November 21, 2024
Mind Meditation needs for spiritual seed germination
Home » आत्मज्ञानाचे बीज स्वतंत्र करण्यासाठीच साधनेने मनाची मळणी
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानाचे बीज स्वतंत्र करण्यासाठीच साधनेने मनाची मळणी

साधनेत पाठ शेकली जाते. त्यातून बाहेर पडणाऱ्या या उष्णतेने मनातील कठीणातील कठीण अशुद्ध विचारही जाळून टाकले जातात. दूर होतात. शुद्ध, सात्त्विक विचारांचा झरा मग मनात वाहू लागतो. एकाग्रता वाढते. सर्व टरफले दूर होतात. साधनेने मग आत्मज्ञानाचे बीज आपोआप बाहेर येते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

की भूंस बीज एकवट । उफणितां राहे घनवट ।
तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ।।130।। ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ – किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफणले असतां धान्य जाग्यावर राहातें व उडून गेलेले तें फोलकट, असे ज्याप्रमाणें समजून येतें.

पिकात दाणे भरल्यानंतर योग्यवेळी त्याची कापणी करावी लागते. कापणी केलेल्या कणसांची मग खळ्यावर मळणी केली जाते. मळलेल्या कणसातून दाणे स्वतंत्र होतात. त्याला वारा देऊन फलकटे व दाणे स्वतंत्र केले जातात. आता यांत्रिकीकरणामुळे एकाचवेळी ह्या सर्व क्रिया करणे शक्य झाले आहे. कापलेली कणसे यंत्रात टाकली की दाणे व फलकटे स्वतंत्र होऊन बाहेर पडतात. शेवटी मळणी ही करावीच लागते. दाण्यावरील आवरण हे दूर करावेच लागते. शेंगा फोडाव्या लागतात. तरच आतील दाणे बाहेर येऊ शकतील. उष्णतेने काही फळातील दाणे बाहेर पडतात. पण उष्णतेचीही गरज त्याला भासते.

अध्यात्माचेही तसेच आहे. मनातील मरगळ दूर करण्यासाठी, मनावर साचलेला मळ धुण्यासाठी ग्रंथांची पारायणे ही करावीच लागतात. वाचनाने, पारायणाने मनातील अशुद्ध विचार दूर होतात. सात्त्विक विचारांचे दाणे मग आपोआप एकत्र होऊ लागतात. काही फळांची टरफले कठीण असतात. सोलून, बदडूनही ती दूर होत नाहीत. ती दूर करण्यासाठी उष्णतेची गरज भासते. उकळत्या पाण्यात टाकून टरफलाचा टणकपणा कमी करावा लागतो. मनातील काही अशुद्ध विचार पटकन, सहजरीत्या दूर होत नाहीत. ते विचार धुण्यासाठी मग साधनेची गरज भासते. साधनेने मनाची मरगळ दूर होते. मन प्रसन्न होते. शरीराचे तापमान वाढते.

साधनेत पाठ शेकली जाते. त्यातून बाहेर पडणाऱ्या या उष्णतेने मनातील कठीणातील कठीण अशुद्ध विचारही जाळून टाकले जातात. दूर होतात. शुद्ध, सात्त्विक विचारांचा झरा मग मनात वाहू लागतो. एकाग्रता वाढते. सर्व टरफले दूर होतात. साधनेने मग आत्मज्ञानाचे बीज आपोआप बाहेर येते. धान्य स्वतंत्र करण्यासाठी जशी मळणी आवश्यक आहे. तसे अध्यात्मात आत्मज्ञानाचे बीज स्वतंत्र करण्यासाठीही साधनेची, सात्त्विक विचारांची मळणी ही करावीच लागते. कणसावरून सात्त्विक विचारांचा ट्रॅक्टर हा फिरवावाच लागतो. दाणे स्वतंत्र होईपर्यंत फिरवावा लागतो.

भाताची धाटे खाटेवर बडवावी लागतात. तसे मनावर सात्त्विक विचारांचा घाव हा घालावाच लागतो. बडवून, बडवून दाणे स्वतंत्र केले जातात. तसे घाव घालून सात्त्विक बीज वेगळे करावे लागते. सात्त्विक वारा देऊन मनावरील फलकटे दूर करावी लागतात. तरच आत्मज्ञानाचे बीज हाती लागेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading