‘मी का लिहिते?’ या पुढील प्रकरणात, लेखिका म्हणते, ‘लिहिणं, व्यक्त होणं ही माझी शालेय वयापासूनची श्वासाइतकी प्राथमिक गरज आहे. ती जगण्याचं एक उद्दिष्टच बनली.’ ललित, कल्पनारम्य लेखनाची लेखिकेला आवड नाही. ती म्हणते, ’माझा पिंड वैचारिक, सामाजिक लेखनाचा.’ ‘ निर्वासित ’ हे त्यांचे आत्मकथन, याच दृष्टीकोनातून लिहिले आहे.
उज्ज्वला केळकर मो. – 8369252454
‘ निर्वासित ’ हे डॉ. उषा रामवाणी यांचे आत्मकथन. त्यांच्या जीवन-संघर्षाची कहाणी. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. राजेंद्र बर्वे (मानसोपचार तज्ज्ञ) लिहिताता, ‘हे आत्मकथन वाचनीय, प्रांजळ आहे. यात उषाच्या ‘धाडस करण्याला हाक देऊ आणि पुढे जाऊ’ या वृत्तीचा परिचय येतो. अंगावर कोसळलेले प्रसंग धाडसाने टिपताना आणि त्यातून मार्ग काढण्याची पायरी ओलांडताना त्यांना पदोपदी झगडावं लागलं. प्रस्थापित जीवनशैली झुगारून आत्मशोधनाचं धाडस ही त्यांची या आत्मकथनाचा ‘हीरो’ म्हणून प्रमुख भूमिका.’ ते पुढे लिहितात, ‘आत्मकथा म्हणजे, आपल्याला समजलेल्या जीवनातील, स्वत:ला भावलेल्या अनुभवांचं कथन असतं.’
आपलं ‘मनोगत’ व्यक्त करताना, लेखिका म्हणते, ‘मी आत्मकथन लिहिणार असल्याचं शाळेत असल्यापासून ठरवलं होतं. आजवरचं माझं जगणं वाचनीय आहे, असं मला आणि अनेकांना वाटतं, म्हणून मला ते ग्रंथबद्ध करावसं वाटलं. ती श्वासाइतकी उत्कट गरज वाटली. या आत्माविष्काराला सार्वजनिक स्वरुपात ‘न्याय’ दिल्याशिवाय घुसमट थांबणार नव्हती. या लिखाणातून जे आत्मिक सुख मला मिळाले, ते अमूल्य आहे. हे आत्मचरित्र नाही. उत्कटतेने, उत्स्फूर्तपणे तुमच्याशी मारलेल्या या गप्पा, हितगुज आहे., असंही लेखिका म्हणते, आजवर मी मूलभूत गरजांसाठीच जीवघेणा संघर्ष केला आहे. घर, पैसा, प्रेम, आधार वगैरे….. जगण्याच्या मूलभूत प्रश्नाशी इतर प्रश्न भिडत राहिले. जगावसं वाटत नव्हतं. मी आयुष्याला कंटाळले होते. अस्तित्व टिकवण्यासाठी अखंड लढाई चालू होती. लहानपणापासून मी टोकाची अलिप्त, तटस्थ, स्थितप्रज्ञ बनले होते. स्वत:ला शोधण्याचा प्रवास सुरू होता आणि माझीच मी मला नव्याने आकळत गेले.
तिने आपली संघर्षगाथा २०१६ मध्ये फेसबुकवर पोस्ट केली. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अविनाश धर्माधिकारी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, इ. अनेक जाणकार साहित्यिकांनी कौतुक केले. तिच्या या कहाणीला पाच हजारावर लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या. मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. सतीश बडवे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, ‘या लेखनात खूप आशा आहेत, की त्यातून आपली घर नावाची संस्था, विद्यापीठ नावाची संस्था आणि भोवतालचा समाज यातील ताणे-बाणे उलगडले जातात. त्यातही मुलीच्या वाट्याला येणारे संघर्षाचे प्रसंग फारच तीव्र होत जातात. तुम्ही सगळ्यात चांगली निभावलेली गोष्ट म्हणजे लेखनात कुठल्याच गोष्टीचे भांडवल केलेले नाही. घराची श्रीमंती, सामाजिकदृष्ट्या मागासलेले असणे, स्त्री असणे, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे वगैरे….वगैरे…. . निखळ माणूस म्हणून तुम्ही हे सलग सांगत जाता. कोणताच अभिनिवेश न बाळगता. संवादी शैलीतील हे प्रभावी निवेदन म्हणूनच भावते. खोलवर रुतते.’ पुढे आणखीही काही अभिप्राय दिलेले आहेत.
‘मी का लिहिते?’ या पुढील प्रकरणात, लेखिका म्हणते, ‘लिहिणं, व्यक्त होणं ही माझी शालेय वयापासूनची श्वासाइतकी प्राथमिक गरज आहे. ती जगण्याचं एक उद्दिष्टच बनली.’ ललित, कल्पनारम्य लेखनाची लेखिकेला आवड नाही. ती म्हणते, ’माझा पिंड वैचारिक, सामाजिक लेखनाचा.’ ‘ निर्वासित ’ हे त्यांचे आत्मकथन, याच दृष्टीकोनातून लिहिले आहे.
नंतरचे प्रकरण लेखिकेने आपल्या सिंधी समाजावर लिहिले आहे. फाळणीनंतर सिंधी लोक भारतात आले. जमेल तिथे, जमेल तसे स्थिरावले. रुजले. या समाजाची वैशिष्ट्ये तिने दिली आहेत. कुशल, व्यवहारी, सरळमार्गी, उदार, दिलदार, पापभीरू असे हे लोक दैववादी नाहीत. मिठास वाणी हा या समूहाचा विशेष गुणधर्म. श्रमाची त्यांना लाज वाटत नाही. सामाजिक आणि वैचारिक मागासलेपण, रूढीप्रियता, उत्सवप्रियता, चंगळवाद यासारख्या दोषांबद्दलही तिने लिहिले आहे. ती म्हणते, ‘यांना ‘सुखवस्तू आदिवासी’ म्हणता येईल. परांपरागत व्यवसाय करण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. नोकरी करणार्यांचं प्रमाण एक टक्केही नाही. स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प. आपलं शाश्वत सुख, स्वातंत्र्य , आत्मभान याची जाणीव असणार्या स्त्रिया अभावानेच आढळतात.
आपला जन्म ‘लासी’ नावाच्या तळागाळातल्या जमातीत झाल्याचे ती सांगते.. सिंधी समाजाबद्दल बरीच माहिती, या पुस्तकाच्या निमित्ताने वाचायला मिळते. फाळणीनंतर सिंधी भारतात आले. सिंधी समाजाला आपण निर्वासित म्हणतो. उषाने आपल्या घरातच इतके भोगले आहे, की विनीता हिंगे म्हणतात, ‘उषा तिच्या स्वत:च्या घरातच ‘निर्वासित’ होती.’ अर्थात, तसे वेळोवेळी वडिलांनी तिला आर्थिक मदत केल्याचेही तिने लिहिले आहे. पण, तिला पुरेशी आणि तिला हवी त्यावेळी मिळालीच असे नाही.
‘बालपण आणि शाळा-कॉलेज’ व ‘माहेरवास’ प्रकरणात, उषाने आपल्या कुटुंबाची माहिती दिली आहे. आई- वडील, चार बहिणी, एक भाऊ, वहिनी, आजी, नानी, एक व्यंग असलेले गतीमंद काका, यांची सविस्तर माहिती दिली आहे. आई सत्संगात, गुरूमध्ये रमलेली. पुढे ती साध्वी झाली. वडील श्रीमंत, पण चैनी, उधळे. त्यांच्या या स्वभावामुळे पुढे त्यांना खूप कर्ज झाले. मुले-मुली यांना समान वागणूक नाही. घरात शिक्षणाचे महत्व तिच्याशिवाय कुणालाच नाही. समाजालाही नाही. शिकावं, स्वाभिमानाने जगावं, आत्मभान जागवावं, याची जाणीव कुणालाच नाही, याबद्दल ती खंत व्यक्त करते.
तिची धाकटी बहीण १६व्या वर्षी साध्वी झाली. तिला अध्यात्मातलं, त्या वयात काय कळत असेल ? पण परतीचे मार्ग नाहीत. याबद्दल समाजाने, कायद्याने काही तरी करायला हवं, असं तिला वाटतं. तिच्याही मागे साध्वी होण्याबद्दल तगादा लागला होता, पण पुढे शिकण्याबद्दल ती ठाम होती. दहावीला चांगले मार्कस् असूनही वडिलांनी कॉलेजमध्ये घातले नाही. दोन वर्षांनंतर तिला ती परवानगी मिळाली. दोन वर्षे वाया गेली, म्हणून ती हळहळली.
पुढल्या कॉलेजच्या जीवनातील निबंध स्पर्धा, प्रदर्शने, नानाविध उपक्रम यात ती रमून गेली. ती लिहिते, ‘कॉलेजमध्ये वाङ्मयीन जाणीवा विस्तारल्या. अभिरुची संस्कारित झाली. प्रतिभेला वाव मिळाला.’ कॉलेजच्या जीवनातील आनंदक्षणांबद्दल तिने मनापासून लिहिले आहे. ती पदवीधर झाली, पण एम. ए. होऊ शकली नाही, याबद्दलही तिने विस्ताराने लिहिले आहे. विद्यापीठाच्या 0.763 क्रमांकाच्या नियमांनुसार तिला पीएच. डी. साठी रजिस्ट्रेशन मिळाले. विषय कोणता घ्यावा, कसे काम करावे, याबद्दल मार्गदर्शन करणारे तिला कोणीच भेटले नाही. 19 व्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’ हा तिचा प्रबंधाचा विषय. तिच्या वैचारिक आणि गंभीर प्रकृतीला साजेसाच हा विषय, पण संदर्भ शोधायला कठीण. त्यासाठी खूप भ्रमंती करावी लागली. या काळात नोकरी करणंही अत्यावश्यक होतं. 17 वर्षे अथक परिश्रमानंतर, चिवटपणे परिस्थितीशी झुंज देत, तिला 2006 मध्ये पीएच. डी. मिळाली. इतकंच नव्हे, तर उत्कृष्ट प्रबंधाचं, प्रा. अ. का. प्रियोळकर पारितोषिकही मिळाले. जीवनातले एक मोठे ध्येय साध्य झाले.
बी. ए. पासून उषा घर सोडून हॉस्टलमध्ये राहू लागली. कॉलेज हॉस्टेल, वर्किंग वुईमेन्स, हॉस्टेल, विद्यापीठाचे हॉस्टेल इ. अनेक ठिकाणचे अनुभव, त्याचप्रमाणे नोकरी, अर्थार्जन करत असताना घडलेल्या प्रसंगांचेही सविस्तर वर्णन तिने केले आहे. यावेळी नाना प्रकारच्या व्यक्ती भेटल्या. त्यांचे नाना प्रकारचे स्वभाव, विचित्र, विक्षिप्त वागणं, स्वार्थी, आत्मकेंद्रित वृत्ती या सगळ्याशी जुळवून घ्यावं लागलं. तिची वर्णनशैली इतकी प्रत्ययकारी आहे, की हे सारे प्रसंग आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत आणि त्यांच्यातील संवाद प्रत्यक्ष ऐकतो आहत असे वाटते. ‘माहेरवास’, ‘मुंबई विद्यापीठ आणि माझी पीएच. डी.’, ‘माझ्या नोकर्या वगैरे आणि अर्थार्जन’, माझी घरघर’, माझे मित्रमैत्रिणी अशी काही प्रकरणे एखाद्या कादंबरीसारखी झाली आहेत. ती स्वत:च वाचून समजून घ्यायला हवी.
कधी वाटतं, हे लेखन एकतर्फी तर नाही? पण लगेच जाणवतं, ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. अर्थात काही चांगली माणसेही तिला भेटली. त्यांच्याबद्दल तिने कृतज्ञतेने लिहिले आहे. तिच्यावरील एका लेखाला माया देशपांडे शीर्षक देतात, ‘उपेक्षेच्या अंध:काराला भेदणारी उषा’
‘माझं लग्न: माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी ‘ हे या पुस्तकातील शेवटचे प्रकरण. ती लिहिते की जीवनाचा जोडीदार शोधण्याचे काम तिलाच करावे लागले. वयाच्या 21व्या वर्षापासून तिने जाहिराती, वेगवेगळी वधू-वर सूचक मंडळे यांच्याशी संपर्क साधला. याही बाबतीतला तिचा संघर्ष दीर्घकालीन आहे. काही ठिकाणी तिला नकार आला, तर काही स्थळे तिने नाकारली. तिचं ’अमराठी’ असणं, तिची पत्रिका चांगली नसणं, जाड भिंगाचा चश्मा, बेताचं रूप, कमी ऊंची, थोडासा लठ्ठपणा इ. तिला नाकरण्याची कारणे होती. तिच्या नकरामागे, लग्न न करता नुसतीच मैत्रीची अपेक्षा, चुकीची माहिती, फसवणूक, आधीच सेक्सची अपेक्षा इ. कारणे होती.
पुढे जाहिरातीद्वारेच दीपक गायकवाड यांच्याशी भेट झाली. तीन-चार भेटी-गाठीनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती 53 वर्षांची होती, तर दीपक 58 वर्षांचे होते. त्यांना त्यावेळी तेजस्विनी ही लग्न झालेली मुलगीही होती. ते BPCLमधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले ते अधिकारी होते. पहिल्या पत्नीशी वैचारिक मतभेदातून घटस्फोट झाला होता. उषाचे व त्यांचे लग्न रजिस्टर पद्धतीने 28 मे 2015 ला झाले. आता उषा सुखात नांदते आहे. बर्याच वर्षांनी जीवनात, कदाचित प्रथमच, मानसिक स्थैर्य ती अनुभवते आहे. उषाच्या जीवन संघर्षाची ही साठा उत्तरीची काहाणी, सुखी सहजीवनाच्या पाचा उत्तरी सफल संपूर्ण झाली आहे.
पुस्तकाचे नाव – निर्वासित
लेखिका – डॉ. उषा रामवाणी – गायकवाड
प्रकाशक – उष:काल पब्लिकेशन
पृष्ठे – 430 मूल्य – 400 रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
