कोल्हापूर – येथील शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत मराठी शिक्षक संघ आणि नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या मराठी विभागाच्यावतीने ‘भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूपʼ या विषयावरील दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे. बुधवारी (१२ मार्च) व गुरुवारी ( १३ मार्च ) नाइट कॉलेजमध्ये होणाऱ्या या चर्चासत्राचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम भूषवीत आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष डॉ प्रसाद मगदूम, संचालक ॲड . वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर, संघाच्या चौदाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष प्रा. डॉ गोपाळ गावडे, शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉ .नंदकुमार मोरे, शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणधीर शिंदे, संघाचे अध्यक्ष डॉ भरत जाधव, सचिव मांतेश हिरेमठ हे उपस्थित राहात आहेत.
यावेळी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्यावतीने प्राध्यापकांच्या ललित, ललितेतर व संकीर्ण प्रकारातील साहित्य पुरस्कारांचे वितरण, गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सत्कार, विशेष पुरस्कार प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार, सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार, उत्कृष्ट शोधनिबंध लेखकांचा सत्कार केला जाणार आहे.
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील भाषा, साहित्य आणि संस्कृती अभ्यास संकुलाचे प्रमुख प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांच्या बीजभाषणाने चर्चासत्रास प्रारंभ होईल. दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे ‘भाषा, साहित्य आणि संस्कृती अभ्यास` या विषयावर मांडणी करतील. ‘भाषाभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूपʼ या विषयावरील सत्रामध्ये प्रा डॉ बाळासाहेब गणपाटील (प्राकृत – मराठी अनुबंध), सारिका उबाळे (भाषा आणि लिंगभाव), प्रा डॉ . उदय पाटील (कृत्रिम बुद्धिमत्ता, भाषा आणि साहित्य) हे मांडणी करणार असून डॉ नंदकुमार मोरे हे सत्राध्यक्ष आहेत.
‘साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूपʼ या विषयावरील सत्रामध्ये श्रीराम मोहिते (साहित्य आणि ललितकला), फारुक काझी (बालसाहित्याचा मानसशास्त्रीय अभ्यास), डॉ. संजय साठे (कलाकृतीचे माध्यमांतर), डॉ. गौतम काटकर (ताम्रपट, शिलालेखांचा भाषिक अभ्यास), डॉ. सुखदेव एकल (लोकविद्या आणि लोकसंस्कृती), डॉ. महेश गायकवाड (साहित्य आणि विज्ञान) हे शोधनिबंधाचे वाचन करणार असून सत्राध्यक्षस्थान डॉ. लता मोरे भूषवित आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता खुले शोधनिबंध वाचन होणार असून प्राचार्य डॉ संजय पाटील व डॉ. गिरीश मोरे हे अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी सात वाजता कवी संमेलन असून अध्यक्षस्थानी प्रा एकनाथ पाटील आहेत.
गुरुवारी ( १३ मार्च ) सकाळी नऊ वाजता खुल्या शोधनिबंध वाचनाचे सत्र होणार असून प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण व डॉ. गोमटेश्वर पाटील हे सत्राध्यक्ष असतील. सकाळी साडेदहा वाजता ‘मानव्यविद्या आणि साहित्याभ्यासया विषयावरील सत्र होणार असून यामध्ये डॉ अवनीश पाटील (साहित्य आणि इतिहासाचा अनुबंध), ज्येष्ठ अभिनेते डॉ. शरद भुताडिया (भाषा, साहित्य आणि नाट्यशास्त्र), प्रा डॉ. माया पंडित (आधुनिक विचार प्रवाह आणि साहित्याभ्यास)
मांडणी करणार आहेत. अध्यक्षस्थानी डॉ. रणधीर शिंदे आहेत.
‘चळवळी आणि साहित्याभ्यासʼ या विषयावरील सत्रामध्ये ज्ञानेश्वर बंडगर (वारकरी चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक अभ्यासाच्या नव्या दिशा), संपत देसाई (सामाजिक चळवळी आणि साहित्य) हे मांडणी करणार असून डॉ. श्यामसुंदर मिरजकर हे सत्राध्यक्ष आहेत. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे चौदावे अधिवेशन होईल. यावेळी पीएच्.डी पदवीप्राप्त प्राध्यापक, स्पर्धांचे आयोजक, विशेष पुरस्कारप्राप्त प्राध्यापक, नवनियुक्त प्राचार्य, प्राध्यापकपदी निवड झालेले शिक्षक इत्यादींचा सत्कार करण्यात येणार आहे.
चर्चासत्राच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे हे मार्गदर्शन करतील. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम हे अध्यक्षस्थानी असतील. या चर्चासत्रासाठी सुमारे अडीचशेहून अधिक प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी उपस्थित राहतील. प्राध्यापकांचे शोधनिबंध ‘शिविम संशोधन पत्रिकेʼतून प्रसिद्ध केले जाणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आंतरविद्याशाखीय शिक्षण व संशोधन यास महत्त्वाचे स्थान देण्यात आले असून भाषा आणि साहित्याचा आंतरविद्याशाखीय अभ्यास कसा करावा या विषयावर तज्ज्ञ मांडणी करणार आहेत. नाइट कॉलेजच्या मराठी विभागाने सध्याच्या काळात शिक्षणक्षेत्रात केंद्रस्थानी आलेल्या महत्त्वाच्या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करून आंतरविद्याशाखीय अभ्यासास व संशोधनास चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रास उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. उत्तम पाटील, चर्चासत्राचे निमंत्रक व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण शिंदे व समन्वयक डॉ. नंदकुमार कुंभार यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.