गवा या प्राण्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. यासाठी या प्राण्याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. गवा आकाराने मोठा असल्याने त्याला अन्य प्राणी त्रास देत नाहीत. मानवापासूनच त्यांना सर्वाधिक त्रास होतो. हे टाळण्यासाठी गवा हा प्राणी समजावा या उद्देशाने मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी गव्याबद्दल सांगितलेले मुद्दे जरूर विचारात घ्या अन् गव्याच्या संवर्धनासाठी सहभागी व्हा…
- गव्याच्या प्रचंड आकारामुळे माणसाला भीती वाटू शकते पण गवा मात्र लाजाळू असतो. गवत, पानं खाऊन जगतो.
- गवा प्राण्याचे शरीर लालसर ते तपकिरी कोटाने झाकलेले असते. वय वाढत जाईल तसे हा कोट काळा होत जातो. मादी व पिल्लांचा रंग नर गव्याच्या रंगा पेक्षा थोडा फिकट असतो.
- गवा हा आपल्या राज्यात आढळणाऱ्या खुर धारी प्राण्यात सर्वात मोठा प्राणी आहे. पूर्ण वाढ झालेल्या गव्याचे वजन 9०० ते २२०० किलो दरम्यान असते. त्यांची लांबी ८ ते ११ फूट आणि खांद्याच्या उंचीवर ५ ते ७ फूट पर्यंत पोहोचू शकते.
- गव्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाचा मोठा ठिपका असतो, मोठे कान हे त्यांच्या डोक्यावर आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. शिंगचे टोक हे पिवळसर पांढरे असते.
- गवा हे प्रामुख्याने सकाळी लवकर आणि दुपारी उशिरा सक्रिय असतात. मानवाच्या जवळच्या भागात, गवा आपली सामान्य दिनचर्या बदलू शकतात आणि निशाचर प्राणी बनू शकतात (रात्री सक्रिय).
- त्यांच्या मोठ्या आकारामुळे, गवा प्राण्याला खूप शत्रू नसतात. (मनुष्यांव्यतिरिक्त)
- गवा हा शाकाहारी प्राणी आहे. (वनस्पती खाणारे). त्यांच्या आहारात गवत, पाने, कोंब आणि फळे असतात.
- गवा सामान्यत: गटात (कळप) राहतात. या गटांमध्ये एक प्रबळ नर आणि मादी असतात. चुकून कळपातून भरकटले तर ते शेतातून वाट काढत फिरताना आढळतात.
- गवा हा प्रादेशिक प्राणी आहे. एका गटाला सुमारे ३० चौरस मैलांचा प्रदेश आवश्यक आहे.
- गवा संवादासाठी विविध प्रकारचे आवाज तयार करतात.
- नर आणि मादी दोघांनाही वरच्या दिशेने वक्र शिंगे असतात. त्यांची लांबी सर्व साधारण ४५ इंच असते. त्यांच्या शरीरात अफाट स्नायूंची बांधणी आणि दणकट शरीराचा आकार असतो.
- गव्याला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे पायांचा रंग. पायात मोजे घालावे तसा हा रंग असतो. त्याला स्टॉकिंग्ज म्हणतात. हा रंग गव्याला म्हशींपासून वेगळा करतो.
- गवे सहसा माणसांवर हल्ले चढवत नाहीत. गव्यांमध्ये आपापसात मारामारी होतात पण मुद्दाम त्यांनी माणसावर हल्ला केला असं होत नाही.
- आवाज व माणसांच्या गर्दीमुळे गवे बिथरून/घाबरुन पळून जातात , जर वाट मिळाली नाही तर हल्ले सुद्धा करतात, तरी सर्वांनी काळजी घेणे गरजेच आहे.
राजकिय फुलबाज्या…