July 27, 2024
Book Review BoliVidnya by Tejas Chavan
Home » बोलीविज्ञान : भाषाभ्यासाच्या कक्षा रुंदावणारा ग्रंथ
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

बोलीविज्ञान : भाषाभ्यासाच्या कक्षा रुंदावणारा ग्रंथ

मराठीच्या या बोलींचा कुठेही सुव्यवस्थित अभ्यास झालेला पहावयास मिळत नाही. मराठी भाषेबद्दलचा बहुतांश विचार हा इंग्रजीच्या आक्रमणाच्या अनुरोधाने केलेला दिसतो. त्यामागेही तीव्र भाषिक अस्मिता आणि कमालीचा इंग्रजीविषयीचा द्वेष लपलेला असतो. त्यामुळे भाषेच्या शास्त्रीय अभ्यासाठी, विश्लेषणासाठी आवश्यक असणारे मूलभूत, पद्धतशीर चिंतन मराठीत होताना दिसत नाही.

डॉ. तेजस चव्हाण
संपर्क : 7385588335 । Email : chavantejast@gmail.com

बोलीविज्ञान ही भाषाविज्ञानाची एक महत्त्वाची परंतु अलक्षित अभ्यासशाखा आहे. खरे तर युरोप आणि अमेरिकेमध्ये बोलीविज्ञानाच्या पद्धतशीर अभ्यासाला एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस आरंभ झाला होता. सुरुवातीस प्राथमिक स्तरावरील केवळ संकलनाच्या स्वरूपातील हा अभ्यास नंतरच्या काळात विश्लेषणापर्यंत जाऊन पोहोचला होता. कालपरत्वे भाषाविज्ञानातील काही संकल्पनांच्या, अभ्यासपद्धतींच्या आधाराने बोलीविज्ञानाने स्वत:च्या काही नव्या अभ्यासपद्धती विकसित केल्या. हा सगळा ऊहापोह होत असताना मराठीमध्ये मात्र बोली अभ्यासाच्या अंगाने सूक्ष्म, तात्त्विक आणि पद्धतशीर विचार मात्र कुठेच होताना दिसत नव्हता. पीएच.डी. संशोधनाच्या अनुषंगाने किंवा विविध शासकीय, निमशासकीय, विद्यापीठस्तरीय, भाषा संवर्धनाच्या हेतून काम करणाऱ्या संस्थांच्यावतीने बोलीविषयक लहानमोठी कामे, प्रकल्प हाती घेतले जात होते. परंतु, केवळ शब्दनिधीचे संकलन करून त्याची वर्गवारी करण्यापलीकडे या अभ्यासांना आपले अस्तित्व सिद्ध करता आले नव्हते. यामागचे महत्त्वाचे कारण, मराठीमध्ये तसे मूलभूत बोली अभ्यासाचे पद्धतिशास्त्र सांगणारा, दिशादर्शक ठरू शकेल असा एकही ग्रंथ उपलब्ध नसणे, हे आहे.

मराठी भाषा ही जगातील एक महत्त्वाची आणि मोठ्या भाषिक समूहाची व्यवहार भाषा आहे. ती महाराष्ट्राच्या विस्तीर्ण भूप्रदेशामध्ये बोलली जाते. अर्थातच प्रदेशानुरूप, भौगोलिक स्थानानुरूप, सामाजिक-सांस्कृतिक स्तरानुरूप तिच्या विविध बोलीही बोलल्या जातात. मात्र मराठीच्या या बोलींचा कुठेही सुव्यवस्थित अभ्यास झालेला पहावयास मिळत नाही. मराठी भाषेबद्दलचा बहुतांश विचार हा इंग्रजीच्या आक्रमणाच्या अनुरोधाने केलेला दिसतो. त्यामागेही तीव्र भाषिक अस्मिता आणि कमालीचा इंग्रजीविषयीचा द्वेष लपलेला असतो. त्यामुळे भाषेच्या शास्त्रीय अभ्यासाठी, विश्लेषणासाठी आवश्यक असणारे मूलभूत, पद्धतशीर चिंतन मराठीत होताना दिसत नाही.

मराठीमध्ये सु. बा. कुलकर्णी यांचा ‘बोलीभाषांचा अभ्यास’ हा लेख आणि ना. गो. कालेलकरांच्या ‘भाषा आणि संस्कृती’, ‘भाषा : इतिहास आणि भूगोल’ या दोन पुस्तकाव्यतिरिक्त म्हणावे तसे चिंतन सुरुवातीच्या काळात झालेले दिसत नाही. बहुतेक बोली अभ्यासकांकडून कुलकर्णी आणि कालेलकरांच्या उपरोल्लिखित लेखनाचा पथदर्शक म्हणून उपयोग केला जातो. परंतु, या लेखनामध्येही पाश्चिमात्य देशांमध्ये सुरू असणार्या बोली अभ्यासाची अत्यंत त्रोटक स्वरूपात दखल घेण्यात आली होती. तेव्हा पाश्चिमात्य देशांत आजवर झालेल्या बोलीविषयक अभ्यासाची नेमकी आणि सर्वंकष नोंद मराठीत झालेली नाही. ती व्हावी, या उद्देशाने औदुंबर सरवदे यांनी ‘बोलीविज्ञान’ या ग्रंथाचे लेखन केले आहे. बहुतेकदा कोणत्याही सैद्धान्तिक ऊहापोह करणार्या शास्त्रीय ग्रंथाचे स्वरूप, हे बोजड आणि अकलनाच्या दृष्टीने कठीण असते. परंतु, ‘बोलीविज्ञान’ या ग्रंथाची उल्लेखनीय बाब म्हणजे, सामान्यातील सामान्य मराठी वाचकाला डोळ्यासमोर ठेऊन अतिशय सुलभ भाषेत औदुंबर सरवदेंनी बोलीअभ्यासाच्या जडणघडणीचा चढता आलेख मांडला आहे.

सरवदेंनी ‘बोलीविज्ञान’ या संकल्पनेची सैद्धान्तिक चर्चा करीत असताना ‘भाषा आणि बोली’ या प्रकरणात शीर्षक संकल्पनांचे उत्पत्तीविषयक विवेचन केले आहे. ‘भाषा’ आणि ‘बोली’ या दोन्ही संज्ञाच्या संकल्पनात्मक अर्थांमागील गोंधळ, दोन्हींतील परस्पर संबंध, याविषयीची सविस्तर चर्चा पहिल्या प्रकरणात करण्यात आली आहे. सामान्यपणे बोली ही ग्रामीण आणि कमी महत्त्वाच्या लोकसमूहाशी संबंधित असते, अशी धारणा बहुतेक अभ्यासकांची असते. त्यामुळे ‘बोली’ या संज्ञेची नेमकी व्याख्या करताना आणि तिचे स्वरूप समजून घेताना अभ्यासकांची आजही मोठी धांदल उडालेली दिसते. सुरुवातीच्या काळात युरोपमध्येही या दोन संकल्पनांबद्दल कमालीचा गोंधळ होता. सरवदेंनी याबाबतची तपशीलवार चर्चा दाखल्यांसहित या प्रकरणात नोंदविली आहे.

भाषावैज्ञानिक आणि समाजभाषावैज्ञानिक द़ृष्टीने ‘भाषा’ आणि ‘बोली’ या संकल्पनांची व्याख्या करता येते का, याचाही शोध पाश्चात्त्य विमर्शाच्या आधारे घेण्याचा प्रयत्न केला आहे. सरते शेवटी बोली म्हणजे ‘समान भौगोलिक वा सामाजिक प्रसार असलेली भाषिक वैशिष्ट्य’ अशी आज मान्यता पावलेली व्याख्या नोंदवित ‘भाषा’ आणि ‘बोली’ यातील निश्चित फरक सांगता येत नाही, त्याचप्रमाणे बोली-बोलींमधील संबंध आणि त्यांच्यातील फरक निश्चितपणे मांडता येत नाहीत, असेही नमूद केले आहे.

खरे पाहता 1960 नंतरच जगभरातील विविध देशांत बोलीअभ्यासाला मूर्त रूप येऊ लागले होते. परंतु, याची सुरुवात मात्र 1876 मध्येच झाली होती. 1876 साली बोली अभ्यासाबाबत काही महत्त्वाच्या घटना घडल्या. ज्यामुळे बोली अभ्यासाला एक महत्त्वाचे वळण मिळाले. भाषाभ्यासक एडुअर्ड सैव्हीर्स यांचे ‘उच्चारशास्त्राची तत्त्वे’ हे पुस्तक या वर्षी प्रकाशित झाले. पुढे काही दिवसात त्यांच्या स्वीस विद्यार्थ्याने केरंझेन या ठिकाणच्या बोलीवर एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला. तोही याच वर्षी प्रसिद्ध झाला.

दरम्यान जॉर्ज वेन्कर या तरुण शिक्षकाने स्थानिक बोलीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली. कालांतराने या स्थानिक बोली सर्वेक्षणाचे रूपांतर जर्मन भाषेच्या बोलींच्या सर्वेक्षणामध्ये झाले. त्याशिवाय नवव्याकरणकार (छशे-सीराारीळरपी) या नावाने परिचित असणार्या भाषा अभ्यासकांनी ‘ध्वनी परिवर्तनाचे नियम निरपवाद असतात’ असे सूत्र याच वर्षी प्रस्थापित केले. ज्यामुळे बोली अभ्यासाला एक आगळे वळण लाभले. अशा प्रकारे 1876 साली युरोपमध्ये सुरू झालेला बोलीचा अभ्यास नंतरच्या काळात अमेरिकेमध्ये केला जाऊ लागला. अगदी अलीकडे, म्हणजे 1960 नंतर जगातील इतर देशांमध्ये बोली अभ्यासाला सुरुवात झाल्याचे या प्रकरणातून लक्षात येते.

सुुरुवातीच्या काळात बोली बोलणारे लोक हे ग्रामीण, खेडवळ, शेतकरी, मजूर असतात, असे गृहित धरून भाषा अभ्यासक आपले चिंतन प्रकट करीत असत. बोलीविज्ञान अभ्यासशाखेच्या उत्पत्तीनंतर मात्र बोलींचा अधिक गंभीरपणे आणि स्वतंत्रपणे विचार होऊ लागला. ‘बोली आणि बोलींचा अभ्यास म्हणजे बोलीविज्ञान’, अशी व्याख्या चेंबर्स आणि ट्रजिल यांनी 1980 मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात केली. पुढे बोली अभ्यासाच्या 150 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत भाषेची कोणती वैशिष्ट्ये बोलींचा भाग असतात?, बोली म्हणजे काय? आणि या वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्याच्या योग्य पद्धती कोणत्या? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे प्रयत्न बोलीविज्ञानाने केले.

या द़ृष्टीने बोलीविज्ञानाकडे पाहिले असता, बोलीविज्ञान अभ्यासशाखेचा इतिहास म्हणजे, भौगोलिकद़ृष्ट्या पसरलेल्या मुख्यत: ग्रामीण बोलींच्या गुणवैशिष्ट्यांच्या नमुन्यांच्या संकलनापासून सामाजिक आणि इतर काही भाषिक बाबींशी संबंधित मुख्यत: शहरी बोलींच्या विश्लेषणापर्यंत झालेले स्थित्यंतरांचा अभ्यास होय, असे प्रथमदर्शनी म्हणावे लागेल. औदुंबर सरवदेंनी भाषा आणि बोलीतील जननीय संबंध आणि बोली अभ्यासासाठी बोलींची निवड कोणत्या निकषांच्या आधारे करावी, याबाबतच्या पद्धतिशास्त्राचाही उलगडा प्रस्तुत प्रकरणामध्ये नेमकेपणाने केला आहे. शिवाय बोली-बोलीतील भेद स्पष्ट करण्यासाठी योजल्या जाणार्या ‘समवाक आरेखन रेषां’चा उपयोग कशा रीतीने करायचा असतो, याबाबतचे विस्तृत विवेचनही त्यांनी केले आहे. ज्यामुळे वाचकांना सुरुवातीलाच बोलीविज्ञानाच्या अभ्यासपद्धतीसाठी आवश्यक असणार्या प्राथमिक संकेतांची, नियमनांची, आचारसंहितेची ओळख होते.

प्रत्येक बोलींची स्वत:ची काही खास वैविध्ये, वैशिष्ट्ये असतात. बोलींचा शास्त्रशुद्ध अभ्यास करताना या वैविध्याचा विचार करणे क्रमप्राप्त किंवा अभ्यास विषयाची गरज असते. ही बाब विचारात घेत सरवदेंनी ‘बोलीवैविध्य’ या दुसर्या प्रकरणाची मांडणी केली आहे. ज्यामध्ये विशिष्ट एका भाषेत वैविध्ये निर्माण होण्यामागील कारणांची चर्चा करण्यात आली आहे. साधारणपणे कोणतीही भाषा ही सर्वत्र सारख्या पद्धतीने वापरली जात नसते. त्या भाषा बोलणार्या संबंधित भाषिकांकडून जाणतेपणी किंवा अजानतेपणाने तिच्या उच्चारणामध्ये, वापरामध्ये अनायासे भेद निर्माण होत असतात.

कोणतेही दोन भाषिक एकमेकांशी संवाद साधताना एकाच पद्धतीने भाषेचा उपयोग करीत नसतात. त्यांच्या भाषा वापरामध्ये कमी-अधिक प्रमाणात वेगळेपण असते. परंतु, नैसर्गिक भाषेतील अनावश्यक पुनरावृत्ती आणि भाषकाचे भाषेच्या बाह्य रूपाकडे जास्त लक्ष नसल्यामुळे आकलनामध्ये फारसे अडथळे येत नाहीत. याशिवाय काही वेळा उच्चारणाच्या पातळीवर वाटणारे हे अतिशय सूक्ष्म भेद शब्दांच्या वापरातील आदलाबदलीपर्यंत जाऊन पोहोचतात. एखाद्या बोलीत र्हस्व आणि दीर्घ स्वरांचे उच्चार एकसारखे केले जातात. तर काहीवेळा एका शब्दासाठी इतर पर्यायी शब्द वापरले जातात. यामुळेही काही बाबतीत शब्द वैविध्ये निर्माण झाल्याचे पहावयास मिळते. झाडूसाठी केरसुनी, साळोता, फडा, खराटा, झाडू, झाडणी असे शब्द वापरले जातात. त्यामुळेही एखाद्या बोलीत ही वैविध्ये निर्माण झालेली पहावयास मिळतात. मुळातच भारत हा बहुभाषिक देश असल्याने येथील भाषिक स्थिती ही खूपच गुंतागुंतीची आहे.

भाषाभ्यासाच्या दृष्टीने भारत ही एक भाषाविज्ञानाची प्रयोगशाळा आहे, असे पाश्चात्त्य अभ्यासक सातत्याने म्हणत आले आहेत. त्यांचे हेे म्हणणे अजिबात चुकीचे नाही. भारतीय भाषांचा अतिशय पद्धतशीरपणे अभ्यास करणार्या जार्ज ग्रियर्सन यांनी अतिशय सूक्ष्मपणे बोली उच्चारणातील नोंदवून ठेवलेली वैविध्ये र्(ींरीळरींळेप) विचारात घेतल्यास, पाश्चात्त्य अभ्यासकांच्या उपरोक्त विधानाची सत्यता पटते. याचा आधार घेत शब्द वैविध्य हे पद्धतशीरपणे निर्माण न होता, गरजेतून निर्माण होत असल्याचे निरिक्षण या प्रकरणात नोंदविले आहे. एकीकडे पाश्चात्य अभ्यासक जॉफरी लीच, हॅलिडे यांच्या चिंतनाचा आधार घेत बोलीवैविध्यामागील कारणे उलगडून दाखवत असताना समांतरपणे संस्कृत भाषेतील परिवर्तनांची कारणमीमांसा आणि तंजावर आणि महाराष्ट्र येथील मराठीत विनिमयाचा अभाव या प्रकरणात जाणीवपूर्वक नोंदविला आहे.

प्रस्तुत ग्रंथातील तिसरे प्रकरण ‘बोलीभूगोल (पारंपरिक बोलीविज्ञान)’ हे अतिशय रोचक आणि कुतूहलपूर्ण आहे. पाश्चिमात्य देशात बोलींच्या अभ्यासांबाबत झालेल्या काही प्रकल्पांचा वेध घेत सरवदेंनी बोलीभूगोल, बोलीनकाशे या संकल्पनांची ओळख करून दिली आहे. पाश्चात्त्य भाषा अभ्यासकांनी निवेदकाच्या निवडीसाठी योजलेल्या पद्धती, संकलित केलेल्या माहितीतून नमुने निवडण्यासाठी केलेल्या खटपटीबाबतची तपशीलवार माहिती वाचणे अतिशय औत्युक्याचे आणि तितकेच रंजक आहे. जॉर्ज वेन्कर याने 1876 मध्ये जर्मनीमध्ये 40 प्रश्नांच्या साहाय्याने सर्वेक्षण केले होते. ज्यासाठी त्याने शाळांतील मुख्याध्यापकांची मदत घेतली होती. ज्या अभ्यासाच्या आधारे त्याने पहिले वहिले ‘भाषिक नकाशे’ही प्रसिद्ध केले होते. वेन्करच्या चाळीस वर्षांच्या माहिती संकलनाच्या कार्यात फर्दिनाद रेडे, मारियस क्रिस्टेनसेन यांनी दिेलेला सहयोगही अतिशय महत्त्वाचा ठरला होता. एखादी अभ्यासपद्धती कोणकोणत्या स्थित्यंतरातून विकसित होत जाते, याचा एक उत्तम नमुना म्हणून या काळातील बोली सर्वेक्षणाचा प्रवास वाचणे कुतूहलजनक आणि अभ्यासनीय आहे.

ज्यामध्ये अन्गुस मॅकईन्टोश या भाषा अभ्यासकाने स्कॉटलंडमधील शाळांमधून पत्र प्रश्नावल्यांच्या आधारे बोलींच्या नमुन्यांचे संकलन केले होते. तर वेन्करच्या भाषिक माहिती संकलनासाठी वापरलेल्या पद्धतीत सुधारणा करत जुलेस गिलियरॉनने केलेले फ्रेंच भाषेचे सर्वेक्षणही अत्यंत परिणामकारण आणि सर्वांगीण होते. गिलीयरॉनने या कामासाठी एक आगळा प्रयोग केला. त्याने संकलनासाठी पेशाने किराणा दुकानदार असणार्या इडमंड एडमॉन्टची मदत घेतली होती. एडमॉन्टन आपल्या ऐकण्याच्या कुशलतेसाठी प्रसिद्ध होता. त्याला ध्वनींमधील तसेच उच्चारात्मक भेद नोंदवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मग एडमॉन्टने सायकलवरून 639 ठिकाणांना भेटी देऊन निवेदकांच्या मदतीने भाषिक माहिती संकलित केली. यासाठी त्यांने मुलाखत पद्धतीचा उपयोग केला होता. अर्थात हे दोन्ही प्रकल्प वेन्कर आणि गिलियरॉन यांनी वैयक्तिक पातळीवर पार पाडले असले तरी, नंतरच्या काळात बोली अभ्यासाच्या दिशा ठरविण्यामध्ये या दोन्ही प्रकल्पांचे मौलिक योगदान राहिलेले होते. यासह याकोब यूड, हन्स कुरथ, ज्युनियर गे लोमन यांनी केलेल्या बोली संशोधाचाही धावता आढावा घेतला आहे.

युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बोली अभ्यासाचे प्रकल्प हाती घेतले जात होते. परंतु, सुरुवातीच्या काळातील हे बोली अभ्यास राष्ट्रीय पातळीवर केले जात असत. मोठी भौगोलिक व्याप्ती असणारा परिसर बोलींच्या सर्वेक्षणासाठी निवडला जाई. तसेच या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट विविध बोलीतील वैविध्ये दर्शविणे, इतकेच असल्याने बोलींचा म्हणावा तसा सर्वंकष आणि नेमका निष्कर्षाप्रत जाणारा अभ्यास होत नसे. नंतरच्या काळात मात्र अभ्यासकांकडून बोली अभ्यास अधिक नेमकेपणाने व्हावा, यासाठी भौगोलिक व्याप्ती मर्यादित केली जाऊ लागली. बोलींच्या अभ्यासात सामाजिक बाबींचाही विचार होऊ लागला. संकलनाच्या तंत्राविषयी अधिक मूलभूत आणि मूलगामी चर्चा होऊ लागली. प्रश्नावलीचे स्वरूप कसे असावे किंवा मुलाखतीचे प्रश्न नेमके कसे असावेत, याविषयी अभ्यासकांत चर्चा होऊ लागल्या. या सगळ्यातून बोलीचा अभ्यास करताना भौगोलिक स्थितीचा विचार अभ्यासकांनी कशा तर्हांनी केला, याचे एक सर्वसमावेशक चित्र प्रस्तुत प्रकरणात नोंदविले आहे.

औदुंबर सरवदे यांनी बोलीविज्ञान या अभ्यासशाखेची तात्त्विक चर्चा करीत असताना, या अभ्यासशाखेचा विकासक्रम अत्यंत समर्पक रीतीने उलगडला आहे. ‘बोलीभूगोल’ या प्रकरणानंतरच्या ‘पारंपरिक बोलीविज्ञानावरील टिका’ या प्रकरणात त्यांनी बोली अभ्यासपद्धतीतील महत्त्वाच्या स्थित्यंतराचा वेध घेतला आहे. 1950 नंतर युरोपमधील सर्व देशांत बोली सर्वेक्षणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले. याचा परिणाम असा झाला की, पारंपरिक बोलीवैज्ञानिकांना आपण मांडलेले अभ्यासक्षेत्र चांगल्या प्रकारे प्रस्थापित झाले आहे, असे वाटू लागले.

परंतु, दरम्यानच्या काळात पारंपरिक अभ्यासपद्धती आणि तिच्या अभ्युपगमांबद्दल नव्या भाषाभ्यासकांत चर्चा होऊ लागली. त्याआधी भाषाविज्ञानामध्ये दोन भाषांचा तौलनिक स्वरूपात अभ्यास केला जाई. भाषांचा ऐतिहासिक विकास अणि त्यांचा परस्परसंबंध महत्त्वाचा समजला जाई. ज्यामुळे बोलीतील भाषिक वैविध्य संकलित करणे आणि भौगोलिकदृष्ट्या त्यांच्यातील फरक नोंदविण्यापलीकडे पारंपरिक अभ्यास जात नसे. पारंपरिक बोलीविज्ञानाच्या या मर्यादांवर झालेल्या टीकांचा विस्तृत आढावा घेताना, या टिकांमागील कारणमीमांसा या ग्रंथात उदाहरणांसहित सांगितली आहे. ज्यामध्ये 1. भाषिक वैविध्यांचा अभ्यास करताना संबंधित भाषेच्या एकूण रचनेचा विचार न करता निष्कर्ष काढते; आणि 2. पारंपरिक बोलीविज्ञानामध्ये भूप्रदेशपरत्वे बोलींचे वर्गीकरण केले जाते. अशा वर्गीकरणात प्रत्येक बोली ही एकजिनसी-एकसंघ असल्याचे सुचविले जाते. या दोन विवेचक टीकांचा विस्तृत विमर्श केला आहे. ज्यामध्ये या आधी झालेल्या सर्वेक्षणातील निष्कर्षांच्या विश्वासार्हतेबाबत साशंकता उपस्थित करीत निवेदकांची निवड कशी करायला हवी, त्याचे वय, शिक्षण, लिंग, सामाजिक स्तर कसा असावा, या बाबत झालेल्या समाजशास्त्रातील अभ्यासकांच्या मतमतांतरांचीही दखल घेतली आहे.

‘पारंपरिक बोलीविज्ञान आणि भाषाविज्ञान’ या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या बोलीविषयक मिथ्या संकल्पनांपासून अलीकडे होत असलेल्या भाषाविज्ञानाच्या विश्लेषणाचा आधार घेत, बोलीविज्ञानानाने कशा तर्हेने प्रगती केली आहे याचा आढावा घेतला आहे. खरे तर बोली अभ्यासकांनी बोलीविज्ञानाच्या अनुषंगाने कोणत्याही स्वरूपाची मूलभूत सैद्धान्तिक मांडणी केलेली नाही. परंतु, त्यांनी संकलीत केलेल्या प्रत्यक्ष भाषिक नमुन्यांमुळे भाषाविज्ञानातील काही अमूर्त सिद्धान्त बदलावे लागले आहेत, ही बाब सर्वमान्य आहे. याचा आढावा घेत बोलींच्या सर्वेक्षणांमुळे आणि बोलीवैविध्याच्या पद्धतशीर विश्लेषणामुळे आधुनिक भाषाविज्ञानामध्ये उपयोजिल्या जाणार्या संरचनावादी, जननशील, समाजशास्त्रीय इत्यादी नवअध्ययनपद्धती बोली अभ्यासामध्येही वापरल्या जाऊ लागल्याची महत्त्वपूर्ण नोंद या प्रकरणात केली आहे.

‘यांत्रिक पद्धतीने झालेले ध्वनीपरिवर्तन निरपवाद नियमांच्या आधारे होत असते’ या नवव्याकरणकारांनी मांडलेल्या सिद्धान्ताचाही विचार सरवदेंनी काही वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणांच्या आधारे स्पष्ट केला आहे. त्यासाठी त्यांनी इंडो-युरोपियन कुलातील लॅटीन, ग्रीक, संस्कृत भाषांतील शब्दांचे तौलनिक दाखले दिले आहेत. फ्रान्सिसने सांगितलेल्या बोलीविज्ञानाच्या चार प्रवाहांची विस्ताराने चर्चा केली आहे. तसेच गॅस्टोन पॅरिस या बोलीवैज्ञानिकाचे ‘खरे पाहता बोली अस्तित्वातच नसतात. त्यामुळे बोलीमध्ये सीमा नसतात.’ या टोकाच्या विधानाचा ऊहापोह आणि स्विस बोलीवैज्ञानिक गाउश्चॅट याने बोलीसंबंधी काही खोट्या कल्पनांबद्दल केलेल्या टिपणींची विमर्शक चर्चा प्रकरणाच्या शेवटी करण्यात आली आहे.

या विवेचनाचा उत्तरार्ध म्हणून सरवदे ‘संरचनात्मक आणि जननशील बोलीविज्ञान’ या प्रकरणाची मांडणी करतात. भाषाविज्ञानामध्ये नव्याने निर्माण झालेल्या या दोन अभ्यासपद्धतींचा उपयोग बोलीविज्ञानामध्ये कशा प्रकारे केला गेला, याचा चढता आलेख प्रस्तुत प्रकरणात रेखाटण्यात आला आहे. संरचनात्मक अभ्यासपद्धतीत बोलीच्या ध्वनिव्यवस्थेचा अत्यंत बारकाईने आणि सखोल अभ्यास करण्यावर भर दिला जाई. ज्यासाठी तिला अमेरिकेत लियोनाद्र ब्लुमफिल्ड यांचा भाषेच्या ध्वनिव्यवस्थेचा आणि पदिमव्यवस्थेचा विचार दिशादर्शक ठरत होता. त्या आधारे बोलीविज्ञानही प्रत्येक बोलीची स्वतंत्र ध्वनिव्यवस्था असते, असे गृहित धरून बोलींचा अभ्यास करू लागले होते. दरम्यानच्या काळात निकोलस ट्रबेटझकार्झ याने बोलीमध्ये तीन मुख्य ध्वनीभेद असतात असा मांडलेला सिद्धान्त बोलींच्या वर्गवारीसाठी उपयुक्त ठरला होता.

याशिवाय 1959 मध्ये उरियल वेन्रिक या भाषा अभ्यासकाने ‘संरचनात्मक बोलीविज्ञान शक्य आहे का?’ अशा शीर्षकाचा एक लेख लिहून संरचनात्मक बोलीविज्ञानाच्या चर्चेला सुुरुवात केली होती. अशा अनेक घटितांच्या उलथापालथीतून संरचनात्मक बोलीविज्ञान कसे विकसित झाले याचा अत्यंत अभ्यासपूर्ण आढावा प्रकरणाच्या पूर्वार्धात घेलता आहे. ज्यामध्ये वेन्रिन, एडवर्ड स्टानकेईवझ, कॉकरन, मॉल्टोन आदी बोलीवैज्ञानिकांनी केलेल्या चिंतनाचाही ऊहापोह केला आहे. पुढे जननशील बोलीविज्ञान या उपघटकामध्ये नोम चोम्स्की यांनी प्रस्थापित केलेल्या रचनांतरनीय आणि जननशील या संकल्पनांचा विस्ताराने वेध घेतला आहे. ‘भाषेचे नियम हे जननशील असतात. ते नियम कोणताही निजभाषिक अवगत करीत असतो. हा निजभाषिक त्याच्या भाषिक क्षमतेच्या आधारे ठरविता येतो’, या चॉम्स्कीच्या मतांचा विस्ताराने ऊहापोह केला आहे. त्यासाठी मराठीतील काही स्वनिम आणि त्यांच्या वैविध्यांचा अत्यंत सुस्पष्ट उदाहरणे दिली आहेत. ज्यामुळे मराठी वाचकासाठी हा सर्व भाग समजून घेणे अतिशय सुलभ होते.

1950 नंतरच्या काळात वेन्रिकसारख्या भाषा अभ्यासकाच्या प्रयत्नांमुळे भाषाविज्ञान आणि बोलीविज्ञान यांचा अपेक्षित समन्वय झाल्याचे पहावयास मिळते. ज्यातून पुढे नव्याने निर्माण झालेल्या ‘संरचनात्मक बोलीविज्ञान’ आणि ‘जननशील बोलीविज्ञान’ या ज्ञानशाखांसह ‘शहरी बोलीविज्ञान’ ही ज्ञानशाखाही निर्माण झाली होती. सरवदेंनी या ज्ञानशाखेचा विचार करण्यासाठी ‘सामाजिक आणि शहरी बोलीविज्ञान’ या स्वतंत्र प्रकरणाची निर्मिती केली आहे. ज्यातून बोली अभ्यासाच्या एका नव्या सूसूत्र पद्धतिशास्त्राची ओळख होते.

1950 नंतर काही सामाजिक बाबींचा जसे, भाषकाचा सामाजिक, आर्थिक वर्ग, लिंग, शिक्षण इत्यादींचा विचार करून बोलींतील वैविध्ये स्पष्ट केली जाऊ लागली. ज्याची सुुरुवात जी. एन. पूतनर आणि ई. एम. ओर्हेन यांच्या सर्वेक्षणातून झाली. त्यांनी 1955 मध्ये वॉशिंग्टन शहरातील झोपडपट्टीतील कनिष्ठ वर्गीय निग्रोंच्या बोलींचे संकलन केले. यासाठी त्यांनी टेपरेकॉर्डचा उपयोग केला. तसेच निग्रो निवेदकांना एका धर्मकथेचे त्यांच्या भाषेत निवेदन करण्यास लावले. या निवेदनांचे इतर 70 लोकांकडून परिक्षण करून घेतले. या अभ्यासामध्ये काही त्रुटी असल्या तरी शहरी-सामाजिक बोली अभ्यासाची मुहूर्तमेढ या द्वयींच्या अभ्यासाने झाली होती.

दरम्यानच्या काळात अमेरिकेमध्ये विल्यम लबोव याने मार्थांझ व्हेनयार्ड या बेटावर वास्तव्यास असणारे मूळ अमेरिकन, इंग्लंडमधून आणि पोर्तुगालमधून विस्थापित होऊन या भागात स्थायिक झालेले लोक आणि उन्हाळ्यात या भागात पर्यटनानिमित्त येणारे लोक, या तीन समूहांच्या बोलीचा विचार करून भाषिक वैविध्ये नोंदविली होती. त्यासाठी त्याने 69 ध्वनीमुद्रित मुलाखतींचे कोष्टकांच्या आधारे सांख्यिकी विश्लेषण केले होते. तर पुढच्या अभ्यासासाठी न्यूयार्क शहरातील लोकांच्याकडून ‘र’ या व्यंजनाचे उच्चारण आणि त्यांच्याशी संबंधित सामाजिक बाबी यांचा परस्परांशी कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्याने या सर्वेक्षणासाठी डिपार्टमेंटल स्टोअरचाही आधार घेतला होता. तर पीटर ट्रॅजिल सारख्या अभ्यासकाने न्यूयार्कच्या तुलनेत शहरीकरण न झालेल्या नॉर्विक या निमशहराला केंद्रवर्ती ठेऊन बोली अभ्यासावर केलेले संशोधनही शहरी बोलीविज्ञानाच्या अभिवृद्धीसाठी महत्त्वाचे ठरले होेते. या सगळ्याचे साधार विवेचन या प्रकरणात केले आहे.

समाजामध्ये दोन भिन्न वर्गांकडून वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरली जाते, हे विधान बोली अभ्यासकांत सर्वमान्य आहे. परंतु, असे होत असताना कोणत्या भाषिक बाबी वेगळ्या असतात आणि त्यांचे प्रमाण कशा स्वरूपात असते, याबद्दल मात्र म्हणावी तशी गांभीर्यपूर्ण चर्चा बोली अभ्यासात होत नव्हती. अमेरिकेतील लबोव आणि इंग्लडमध्ये ट्रजिल यांनी अशा स्वरूपाचा अभ्यास करून बोलीविज्ञानामध्ये मोलाची भर घातलेली. ज्यामुळे बोलीविज्ञानात मूलभूत चिंतन होण्यासाठी पूरक मळवाट तयार होण्यास मदत झालेली. ‘भाषा आणि सामाजिक भेद’ या प्रकरणात याबाबतचा विस्ताराने विचार केला आहे. बोलीवैविध्य आणि भाषावापरशैली, बोलीवैविध्य आणि जात, बोलीवैविध्य आणि लिंगभेद, बोलीवैविध्य आणि वंशभेद अशा शीर्षकांतर्गंत सामाजिक बाबींचा आणि बोलीचा सहसंंबंध स्पष्ट केला आहे.

प्रस्तुत ग्रंथाच्या उत्तरार्धाकडे वळताना ‘बोली अभ्यासाच्या नव्या दिशा’ या प्रकरणात नव्याने येऊ घातलेल्या बोली अभ्यासाच्या पद्धतिशास्त्राचा परिचय करून दिला आहे. ज्यामध्ये ‘सीमावर्ती-बोलीअभ्यास’, ‘नवबोली निर्मिती अभ्यास’, ‘विस्थापितांच्या बोलीचा अभ्यास’ (भूप्रदेशबाह्य बोलीचा अभ्यास) इत्यादी अभ्यासपद्धतींचा सांगोपांग वेध घेतला आहे. ज्यामध्ये त्यांनी जगभरातील भाषिक समूहांचा उदाहरणांदाखल आधार घेतला आहे. आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण, जागतिकीकरण आणि शहरीकरण इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात आज ‘विस्थापन’ होत आहे.

अशा विस्थापनाचा भाषिक दृष्टिकोनातून विचार केला असता काही नवे निष्कर्ष बोली अभ्यासकांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. विस्थापित आपली स्वत:ची बोली जतन करतील (ङरपर्सीरसश ारळपींरपलश) किंवा त्यामध्ये काही परिवर्तन घडवून आणतील किंवा त्यांच्या बोलीचा विनियोग थांबवून संबंधित ठिकाणच्या बोलीचा स्वीकार करतील, या दृष्टीने काही प्रश्न उपस्थित करून बोलींचे अभ्यास होणे गरजेचे आहे, असे महत्त्वाचे मत प्रकरणाच्या शेवटी सरवदे मांडतात. खरे तर मराठीसह भारतीय भाषांमध्ये अशा अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे.

‘बोलीविज्ञान’ ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणामध्ये सरवदेंनी भारतातील बोली अभ्यास प्रकल्पांचा विचार केला आहे. ज्यामध्ये लहानसहान प्रकल्पांचा विचार करणे अशक्य असल्याने चार मोठ्या प्रातिनिधिक प्रकल्पांचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सुरुवातीसच नोंदविले आहे. ज्यामध्ये ग्रिअर्सन यांचा ‘भारतीय भाषा सर्वेक्षण प्रकल्प’, ए. एम. घाटगे यांचे ‘मराठीचे बोली सर्वेक्षण’, राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेला ‘महाराष्ट्राचा भाषिक नकाशा’ हा प्रकल्प आणि गणेश देवी यांचा ‘भारतीय भाषांचेलोकसर्वेक्षण’ इत्यादीचा समावेश केलेला आहे. पाश्चिमात्य देशातील बोली अभ्यास आणि त्यासाठी वापरलेल्या पद्धती यांचा अनुषंगिक विचार करीत, भारतातील बोली अभ्यासामध्ये फार मोठ्या कमतरता राहिल्या असल्याची खंत सरवदेंनी नोंदविली आहे.

भाषानिहाय प्रांतरचना होऊनही संबंधित राज्यांमध्ये त्या-त्या राज्यांतील भाषांचा गांभिर्याने आणि पद्धतशीरपणे अभ्यास झाला नसल्याचे ते म्हणतात. येणार्या काळात असे पद्धतशीर, शास्त्रशुद्ध भाषांचे बोलींचे अभ्यास झाले तरच भारतीय भाषांना भवितव्य असणार आहे, अशा अपेक्षेन ते ग्रंथाचा शेवट करतात. थोडक्यात, बोलीविज्ञानासारखी अतिशय महत्त्वाची अभ्यासपद्धती अत्यंत सोप्या, सुलभ आणि ओघवत्या शैलीत सरवदे यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांपुढे उलगडली आहे.

बोलीविज्ञानावर मराठीमध्ये संदर्भांसह लिहिलेले हे पहिले पुस्तक आहे. मराठीतील सामान्य वाचकांचा विचार करून अत्यंत सोप्या, सुलभ रीतीने या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. त्यामुळे भाषा आणि भाषाभ्यासाची आवड असलेल्या प्रत्येकाला हे पुस्तक वाचनीय वाटू शकते. ‘बोलीविज्ञान’ या अभ्यास शाखेचा विकासक्रम आणि अभ्यासपद्धतीचे शास्त्र सांगणे, या हेतूने प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती केली आहे. तरी त्या अनुषंगाने सैद्धान्तिक विवेचन करत असताना सरवदेंनी कुठेही पारिभाषिक शब्दांची जंत्री दिलेली नाही. जिथे कुठे अतिशय निकड असेल अशाच ठिकाणी शक्य तितक्या पारभिाषिक शब्दांचा, संज्ञांचा वापर केला आहे. किस्सेवजा कथनपद्धतीचा अवलंब करीत बोलीविज्ञानातील गुंतागुंतीच्या सिद्धान्तनाचे अतिशय ऋजू शब्दात केले आहे.

बोली अभ्यासाशी निगडीत विविध अभ्यासपद्धती, संकल्पना आणि पाश्चात्त्य देशातील अभ्यासक मराठी वाचकांना अपरिचित असण्याची शक्यता गृहित धरून ग्रंथाच्या शेवटी दोन परिशिष्टांची योजना केली आहे. ज्यामध्ये पहिल्या ‘अभ्यासक’ या परिशिष्टामध्ये संबंधित अभ्यासकांच्या एकूण कार्याचा थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे. तर दुसर्या ‘पारिभाषिक शब्द’ या परिशिष्टामध्ये पारिभाषिक शब्द, अभ्यासपद्धती इत्यादींविषयी सारांशरूपाने माहिती देण्यात आली आहे. याशिवाय सरतेशेवटी संदर्भग्रंथाची विस्तृत यादी देणारे परिशिष्टही जोडण्यात आले आहे.

अशाप्रकारे प्रस्तुत ग्रंथाच्या अंतरंगाचे स्वरूप आहे. ज्यामध्ये गरजेनुसार आकृत्या, कोष्टके, चिन्हे इत्यादींचा नेमका आणि सुबक वापर करण्यात आला आहे. छापाई, अक्षरजुळणी (लेआऊट) इत्यादीबाबतही प्रस्तुत ग्रंथ अतिशय देखणा आणि शास्त्रशुद्ध स्वरूपात बनविला आहे. ग्रंथाचे बहिरंगही अंतरंगाइतकेच देखणे आणि मूल्ययुक्त आहे. मराठीतील भाषा अभ्यासामध्ये प्रस्तुत ग्रंथाची उपयुक्तता सांगणारा ब्लर्ब डॉ. नंदकुमार मोरे यांनी लिहिला आहे.

तर गणेश विसपुतेंनी ग्रंथाच्या शीर्षकाचे सुलेखन व मुखपृष्ठाची निर्मिती अत्यंत कलात्मक रीतीने केली आहे. छपराच्या सारवलेल्या कुडावरील पोताचे छायाचित्र मुखपृष्ठासाठी योजण्यात आले आहे. जे ग्रंथाच्या विषयविवेचनाशी अंतरीक स्तरावर जोडले गेले आहे. याशिवाय ग्रंथात आलेली निरनिराळ्या पाश्चात्य भाषावैज्ञानिकांची आणि बोलीवैज्ञानिकांची नावे योजकतेने मुखपृष्ठावर देण्यात आली आहेत.

मराठीतील भाषा अभ्यासामध्ये बोलीच्या पद्धतशीर अभ्यासाबाबत असलेली पोकळी भरून काढण्याचे सामर्थ्य निश्चित ‘बोलीविज्ञान’ या ग्रंथात आहे. प्रस्तुत ग्रंथामुळे मराठीतील भाषाविज्ञानाचे आकलन करून घेणे अभ्यासकांसाठी सोपे जाणार आहे. आगामी काळात मराठीमध्ये बोली अभ्यासाची नवी दृष्टी रुजण्यासाठी हा ग्रंथ निश्चित दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.

पुस्तकाचे नावः बोलीविज्ञान
लेखकः औदुंबर सरवदे
प्रकाशक : भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
प्रथमावृत्ती : जून 2020
पृष्ठे : 224
मूल्य – 280 रुपये

पुस्तकासाठी संपर्क : 7385588335


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Navratri Theme : जैवविविधतेतील हिरवी छटा

अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा अर्थायनमधून आढावा

आळसंद ला सोमवारी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading