June 19, 2024
the-fate-of-24-lakh-neet-students-is-in-danger
Home » नीटच्या २४ लाख विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

नीटच्या २४ लाख विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात

‘नीट’चा घोळ, भावी डॉक्टरांचं आंदोलन आणि फेरपरीक्षेची मागणी यामुळे देशभरातील शैक्षणिक वातावरण पुरते ढवळून निघाले आहे .डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र त्यातच जर गैरप्रकार होत असतील तर त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. केवळ ग्रेस मार्कांची चौकशी करून सत्य बाहेर येणार नाही आणि विद्यार्थ्याना न्याय देखील मिळणार नाही.

नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चर्चा रंगलीय ती, या परीक्षेवर झालेल्या आरोपांची. एका परीक्षा केंद्रावरील ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले ? असा सवाल करत, देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. 

आयुष्यात कधीतरी गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून रुग्णांची सेवा करण्याचं स्वप्न बघणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या हातात आता निषेधाचे फलक आणि तोंडात जोरदार घोषणा आहेत. त्यांच्या या संतापाचं कारण आहे नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकराचं. नीट परीक्षेच्या निकालाच ६७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. निगेटिव्ह मार्किंग प्रणाली असताना पैकीच्या पैकी गुण कसे? ६७ पैकी ८ विद्यार्थी हरियाणातील एकाच केंद्रावरचे असल्याचे समोर आले आहे.

नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून आता राजकीय नेत्यांनीही जोरदार हल्लाबोल केलाय. ‘नीट’ प्रवेशपरीक्षेतील गैरकारभाराविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय शिक्षणाच्या ‘नीट’ या प्रवेशपरीक्षेमध्ये उत्तर भारतातील एका केंद्रातील विद्यार्थ्यांना वाढीव गुण देत उत्तीर्ण केल्याची घटना समोर आलीये. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून राज्यातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं कठीण होणार आहे.

नीट परीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्यातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कमी आणि परीक्षेतील गैरप्रकाराचीच चर्चा अधिक रंगली. आता यावरून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्टीकरण दिलंय. विद्यार्थ्यांच्या गुण मिळवण्याच्या क्षमतेत वाढ झाली. मार्क देण्याच्या पद्धतीतही मोठे बदल झाले. तिसरा पर्यायही निवडलेल्या विद्यार्थ्यांना गुण देण्याच्या पद्धतीमुळे जास्त गुण मिळाले.

मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची शक्यता निकालावरून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नीट परीक्षेत एवढे गुण मिळवणं शक्य आहे का? की यात कोणता मोठा घोटाळा झालाय का? 

खरंतर डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र त्यातच जर गैरप्रकार होत असतील तर त्याची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नीट पेपर फुटीमुळे 2४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्य धोक्यात आले आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( एम्स) केंद्रीय विद्यापीठासह शासकीय महाविद्यालय मध्ये एमबीबीएस, बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परिक्षा राष्ट्रीय परिक्षा एजन्सी मार्फत घेतल्या जातात. यात देशभरातून २४ लाख विद्यार्थीनी परिक्षा दिली होती. त्यांपैकी ५४७०३६ विद्यार्थी तर ७६९२२२ विद्यार्थीनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खाजगी अशा एकूण ५४९ महाविद्यालयांच्या ७८०३३ जागांसाठी प्रवेश दिला जातो. मात्र उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्र्यांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे.

२०१९ मध्ये फर्स्ट रँक मिळालेले देशात केवळ तीन विद्यार्थी होते यावर्षी पैकीच्या पैकी म्हणजे ७२० मार्क्स मिळवणारे तब्बल ६७ विद्यार्थी आहेत, त्यामुळे देशभरात गहजब माजला. अनेक सरकारी परिक्षेत पेपर फुटीच्या संदर्भात शिक्षा झालेला आरोपी विशाल चौरासिया या प्रकरणात संशयित आहे. यावेळी चक्क परिक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रकार घडला.

गोध्रामधील जयजलाराम हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. परशुराम रॉय, तुषार भट,आणि आरिफ वहोरा यांना अटक केल्याने पंचमहाल पोलिसांच्या तपासात १६ विद्यार्थी कडून प्रत्येकी सात लाख रुपये आगाऊ घेतल्याचे निष्पन्न झाले. देशांतील सोळा राज्यातून एक हजार कि. मी. अंतरावरील विद्यार्थी याच केंद्राची मागणी करतात हेच हेराफेरीच निदर्शक आहे.

नीट परिक्षेत ग्रेस मार्क्सचा नवा फंडा समोर आला आहे.अनेक केंद्रावर पेपर उशिरा वितरित करणेत आला. तो मुद्दामहून उशीरा वितरित करणेत आला असा काही पालकांचा आक्षेप आहे. अशा परिस्थितीत २० ते ६० मार्क्स विद्यार्थ्यांना सरसकट ग्रेस देण्यात आले. वेळ वाढवून देण्याऐवजी ग्रेस मार्क्स देण्याची अजब शक्कल लढविण्यात आली. काही विद्यार्थ्याना ७१८/७१९ मार्क्स दिले गेले. ज्यांना नीटमधील मार्किंग पद्धत माहीत आहे त्यांना हे मार्क्स नक्कीच अस्वाभाविक वाटतील. काही मोजक्या विद्यार्थ्याना ग्रेस मार्क देताना इतर प्रामाणिक, मेहनती विद्यार्थ्यांवर आपण अन्याय करतो हे आपल्या का लक्षात येतं नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या दिशा पांचाळ या निकालाचा संदर्भ दिला जातो.परंतु क्लाटची परिक्षा ऑन लाईन होती आणि त्यामध्ये संगणकाचे तांत्रिक मुद्दे अंतर्भूत होते. त्या निकालाचा या विषयाशी कोणताही संबंध नाही. पात्रता गुण ( कट ऑफ) १३७ ऐवजी १६४ करणेत आली. यामुळें मागील वर्षाच्या तुलनेत १ लाख ७० हजार विद्यार्थी वाढले. १५ एम्समध्ये १२०५ विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. सर्वसाधारणपणे ६५० गुण मिळवणाऱ्याला पूर्वी प्रवेश मिळत असे. यावर्षी ७०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार आहे.

आयुष्यात कधीतरी गळ्यात स्टेथास्कोप अडकवून रुग्णाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या हातात निषेधाचे फलक आणि तोंडात जोरदार घोषणा आहेत. नीट परीक्षेतील घोटाळा केवळ सहा केंद्राशी आणि १६०० विद्यार्थी यांचेपुरता मर्यादित आहे, अस म्हणणाऱ्या उच्च शिक्षण सचिव के संजय मूर्ती याना हात झटकता येणार नाही. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्याना न्याय मिळेल, अस म्हणण्यास वाव आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे, परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात आली असून २४ लाख विद्यार्थांचे भवितव्य डावावर लागले आहे.

ॲड विलास पाटणे
उपाध्यक्ष, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी.

Related posts

मध्य भारतासाठी शिफारस केलेल्या एनआरसी -१३० या वाणाचे कणेरी मठावर बिजोत्पादन

मी एक बाप आहे

प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव करण्याचे आवाहन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406