लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला- गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ या पहिल्या ग्रामीण कादंबरीस जाहीर
वाशीम – लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला – गंगा नवोदित ग्रामीण कादंबरी पुरस्कार आज पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ या कादंबरीस जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार स्वरूप रोख दहा हजार रुपये व सन्मान चिन्ह असे आहे. पुरस्कार निवड समितीने बैठकीअंती हा निर्णय जाहीर केला आहे, अशी माहिती लेखक बाबाराव मुसळे यांनी दिली आहे.
हंगामागणिक बदलणारे निसर्गाचे ऋतुचक्र, मातीचे उमाळे उसासे आणि रानाचा आदिमगंध याचा जिवंत साक्षात्कार घडवणारी पांडुरंग पाटील यांची ही कादंबरी. विठ्ठलावर सारा भरवसा ठेवून कष्टणारी माणसं इरल्यावर पाऊस झेलत रान भांगलणाऱ्या आयाबाया, या माणसांनी जीवाजतन मायेने सांभाळलेले जितराब आणि या सगळ्यांच्याच जगण्याला लाभलेला एक भूमिनिष्ठ तोल !
हरिपंताकडून औतेरावाकडे झिरपत आलेला वारकरी परंपरेचा वारसा हा औतेराव आणि साखरू या जोडप्याच्या जीवन संघर्षाच्या कहाणीचा चिवट असा धागा आहे. ही कहाणी त्या कुटुंबाची न राहता, पाहता पाहता समस्त कुळवाडींच्या आयुष्याचा नकाशा म्हणून आपल्यासमोर उभी राहते. इथल्या लोकजीवनाला लाभलेले बोलीभाषेचे अस्तर हे या कादंबरीचे बलस्थान आहे. आशय आणि रूपबंधाच्याही दृष्टिकोनातून ‘नांगरमुठी’ची पकड अद्वितीय आहे. वर्षानुवर्षे पडीक राहिलेल्या जमिनीत खोलवर नांगराचा फाळ घुसावा आणि त्याने कुंधा, हरळीला तळामुळातून उखडून टाकत मातीचे काळीज उघडे करावे तसा जोरकस परिणाम या कादंबरीने समर्थपणे साधला आहे.– आसाराम लोमटे
पुरस्कार वितरण लेखक बाबाराव मुसळे यांच्या वाढदिवशी १० जून २०२५ रोजी वाशीम येथे एका भव्य समारंभात करण्यात येईल. पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन वत्सगुल्म फाउंडेशन, विदर्भ साहित्य संघ शाखा, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशीम आणि मुसळे कुटुंबीयांतर्फे करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी एकूण २१ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या .त्यातून एकमेव म्हणून पांडुरग पाटील यांची ‘नांगरमुठी’ ही कादंबरी पात्र ठरली आहे. श्री. पाटील हे कपिलेश्वर ( ता.राधानगरी, जि.कोल्हापूर ) येथे शेती व्यवसाय करून लेखन करतात. कृषिनिष्ठा हा त्यांच्या लेखनाचा मूळ पिंड आहे. ह्या कादंबरीत पंढरपूरचा वारकरी संप्रदायी असणाऱ्या कास्तकाराच्या शेती – मातीत राबताना होणाऱ्या जीवघेण्या कष्टांचे चित्रण अतिशय प्रभावीपणे केले आहे. या कादंबरीने ग्रामीण कादंबरीच्या पूर्वपरंपरेला अधिक समृद्ध केले आहे.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कथाकार डॉ. प्रा. विजय जाधव, ज्येष्ठ कवी मोहन शिरसाट आणि ग्रामीण कथा -कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी काम पाहिले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.