आदर्श परंपराची खाण असलेल्या वडणगे गावची हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि गावची सामाजिक सलोख्याचे नाते घट्ट करणारी मोहरमची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. गावच्या जुन्या जाणत्या लोकांनी पूर्वीच्या काळी सुरू केलेली ही परंपरा दोन पिढ्यांनी जपली असून आजची तिसरी पिढी तितक्याच ताकदीने मोहरमची परंपरा जपत आहे.
सर्जेराव नावले,
मोबाईल – ८३८००९४६४२
वडणगे गावची हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोहरमची परंपरा ही निश्चित असे वर्ष सांगता येत नाही पण साधारण ३०० ते ३५० वर्षापूर्वीची मानली जाते. गावच्या महादेव मंदिराच्या मागे सध्या असलेल्या छोट्या दर्ग्याच्या ठिकाणी हसरतजंगलीसाहेब हजरतलाडलीसाहेब आणि पाच बेबी फातिमा यांची प्रतिष्ठापना त्यावेळच्या मुस्लीम आणि संबधित हिंदू बांधवानी आपल्या उपासनेतून केली.
गावचा त्याकाळी फारसा विस्तार नव्हता. सध्या मशीद असलेल्या परिसरात गावच्या मुस्लीम बांधवांचे कबरस्तान होते. त्याच्या शेजारीच वरील दोन पंजे (पीर) हसरतजंगलीसाहेब, हजरतलाडलीसाहेब यांची प्रतिष्ठापना केली. हे पीर मूळ स्थाने कर्नाटकात व दानोळीतील असल्याचे सांगण्यात येथे. छोट्या जागेत हे स्थान होते.
१९३० च्या सुमारास अगदी छोट्या दर्ग्यात सुरूवातीला रज्जाकआबा मुल्ला, रहिमतुल्ला मुल्ला, गफूरसाब मुल्ला, करिमसाब मुल्ला, नंतरच्या काळात खुतबुद्दीन मुल्ला, बापू गफूर मुल्ला, अब्दुलगणी मुल्ला, बापू करिमसो मुल्ला, महंमद बाबालाल मुल्ला, महंमद हनिफसो मुल्ला यांच्या जोडीला गावातील जाधव, चौगले, नांगरे, पाटील, उदाळे, मातंग आणि दलित समाजातील काही व्यक्तींनी एकत्र येत पंजे प्रतिष्ठापना करून ९ दिवस मोहरम साजरा करत होते. सुरूवातीला अगदी साध्या पध्दतीने मोहरम साजरा होत असे.
मोहरम काळात त्याकाळी कै.महंमद बाबालाल मुल्ला, कै.नारायण लोहार, कै दत्तात्रय पाटील-घोळसकर यांच्या अंगात स्वाऱ्या यायच्या, पंजे भेटीसाठी मातंग समाजातील चिंतामणी मांग यांची हलगी आणि बुरूड समाजातील धोंडीबा कोरवी यांचे पिंपानी आणि गळ्यातील सूरपेटीव्दारे पंजे भेटीची मिरवणूक निघत असे. पंजेभेटीसाठी हे कोल्हापुरातील बाबुजमाल व अन्य ठिकाणी वाजवत वडणगेतून पंजे घेऊन जात असत. या सारा गाव आपआपल्या परीने सहभागी होत असायचा.
सध्या या दर्ग्यात तिसरी पिढी मोहरम सण साजरा करते. ९ दिवस येथे पंजे प्रतिष्ठापना विविध विधी करण्यात या तरूण पिढीचा सहभाग असतो.
येथे सध्या प्रकाश साळोखे, आशपाक मुल्ला यांच्या अंगात स्वारी येथे तर शिवाजी व्हरगे, तौफिफ मुल्ला, कृष्णात सुर्यवंशी (केर्लेकर), दिनकर पाटील, राहुल संकपाळ, प्रवीण (पवन) जाधव, अजित साखळकर, महेश जाधव, बबन शेलार, सागर आजगावकर, दत्ता सूर्यवंशी, रणजीत बुगले, शशिकांत, रणजीत तेलवेकर, बंडा बराले, अभिजीत शिंदे (वाठार) आदी तरूणांचा सहभाग असतो ९ दिवस हे सर्वजण हिरीरीने सहभाग घेत मोहरम गुण्यागोविंदाने आणि उत्साहात साजरा करतात.
नव्या राजवाड्यावरून पंज्यासाठी फेटा..
महादेव मंदिराच्या मागे असलेल्या दर्ग्यात मोहरम काळात राजर्षी शाहू महारांजाच्या काळात आणि राजाराम महाराजांच्याकडून नव्या राडवाड्यातून पंज्यांसाठी मानाचा फेटा येत असे. अलिकडे काही वर्षात फेटा येण्याचे बंद झाले. संस्थानकाळातील एक फेटा आजही येथील दर्ग्यात जपून ठेवलेला पाहायला मिळतो.
वल्लीसो दर्गा, माळवाडी….
सध्या माळवाडी येथे असलेला वल्लीसो दर्गा आहे. तेथे सहा पीर (पंजे) स्थाने पूर्वीपासून प्रतिष्ठापित आहेत. गावचे प्रतिष्ठीत नागरीक हंबीरबाबा पाटील यांनी पिकपाणी चांगले येवू, सुखसमृध्दी नांदू दे या उपासनेतून राजेबागस्वार या स्वारीची प्रतिष्ठापना सध्याच्या दर्ग्याच्या ठिकाणी केली होती. या पिराचे मूळ स्थान यमनूर (ता. नवलगुंद, जि. धारवाड, कर्नाटक) येथे असल्याचे सांगण्यात येते. या स्वारी (पीर) बरोबरच मलिकरेहान मिरासाहेब, दावलमलिक, (ही पूर्वी पार्वती गल्ली माने यांच्या घरी होती) चांदसाहबवली, साधा तुलसेन, जलालसाहेब या पंजांची स्थाने प्रतिष्ठापित केली.
वडणगे गावचा आता जसा विस्तार झाला तसा त्याकाळी झाला नव्हता. सध्या माळवाडी येथे असलेल्या दर्ग्याच्या ठिकाणी उघडा माळ होता. येथे पांढऱ्या मातीच्या भेंड्यांच्या भितींत आणि पत्रांच्या शेडमध्ये या स्वाऱ्यांची प्रतिष्ठापना केली. सुरूवातीपासून दत्तू गोंधळी, महादेव माने, बापू रणदिवे, शंकर लोहार, सरदार ठमके, दादू साळोखे-कोथळे, बापू टेकडे-पाटील, दत्तू वाडीकर मामा, पांडू मिरजे, बळी माने, किसू माने, दादू मिरजे, येसबा मिरजे, सदाशिव चोपडे, रंगराव माने, मल्लू इंगळे, पांडूरंग तांबेकर, हिंदूराव लोहार लक्ष्मण ठाणेकर, सखाराम मेथे, तुकाराम मेथे, महादेव मिरजे -संपपाळ, पांडूरंग कुभांर, दगडू कुंभार आदी लोकांचा राबता होता. यातील काहीजणांच्या अंगात स्वारी यायची. दर गुरूवारी वल्लिसो दर्गात भक्तांची सुरूवातीपासून मोठी गर्दी असते. भाविकांच्या श्रध्देचे मोठे स्थान वल्लिसो दर्गात मानले जाते. गावच्या अठरापगड जातीचे ते श्रध्दास्थान बनले आहे.
येथे १९७३ सालापासून वल्लिसो तालिम मागे आणि पुढील बाजूस सध्या असलेल्या दर्ग्याच्या बांधकामाला सुरूवात झाली. दर्गा आणि समोरील कमान दोन वर्षात १९७७ पर्यत बांधून पूर्ण झाली. दर्गा बांधकाम येथे राबणाऱ्या कार्यकर्यांनी लोकवर्गणी आणि लोकसहभागातून केले आहे
दर्गा बांधकामासाठी माने, रणदिवे, ठमके, वाघवे, लोहार, पाटील, मिरजे-संकपाळ, टेकडे-पाटील, पोवार,चोपडे, तांबेकर या कुटुबांतील जुन्या पिढीतील लोकांनी पुढाकार घेवून दर्गा आणि कमान बांधकाम पूर्ण करून घेतले. दर गुरूवारी येणाऱ्या भाविकांच्या देणगीतून आणि लोकवर्गणीतून हे बांधकाम पूर्ण झाले.
दुसऱ्या पिढीत पांडूरंग साळोखे, आर. के. माने, पांडू मिरजे, परसू मिरजे, सर्जेराव धुमाळ, हिंदूराव धुमाळ, संजय लोहार, दत्ता लोहार, शिवाजी रणदिवे, बाबासो रणदिवे, बळीराम रणदिवे, विष्णू ठमके, बाजीराव रणदिवे, सदाशिव घाटगे, दगडू सुतार, भगवान सुतार, यशवंत वाघवे, मनोहर वाघवे, हंबीरराव पाटील, तिसऱ्या पिढीत पिराजी मिरजे-संकपाळ, शहाजी व्हरगे, सुनील खांडेकर, बाळू पाटील, बाबासो रणदिवे, संतोष लोहार, खंडेराव झेंडे, अजित पाटील, अजित माने, अशोक माने, पिराजी माने, शिवाजी पोवार, संजय माने, सर्व माने परिवातील लोक, नवनाथ ठमके, दत्ता वाघवे, संभाजी वाघवे, विठ्ठल मोरे-गोंधळी, बाळासाहेब ठमके आदींचा येथे हिरीरिने सहभाग असतो.
दर गुरूवारी या दर्ग्यात सुरूवातीच्या काळात दत्तू गोंधळी (राजेबागस्वार), महादेव माने (दावलमलिक), बापू रणदिवे (मलिकरेहानसाहेब), शिवाजी रणदिवे (चांदसाबवली साहेब) अशा स्वाऱ्या अंगात यायच्या. रिवाज मुजावर म्हणून विधी करण्यात येसबा मिरजे (संकपाळ), सहपुजारी म्हणून कृष्णात पोळ, आर. के. माने हे काम पाहायचे सध्या विजय ठमके, सर्जेराव टेकडे- पाटील हे मुजावर व पुजेचे काम करतात. मोहरम काळात कुदळ मारणे, संदल चढविणे, पंजे बांधणे, खतम म्हणणे सर्व रितीरिवाज करण्याचे काम ही मंडंळी करतात.
खत्तलरात्रीदिवशी खाई उधळण्याच्या विधीत या कुटुंबातील तरूणांचा पुढाकार असतो. याच दिवशी गावातील दर्ग्यात पंचेभेटीला वल्लीसो दर्ग्यातील पंजे मिरवणुकीने निघतात, सुरूवातीला चिंतामणी मिसाळ आणि धोंडीबा कोरवी त्यानंतर आनंदा गजरे (बुरूड) यांचे वादन असायचे दत्ता नांगरे यांनी धरलेल्या मशालीच्या उजेडात पंजे भेटीची मिरवणूक दिमाखात गावातील पंजे भेटीसाठी यायची नंतरच्या काळात हलगी, घुमक्याच्या ठेक्याच निघू लागली. सारा गाव पंजेभेटीची मिरवणूक पाहण्यासाठी यायचा. सर्व गाव भेदभाव, जातीभेद विसरून मोहरमच्या उत्सवात आनंदाने सामिल होतो. जाधव मळ्याशेजारी नाईक मळ्यातही जंगली साहेब पीर स्थानाची भोसले-नाईक यांच्या परिवारातील पूर्वीच्या पिढीतील प्रमुखांनी या पंज्याची प्रतिष्ठापना पूर्वीच्या काळी केली आहे.
वडणगेच्या गावगाड्यात एकेकाळी सुरू झालेल्या परंपरेत पंजे हे मुस्लीम धर्माचे किंवा अमूक पंथाचे आहेत म्हणून कधी कुणी आढेवेढे घेतले नाहीत तर कोणी येथे जातपात, धार्मिक तेढ पेरण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. हिंदू, मुस्लिम, दलित, मातंग, धनगर, बुरूड, चर्मकार यांच्यासह अठरापगड जाती, बारा बलुतेदार अनेक लोकांनी, तरूणांनी आपआपल्या परीने प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे हिंदू-मुस्लिम ऐक्य जपण्याचा आणि सामाजिक सलोखा कायमपणे टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. गाव कितीही बदलला, विस्तारला तरी वर्षानुवर्षे चाललेली ही मोहरमची हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा वडणगेतील आजच्या पिढीला नेहमीच मार्गदर्शन करत राहिल.