रार करणार नाही, संस्थेतील मुलांचा त्यांची आई होऊन सांभाळ करेन, आयुष्यभर मुलांसोबत राहायचे, आपले बाळ झाले तरी ते मुलांमध्येच राहील’ ही अशोक यांची अट मान्य करत या ध्येयवेड्या तरुणाला अतिशय खडतर प्रवासात साथ देण्याची तयारी दर्शवली आणि या आधुनिक सावित्रीने जनसेवेचा वसा घेतला.
२१ नोव्हेंबर २०१६ रोजी विवाह झाला आणि पहिल्याच दिवसापासून चार छोट्या खोल्यांच्या घरातील ३० जणांच्या संसाराचा भार अर्चनाने पेलला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने संस्थेतील सर्व मुलांचे मातृत्व स्वीकारत त्यांचे संगोपन, त्यांचे जेवणखाण, अभ्यास, आजारपण या सगळ्यांची जबाबदारी आनंदाने उचलली. मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यात तिने आपली स्वप्नं मागे टाकली. प्रेम, त्याग, समर्पण, विश्वास, कष्ट, सातत्य यात तिने स्वतःला झोकून दिले. मात्र कामाच्या व्यापात २०१७ मध्ये अर्चनाचे अबॅार्शन झाल्याने आपले पहिले अपत्य गमवावे लागले. नंतर २०१८ मध्ये मुलगी जन्माला आली तीही सातव्या महिन्यातच. अवघ्या दीड किलो वजनाच्या त्या बाळाला सांभाळत अर्चना २५ मुलांचा स्वयंपाक करायची. पदवीधर असल्याने मुलांना शिकवणे, त्यांना संस्कारित करणे, त्यांना बागकाम, शिलाई काम व इतर काही गोष्टी शिकवणे तिचे सुरुच होते व आजही आहे.
प्रसिद्धीपासून दूर असलेल्या अर्चनाच्या या कुटुंबाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे, तिच्या अपार कष्टाने ‘स्नेहवन’ बहरतय. तिच्या स्वतःच्या आनंदी आणि राधा या मुली संस्थेतील मुलामुलींबरोबरच वाढत आहेत. सध्या संस्थेतील ९० माणसांची स्वयंपाकाची जबाबदारी २६ वर्षांच्या अर्चनाकडे आहे. स्नेहवनमध्ये मुलांना शालेय अभ्यासाव्यतिरिक्त संगणक, तबला, हार्मोनियम, शास्त्रीय संगीत, योगा, सूर्यनमस्कार, प्रार्थना, कराटे, प्रोफेशन पेंटीग, हस्तकला आदींचे प्रशिक्षणही दिले जाते. या सर्वाची जबाबदारी अर्चना आणि अशोक दोघेच घेतात. पुढचे संपूर्ण आयुष्य याच कामासाठी देण्याचा अर्चनाचा निर्धार आहे अनेक त्याग आणि संघर्षातून ज्ञानदानाचा हा महायज्ञ चालू आहे. अर्चनाचे हात आणखी बळकट करण्यासाठी समाजाची साथ हवी आहे.
अशोक देशमाने यांचेकडून मिळालेली प्रेरणा ही अर्चनाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. आजकाल Dink (Double income no kids) सोसायटीचा उदय होत असताना अर्चना ७०, तेही इतरांच्या मुलांचा सांभाळ करत देशाचे उत्तम नागरिक घडवायचा जो प्रयत्न करत आहे तो आजकाल आयटीत काम करणाऱ्या तरूणाईने एकदा पहायला हवा.
अशा या निःस्वार्थीपणे, मुलांवर प्रेम करणाऱ्या व उत्तम नागरिक घडवणाऱ्या या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा करतानाच तिच्या हाताला साथ द्यायला हवी..!!
मदतीसाठी संपर्क – अर्चना देशमाने
पत्ता – स्नेहवन संस्था, कोयाळी फाटा, कोयाळी तर्फ चाकण, ता. खेड, जिल्हा. पुणे- ४१०५०१
संपर्क 8237277615
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
