November 21, 2024
Natural signs of rain
Home » पावसाचे नैसर्गिक संकेत
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पावसाचे नैसर्गिक संकेत

पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू. पावसाळ्यात पाऊस, हिवाळ्यात थंडी आणि उन्हाळ्यात उष्मा हे ठरलेले. मात्र हिवाळा आणि उन्हाळ्यातही पाऊस पडू लागला आहे. मात्र धरणे काठोकाठ भरलेली असतानाही, नद्यानाही पूर येतात, महापूर येतात. मात्र अगदी हिवाळ्यातच पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र टंचाई निर्माण होऊन पाणी कपातीचे संकट निर्माण होते. अनेक गावांना, शहरांना वीस दिवसातून एकदा पाणी पुरवण्याची नामुष्की अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर येते. त्यानंतर जलसंधारणाच्या चर्चा सुरू होतात. पाणीटंचाई निर्माण झाल्यावर हे सर्व ऐकावयास मिळते आणि ‘माकडाच्या घराची गोष्ट’ आठवते. त्याचबरोबर सर्वसामान्य लोक पावसाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून असतात. हवामान खाते आपले अंदाज सांगते. लोक खुश होतील असेच अंदाज बहुतांश वेळा असतात. मागील वर्षी हवामान खात्याने सांगितलेल्या दिनांकास मान्सून केरळमध्ये आला. महाराष्ट्रात मान्सून सर्वदूर पसरण्याचा अंदाज मात्र अरबी समुद्रातील वादळाने दूर वाहून नेला. अशावेळी निसर्ग पावसाचे कोणते संकेत देतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न फार महत्त्वाचा असतो. त्याचे कारण म्हणजे आजही निसर्गालाच भविष्याची अचूक चाहूल लागते.

यावर्षीही पाऊस वेळेवर येणार आणि सरासरीपेक्षा जास्त येणार, अशी बातमी आली आहे. शेतकऱ्याला निदान पाण्यासाठी त्रासावे लागणार नाही, शेती चांगली पिकेल, पाणीटंचाई दूर होईल, अशा अनेक भावना मनात असताना निसर्गाचे सांगणे मात्र थोडेसे वेगळे आहे. अर्थात या निसर्गसंकेतांचा शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र पावसाचे ठोकताळ्याने वागणे अचूक आहे. निसर्गातील पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती यांच्याकडून पावसाचे संकेत मिळतात. हे संकेत निसर्गातील अनेक घटकांना समजतात. अनेक वृद्ध मंडळी याचे सुतोवाच करत असतात, मात्र त्यांना गांभिर्याने कोणी घेत नाही. काही ग्रंथातही याचे उल्लेख आढळतात. आजही, मेंढ्यांच्या पोषणासाठी फिरणारे मेंढपाळ, भटकणारा बंजारा समाज यांच्याकडून पावसाच्या प्रमाणाबद्दल आणि निसर्ग संकेताबद्दल ऐकायला मिळते.

पाऊस आणि किती पडणार याचा अंदाज सांगतो, तो म्हणजे कावळा. कावळ्याचे घरटे तीन फांद्याच्या बेचक्यात, काटक्यांनी बांधले जाते. घरटे जर झाडाच्या उंच टोकाला असेल, तर पावसाचे प्रमाण कमी असते. कावळ्याचे घरटे मध्यभागी असेल, तर पाऊस नेहमीसारखा आणि पिकांना उपयुक्त पडतो. कावळ्याचे घरटे खालच्या बाजूला असेल, तर अतिवृष्टी किंवा पाऊस जास्त पडतो. कावळ्याचे घरटे झाडाच्या कोणत्या दिशेला आहे, यावरूनही पावसाचे अनुमान काढले जाते. घरटे पश्चिमेस असेल तर सरासरीएवढा, पूर्वेस असेल तर जास्त आणि दक्षिण किंवा उत्तरेला असेल तर कमी पाऊस असा अंदाज असतो. मात्र यावर्षी आता कुठे कावळा घरटे झाडाच्या मध्यावर बांधायला जागा शोधतो आहे.

टिटवीचे घरटे तळ्याच्या, नदीच्या कोरड्या पात्रात किंवा माळरानावर असते. ते छोट्या दगडांचे बनलेले असते. पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी दिडेक महिना ती अंडी घालते. अंड्यांच्या संख्येवरून पाऊस किती पडणार, याचा अंदाज बांधला जातो. चार अंडी असतील, तर भरपूर पाऊस, तीन अंडी असतील तर सरासरीइतका आणि त्यापेक्षा कमी अंडी असल्यास अवर्षणाचे वर्ष, असे अनुमान असते. यावर्षी मेच्या अखेरीस टिटवीची अंडी घातलेली आढळून आली आहेत. तिही चार. तित्तर पक्षी मोठमोठ्याने आवाज करू लागला, की लवकरच पाऊस पडणार, हे शेतकरी जाणतात. पेरणीच्या तयारीला लागतात. तसेच पावशाचेही आहे. ‘पेर्ते व्हा’ असा संदेश देत पावशा ओरडू लागला की लवकरच पाऊस येणार, असा अंदाज बांधला जातो.

पावसाचा अंदाज आफ्रिकेतून येणारे चातक पक्षीही देतात. चातकांची गर्दी दिसू लागली की, पाऊस येणार. त्याचे येणे लांबले की पावसाळा उशिराने येतो. पाऊस कमी असेल, तर त्यावर्षी हरणांची पाडसे दिसत नाहीत. वाघीणसुद्धा दुष्काळाच्या वर्षी पिल्लांना जन्म देत नाही. समुद्रातील वादळी पक्षी किनाऱ्यावर येऊन मच्छीमारांना वादळाची पूर्वकल्पना देतो. समुद्रकिनारचे खेकडे आणि मासे यांच्या प्रवासाच्या दिशेवरून आणि काळावरून पावसाचा अंदाज बांधला जातो. काळ्या मुंग्याचा समूह तोंडात अंडी घेऊन स्थलांतर करू लागले की लवकरच मोठा पाऊस पडतो. वाळवीला पंख फुटून ती हवेत उडताना दिसल्यास लवकरच पाऊस पडतो. तसेच पाऊस जोरात येणार असल्यास सरपटणारे प्राणी सुरक्षित जागी जातात. चिमण्या धुळीत अंग घुसळताना दिसल्या की दोन-तीन दिवसांत पाऊस पडतो. यातील अनेक संकेत अजूनही मिळत नाहीत.

निसर्गातील झाडे पावसाच्या प्रमाणाबद्दल आणि पावसाच्या काळाबद्दल अचूक संकेत देतात. त्यातील बहावा हा महत्त्वाचा वृक्ष. बहावाच्या झाडे फुलली की चार महिन्यांत पाऊस पडतो. मात्र यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये बहावा फुलू की नको, असा फुलला. मेच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र तो प्रसन्न फुललेला दिसत आहे. चिंचेच्या झाडांचा फुलोराही यावर्षी उशिराने आला आहे.  फुलोरा जास्त असेल तर पाऊस अधिक आणि कमी आला तर पाऊस कमी. बिबा, खैर आणि शमीची झाडे जास्तच फुलल्यास कमी पाऊस पडतो. या झाडांना पाणी कमी मिळाल्याने त्यांच्या फुलांची गळ जास्त होते. ज्या वर्षी आंबे मोठ्या प्रमाणात आलेले असतात, त्यानंतरचा पावसाळा हा कमी पावसाचा असतो.

जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गातील जलचक्रावर मोठा परिणाम झाला आहे. हवामान खात्याच्या अभ्यासातून मागील काही वर्षात अचूक अंदाज येताहेत. मात्र सूक्ष्मरूपात हे अंदाज चुकतात. अर्थात जागतिक पातळीवर पर्यावरणाचे अभ्यासक याबद्दल मागील काही वर्षांपासून भीती व्यक्त करतात. ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ने आपल्या सहाव्या अहवालात पावसाबद्दल अनेक अंदाज दिले आहेत. त्यानुसारच यावर्षी ऐन मेमध्ये दुबईची अवस्था मुंबईपेक्षा भयानक केली. त्यानुसार पर्जन्यचक्रामध्ये अनपे‍क्षित आणि मोठे बदल होत आहेत. कमी काळामध्ये जास्त पाऊस, काही ठिकाणी अवर्षण तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहेच. या दोन्हीमुळे शेतीचे मोठे नुकसान संभवते.

यावर्षी मेपासून हवामान विभागाने पूर्व अभ्यास आणि सध्याचे वातावरणात होणारे बदल यावरून आपले अंदाज जाहीर केले आहेत. सरासरीच्या १०४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाज पावसाच्या प्रमाणाबाबत अचूक निघणार याबद्दल शंका नाही; मात्र निसर्ग संकेतानुसार पावसाचे पडणे नियोजित पद्धतीने नेहमीप्रमाणे नसेल, असे दिसते. उशिराने फुललेला गुलमोहोर सपर्ण फुलला आहे. बहावा नेहमीच्या वेळी पूर्ण न बहरता आता नेहमीप्रमाणे फुलला आहे. बहावाच्या झाडाकडूनही, जूनला चांगला पाऊस पडणार असे दिसत नाही. मात्र तो जुलैनंतर दीर्घ काळ पडत राहणार असल्याचे संकेत येतात. धामण आणि पांढरफळी या झाडांची अवस्थाही तशीच आहे. दरवर्षी पंधरा दिवसांत सर्व पांढरफळीची झाडे फुलत. मात्र यावर्षी पांढरफळीची काही झाडे फुलून त्यांना फळे आलेली आहेत, तर काही झाडांना जून सुरू झाला तरी फुलोरा आलेला नाही.

धामणीची झाडे पाऊस येण्याअगोदर एक महिना फुलतात. तीही मेअखेरीस फुलत आहेत. दुसरीकडे कावळ्यांची घरटी टोकाला नाहीत. याचा अर्थ पाऊस येणार, भरपूर येणार, मात्र तो उशिरांने, याचेच संकेत निसर्ग देत आहे. सुरुवातीस नेहमीच्यावेळी पेरणीयोग्य पाऊस येईल. मात्र नंतर खऱ्या अर्थाने जुलैअखेरीस पाऊस जोरात सुरू होईल आणि तो सप्टेबर, ऑक्टोबरपर्यत सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत. टिटवीची अंडी जमिनीवर घरटे असूनही नजरेस पडणे अवघड असते. यावर्षी टिटवीने चार अंडी घातल्याचे सर्रास दिसते. तसेच अंडी आता घातली आहेत. तळ्याच्या पूर्ण भरण्याच्या क्षमतेच्या पातळीच्या एक-दोन फूट खाली दिसतात. यातूनही मिळणारे संकेत हेच आहेत.

मानव निसर्गापासून दिवसेंदिवस दूर जात आहे. मानवाखेरीज इतर सर्व निसर्ग घटक म्हणजेच झाडे, पशू, पक्षी यांचे नाते मात्र आजही घट्ट आहे. म्हणूनच ते निसर्ग बदलांबाबत मानवापेक्षा जास्त संवेदनशील राहून व्यक्त होतात. मानवाला हे समजून घ्यायला वेळ नाही. हे समजून घेण्यासाठी पुन्हा निसर्गाशी नाते जोडायला, निसर्गाशी आपला संबंध पुनर्प्रस्थापित करायला हवा. त्यासाठी झाडे, निसर्ग वाचायला हवा. त्याही अगोदर निसर्ग जपायला हवा! 
 
डॉ. व्ही.एन.‍ शिंदे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading