December 12, 2024
To save Earth article by Vilas Shinde
Home » पृथ्वीवर असा आघात होऊ नये यासाठी एक उठाठेव
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वीवर असा आघात होऊ नये यासाठी एक उठाठेव

माणूस मरणाला घाबरतो, हेच खरं. ‘जन्म मिळाला, म्हणजे मरण निश्चित’, हे माहीत असूनही केवळ अवकाशातील अपघातात मरण येऊ नये, म्हणून ही आणखी एक उठाठेव केली आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे

मानवाने जंगले नष्ट करून वन्यप्राण्यांचे जगणे अवघड केले. झाडांना तोडून पक्ष्यांना बेघर करत, स्वत:ची घरे बनवली. शहरे निर्माण केली, कारखाने उभारले. नद्यांवर तलाव बांधले. जीवनदायिनी नद्या मृत्यूदायिनी बनवल्या. मानवाचा निसर्गात हस्तक्षेप वाढल्याने पाऊस अनियमीत झाला. अचानक वादळे येणे, थंडीच्या दिवसात उकाडा आणि उन्हाळ्याच्या दिवसात थंडी येते. यावर्षी नाहीतरी ‘ऑक्टोबर हिट’ जाणवलीच नाही. पृथ्वीवरील निसर्गातील मानवी हस्तक्षेपाचे, परिणाम आता दृश्यरूपात दिसत आहेत. याची तिव्रता आणखी वाढेल, अशी चिंता पर्यावरण अभ्यासक व्यक्त करतात. त्यांच्या अंदाजानुसारच घटना घडताहेत. हे एकिकडे सुरू असतानाच माणसाने आपल्या हस्तक्षेपाची कक्षा आणखी वाढवली आहे. हा हस्तक्षेप वैश्विक पातळीवर पोहोचला आहे. पृथ्वीवर धडकण्यासाठी एखादी उल्का, लघुग्रह, धुमकेतू जर येऊ लागला, तर त्याला अडवण्याच्या तंत्राची यशस्वी चाचणी नुकतीच पार पडली. वैज्ञानिकांनी चाचणी यशस्वी होताच जल्लोष केला. प्रयोगातून अपेक्षीत केलेले यश प्राप्त झाल्याने, ते स्वाभाविकही होते.

अमेरिकन अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने ‘डार्ट’ नावाने मोहीम आखली होती. अवकाशातून येणाऱ्या उल्कापातातून ‘लोणार’ सरोवराची निर्मिती झाली. साठ लाख वर्षांपूर्वी, एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला. त्यातून मोठा खड्डा पडला. आकाराने सर्वात मोठा प्राणी, डायनॉसॉर प्रजाती त्यामध्ये नष्ट झाली. १९०८ मध्ये रशियामधील तुंगुस्कामध्ये मोठा अशनी आदळला. त्यामुळे २००० चौरस किलोमीटर क्षेत्रावरील जंगल जळून गेले. २०१३ मध्येही रशियामध्ये पडलेल्या अशनीमुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले. वारंवार असा एखादा उपग्रह किंवा अशनी पृथ्वीवर येऊन आदळून विनाश होणार, अशा बातम्या येतात.

कोणतीही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आली, तर ती भूपृष्ठाकडे येते, हे न्यूटनने सांगितले. त्यानंतर मानवाने अवकाश संशोधनामध्ये मोठी भरारी घेतली. गुरुत्वाकर्षणाची कक्षा ओलांडून उपग्रह पाठवण्याचे तंत्र विकसीत केले. पुढचा टप्पा चंद्र ठरला. चंद्रावर यान पाठवले. पुढे मंगळ, शुक्र आणि अगदी सौरवादळांचा अभ्यास करण्यासाठी सूर्यापर्यंत यांने पाठवली. मात्र त्या उलट घडू शकते. पृथ्वीच्या कक्षेत येऊन काही आदळू शकते. त्यामुळे असा एखादा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरला, तर तो गुरुत्वाकर्षणामुळे भूपृष्ठाकडे येणार. तो जर नागरी वस्तीवर आदळला, तर मोठी जिवीत आणि मालमत्तेची हानी करणार. हे ओळखून अशी आपत्ती पृथ्वीवर आली, तर ती टाळण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली.

असा एखादा लघुग्रह पृथ्वीकडे येऊ लागला, तर त्याला अवकाशात नष्ट करणे किंवा त्याची दिशा बदलण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. यासाठी अंतराळातील ‘डायमॉर्फस’ लघुग्रहाची निवड केली. डायमॉर्फस पृथ्वीपासून अकरा दशलक्ष किलोमीटर दूर होता. तो पृथ्वीवर येऊन आदळण्याची कोणतीही शक्यता नव्हती. तो केवळ १६० मीटर लांबीचा होता. खरं तर, पृथ्वीचा उपग्रह जसा चंद्र आहे, त्याप्रमाणे अवकाशातील ‘डिडिमस’ लघुग्रहाचा तो चंद्र. त्याला निशाणा बनवण्याचे निश्चित करण्यात आले. केवळ भविष्यात अशी आपत्ती आली, तर आपणास ती दूर करता येऊ शकते का? याची खातरजमा करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. डार्ट नावाचे अंतराळ यान अवकाशात पाठवण्यात आले. ते निरूपद्रवी डायमॉर्फसच्या डोक्याकडील बाजूला ताशी २२,५०० किलोमीटर वेगाने आदळवण्यात आले. लघुग्रहाचे अनेक तुकडे हजारो किलोमीटर अवकाशात पसरले. या आघाताने या लघुग्रहाचा कक्षाक्रमणाचा काळ रोज काही मिनीटांनी बदलेल आणि त्याचा वेगही कमी होईल. याचे परिणाम सहा ते सात आठवड्यात दिसून येणार आहेत. डार्ट यांनावर बसवलेल्या कॅमेऱ्यातून धडकेची छायाचित्रे घेण्यात आली. कॅमेऱ्याने टक्कर होतानाचे चित्रणही पाठवले. ते सर्वांनी लाईव्ह पाहिले आणि जल्लोष केला. या मोहिमेवर २५०० कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

आतापर्यंत हा प्रयोग नियोजनबरहुकूम पार पडला आहे. नासाच्या या शाखेच्या प्रमुख लोरी ग्लेझ यांच्या म्हणण्यानुसार, ‘मानवाने एका नव्या पर्वात पाऊल ठेवले आहे. मानव आणखी सक्षम झाला आहे. बाहेरच्या जगातून एखादा लघुग्रह किंवा विनाशकारी गोष्टीपासून आपण आपलं संरक्षण करू शकतो, हेच खूप आनंददायी आहे’. त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य निश्चित आहे. मात्र मूळ प्रश्न राहतो तो हाच, की खरंच या प्रयोगाची गरज होती?

नासाच्याच संशोधनानुसार, लक्षणीय विनाश घडवून आणेल असा २५ मीटर लांबीचा अशनी किंवा लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळण्याची शक्यता शंभर वर्षांतून एकदा आहे. त्यापेक्षा जास्त विनाशकारी दिडशे मीटर लांबीचा लघुग्रह आदळण्याची शक्यता वीस हजार वर्षांतून एकदा, तर दहा हजार मीटर लांबीचा लघुग्रह आदळण्याची शक्यता शंभर ते दोनशे दशलक्ष वर्षातून एकदा आहे. पण ही शक्यता कधीही येऊ शकते. त्यासाठी आपण तयार असले पाहिजे, या हेतूने हा प्रयोग महत्त्वाचा मानला जातो. नासाप्रमाणेच युरोपियन अंतराळ संशोधन संस्थाही यावर संशोधन करत आहे. केवळ मानवच नव्हे, तर इतर प्राण्यांचे, वनस्पतींचेही यातून रक्षण होईल, असे अवकाश संशोधक म्हणतात.

मानवाने स्वत:च्या रक्षणासाठी केलेल्या प्रयोगातून तो डायनॉसॅारसारखी प्रजाती नष्ट होणार नाही, असे सांगत आहेत. मात्र हा मोठेपणाचा घेण्याचा भाग आहे. आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली अनेक प्रजाती नष्ट करत आहे. जंगले संपवत आहे. त्याबद्दल एक शब्द बोलत नाहीत. पृथ्वीवर असा आघात झाल्यानंतर जीवसृष्टीच्या नुकसानीपेक्षा, मानवी जीवनाला हानी पोहोचू नये, आघातात आपला बळी जाऊ नये, याची जास्त चिंता आहे. माणूस मरणाला घाबरतो, हेच खरं. ‘जन्म मिळाला, म्हणजे मरण निश्चित’, हे माहीत असूनही केवळ अवकाशातील अपघातात मरण येऊ नये, म्हणून ही आणखी एक उठाठेव केली आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading