July 27, 2024
ajay-purkar-interview-on-recorded-pu-la-deshpande-stories
Home » पुलंची प्रतिभा, मिश्किलपणा समोर ठेवूनच त्यांच्या कथांचे ध्वनिमुद्रित – अजय पुरकर
गप्पा-टप्पा

पुलंची प्रतिभा, मिश्किलपणा समोर ठेवूनच त्यांच्या कथांचे ध्वनिमुद्रित – अजय पुरकर

माझ्या आई-वडिलांचा वाचन छंद ‘स्टोरीटेल’मुळे जोपासला गेलाय!

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करून घराघरात लोकप्रिय असलेले आजचे आघाडीचे कलावंत आणि अभ्यासू नट गायक अजय पुरकर यांनी स्टोरीटेलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि प्रख्यात लेखक पुल देशपांडे यांच्या कथांचे ‘ऑडीओ बुक्स’ रेकॉर्ड करून त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. स्टोरीटेलसाठी ऑडीओ बुक्स ध्वनिमुद्रित करण्याचा त्यांचा हा अनुभव नेमका कसा होता याबद्दल खास त्यांच्याच शब्दात वाचा…

प्रश्नः पुलंचे साहित्य ध्वनिमुद्रीत करण्यासंदर्भात तुम्हाला स्टोरीटेलतर्फे विनंती केल्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती?

अजय पुरकर : आम्हा सगळ्या कलाकारांवर स्टोरीटेलचं खूप प्रेम आहे. साक्षात पुल देशपांडे यांचे लिखाण वाचण्यासाठी स्टोरीटेल आणि पुलंचे सर्वेसर्वा असलेले ज्योती ठाकूर आणि दिनेश ठाकूर यांनी विनंती केली, मला वाटते ही विनंती न स्वीकारण्याचे काही कारणच नव्हते. पुलंचे साहित्य आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित करणं हा एक सन्मान मिळविण्यासारखीच बाब म्हणता येईल. मी असं सांगेन की पु.ल. देशपांडे ही एक संस्कृती आहे. आणि ही संस्कृती संस्कारक्षम वयात केली गेली पाहिजे. माझ्या आई-वडिलांमुळे माझ्यावर हा संस्कार माझ्या बालपणात झाला आहे. त्यामुळे पुलंचं लिखाण किंवा त्यांचे कथाकथन हे खूप लहानपणापासून कानावरती होतं. त्यामुळे एकतर मला खूप आनंद वाटला की मी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी आज स्टोरीटेलसाठी रेकॉर्ड करतोय. हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, आनंदाचा होता.

प्रश्नः स्टोरीटेलसाठी अनेक नामवंत कलावंतानी ऑडीओ बुक्स रेकॉर्ड केली आहेत, तुमचा अनुभव कसा होता?

अजय पुरकर : अत्यंत उत्तम. स्टोरीटेलची क्रियेटीव्ह टीम खूप अभ्यासू आहे. त्यांनी फार उत्तमरीत्या साहित्यिक आणि साहित्यकृतींचे विभाजन केलंय. कोण काय वाचेल याचे त्यांचे नियोजन वाखाणण्यासारखे आहे. ज्योती ठाकूर आणि दिनेश ठाकूर यांनी पुलंचे काही विनोदी लेख माझ्यासाठी वेगळे काढून ठेवले होते. या दोघांचं माझ्या गाण्यावर देखील खूप प्रेम आहे. पु. ल. देशपांडे हे स्वतः अष्टपैलू कलावंत होते. कथाकथनकार, लेखक, संगीतदिग्दर्शक, गायक, अभिनेता, दिग्दर्शक तर होतेच त्यासोबत ते नाट्यदिग्दर्शक देखील होते. एकपात्री कार्यक्रम सादर करण्यातले त्यांचे कौशल्य अबाधित आहे. पुलंच्या नंतर प्रदीर्घ काळ त्यांच्यासारखी व्यक्ती झाली नाही. नजीकच्या काळात प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे यांनी ‘वराड निघालय लंडन’ला हा एकपात्री कार्यक्रम करून त्यांची आठवण करून देण्याचा अनोखा प्रयत्न केला. अशा माणसाचं लेखन आपण स्टोरीटेल सारख्या माध्यमातून वाचणार आहोत ही खरच मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं.

प्रश्न: अष्टपैलू कलावंत असलेल्या पुलंच्या लिखाणातील भावबंध ध्वनिमुद्रित करताना, तुमच्या मनात कोणते भाव होते? त्या क्षणाचा तुम्ही कसा आनंद घेतला ?

अजय पुरकर : मी पुलंच्या कथांचे ध्वनिमुद्रण करत आसनात मनात एक गोष्ट होती आणि ती म्हणजे मी पुलंसारखं सादरीकरण करू शकत नाही, पण त्यांनी जे लिहून ठेवले आहे ते अत्यंत उत्तमरीत्या लोकांपर्यंत कसे पोहचविता येईल याचा विचार करून मी हे ध्वनिमुद्रण केले आहे. एकपात्री प्रयोगातून अनेक पात्रे एकटे पुल रसिकांसमोर उभी करायचे. आपण त्यांचे कथाकथन डोळे मिटून ऐकले तर आपल्याला वाटते की अनेक पात्रे स्टेजवरती आहेत कि काय. त्यांचे हेच वैशिष्ट्ये डोक्यात ठेवून मी ध्वनिमुद्रण केलं आहे. स्टोरीटेल हे ऑडिओ माध्यम असल्याने ऑडीओ बुक्स ऐकताना श्रोत्यांना काही दृश्य दिसणार नाहीये, या गोष्टीचा विचार करून कथा ध्वनिमुद्रित करताना जे भाव अपेक्षित होते त्यांचा विचार करून स्वतः अगोदर मी या सर्व कथा वाचून, कुठे कुठे, काय काय, कसे कसे भाव बदलता येतील हे जाणून त्याप्रमाणे मी त्या कथा रेकॉर्ड करत गेलो. पुलंची ही ऑडिओ बुक्स ऐकताना सगळ्यात मोठी गंमत म्हणजे की ती कितीही वेळा वाचली, ऐकली, पाहिली आणि कुठल्याही पानावरून किंवा कुठल्याही सीनवरून किंवा कुठल्याही गोष्टीवरून आपण पुढे गेलो तरी आपल्याला ते तितकच आनंद देत राहणार आहे.

ajay-purkar-interview-on-recorded-pu-la-deshpande-stories

प्रश्नः बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या पुलंनी कथाकथनातून रसिकांवर मोहिनी घातलेली आहे, स्टोरिटेल ऑडिओ बुक्स मधील त्यांच्या कथा ध्वनिमुद्रित करताना पुलंचा कोणता गुण – स्वभाव डोळ्यासमोर होता ?

अजय पुरकर : पुलंचा स्वभाव डोळ्यासमोर होता. म्हणजे एकतर पुलंचा चेहरा जरी आपण कुठेही बघितला किंवा आत्ता सुद्धा बोलताना माझ्या डोळ्यासमोर जेव्हा पुलंचा चेहरा येतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती दोन गोष्टी अत्यंत प्रकर्षाने दिसतात त्या म्हणजे त्यांची प्रतिभा आणि मिश्किलपणा. त्यांनी ज्या प्रतिभेनं हे लिहिलेलं आहे, त्या प्रतिभेने आपण ते सादर करू शकू का? ऑडिओ माध्यमातून, हे सारखं डोक्यात होतं माझ्या. थोडक्यात सांगायचं तर कुठलीही गोष्ट वाचताना कुठल्याही कलाकाराबद्दल जे त्यांनी लिहिलेलं आहे. आता त्यांचा जो लेख आहे की डॉ. वसंतराव देशपांडे तर वसंतराव त्यांना जसे दिसले तसेच मी माझ्या वाचनातन लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत हे सारखं माझ्या डोक्यात होतं आणि मी त्या त्याचा प्रयत्न करून मी हे सगळं ध्वनीमुद्रित केलेलं आहे.

प्रश्नः आपल्या व्यस्त दिनक्रमात कामाव्यतिरिक्त अवांतर वाचन करण्यासाठी / ऐकण्यासाठी वेळ मिळतो का? तुमच्या वाचन प्रवासाबद्दल काय सांगाल?

अजय पुरकर : मी कितीही व्यस्त असलो, दमलो थकलो असलो तरी रात्री झोपताना कोणत्याही पुस्तकातील एखादी गोष्ठ – प्रकरण वाचल्याशिवाय मला शांत झोप येत नाही. त्यामुळे माझं अवांतर वाचन हे होत राहतं. माझं स्वतःच एक स्वतंत्र पुस्तकांचं कपाट आहे. आपली वाचन संस्कृती हळूहळू संपत चाललेली आहे. व्हिजुअल मिडीयमकडे लोक जास्त जातात आणि मला असं वाटतं ‘स्टोरीटेल’सुद्धा त्याच्यामुळे आलंय. पूर्वी माणसं आपल्या बॅगमध्ये एखादं पुस्तक ठेवून फिरत. तो एक काळ आता निघून गेलाय. पण मी अजूनही तसं करतोय. माझ्याबॅगमध्ये एखाद दुसरी पुस्तके असतातच. जसा वेळ मिळतो, तसं माझं वाचन होत राहत. मी सांगेन सर्वांनी जरूर वाचायला हवं, रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं का होईना पण नक्की वाचावं. त्यामुळे वाचन संस्कृती जपली जाईल आणि तुम्हाला वाचताना पाहून घरातील इतरांनाही ती सवय लागून आपली वाचन संस्कृती पुढेटिकून राहण्यास थोडीफार मदत मिळेल.

प्रश्नः तुमच्या मते ‘ऑडिओ बुक’ हे एक माध्यम कसं आहे?

अजय पुरकर : आज सगळ्यात मोठ व्हिजुअल माध्यम असल तरी स्टोरीटेल सारख्या संकल्पनेचं मला कौतुकच वाटत, गाडी चालवत असताना सुद्धा स्टोरिटेलवरील ऑडीओ बुक्स मी ऐकलेली आहेत. जे मला ऐकायचं असतं ते मी कायम गाडी चालवताना ऐकतो. आपण ऑडीओ बुक्स ऐकतानाही त्या कथेत तितकेच रमतो. सो हेडफोन्स लावून तुम्ही ते ऐकू शकता, आणि त्यासोबत अन्य कामेही करू शकतो. मला वाटतं ही स्टोरीटेलची सर्वात मोठी उपलब्धी आहे. आणि म्हणूनच स्टोरीटेल आज बऱ्यापैकी लोकप्रिय असून लोक ते ऐकतात. मुद्दामून सांगायची गोष्ट अशी की माझ्या आई-वडिलांना वाचण्याचा खूपच छंद होता, अजूनही आहे. आता माझे वडील जवळ 78 वर्षाचे आहेत आणि वयोमाना परतवे दुर्दैवाने त्यांची दृष्टी कमी झाली. म्हणून आम्ही त्यांना स्टोरीटेल ऐप घेऊन दिले आहे. हेडफोन्स लावून त्यांच्या आवडीच्या साहित्याचा दिवसभर ते आनंद घेत असतात. जे तरुणपणी खूप वाचत होते पण आता दृष्टी अधू झाल्याने वाचता येत नाही, त्या लोकांसाठी स्टोरीटेल ॲप वरदान म्हणता येईल. हे उदाहरण माझ्या स्वतःच्या घरात आहे आणि म्हणून मी स्टोरीटेलला धन्यवाद देऊ इच्छितो.

प्रश्नः पहिलं ऑडीओ बुक रेकॉर्ड करण्याचा अनुभव कसा होता ? त्यासाठी होमवर्क करावा लागला का?

अजय पुरकर : अत्यंत वेगळा आणि संस्मरणीय. पहिलं पुस्तक रेकॉर्ड करण्याआधी मी अभ्यास म्हणून आधी रेकॉर्ड झालेली पुस्तके वाचली. नंतर त्यांची ऑडीओ बुक्स ऐकली. माझे आवडते कलाकार ज्यांची व्हाईस कॉलिटी खूप चांगली आहे त्यांनी केलेली ऑडिओ बुक्स मुद्दामहून मी ऐकली. मी जरी अभिनेता असलो तरी वाचन किंवा वाचिक अभिनय हा एक वेगळा प्रकार आहे. सगळ्या लोकांचं थोडं थोडं ऐकून मी शिकत गेलो. प्रत्येक कथा ध्वनिमुद्रित करताना काय फरक केला पाहिजे, आपण स्वतः जेव्हा पुस्तक वाचतो आणि एक काही हजार लोक एकाचवेळी ते ऐकत असतील तर त्यांच्या मनामध्ये काय भाव निर्माण झाले पाहिजेत? त्यांना पूर्ण गोष्ट समजतेय ना? या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि मग पहिलं पुस्तक ध्वनिमुद्रित करायला घेतलं. मी मघाशी म्हटलं तसं स्टोरीटेल हे माध्यम उत्तम आहे. जे उत्तम वाचू शकतात अशा कलावंतांनी वाचणं ही गरज आहे. आपला सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला कळवा यासाठी वाचन संस्कृती जपली पाहिजे. आज आपली मुले वाचत नाहीत ही वस्तुस्थिती लक्षात घेवून, निदान गोष्ट सांगताय का, मग ती कोण सांगतंय, अजय पुरकर सांगतात की आणखी कोणी? त्यानिमित्ताने का होईना लोक ऐकतील हे अधिक महत्वाचे आहे. खूप वेगळा आणि अत्यंत उत्तम असा मार्ग स्टोरीटेलने निवडलाय, अनेक लोकप्रिय कलाकारांना घेऊन केलेली ऑडिओ बुक्स रसिक श्रोते नक्कीच ऐकतील. हा प्रवास खूप छान आणि आनंद देणारा होता.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रेवड्यांचा वर्षाव

आत्म्याच्या अनुभुतीसाठी दृढ निश्चयाने ध्यान करावे

अनाथांची माय…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading