October 26, 2025
"Cover of Mayboli Rang Kathanche – a collection of rare and curated Marathi short stories by authors across Maharashtra"
Home » दुर्मीळ शब्दांचं कथाबीज : मायबोली रंग कथांचे…
मुक्त संवाद

दुर्मीळ शब्दांचं कथाबीज : मायबोली रंग कथांचे…

एकंदरीत हा संग्रह दमदार आणि वजनदार असा झाला आहे आणि मायमराठीचा अभिमान बाळगणाऱ्या वाचकांनी संग्रहित ठेवावा इनका अनमोल आहे. म्हणूनच सह्याद्रीसम एवढ्या दांडग्या चिरस्मरणीय बहुमोल साहित्य पेरणी आणि जोमानं उगवणी कार्यासाठी झटणारे समस्त कथालेखक, संपादक आणि प्रकाशक यांना आभाळभर शुभेच्छा !

रवींद्र शिवाजी गुरव

चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या निवडक साहित्यिकांच्या लेखणीतून नीटवाट केलेलं दाणेदार दुर्मीळ शब्दांचं कथाबीज म्हणजे ‘मायबोली रंग कथांचे…’ हा कथासंग्रह होय. शब्दान्वय प्रकाशन, मुंबई यांनी दर्जेदार स्वरूपात प्रकाशित केलेला हा कथासंग्रह साहित्यिक मित्र सचिन वसंत पाटील यांनी अत्यंत बारकाव्यानिशी काम करून संपादित केला आहे.

वारली चित्रकलेचं साजेसं देखणंपान कल्पक मुखपृष्ठ घेऊन मिरवणारा हा संग्रह मनात भरतो. मुखपृष्ठापासून ते डाॅ. संदीप सांगळे यांच्या मलपृष्ठावरील पाठराखणीपर्यंत वाचनीय आणि आवर्जून संग्रही ठेवावा असा बावनकशी साहित्य ऐवज झाला आहे. मायमराठी बोलीतील राज्याच्या विविध भागातील बावीस सकस कथांचा समावेश या कथासंग्रहामध्ये आहे. सात स्त्री लेखिका आणि पंधरा पुरुष लेखकांच्या लेखणीतून या सकस कथा साकारल्या आहेत. नवखेपणाच्या खुणा पुसत तसेच मुरलेल्या साहित्यिकांच्या लेखणीतून उतरत विविध भागातील मराठी बोली भाषा जतन करून ठेवण्याचं अनमोल कार्य या कथा करतात.

‘पाडा’कार अशोक कौतिक कोळी यांची ‘डफडं’ ही कथा तावडी बोली भाषेमधून कोरोनासारख्या महामारीत गावातील आठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदारांची उपासमार ठळक करते. वाचकाला ही कथा विविध भागातील कथांच्या प्रवासासाठी बोली भाषेच्या माध्यमातून पुढं घेऊन जाते. ती अगदी संपादनाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेल्या सचिन वसंत पाटील यांच्या शिवीशिवाय पाणी न पिणाऱ्या मर्दानी कोल्हापुरी बोलीतील पुष्पाआक्काच्या झणझणीत बोलण्यातील ‘उमाळा’पर्यंत.

सुरुवातीला बावीस कथांतील बोलीवर आधारित पाटील यांचे विस्तृत संपादकीय अभ्यासू असे आहे. बोली भाषेचा वापर, तिची प्रादेशिकता, बोलीवर होणारी इतर भाषांची आक्रमणे आणि बोली भाषांची सद्यस्थिती यावर केलेला उहापोह वाचनीय असा आहे.

या कथासंग्रहामध्ये मालवणी बोलीतील ‘मातयेचो लळो’, कडकडीत जालनीतील ‘कुबदा’, गोंडी भागातील ‘भूक’, पावरा बोलीतील ‘धोंडी, दख्खनी दणका ‘उजाले की ईद’, आदिवासी पावरा मधील ‘इंद्रधनुष्य नी एकलव्य धनुष्य’, माणदेशी माणसांची ‘आठवण’, महानगरीतील भेळमिसळ ‘गिरीजा’, वर्‍हाडी तडका ‘दगुड’, दुर्मीळ पोवारी’ बंधे मुठ की ताकद’, वारसा जपणारी नगरी ‘कुजबुजणाऱ्या भिंती’, कडक मराठवाडी’ देवकी’, ताल लहेजा जपणारी अहिराणी ‘लाखीपुनी’, नाट्यपरंपरा असलेली झाडीबोली ‘इब्लिस’, आगळीवेगळी आगरी ‘टिटवी’, आदीवासी परंपरा जपणारी तडवी भिल ‘बोरखेडाची येस्टी’, काळजाजवळची चंदगडी ‘म्हाळ आणि मोबाईल’, झिपऱ्या, बिन बापाची लेक अशा एकापेक्षा एक सरस कथा मालवणी, जालनी, गोंडी, बंजारा, दख्खनी, पावरा, माणदेशी माणसांची माणदेशी, व्हटाव रुळणारी चकचकीत महानगरीय, वऱ्हाडी, पोवारी नगरी, मराठवाडी, अहिराणी, झाडी, आगरी, सोलापुरी, भिलाऊ, लेवा बोली म्हणता – म्हणता त्यांच्या सोबत विविध प्रदेशातून हिंडता-हिंडता न दमता तळ कोकणात चंदगडी बोलीची कडकडून गाठभेट घेते. जीव हरकुन जातो. काय वाचू आणि काय नगो असं हून जातं. ज्या त्या भागातील बोलीतील चिक्कार, मायंदळ, रग्गड अस्सल शब्दभांडार, वाक्प्रचार आणि म्हणी कवेत घेऊनच हा मायबोली कथा बीज असणारा संग्रह अंगभर मिरवतो.

मजबूत बांधणी आणि सुबक छपाईमुळेही हा कथासंग्रह बोलीभाषे इतकाच मनात रुतून बसतो. प्रत्येक कथेच्या खाली दिलेली शब्दसूची वाचकाला ज्या त्या भागातील बोलीभाषेतील शब्दांचा अर्थ लावण्यास मदत करते. कथा समजत जाते. सुख दुःखाची कावड भरून आणते. कधी हसवते तर कधी रडवते. प्रचंड वाचनीयता आणि अस्सल कथांची निवड हेही एक वैशिष्ट्यच. शेवटी दिलेला कथा लेखक आणि लेखिकांचा परिचयही हा संग्रह समृद्ध करतो. संदर्भ ग्रंथाशिवाय हे काम तडीस जाणं तसं अवघडच. त्या समस्त संदर्भ ग्रंथांची सूची ही इथं नामोल्लेखासह मदतीला धावते. इतकंच नाही तर हा संग्रह मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल कौतुक करत तिच्या संवर्धनाची आणि संगोपनाची गरज सजगपणे व्यक्त करतो ते कविवर्य सुरेश भटांना स्मरत…

‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…’
असं अभिमानानं म्हणत… गुणगुणत…
एकंदरीत हा संग्रह दमदार आणि वजनदार असा झाला आहे आणि मायमराठीचा अभिमान बाळगणाऱ्या वाचकांनी संग्रहित ठेवावा इनका अनमोल आहे. म्हणूनच सह्याद्रीसम एवढ्या दांडग्या चिरस्मरणीय बहुमोल साहित्य पेरणी आणि जोमानं उगवणी कार्यासाठी झटणारे समस्त कथालेखक, संपादक आणि प्रकाशक यांना आभाळभर शुभेच्छा !

कथासंग्रह – ‘मायबोली रंग कथांचे….
संपादक – सचिन वसंत पाटील
प्रकाशन – शब्दान्वय प्रकाशन, मुंबई.
पृष्ठे – १८८, मूल्य- ३०० ₹
संपर्क: 8275377049


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading