आधुनिक तंत्रज्ञान मराठीमध्ये यायला हवे तरच मराठी भाषेचा प्रसार, प्रचार अन् संवर्धन होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कोल्हापूर येथील वर्डप्रेस व्यावसायिक मकरंद माने, आदित्य चौगुले, डॉ. जयदीप पाटील, प्रिमांशु मंजीरमालिनी, तुषार वेसनेकर यांनी वर्डप्रेसचे मराठी व्हर्जन तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयोगाबाबत मकरंद माने यांच्याशी केलेली बातचित…
प्रश्न – वर्डप्रेसच्या वेबसाईटचे मराठी व्हर्जन नेमके काय आहे ?
मकरंद माने – वर्डप्रेस फाऊंडेशनकडून स्थानिक भाषात वर्डप्रेसची निर्मिती करण्यासाठी एक चळवळ उभी केली होती. त्यामध्ये सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यावेळी ४.८ हे व्हर्जन सुरू होते. हे व्हर्जन मराठीत करण्यासाठी वर्डप्रेसने वर्डप्रेस भाषांतर दिवसाचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने भारतातील अनेक भाषामध्ये वर्डप्रेसचे भाषांतर होण्यास प्रोत्साहन मिळाले. मराठीमध्ये भाषांतराचे ८० टक्के काम हे कोल्हापूरमधून झाले. कोल्हापूर येथून मी व आदित्य चौगुले, डॉ. जयदीप पाटील, प्रिमांशु मंजीरमालिनी, तुषार वेसनेकर मिळून काही स्ट्रींग्ज मराठीमध्ये भाषांतरीत केल्या आणि मराठीतील ४.८ हे व्हर्जन प्रथम प्रकाशित करण्यात आले.
प्रश्न – मराठी व्हर्जन नेमके आहे तरी काय ?
मकरंद माने – वर्डप्रेसचा जेंव्हा तुम्ही वापरता, अर्थात तुम्ही इन्स्टॉल करता, तेंव्हा वापरण्यासाठीची जी भाषा आहे ती मराठीमध्ये असते. डॅशबोर्डची मेनु आहेत ते मराठीमध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे लॉगिन की पासून ते वर्डप्रेसच्या डॅशबोर्डपर्यंत सर्व काही मराठीमध्ये उपलब्ध होते.
प्रश्न – मराठी व्हर्जन तयार करताना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या ?
मकरंद माने – याचे काम कसे चालते हे प्रथम समजून घ्यायला हवे. मराठीमधील स्ट्रींग्ज वर्डप्रेसकडे पाठवल्या जातात. हे भाषांतरील केलेले काम संपादकांचा एक गट तपासून पाहातो अन् मग त्याला संमती दिली जाते. हे काम सुरू होते तेंव्हा संपर्काची माध्यमेही नव्हती. त्यामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या व्यक्ती एकाच वेळी काय करत आहेत हे समजत नव्हते. हे एक मोठे आव्हान होते. सध्या संपर्काची माध्यमे विकसित झाल्याने यातील अडचणी आता दुर झाल्या आहेत. संपादकांनी नाकारलेली स्ट्रींग कोणती आहे किंवा त्यात नेमके काय चुकले आहे याबद्दल कमेंट टाकून विचारता येते.
प्रश्न – मराठीमध्ये केल्याचा नेमका काय फायदा आहे ?
मकरंद माने – मराठीचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याला यातून प्रोत्साहन मिळू शकेल. मराठी शाळा, माध्यमे आहेत ते हे मराठी भाषेतील व्हर्जन वापरू शकतात. भाषेमुळे येत असलेल्या अडचणीवर यातून मात करता येऊ शकेल. स्थानिक पातळीवर याचा वापर अगदी सहजरित्या करता येऊ शकेल. यामध्ये वर्डप्रेसलाही फायदा होऊ शकतो. भाषांतरामध्ये झालेल्या चुकांबद्दल ते सांगू शकतात. यामुळे मराठीतील व्हर्जन अधिक चांगले होऊ शकेल. उदाहरणादाखल सेव्ह या शब्दासाठी कोणता शब्द वापरायला हवा ? सहजासहजी न समजणारे शब्द वापरायला हवेत की बोली भाषेतील शब्द वापरायला हवेत. यावर वापरकर्ते सुचना करू शकतात. अर्थात मराठीतील साहित्यिकांनी, मराठी प्रेमींनी याचा वापर करायला हवा.
प्रश्न – मराठी व्हर्जनच्या सध्यस्थितीबद्दल…
मकरंद माने – वर्डप्रेसची चारपाच व्हर्जन मराठीमध्ये उपलब्ध आहेत. ६.८ हे नवे व्हर्जनही मराठीमध्ये उपलब्ध आहे.
११ व १२ जानेवारी २०२५ दरम्यान कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कुल ऑफ इजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंटमध्ये वर्डप्रेसच्यावतीने वर्डकॅम्पचे आयोजन केले आहे. यामध्ये विविध तज्ञांचे व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यामध्ये मराठी भाषांतर यावरील उपक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी क्लिक करा…
https://mr.wordpress.org/team/
वर्डप्रेसचे मराठी व्हर्जन पाहण्यासाठी क्लिक करा – https://mr.wordpress.org/
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.