September 24, 2023
Home » पाटण ची “राणी ची वाव” आणि मोढेरा चे “सूर्य मंदिर”
पर्यटन

पाटण ची “राणी ची वाव” आणि मोढेरा चे “सूर्य मंदिर”

दिवाळीच्या सुट्टीत अहमदाबादला मामाला भेटायला जाऊयात असा विचार अगदी दोन आठवड्यांपूर्वी मनात आला. एवढ्या कमी वेळात ट्रेनची तिकीटे मिळणे अशक्यच होते. दिवाळी संगमनेरात असल्याने, विमानाने जायचे म्हटले तरी परत पुण्याला जायचा कंटाळा येत होता. मग काय, कारनेच संगमनेर – अहमदाबाद प्रवास करावा हे ठरवून टाकले. 

जवळपास दरवर्षी किंवा निदान वर्षाआड तरी अहमदाबाद चक्कर ठरलेली असते. पण इतक्या वेळा येऊनही तशी जवळच असलेली मेहसाणा जवळची पाटण ची “राणी ची वाव” आणि मोढेरा चे “सूर्य मंदिर” बघायचा योग अजूनपर्यंत काही आलेला नव्हता. मागच्या वेळी कार घेऊन आलो त्यावेळी उदयपूरला जाऊन आलो होतो. त्यामुळे यावेळी बऱ्याच वर्षांपासून डोक्यात असलेल्या या दोन्ही ठिकाणांना भेट द्यायची हे आधीच निश्चित केले होते. 

संगमनेरात दिवाळी साजरी करुन भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही अहमदाबाद प्रवासाला सुरुवात केली. नाशिक – पेठ- धरमपूर मार्गे आयुष्यात पहिल्यांदाच येणार होतो. त्यामुळे थोडी धाकधूक होती, पण मधला फक्त ४०-५० किमी चा पॅच सोडला तर रस्ता एकदम मस्त होता. चांगला रस्ता आणि अतिशय तुरळक गर्दी यामुळे चक्क विक्रमी अशा नऊ तासात आम्ही अहमदाबादला पोहोचलो देखील. मामाला भेटून आणि तो दिवस आराम करुन, दुसऱ्या दिवशी सकाळीच या दोन्ही ठिकाणांना जायला निघालो. दोन्ही ठिकाणे तशी एका वाटेवरच असल्याने, माझे निम्मे काम सोपे झाले होते. जागतिक वारसा ठिकाणे असल्याने गुगळे मॅप्स वर पण दोन्ही ठिकाणे व्यवस्थित दिसत होती. त्यामुळे काहीही अडचण न येता अडीच तासात आम्ही पाटण ला पोहोचलो देखील. 

पाटण ची “राणी ची वाव/ विहीर” 

“वाव” म्हणजे विहीर. अहमदाबाद जवळच अडालज ला असलेली अशीच एक विहीर दोन तीनदा बघायचा योग आला होता. पण त्यापेक्षा मोठी असलेली ही पाटण ची विहीर बघायची राहिली होती. सरस्वती नदीच्या तीरावर असलेल्या ह्या ऐतिहासिक वास्तूला २०१४ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये सामील केले आणि ही अजूनच प्रकाशझोतात आली. 

पाटण ही गुजरातची पहिली राजधानी. चावडा साम्राज्यानंतर आलेल्या सोलंकी साम्राज्याच्या काळात ही बनविण्यात आली होती. १०व्या शतकात बनविण्यात आलेली ही विहीर सोलंकी वंशाची भव्यता दर्शविते. ह्या विहीरीची निर्मिती राणी उदयमती हीने सर्व लोकांच्या विरोधात जात आपल्या पतीच्या राजा भीमदेव यांच्या स्मरणार्थ केली होती. गुजराती भाषेत विहीरीला ‘बाव’ असे म्हटले जाते, म्हणून ह्याचे नाव ‘रानी की वाव’ म्हणजेच ‘राणी ची विहीर’ असं पडलं.

ह्या सात मजली विहीरीची उंची ६४ मीटर, रुंदी २० मीटर आणि खोली २७ मीटर आहे. विहीरीच्या खाली एक लहान दरवाजा आहे, ज्याच्या आतून ३० किलोमीटर एवढे लांब एक भुयार आहे. पण सध्या ते माती आणि दगडांनी बंद करण्यात आले आहे. आपल्या सनातन धर्मात, तहानलेल्याला पाणी पाजणे आणि उपाशी माणसाला जेवण देणे हे सर्वात पवित्र कार्य मानले जाते. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गुजरात- राजस्थान मध्ये पूर्वीच्या राजा- महाराजांनी जागो जागी अशा विहिरींची योजना केलेली होती. ही विहीर तर तहानलेल्याला पाणी पाजण्याबरोबरच राणीच्या राजाप्रती असलेल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून बांधली गेलेली आहे. ही संपूर्ण विहीर, शिल्पकलेच्या दृष्टीनेही अतिशय समृद्ध आहे. ह्या विहीरीमध्ये अनेक अप्रतिम कलाकृती, तसेच विष्णूचे दशावतार अगदी सुंदर रुपात आपल्याला या ठिकाणी बघता येतात. त्याचबरोबर या विहीरीच्या भिंतींवर देखील भगवान राम, वामनावतार, महिषासुरमर्दिनी, कल्की अवतार आणि भगवान विष्णू ह्यांच्या विविध अवतारांचे चित्रण आहे.

वास्तुकलेच्या दृष्टीने ह्या विहीरीची निर्मिती ही “मारू-गुर्जरा” आर्किटेक्चर स्टाईलने करण्यात आली आहे. राणीच्या विहीरीच्या आत एक मंदिर आणि पायऱ्यांचे सात स्तर आपल्याला बघायला मिळतात. ज्यामध्ये १५०० पेक्षा जास्त नक्षीदार मुर्त्या कोरलेल्या आहेत. ९०० वर्ष जुन्या ह्या विहीरीची सुंदरता आणि भव्यता बघून कुणीही आश्चर्यचकित होऊन जाईल. आपल्या १०० रुपयांच्या नवीन नोटेवर अप्रतिम अशा या ‘रानी की वाव’ ला एकदम मानाचे स्थान मिळालेले आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ताजमहाल च्या आधी बांधल्या गेलेल्या या प्रेमाच्या प्रतिकाला नक्कीच भेट द्यायला हवी.

मोढेरा चे सूर्य मंदिर

राणी की वाव बघून आम्ही पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या मोढेराकडे निघालो. भारतात तीन महत्त्वाची सूर्य मंदिरे आहेत, पहिलं ओडीसा येथील कोणार्क मंदिर, दुसरं जम्मू येथील मार्तंड मंदिर आणि तिसरं म्हणजे गुजरातच्या मोढेरा येथील सूर्य मंदिर. या सूर्य मंदिराचे स्वतःचे एक ऐतिहासिक महत्व देखील आहे.

पुष्पावती नदीच्या तीरावर असलेले हे सूर्य मंदिर विलक्षण वास्तुकला आणि शिल्पकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंदिराच्या बांधकामात कुठेही चुन्याचा उपयोग केलेला आढळत नाही. इराणी शैलीचा वापर करून बनविण्यात आलेल्या या मंदिराला सोलंकी वंशाच्या राजा भीमदेव पहिला यांनी इ.स. १०२६ मध्ये बनविले होते. हे मंदिर दोन भागांत बनविण्यात आले होते. ज्यात पहिला भाग गर्भगृहाचा तर दुसरा सभामंडपाचा होता. गर्भगृहाची आतील लांबी ही ५१ फुट,९ इंच आणि रुंदी २५ फुट, ८ इंच आहे. सभामंडपात ५२ स्तंभ आहेत. या स्तंभांवर वेगवेगळ्या देवी-देवतांची चित्रं आहेत, त्याव्यतिरिक्त रामायण आणि महाभारतातील प्रसंगांना देखील उत्कृष्ट रितीने दर्शविण्यात आले आहे. 

या स्तंभांना खालच्या दिशने बघितल्यास ते अष्टकोनी दिसतात तर वरच्या बाजूने बघितल्यास ते गोलाकार दिसतात. या मंदिराला अशा पद्धतीने बनविण्यात आले होते की, सूर्योदय झाल्यावर सूर्याची पहिली किरणे ही गर्भगृहाला प्रकाशमान करतील. सभामंडपाच्या समोर एक विशाल कुंड आहे जे सूर्यकुंड किंवा रामकुंड या नावाने प्रसिद्ध आहे.

सोलंकी राजा सुर्यवंशी होते आणि ते सूर्य देवाला कुलदेवता म्हणून पुजत असत. म्हणून त्यांनी त्यांच्या आराध्य देवाच्या पूजेसाठी एक भव्य मंदिर बांधायचा विचार केला आणि त्यातूनच मोढेराचे हे सूर्य मंदिर साकारण्यात आले. दुर्दैवाने अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याने मंदिरातील मुर्त्या देखील तोडल्या, म्हणून आता या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे. या सूर्य मंदिराचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये देखील करण्यात आला आहे. जसे स्कंद पुराण आणि ब्रह्म पुराण. ज्यात सांगितले गेले आहे की, प्राचीन काळात मोढेराच्या आसपासचे संपूर्ण क्षेत्र हे धर्मरण्य नावाने ओळखले जायचे. पौराणिक कथांनुसार हे देखील सांगितले जाते की, जेव्हा भगवान श्री राम यांनी रावणाचा वध केल्यानंतर त्यांचे गुरु वसिष्ठ यांना एक असे स्थान विचारले की जिथे जाऊन ते आत्मशुद्धी करू शकतील आणि ब्रह्म हत्येच्या पापातून मुक्ती मिळवू शकतील, तेव्हा वसिष्ठ मुनींनी त्यांना येथे येण्याचे सुचवले होते.

अशा या अतिशय पवित्र स्थानालाही, सगळ्यांनी न चुकता एकदा तरी जाऊन यायलाच पाहिजे. “अतुल्य भारत” ची साक्ष देणारी अशी अनेक ठिकाणे, भारतात जागोजागी आहेत. पण ताजमहाल आणि कुतुबमिनार च्या पलीकडेही बघण्यासारखी आणि आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख दर्शवणारीह खूप ठिकाणे आहेत हे आत्ता कुठे आपल्याला समजायला लागलय.

– हृषीकेश

Related posts

चक्क बर्फाच्या हॉटेलमध्येच मुक्काम ! (व्हिडिओ)

निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी

अंटार्टिका दर्शन…

Leave a Comment