January 26, 2025
Kshipra Mankar enriched by the journey of words
Home » शब्दांच्या प्रवासाने समृध्द झालेली क्षिप्रा
मुक्त संवाद

शब्दांच्या प्रवासाने समृध्द झालेली क्षिप्रा

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ४
३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज क्षिप्रा मानकर यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

ज्ञान संपादनाची तीव्र इच्छाशक्ती ठेवणारी, प्रत्येक आव्हान एक संधी म्हणून स्वीकारून आनंदाने काम करणारी, उत्तम नेतृत्वगुण, संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात व्याख्यात्या व शासकीय, राजकीय कार्यक्रम निवेदिका म्हणून क्षिप्राला लाभलेला मान ही चळवळीसाठी खऱ्या अर्थाने अभिमानाचीच बाब म्हणावी लागेल. चांगल्या शब्दांचा व भाषेचा उपयोग, भरपूर वाचन, शब्दांचा सखोल अभ्यास, संपूर्ण कार्यक्रम फुलांच्या हारासारखा गुंफणे, श्रोत्यांची आस्वादकाची भूमिका तयार करणे हे कौशल्य संपादन करून त्याद्वारे श्रोत्यांच्या उस्फूर्त टाळ्यांनी हमखास दाद मिळविणारी ‘आत्मविश्वासू’ वक्ता म्हणून क्षिप्राची ख्याती वाखाणण्याजोगी आहे.

आई- वडील, बहीण, भाऊ असे पाच जणांचे कुटुंब. वडील कृषी अधिकारी असल्याने घरात अभ्यास व शिस्तीचे वातावरण होते. सर्व कला गुणांना घरात वाव होता. मात्र सातच्या आत घरात हा नियम सर्वांना सारखाच लागू होता.

क्षिप्राचा जन्म १९८३ चा. घरात मुलगा मुलगी भेद कधीच नव्हता. सुखवस्तू घरातील असल्याने बालपणापासूनच अधिक लाड कौतुक तिच्या वाट्याला आले. लग्नाच्या वयापर्यंत क्षिप्राला शिकायला मिळाले. बी.एस.सी.बायो, बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, मास्टर ऑफ सोशल वर्क, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कौन्सिलिंग अँड सायकोथेरपी असे तिचे शिक्षण झाले. तिला लहानपणापासून भाषणे द्यायला आवडायची. गाणे आणि नृत्य तिच्या आवडीचे. गणेशोत्सव ही सादरीकरणाची हक्काची जागा परंतु एकत्र कुटुंब पद्धती असल्याने घरातील ज्येष्ठांना ते आवडत नसे.

त्यामुळे नृत्य, गाणे सोडून काहीही कर असे तिला सांगण्यात आले. ती लहानपणापासूनच बोलकी. घरचे म्हणायचे काय ही सारखी वटवट करते. क्षिप्राला वाटायचे, काय ही लोकं? नाचायचे नाही, गायचे नाही, बोलायचे नाही, नटायचे नाही. मग करायचे तरी काय??

घरात सर्व बहिणी दिसायला अतिशय सुंदर , क्षिप्रा जरा डावीच त्यामुळे ती खिन्न व्हायची. हिरमुसली व्हायची पण तिच्या आईने तिची समजूत घातली, ‘बेटा, दिसण्यापेक्षा असणे फार महत्वाचे. तुझ्या या गोड बोलक्या स्वभावाचे सोने कर. छान भाषणे दे. भाषणे देण्यासाठी आपल्या घरात तुला कधीच अडवले जाणार नाही. असे व्यक्तिमत्व घडव की दहा सुंदर मुलींपेक्षा तूच छान दिसली पाहिजे. हजारो टाळ्या तुझ्या शब्दा शब्दांवर पडल्या पाहिजे.’ आईचे हे शब्द तिच्या मनावर कोरले गेले. आज ते सत्यात उतरले. तिच्या बाबांच्या वक्तृत्व शैलीत एक लकब होती, समयसूचकता होती. ते उत्तम भाषणे द्यायचे. आईचे लिखाण उत्तम होते. ती शीघ्रकवी होती. दोघांमधील गुण क्षिप्रात आले आणि प्रत्येक संधीचे तिने सोने केले.

शाळेत पहिल्या तीनमधे तिचा नंबर यायचा. चुकून एखादा मार्क्स कमी पडला तर अख्खी शाळा ती डोक्यावर घ्यायची. स्कॅालरशिपमधे मेरिट मिळाले, पुढे केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालय अमरावती येथे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यातून तिची निवड झाली. नवोदयमधे तिची जडणघडण खूप छान झाली.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तिने समाजसेवेत स्वतःला वाहून घेतले. गावागावात श्रमदान करताना ओळखी वाढत गेल्या. अनेक राजकीय, सामजिक व शासकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालनची संधी मिळाली. ग्रामीण भागात केलेल्या सामाजिक कार्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेविका पुरस्कार मिळाला. अमरावती विद्यापीठाची पहिली NSS colour Holder ती ठरली. महाविद्यालयीन जीवनात अनेक तालुका ,जिल्हा, राज्य अन् राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा तिने गाजवल्या. विद्यापीठाने तिला उत्कृष्ट वक्ता पुरस्काराने सन्मानित केले.
सन २००० पासून ती ११ वीत असताना खऱ्या अर्थाने तिने सूत्रसंचालन करायला सुरुवात केली. मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. या २४ वर्षात राजकीय, शासकीय, सामाजिक खूप दर्जेदार कार्यक्रम तिने यशस्वी केले.

गावच्या गल्लीपासून सुरू झालेला शब्द प्रवास दिल्ली पर्यंत पोहोचला. थेट लोकसभा अध्यक्षांची कौतुकाची थाप तिला मिळाली. त्यावेळी आई बाबांचा अन् शिवबाचा तो आनंदी चेहरा ती कधीच विसरू शकत नाही. आता या क्षेत्रात स्वतःची एक स्वतंत्र ओळख तिने निर्माण केली आहे.

प्रसिद्धीच्या झोतात असतानाच २००८ मधे लग्न तिचे झाले. वाटले आता सासरी खूप कौतुक होईल, अनेक संधी मिळतील. परंतु तेथे काही वेगळेच घडले. सलग ५ वर्ष व्यसनाधीन नवऱ्याचा त्रास सहन करताना वाटायचे हेही दिवस पालटून जातील. मी बाबांना म्हणायची, सुधारतील ते, वाट बघू. पण बाबांना ते सहन झाले नाही. अखेर माहेरची मंडळी तिला आणि शिवबाला माहेरी घेवून आले.’ आज ती त्यापासून कितीतरी दूर आलीय, आता नवराही राहिला नाही पण या लेखाच्या निमित्त पुन्हा एकदा तिच्या जखमेवरची खपली काढली गेली. क्षिप्राचा प्रवास पाहून अनेक महिलांना एक नवी दिशा मिळेल हाच प्रामाणिक हेतू आहे. २०१४ मधे क्षिप्राने घटस्फोट घेतला अन् तिचे नवे आयुष्य सुरु झाले.

२०१० ते २०१८ केंद्र सरकारच्या अनेक योजनेवर तिने काम केले. केंद्र सरकारच्या योजनेवरती जिल्हा कार्यक्रम समन्वयक म्हणून जिल्हा परिषद महिला बालकल्याणमधे ५ वर्ष नोकरी केली. १ वर्ष समाजकार्य कॅालेजात प्राध्यापक म्हणून सेवा दिली. केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनेवरती समुपदेशक म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा महिला रुग्णालयात नोकरी केली. पुढे मुख्यमंत्री ग्राम परिवर्तनमधे निवड झाली परंतु तेव्हा तिची आई कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला होती. बाबांना पॅरालिसिस त्यामुळे शासकीय नोकरी, दौरे , मीटिंग हे सर्व शक्य नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथील मुख्यमंत्री ग्राम परिवर्तनमधे डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह या नोकरीचा तिने राजीनामा दिला अन् ६० हजार पगार असलेली नोकरी तिने एका झटक्यात सोडून दिली आणि एका प्रायव्हेट न्यूज चॅनलमधे जॉईन झाली. तेव्हा अनेकांनी तिला मुर्खात काढले. आज ना उद्या कुठेतरी शासकीय सेवेत स्थायिक झाली असती. अशी खाजगी नोकरी का स्वीकारली अशी चर्चा झाली. परंतु छोटा शिवबा, आई बाबांचे मोठे आजारपण हे महत्वाचे समजून तिने हा निर्णय घेतला. आई कॅन्सरसारख्या दुर्धर आजारात शेवटच्या स्टेजवर होती त्यातून तिने तिला बाहेर काढले.
क्षिप्रा सांगते, आईची आई होणे काय असते हे तेव्हा कळले. शिवबा देखील छान घडत होता.
तिचे बाबा मात्र अंथरुणाला खिळून होते. परंतु या कठीण काळात कुटुंबियांसह तिने सर्व संकटावर मात केली.

कुटुंब आणि सूत्रसंचालनचे बाहेरगावी कार्यक्रम यांचा मेळ घालणे शक्य होत नव्हते. शिवबाचे शिक्षण महत्वाचे होते. सूत्रसंचालन क्षेत्रामुळे वाचन लिखाण वाढत गेले, स्वतःला तिने अधिक समृध्द केले. राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यपाल, मुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री , उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असे अनेकांच्या उपस्थितीत कार्यक्रम तिने केले.

‘सूत्रसंचालन क्षेत्रातील या २४ वर्षात कायम चांगलेच अनुभव आले. कोणताही कार्यक्रम यशस्वी आणि सर्वांच्या लक्षात राहील अशा धाटणीचे माझे संचालन असल्याने कशातही अजिबात तडजोड करत नाही. व्याख्यानासाठी मी कित्येकदा मानधन घेतही नाही. कारण आपण समाजाचे देणे लागतो याची मला जाणीव आहे.’ अशा शब्दांत ती सामाजिक कृतज्ञताही व्यक्त करते.

‘सामाजिक बांधिलकी जपताना महाराष्ट्राच्या गावखेड्यात तिने आजवर ५०० च्यावर व्याख्याने दिलीत. पेरलेले विचार आज सुंदर नात्यांची शिदोरी म्हणून फळाला आली आहे. शब्दांच्या प्रवासाने खूप समृध्द केले.’ हे सांगताना ती भावुक झाली. ‘भाषण है तो राशन है’ म्हणून या क्षेत्रात कुटुंबाची मर्यादा सांभाळून आज ती कार्यरत आहे. प्रत्येक एकल आईसाठी लेकरू म्हणजे प्राण असते. शिवबा तिचे स्वप्न आहे. आई व बाप म्हणून कुठेच कमी न पडता शिवबाला अतिशय संस्कारक्षम बनवले आहे.

चिकाटी, अथक परिश्रम, त्याग, अपयश, शिस्त, निराशा, समर्पणवृत्ती यांनी बनलेला संघर्षमय, वेदनादायक भूतकाळ विसरून आज जिजाऊ -सावित्रीचा आदर्श घेऊन ती पुढे पाऊल टाकत आहे. अशा या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading