उदय आहे तसा सूर्यास्तही आहे. जन्माला आले की त्याला मृत्यू आहे. हे चुकविता येणारे नाही. पण झालेला जन्म सार्थकी लावणे हे आपल्या हातात आहे. जन्म का झाला आहे याचा विचार करायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे ।
हे जन्ममरण तैसे । अनिवार जगीं ।। 160 ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा
ओवीचा अर्थ – अथवा, उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणें निरंतर होत जात असतात, त्याप्रमाणे जन्ममृत्यु हे जगांत चूकवितां येणारे नाहीत.
जन्माला आल्यानंतर त्याला मरण हे आहेच. प्रत्येक सजिव वस्तूचा हा गुणधर्म आहे. वयोमानानुसार त्याची रुपेही बदलणार. ते बदलणे मानवाच्या हातात नाही. हे बाह्यगुण आहेत. सूर्य उगवताना सुंदर दिसतो. मनाला मोहून टाकणारा प्रकाश त्याच्यातून ओसंडून वाहत असतो. त्याच्या ह्या सौदर्यांने मन प्रसन्न होते. लहान मुलेही असेच मनाला आनंद देतात. ती हवीहवीशी वाटतात. त्यांच्यासोबत बागडताना मनाचा थकवा दूर होतो. पण जसजसा दिवस वर येऊ लागतो तसे त्याची धगही जाणवू लागते. उन्हाळ्यात सूर्याची धग असह्य होते.
मानवाचेही तसेच आहे. जसेजसे त्याचे वय वाढेल तसे त्याचा प्रपंच वाढत राहातो. अनेक गोष्टीचा त्रास वाढतो. पण त्या सहन कराव्या लागतात. उन्हाची धगही आवश्यकच आहे. यामध्ये अनेक कीड, रोग नष्ट होतात. पण ही धग ठराविक मर्यादेतच हवी. तसेच मानवाचे आहे. मानवाच्या रागात अनेकांची मने दुखावली जातात. यासाठी रागाची धग किती असावी यालाही मर्यादा आहेत. यासाठी नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा. मन नेहमी आनंदी ठेवायला हवे.
धग किती असावी याचे नियंत्रण आपल्या मनावर अवलंबून आहे. या धगीत दुसऱ्याला त्रास होणार नाही अशी मृदुता असायला हवी. तरच आपण नेहमी आनंदी राहु शकू. मनाला तशी सवय लावून घ्यायला हवी. मनाला एकदा जर याची सवय झाली तर सारे जीवनच आनंदी होऊन जाईल. आपल्या वागण्याचा इतरावरही प्रभाव पडेल. असे वागणे नेहमीच फायद्याचे ठरू शकेल. मृत्यूनंतरही आपली आठवण इतरांच्या हद्यात कायम राहील. झालेला जन्म यामुळे निश्चितच सार्थकी लागेल.
उदय आहे तसा सूर्यास्तही आहे. जन्माला आले की त्याला मृत्यू आहे. हे चुकविता येणारे नाही. पण झालेला जन्म सार्थकी लावणे हे आपल्या हातात आहे. जन्म का झाला आहे याचा विचार करायला हवा. त्यानुसार कृती करायला हवी. जन्माचा अर्थ समजला तर जीवन सुसह्य होईल. राजा म्हणून जन्माला आला आणि राजधर्म पाळला नाही तर तो राजा कधीच गणला जात नाही. त्याला कोणीही राजा म्हणत नाहीत. हे विचार करायला हवे. माणूस म्हणून जन्माला आला आहात तर मानवधर्म समजून घ्यायला हवा. तो पाळायला हवा. तरच माणूस म्हणून तुम्ही नेहमी स्मरणात राहाल.