June 7, 2023
Centres promotion of export of coarse cereals and its value added products
Home » भरड धान्ये अन् त्याच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला केंद्राचे प्रोत्साहन
काय चाललयं अवतीभवती

भरड धान्ये अन् त्याच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला केंद्राचे प्रोत्साहन

भरड धान्ये तसेच त्यांच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कृती योजना तयार केली

पोषक धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण या मंत्रालयाच्या प्रमुख कृषी निर्यात प्रोत्साहन संस्थेच्या माध्यमातून भारतीय भरड धान्यांच्या निर्यातीला जगभरात अधिक प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरेल असे व्यापक धोरण तयार केले आहे.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या प्रस्तावाला 72 देशांनी पाठींबा दिल्यानंतर, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाईल अशी घोषणा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 5 मार्च 2021रोजी केली. त्या पार्श्वभूमीवर देखील सरकारचा हा भरड धान्ये निर्यात प्रोत्साहन कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

  • वर्ष 2021-22 मध्ये भारतातून 34.32 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीच्या भरड धान्यांची निर्यात झाली.
  • संयुक्त राष्ट्रांतर्फे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे होणार आहे त्यासोबतच केंद्र सरकारतर्फे भरड धान्यांच्या निर्यातीला अधिक प्रोत्साहन दिले जाते.
  • भारतीय भरड धान्ये आणि त्यांची मूल्यवर्धित उत्पादने जगभरात लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
  • भारतीय भरड धान्यांचे ब्रँडीग आणि जाहिरात याची जबाबदारी परदेशातील भारतीय दुतावासाकडे देण्यात येणार आहे

भारतीय भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 16 आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शने तसेच खरेदीदार-विक्रेता भेटींच्या माध्यमातून निर्यातदार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा सहभाग वाढविण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे.

भरड धान्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या मजबूत नीतीनुसार, परदेशातील भारतीय दुतावासाकडे  भारतीय भरड धान्यांचे ब्रँडीग आणि जाहिरात याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच विक्रेता ते विक्रेता बैठका आयोजित करणे तसेच थेट भागीदारीसाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेफ तसेच डिपार्टमेंटल स्टोर्स, सुपरमार्केट्स यांसारखे सक्षम खरेदीदार निश्चित करणे असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

त्याचबरोबर, ‘ रेडी टू इट अर्थात लगेच खाता येतील अशी त्या प्रकारच्या भरड धान्य उत्पादनांसह भरड धान्यांवर आधारित विविध उत्पादनांचे प्रदर्शन पाहण्यासाठी तसेच विक्रेता ते विक्रेता बैठकांचे आयोजन करणे सुलभ व्हावे यासाठी लक्ष्यीत देशांतील भारतातील राजदूत तसेच सक्षम आयातदार यांना आमंत्रित करण्यात येईल.

भारतीय भरड धान्यांच्या वापरला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अपेडाने  गल्फुड 2023, फुडेक्स,सेऊल फूड अँड हॉटेल शो इत्यादी जागतिक पातळीवरील मंचांवर भरड धान्ये आणि त्यांच्या मूल्यवर्धित उत्पादनांचे प्रदर्शन करण्याची योजना आखली आहे.

भारत हा जगातील भरड धान्ये उत्पादक देशांपैकी एक प्रमुख देश आहे आणि जगात उत्पादित होणाऱ्या एकूण भरड धान्यांपैकी 41% उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात वर्ष 2021-22 मध्ये आधीच्या वर्षीपेक्षा 27% अधिक भरड धान्य उत्पादन झाले. भारतात राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भरड धान्यांचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र देशातील एकूण भरड धान्य उत्पादनापैकी केवळ 1% भरड धान्यांची निर्यात होते. देशात सध्या 9 अब्ज डॉलर्स मुल्याचा भरड धान्य बाजार आता अधिक जोर पकडणार असून वर्ष 2025 पर्यंत तो 12 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

अन्न उत्पादक संघटना, स्टार्ट-अप्स, निर्यातदार, भरड धान्यांवर आधारित मूल्यवर्धित अन्न उत्पादनांचे उत्पादक यांसारख्या पुरवठा साखळीतील महत्त्वाच्या भागधारकांच्या सहभागासह 5 डिसेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 उत्सव उद्घाटन-पूर्व कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे.

भारतीय भरड धान्य आणि त्यापासून बनणाऱ्या पोषण-मूल्यवर्धित उत्पादनांच्या जाहिरातीसाठी केंद्रसरकारने प्रत्येक लक्ष्यित देशासाठी 30 ई-माहिती पुस्तिका तयार केल्या आहेत. यामध्ये निर्यातीसाठी उपलब्ध असलेली भारतामधील विविध प्रकारची भरड धान्ये आणि त्यापासून बनणाऱ्या पोषण-मूल्यवर्धित उत्पादनांची माहिती, सक्रीय निर्यातदार, स्टार्ट-अप्स, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि आयातदार/किरकोळ विक्रेत्यांची साखळी/हायपर लिंक बाजार वगैरे याबाबतची माहिती उपलब्ध असेल. या माहिती पुस्तिका परदेशातील भारतीय दूतावास, आयातदार, निर्यातदार, स्टार्ट-अप्स आणि अन्य भागधारकांपर्यंत  प्रसारित केली जाईल.

नूडल्स, पास्ता, न्याहारीसाठी सिरियल्स, बिस्किटे, कुकीज, मधल्या वेळी खायचे तयार पदार्थ, मिठाई यासारख्या इ.रेडी टू इट (आरटीई) आणि रेडी टू सर्व्ह (आरटीएस) श्रेणीमधील पोषण-मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार स्टार्ट-अप्सना देखील एकत्रित करत आहे.

भरड धन्यांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्रसरकारच्या धोरणाचा भाग म्हणून, भरड धान्यांचे ब्रँडिंग आणि प्रचारासाठी वेगळा विभाग स्थापन करण्यासाठी, लुलू ग्रुप, कॅरेफोर, अल जझिरा, अल माया, वॉलमार्ट यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय रिटेल सुपर मार्केट्सशी सहयोग साधला जाणार आहे.

अपेडाने (APEDA) आपल्या वेबसाइटवर भरड धन्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे आणि भागधारकांच्या माहितीसाठी देश-निहाय आणि राज्य-निहाय ई-माहिती पुस्तिका  अपलोड केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरड धान्ये आणि संबंधित पोषण-मूल्यवर्धित उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आयसीएआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च (आयआयएमआर), हैदराबाद, आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद, सीएसआयआर-सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएफटीआरआय), म्हैसूर आणि शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) यांच्या सहयोगाने पंचवार्षिक धोरणात्मक योजना तयार करायला सुरुवात केली आहे.   

केंद्रसरकारने बाजरी आणि अन्य भरड धान्यांसह संभाव्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आणि पोषणमूल्ययुक्त तृणधान्यांच्या (न्यूट्री सिरियल्स) पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्यासाठी न्यूट्री सिरियल्स निर्यात मंचाची स्थापना केली आहे. भारतामधून संयुक्त अरब अमिरात (U.A.E), नेपाळ, सौदी अरेबिया, लिबिया, ओमान, इजिप्त, ट्युनिशिया, येमेन, यु.के. (U.K) आणि युएसए (U.S.A) या प्रमुख देशांमध्ये भरड धान्ये निर्यात होतात. बाजरी, नाचणी, कांगणी ,राळे, वरी, राजगिरा ज्वारी आणि कुट्टू (बकव्हीट) हे भारतामधून निर्यात होणार्‍या भरड धान्यांचे विविध प्रकार आहेत.

इंडोनेशिया, बेल्जियम, जपान, जर्मनी, मेक्सिको, इटली, यू.एस.ए., युनायटेड किंगडम, ब्राझील आणि नेदरलँड हे जगातील प्रमुख भरड धान्ये आयात करणारे देश आहेत. भरड धान्यांच्या 16 प्रमुख प्रकारांचे उत्पादन आणि निर्यात होते. यामध्ये सोरगम (ज्वारी),  बाजरी, फिंगर मिलेट (नाचणी), मायनर मिलेट (कांगणी), प्रोसो मिलेट (चीना), कोडो मिलेट (कोडो), बार्नयार्ड मिलेट (वरी/सांवा/साणवा/झांगोरा), लिटिल मिलेट (कुटकी), टू स्युडो मिलेट  (बकव्हीट/कुट्टू), अमेरॅन्थस (राजगिरा ) आणि ब्राऊन टॉप मिलेट आदी भरड धान्यांचा  समावेश आहे.

अपेडाने पोषणमूल्य वर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी आयआयएमआर बरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. अपेडाने ‘आहार खाद्य मेळा’, या आशियामधील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय बी2बी (B2B) खाद्य आणि आदरातिथ्य मेळ्या दरम्यान सर्व वयोगटांसाठी, परवडण्याजोगी 5 ते 15 रुपये किमतीची विविध प्रकारची भरड धान्ये प्रदर्शित(लाँच) केली आहेत.

Related posts

शो मस्ट गो ऑन…

Navratri Biodiversity Theme : निळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…

भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’

Leave a Comment