November 22, 2024
necessary to preserve this rare coin to preserve the glorious history
Home » गौरवशाली इतिहास जपण्यासाठी ही दुर्मिळ नाणे जपणे आवश्यक
काय चाललयं अवतीभवती

गौरवशाली इतिहास जपण्यासाठी ही दुर्मिळ नाणे जपणे आवश्यक

  • राज्यपालांच्या हस्ते भारतीय गणराज्यातील चलनी नाणी या विषयावरील पुस्तक प्रकाशित 
  • देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी दुर्मिळ नाणी जपणे आवश्यक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


भारताचा इतिहास केवळ गुलामगिरीचा नाही. तर आपला इतिहास अतिशय जाज्वल्य आणि वैभवशाली आहे. प्रत्येक कालखंडात आपण परकीय आक्रमकांना धैर्याने लढा दिला आहे. इतिहासाच्या विविध कालखंडांमध्ये वापरली गेलेली नाणी हे त्या इतिहासाचा पुरावा आहे. त्यामुळे देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी ही दुर्मिळ नाणे जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 

नाणेशास्त्र विषयातील तज्ज्ञ व लेखक डॉ दिलीप राजगोर लिखित ‘रिपब्लिक कॉन्स ऑफ इंडिया’ (भारतीय गणराज्यातील नाणी) या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २७) राजभवन मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व नाणे संग्राहक दिनेशभाई मोदी, हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष व नाणे संग्राहक पॉल अब्राहम तसेच अनेक नाणेशास्त्र विषयातील अभ्यासक उपस्थित होते. 

जो इतिहास विसरतो त्याला भविष्य देखील विसरते असे सांगून जुनी नाणी इतिहासाची महत्वपूर्ण कडी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. लेखक डॉ दिलीप राजगोर यांनी नाण्यांच्या विश्वात मोठे संशोधन करुन भारत गणराज्य निर्मितीनंतरच्या नाण्यांची अभ्यासपूर्ण माहिती पुढे आणल्याबद्दरला राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. गणराज्याची नाणी हे पुस्तक युवकांकरिता प्रेरणास्रोत व अभ्यासकांकरिता मैलाचा दगड सिद्ध होईल असे त्यांनी सांगितले. 

भारत गणराज्य झाल्यानंतर विविध टांकसाळींमध्ये घडवल्या गेलेल्या नाण्यांनी देशाची एकात्मता बळकट केली गेली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ दिनेशभाई मोदी यांनी केले. 

नाण्यांमध्ये वापरली गेलेली चिन्हे व डिझाइन्स देशातील विविध धर्मांचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे ही नाणी देशातील विविध धर्म पंथांच्या लोकांना जोडण्यास सहाय्यक ठरली आहेत असे त्यांनी सांगितले.  डॉ दिलीप राजगोर हे केवळ नाणेशास्त्र तज्ज्ञ नसून त्यांनी ब्राह्मी, प्राकृत व उर्दू भाषेचे देखील अध्ययन केल्यामुळे त्यांचे पुस्तक संग्रहणीय असल्याचे त्यांनी सांगितले. 

जुनी नाणी जमवणे ही केवळ छंद नसून आपला इतिहास जाणून घेण्याचे एकमात्र माध्यम असल्याचे नाणे संग्राहक व हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम यांनी सांगितले. नाणे जमा करणे सोपे काम आहे परंतु त्याबद्दल ऐतिहासिक पुराव्यांसह लिहिणे कठीण काम असून त्यासाठी मोठे धैर्य लागते असे त्यांनी सांगितले. नाणी म्हणजे केवळ चलन नसून त्यात निहित सौंदर्य व इतिहास आहे, असे अब्राहम यांनी सांगितले. 

रिपब्लिक कॉईन्स ऑफ इंडिया या पुस्तकात सन 1947 ते 2022 या काळात देशात चलनात आलेल्या सर्व नाण्यांची संदर्भासह अभ्यासपूर्ण  माहिती आहे. यापूर्वी ‘सल्तनत कॉईन्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक देखील प्रकाशित केले असल्याचे डॉ दिलीप राजगोर यांनी सांगितले. 

यावेळी राजगोर यांनी राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘शिवराय’ हे नाणे भेट दिली. 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading