आगामी काही वर्षामध्ये मानव महत्त्वाचा का त्याने निर्माण केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्र मानव व कृत्रिम बुध्दिमत्ता
प्रा. नंदकुमार काकिर्डे
(आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) महत्वाची हे ठरवण्याची तसेच त्याचे वाजवी नियमन, नियंत्रण करण्याची वेळ आली आहे. मानवानेच जन्म दिलेल्या “कृत्रिम बुद्धिमत्तेचा ” भस्मासूर आपल्या समोरच अक्राळविक्राळ स्वरूप धारण करत आहेत. यामुळे आपन्या बौद्धिक विकासामध्ये तसेच सर्जनशीलतेवर मर्यादा येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नैतिकते बरोबरच अन्य गंभीर समस्या भस्मासुरासारख्या उभ्या ठाकत आहे. त्यांचा हा धांडोळा.
जेष्ठ अर्थविषयक पत्रकार
अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोस्थित “सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी” (सीएआयएस) या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्या मध्यवर्ती संस्थेने दि. 30 मे रोजी एक संक्षिप्त पण मुद्देसूद विधान प्रसिद्ध करून जगभरात मोठी खळबळ उडवून दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेपोटी मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होत असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अणुयुद्ध किंवा करोना सारखी महामारी यांच्यासारखाच मोठा धोका या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निर्मिती मुळे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) मानवाच्या अस्तित्वाला निर्माण झाला असून त्याविरुद्ध संपूर्ण जगानेच अत्यंत तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे असे सरळ साधे विधान त्यांनी केले आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विधानाला”ओपन ए आय” चे प्रमुख कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन,”डीप माइंड” चे कार्यकारी अधिकारी डेमिस हसाबीस; “अँथ्रोपिक” चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेरिया अमोडाइ; ट्युरिंग अवॉर्ड विजेते जेफ्री हिंटन व योशिआ बेंजियो तसेच स्टॅंनफोर्ड आणि बर्कले येथील एमआयटी मधील 350 पेक्षा जास्त प्रतिष्ठित प्राध्यापकांनी स्वाक्षरीद्वारे या मांडणीला पाठिंबा दिला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस जगभरातील काही धनाड्य मंडळींनी एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासावर किमान सहा महिन्याची बंदी घालावी अशी मागणी एका खुल्या पत्राद्वारे केली .ही मागणी करणाऱ्यांत ॲपलचे प्रमुख, टेस्लाचा संस्थापक एलान मस्क अशा दिग्गज मंडळींचा यात समावेश आहे.
या सर्व तज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या या विधानाची थोडी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. त्याआधी साधारणपणे पंधरा दिवस अगोदर आयबीएम कंपनीचे चीफ प्रायव्हसी ऑफिसर ख्रिस्तीना मॉन्टगोमेरी, श्री सॅम अल्टमन व कृत्रिम बुद्धिमत्तेचे शास्त्रज्ञ गॅरी मार्कस यांनी अमेरिकेच्या सिनेट म्हणजे संसदेच्या समिती समोर कृत्रिम बुद्धिमत्तेची आश्वासने आणि धोके याबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी नमूद केल्या होत्या. याचवेळी” ओपन एआय” च्या सहसंस्थापकांनी कायदे मंडळाने यात वेळीच हस्तक्षेप करून कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन केले होते. जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात तयार होत असलेल्या संगणक प्रणाली परवाने व त्याच्या चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी याबाबत काही मर्यादा कायद्याने स्पष्ट कराव्यात असेही या वेळेला सांगण्यात आले होते. जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापराद्वारे होत असलेल्या विकासाला पायबंद घालण्याऐवजी त्या वरील वाजवी नियंत्रणासाठी अत्यंत अचूक नियमन दृष्टीकोन विकसित करावा अशी मांडणी करण्यात आली होती.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अलीकडे “चॅटबोट” किंवा ” चॅट जीपीटी ” यासारखी नवनवीन साधने निर्माण होत असून त्याच्या मुक्त वापराचा प्रतिकूल परिणाम प्रचलित “सोशल मीडिया” पेक्षाही जास्त गंभीर होऊ शकतो. यासाठी लार्ज लैंग्वेज मॉडेल्स (एलएलएम) चा वापर केला जात असून सुक्ष्म व शक्तिशाली मार्गांनी समाजाला वेगळे वळण दिले जात आहे. या साधनांची महाकाय ताकद एखाद्या चीनी दुकानातील शक्तिशाली, बेपर्वा व नियंत्रणा बाहेरील बैलासारखी आहे, असेही या समितीला परखडपणे सांगण्यात आले होते.
“कृत्रिम बुद्धिमत्ते” चे जन्मदाते जेफ्री हिंटन यांनी अलीकडेच गुगलचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनीच ही कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा विकसित करण्यासाठी त्यांचे आयुष्य खर्ची घातल्याबदल तीव्र खेद व्यक्त केला होता. कारण त्यातूनच “चॅट बोट” सारख्या साधनांचे उदंड पीक निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे जगभर जगासमोर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून “सीएआयएस ” सारखी संस्था हे धोके कसे कमी करता येतील यासाठी प्रामुख्याने काम करत आहे. संस्थेतर्फे सातत्याने संशोधन करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षेतेसाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी निधी पुरवला जातो. मशीन लर्निंग ( एमएल) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा ( एआय सिस्टीम्स) यांचा वापर उच्च दर्जाच्या वातावरणासाठी केला जातो. मशीन लर्निंग हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक भाग आहे. संगणक प्रणालीचे हे असे एक आधुनिक तंत्र आहे की ज्यामुळे संगणक नवनवीन गोष्टींचा स्वतःहून अभ्यास करायला शिकतात आणि आवश्यकतेनुसार स्वतःहून निर्णय घेऊ शकतात. हे तंत्रज्ञान यंत्राला म्हणजे मशीनला माणसासारखे वागण्यास सक्षम करते. यामुळेच मानवाच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
यासाठी अमेरिकेच्या लष्करातील याबाबतचे अलीकड्चे एक उदाहरण खूप महत्त्वाचे ठरेल. लष्करातर्फे वापरल्या जाणाऱ्या एका ड्रोन मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला. त्याला शत्रूच्या “सरफेस टू एअर मिसाईल” (एसएएम) चे शोध घेण्याचे काम सांगण्यात आले. या मध्ये संबंधित ड्रोनने ते शोधून त्याची माहिती संबंधित मानवाला तत्काळ देण्याचे काम अपेक्षित होते. प्रत्यक्षात या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ड्रोनने कुठल्याही मानवाला त्याची माहिती न देता किंवा कोणत्याही मानवी आज्ञेचा विचार न करता परस्पर ते मिसाईल उडवण्याचे थेट काम केले. म्हणजे येथे या यंत्र मानवाचे व कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्तन अत्यंत धोकादायक व अपेक्षेपलीकडचे किंवा अनाकलनीय असल्याचे स्पष्ट झाले. मानवाच्या अस्तित्वाला किंवा त्याच्या निर्णय क्षमतेला हाच गंभीर व मोठा धोका निर्माण झाला आहे. परंतु ज्या पद्धतीने किंवा अन्य साधनांचा वापर केला जात आहे ते लक्षात घेता ही कृत्रिम बुद्धिमत्ता गंभीर चुका करू शकते आणि या चुका माणसाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात अशी निश्चित परिस्थिती आहे.
आज जगभरात केवळ लष्करच नाही तर विविध प्रकारच्या उद्योग क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि मशीन लर्निंगचा वापर केला जातो. आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रात शरीराच्या चिकित्सेचे महत्वाचे काम त्यामध्ये केले जाते. वाहन उद्योगात तर उत्पादनासाठी त्याचा मोठा वापर केला जातो. या सर्व ठिकाणी अत्यंत संतुलित आणि योग्य पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणे महत्त्वपूर्ण व आवश्यक आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांनी असे सुचवले आहे की या यंत्रणांचे” ऑडिट” सातत्याने केले पाहिजे. मात्र त्याआधी कृत्रिम बुद्धीमत्ता वापरासाठी सर्व मान्य अशी आदर्श निती तत्वे किंवा त्याच्या वाजवी मर्यादा तयार केल्या पाहिजेत. त्यानंतरच त्याचे स्वतंत्र बाह्य व्यक्ती किंवा संस्थांकडून ऑडिट करणे शक्य होऊ शकेल. याबाबत आज दुर्देवाने अशी स्थिती आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या बलाढ्य कंपन्यांनाच याबाबत अनास्था आहे. गुगल सारख्या कंपनीत जेव्हा काही संशोधकांनी प्रश्नचिन्ह उभे केले तेव्हा त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. मायक्रोसॉफ्ट कंपनीने तर त्यांच्या “नीतीशास्त्र व समाज संघालाच नारळ देऊन कामगार कपात केली.
मानवी विकासाचा इतिहास आपण पाहिला तर त्यात यंत्रमानवाने आपल्यावर मात करण्याची भीती अनेक दशके आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त चित्रपट तर सातत्याने मानवविरुद्ध यंत्रमानव याचे युद्ध आपल्यासमोर सादर करत आहेत. चित्रपटाच्या अखेरीस जरी त्यात मानव विजय मिळवत असला तरी भविष्यात अशीच स्थिती राहील अशी शक्यता नाही. या यंत्रमानवांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर खऱ्याखुऱ्या मानवावर मात करून त्याच्यावर नियंत्रण मिळवू नये अशी आपली सर्वांचीच अपेक्षा आहे. माणसासारखा विचार यंत्रे करतात का त्यांना काही भावना आहेत का याबाबत आज तरी काही सांगता येत नाही. आज अनेक कंपन्यांनी चॅट जीपीटी सारखी अनेक साधने विकसित केली आहेत. कोणत्याही प्रकारचे लेखन, चित्रे ,संगीत, चित्रपट, नाट्य लेखन किंवा अन्य कोणत्याही कलांची निर्मिती त्याद्वारे होऊ शकते. त्यामध्ये मुद्रणाधिकार कायद्याचा म्हणजे कॉपीराईट कायद्याचा सातत्याने राजरोस भंग होताना दिसतो. विद्यार्थी विद्यार्थ्यांना काहीही अभ्यास न करता कोणत्याही प्रश्नांची उत्तरे यामध्ये उपलब्ध होतात. म्हणजे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची क्षमताच हळूहळू नष्ट होणार आहे.
खोट्या प्रकारची किंवा चुकीची माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेला व मशिन लर्निंगला दिली जाते आणि त्यातून काहीही बुद्धीच्या पलीकडचे किंवा तर्काच्या पलीकडचे असे आगळेवेगळे विश्व निर्माण केले जात आहे. अत्यंत अविश्वसनीय अशा पद्धतीने ही सगळी माहिती एकत्र करून क्षणार्धात आपल्यापुढे सादर केली जाते. मानवाच्या सर्जनशीलतेला, वैचारिक नवनिर्मीती समोर एक वेगळे आव्हान यामुळे निर्माण होत आहे. आपल्या आयुष्यात “शिक्षक” ही संकल्पना अस्तित्वात असणे हे किती आनंददायी असते हे आपल्याला माहित आहे . परंतु त्यांची जागा आज ही कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ पाहत आहे. सकृत दर्शनी हे शक्य वाटत नसले तरी भविष्यात काहीतरी नवीन समोर उभे ठाकणारच नाही असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. इंटरनेटच्या माध्यमातून जगातील देशांच्या सीमारेषा जवळजवळ नष्ट झाले आहेत.
जगाच्या कोणत्याही भागातून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सायबर हल्ल्याद्वारे व्यक्ति, बँका, वित्त संस्थांची आर्थिक लूट केली जात आहे. मानवाच्या प्रत्येक हालचालीवर कृत्रिम बुद्धिमत्तेतून हेरगिरी केली जात आहे. कल्याणकारी राज्य चालवणे हे आता फक्त कागदावर राहत असून महाबलाढ्य कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर सगळ्या जगाला व पर्यायाने मानव जातीला नामोहरम करताना दिसत आहेत. इटली सारख्या देशाने चॅट जीपीटी च्या वापरावर बंदी घातली आहे. युरोपियन महासंघाने याबाबत कायदे करून या तंत्रज्ञानाला एक प्रकारे वेसण घालण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंडने याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. अमेरिकेतही याबाबत उच्च स्तरावर मानवी बुद्धिमत्तेचे बिल ऑफ राइट्स तयार करण्याचे काम सुरू आहे. भारतातही याबाबत धोरणात्मक पेपर तयार केला जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता नियंत्रण करण्याचा कोणताही कायदा भारतात आज तरी विचारार्थ दिसत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सातत्याने नवनवीन शोध लागत आहेत. साधने निर्माण होत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे जगभराचे कायदे अपुरे किंवा अकार्यक्षम ठरताना दिसत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यकाळात भस्मासुर ठरण्याची शक्यता आहे हे नाकारता येणार नाही. मात्र त्या भीतीपोटी कृत्रिम बुद्धिमत्तेचा गळा घोटून त्याचा अंत करणे हेही तंत्रज्ञान विकासाला अभिप्रेत नाही. संपूर्ण जगानेच अशावेळी एकत्र येऊन सर्वांगीण हिताचे नियंत्रण वाजवी नियमन करावे अशी अपेक्षा केली तर ते वावगे ठरू नये.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.