विज्ञानाच्या प्रयोगानंतरच त्यावर विश्वास ठेवता. मग अध्यात्माचा हा प्रयोग करून पहायला नको का? यासाठी मन हे मार्गी लावायला हवे. प्रत्येक वेळी प्रयोगात एकच परिणाम मिळत नाही. यामध्ये फरक असतो. यातून एकच निष्कर्ष काढण्यात येतो. आकड्यामध्ये फरक असला तरी निष्कर्ष निश्चित करण्यात येते. अध्यात्मामध्येही तेच आहे. निष्कर्ष निश्चित आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तूं मन बुद्धी सांचेसी । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।
तरी मातेची गा पावसी । हे माझी भाक ।। 79 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 8 वा
ओवीचा अर्थ – तूं मनबुद्धी हीं खरोखर माझ्या स्वरुपात अर्पण करशील, तर मग माझ्याशी एकरुपच होशील, हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे.
अध्यात्माचा अभ्यास हा करायलाच हवा. साधनेतील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायला हवा. चक्रांचे कार्य काय आहे, ते कसे कार्य करतात? साधनेच्या काळात आपल्या शरीरात कोणत्या क्रिया घडतात ? आपणास कोणते बोध होतात ? कोणती अनुभूती येते ? हे जाणून घ्यायलाच हवे. साधनेत अवधानाला महत्त्व आहे. नुसतेच शांत बसून राहणे म्हणजे साधना नव्हे. सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचे नामस्मरण करायला हवे. ते करताना अवधान आवश्यक आहे.
मन भरकटते, पण मनाला स्थिर करणे आवश्यक आहे. साधनेच्या सुरवातीच्या काळात हे शक्य होत नाही, पण हळूहळू अभ्यासाने ते शक्य होते. मनातील विचार दूर होतात. साधनेत येणारे अडथळे हळूहळू दूर होतात. सद्गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राच्या जागी मन स्थिर होते. मनाला स्थिर ठेवणे कोणास जमले? साधना सुरू असताना विचार येतच राहतात; पण याचा तोटा काही नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. या विचारांच्या जागी मन स्थिर होते. यातून एखाद्या समस्येवर उत्तर मिळते.
चिंतन, मनन, नामस्मरणातूनच अनेक समस्या सुटतात. योग्य मार्ग सापडतात. साधनेचे हे फायदे आहेत. यासाठी सुरवातीच्या काळात साधनेत मन रमले नाही तरी हळूहळू त्याची गोडी लागते. मनाला स्थिरता येते. विचार संपतात. मग आत्मज्ञानाच्या पायऱ्या सहज चढल्या जातात. यासाठीच साधनेत कोणत्या क्रिया घडतात, यामागचे शास्त्रही समजून घ्यायला हवे.
भारतीय संस्कृती ही विज्ञानावर आधारलेली आहे. अध्यात्म हेही एक शास्त्र आहे. याचा सखोल अभ्यास करण्याचाही प्रयत्न साधकांनी करायला हवा. नवी पिढी विज्ञानाची चर्चा करते. विज्ञानाच्या या पंडितांनी अध्यात्माचे विज्ञानही अभ्यासायला हवे. ते जाणून घ्यायला हवे. मगच हे थोतांड आहे की नाही, यावर भाष्य करायला हवे. विज्ञानाच्या प्रयोगानंतरच त्यावर विश्वास ठेवता. मग अध्यात्माचा हा प्रयोग करून पहायला नको का? यासाठी मन हे मार्गी लावायला हवे. प्रत्येक वेळी प्रयोगात एकच परिणाम मिळत नाही. यामध्ये फरक असतो. यातून एकच निष्कर्ष काढण्यात येतो. आकड्यामध्ये फरक असला तरी निष्कर्ष निश्चित करण्यात येते. अध्यात्मामध्येही तेच आहे. निष्कर्ष निश्चित आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.