जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी १०
ॲड. शैलजा मोळक एक दमदार साहित्यिक, सत्यशोधक विचारवंत, पुरोगामी विचारांची कार्यकर्ती आणि निष्ठावान मैत्रीण. एवढीच तिची ओळख पुरेशी नाही, तर ती लेखक, संपादक, प्रकाशक, समुपदेशक, कवी, व्याख्याता आहे. आजवर तिने ५५ पुस्तके तर शिवस्पर्शचे २८ विशेषांक प्रकाशित केले आहेत.
रझिया सुलताना
ज्येष्ठ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या
अमरावती, मो. 95273 99866
ॲड. शैलजा मोळक एक दमदार साहित्यिक, सत्यशोधक विचारवंत, पुरोगामी विचारांची कार्यकर्ती आणि निष्ठावान मैत्रीण. एवढीच तिची ओळख पुरेशी नाही, तर ती लेखक, संपादक, प्रकाशक, समुपदेशक, कवी, व्याख्याता आहे. आजवर तिने ५५ पुस्तके तर शिवस्पर्शचे २८ विशेषांक प्रकाशित केले आहेत. एवढी मोठी विचारवंत असूनही ती स्वतःला कधीच मोठी मानत नाही. ती कायमच तिच्या लेखनीद्वारे इतरांना मोठं करते. वर्षात दोन सदरं लिहून ती ज्या प्रसिध्दी पासून दूर आहेत, ज्या सामान्यातील असामान्य आहेत, समाजहिताचे काम करतात, ज्या कौटुंबिक संघर्षातून वाट काढत आपली वाट शोधत आहेत त्यांना शब्दांकित करून सोशल मीडियावर टाकते. तिचा लोकसंग्रह अफाट आहे. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही तिचा वाचक आहे.
खरं म्हणजे इतरांना मोठं मानण्यात आणि त्याला आपल्या लेखनीद्वारे मोठं करून समाजासमोर आणण्याकरिता फार मोठं मन लागतं, हे मोठ मन तिच्याकडे आहे. तिचे वाचन प्रचंड आहे. आजवर शेकडो पुस्तक तिने वाचली. प्रत्येक पुस्तकावर तिने समीक्षण लिहिले आहे. महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्रात तिचे अनेक वैचारिक लेख, वाचकांची पत्रे प्रकाशित झाली आहेत. ॲड. शैलजा फक्त पुस्तकेच नव्हे तर माणसंही वाचते. त्यांच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा ठेवून त्यांना जमेस तशी मदतही करते.
गरीब कुटुंबातील मुलांना शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चही उचलते. स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्ट्या सक्षम करते. ती उत्तम वक्ता आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांवर तिचे प्रेम आहे. त्यामुळे ती विज्ञाननिष्ठ आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या त्यागावर तिची असिम निष्ठा आहे. त्यामुळेच ती जितकी निधर्मीय जगते, तेवढीच ती निरामय वागते.
तिची व माझी ओळख वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात गेटबाहेर झाली. तेथे माझ्या रजनी ते रझिया या पुस्तकाचे प्रकाशन होते. दोघेही उभयतां तेथे उपस्थित होते. पण तेथे पुस्तक विक्रीला नव्हते. मी दिसताच तिने विचारले, ‘आपले पुस्तक प्रकाशन झाले पण विक्रीला नाही दिसले.’ यावर मी पर्समधून एक प्रत दिली. तिने लगेच मला पैसेही दिले. आणि स्वतःच्या जवळील जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी हे पुस्तक मात्र मला भेट दिले. ही आमची अवघ्या ५ मि.ची भेट. तिने दिलेले पुस्तक वाचून मी तिला फोनवर अभिप्राय कळवला. पण त्याआधीच तिने माझ्या रजनी ते रझिया या पुस्तकावर समीक्षण लिहून ते सोशल मीडियावर टाकले होते. अशी ही केवळ विचारांवर प्रेम करणारी शैलजा, आजवर तिने अनेक लेखक- लेखिकांना उजेडात आणले व आर्थिक दृष्ट्या सक्षमही केले आहे. अनेक लेखकांची पुस्तके ती प्रचंड मेहनत घेऊन ती महाराष्ट्रभर पोहोचवते. सातत्याने एका सृजनशील समाजाच्या निर्मितीचा ध्यास घेते. या सर्व कामात तिचे पती ज्ञानेश्वर मोळक व मुले शैलेश व प्रज्ञेश भरपूर मदत करतात.
चित्रपट, नाटक, साहित्य, वारकरी संप्रदाय अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, कलावंतांशी यांचा संबंध व ओळख असल्याने त्यांचा विचार, त्यांची बौध्दिक मेजवानी ती वर्षभर समाजाला देत असते. एवढं सगळं करून ती प्रसिध्दीसाठी कधीच धडपडताना दिसत नाही. सामाजिक कामाच्या माध्यमातून ती उपेक्षित घटकापर्यंत पोहोचते. दिवाळी पहाट, सफाई कामगारांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू देणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, विधवांचा सन्मान, मार्गदर्शन, समुपदेशन, आर्थिक मदत करते. त्यासोबतच समाज शहाणा व्हावा म्हणून ग्रंथालय चालवते. वाचाल तर वाचाल असा संदेश सतत देते. एक स्टडी केंद्र तिने उपलब्ध करून दिले आहे. एक चालते फिरते जीवंत मानवतेचे विद्यापीठ म्हणजे ॲड. शैलजा मोळक..!
व्यक्ती म्हणून शैलजाताई जेवढी मोठी आहे, तेवढीच लेखिका म्हणूनही फार मोठी आहे. समाजातील असा एकही घटक नाही, जो तिच्या लेखणीतून सुटला आहे हे तिच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. नवतरूणांकरिता तिने युथ कट्टा, समृध्द सहजीवनासाठी, विचारशैली तर संत वाड्मयात श्री संत तुकाराम महाराज स्मारक ग्रंथ, आनंदवारी संतांसंगे ही पुस्तके केली. विवाह संदर्भात लग्न एक सप्तसूर, व्यक्तीविशेष मधे क्रांतीज्योती सावित्रीबाई, जिजाऊ, महाराणी येसूबाई, महाराणी ताराराणी, शिवपुत्र शंभूराजे अशा पुस्तकांचे लेखन केले आहे. आपल्या पतीच्या जीवनावर भाई हे पुस्तक लिहिले आहे. यात ‘मित्र नवरा होणे व नवरा मित्र असणे’ हे किती चांगले आहे हे वाक्यच त्यांच्या सहजीवनाची समृध्दी आहे. महिलांच्या व्यक्तिमत्वावरचे जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी हे पुस्तक महाराष्ट्रभर वाचनीय ठरले आहे.
शैलजाताई म्हणजे मानवतेचे कर्तृत्व, विज्ञाननिष्ठ विचारांचे नेतृत्व, आर्थिकतेचे दातृत्व आणि दिलदारपणाचे मातृत्व आहे. ती फक्त आपल्या दोन मुलांची आई नाही तर अनेक मुलांना शैक्षणिक दत्तक योजनेचा लाभ मिळवून देणारी सक्षम माता आहे. तिच्या पुण्यातील भव्य अशा ऐतिहासिक वाड्यात वर्षभर अनेक विचारवंतांची ये-जा असते. ऐतिहासिक वस्तू जतन करणारे संग्रहालय, अंगणातच छत्रपती शिवाजी व छ. संभाजी महाराजांच्या भव्य मूर्ती, जिजाऊच शिवाजी राजांच्या गुरू हे सांगणार शिल्प, थोडी मान वळवली की, प्राचीन काळातील जाती, पाटे, उखळ, मुसळ, हंडे अशा विविध वस्तू लक्ष वेधून घेतात. टाकाऊतून टिकाऊ अशा तयार केलेल्या बैठका, शंभर लोकांची कार्यशाळा होईल असा प्रशस्त हॅाल. आईवडील व सासूसासरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम त्या घेतात.
शैलजाचे साहित्य व विचार म्हणजे मानवतेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची अभिव्यक्ती आहे. तिचे विचार समाजाला शिकवण देतात. प्रेरणा देतात.
‘वादळ होऊन – वादळावर स्वार व्हायला शिका.
अनुभवातून संकटाच्या – पार व्हायला शिका.
ध्येय ठेवा सोबतीला- गरज मग कुणाची ?
जगताना असूद्या – खंबीरता मनाची’
अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला सलाम करताना तिच्या लोकसंग्रहातील एक म्हणून मला अभिमान वाटतो.
अशा या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
ॲड. शैलजा मोळक
मो.9823637244
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.