March 19, 2024
Visit to Kolrado memory by Dr Sunil B Patil
Home » हवे ते घ्या, हवे ते करा, घर तुमचेच आहे… आदरतिथ्याचा सुखद धक्का
मुक्त संवाद

हवे ते घ्या, हवे ते करा, घर तुमचेच आहे… आदरतिथ्याचा सुखद धक्का

तेरे शहरमें

आम्ही प्रिंजकेलच्या घरचा पत्ता विचारत त्याच्या घरी पोचलो. डॉ. पी.जे. इतका प्रसिद्ध होता, की घर लगेच सापडले. घर कसले मोठा व्हिलाच होता. बाहेर बाग, स्वीमिंग पूल, मोठे किचन, डायनिंग, ड्रॉईंग रूममध्ये मोठा टीव्ही, उंची फर्निचर वगैरे वगैरे.
किचन टेबलावर एक चिठ्ठी होती. “”तुम्हाला हवे ते घ्या, हवे ते करा, घर तुमचेच आहे.” हा एक धक्का.

डॉ. सुनिल बी. पाटील
मो, ९४२२०४९४०५

अमेरिकेतील कोलराडो राज्याच्या राजधानीच्या डेजव्हर या शहरात माझा मुक्काम थोडासा वाढला. ही संधी साधून तेथून दोन-अडीच तासांच्या अंतरावर असलेल्या ब्रेकनब्रिज या छोट्या गावात माझे आयुर्वेदावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले.

ब्रेकनब्रिज एक छोटे गाव अवघ्या तीन हजार लोकवस्तीचे; मात्र या गावाचे वैशिष्ट्य असे, की चोहोबाजूंनी उंचावरून उतार आणि खाली घळीत वसलेले गाव. हे सर्व उतार थंडीच्या मोसमात बर्फाच्छादित होतात आणि बर्फावर स्केटिंग करणाऱ्या साहसी खेळाडूंना हे गाव म्हणजे जणू काही काशीच वाटते. थंडीच्या मोसमात इथे दररोज सुमारे दहा हजार पर्यटक, स्केटिंग खेळाडू येत असतात आणि पर्यटकांच्या वर्दळीने हे गाव फुलून जाते.

मी आणि आमचे मित्र स्टीव्हन जॉन्स डेनव्हरहून भल्या पहाटे निघालो. वाटेत एका ठिकाणी जॉन्सने गाडी थांबवली आणि एक सुंदर वसलेली टुमदार वसाहत दाखवली. ती सुंदर वसाहत पाहून काही बोध झाला नाही म्हणून स्टीव्ह म्हणाला, की अमेरिकेतील सर्वात मोठे धरण कोलराडो नदीवर बांधले गेले तेव्हा धरण बांधण्याच्या आधीच पाणलोट क्षेत्रातील रहिवाशांचे पुनर्वसन आधी करून मग धरणासाठी जमीन ताब्यात घेतली होती हे वैशिष्ट्य.आपल्याकडे सदोदित धरणग्रस्तांचे प्रश्‍न घेऊन मोर्चे, आंदोलने पाहायची सवय. त्या पार्श्‍वभूमीवर हे उदाहरण अगदी विरळाच आणि आर्श्‍चचकित करणारे वाटले.

साधारण 11 वाजता आम्ही ब्रेकनब्रिजला पोचलो. गाव पर्यटकांनी फुलून गेले होते. आमचे तेथील संयोजक होते डॉ. प्रिंजकेल. आम्ही त्यांच्या रुग्णालयात पोचलो. डॉ. प्रिंजकेल हे अस्थिरोगतज्ज्ञ होते. त्यांच्या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ते कामात असतानाच आमचे काचेच्या बंद दरवाजातून बोलणे झाले. डॉक्‍टरांनी तोंडावर मास्क लावला होता. त्यांनी त्या अवस्थेत आमचे काचेपलीकडून स्वागत केले आणि त्यांच्या घरचा पत्ता सांगितला. त्या घराला कुलूप नाही. आपण बेधडक तेथे जा, असे त्यांनी सांगितले आणि आस्थेने तुम्ही काही खाल्ले वा जेवलात का, असे विचारले? अर्थातच आम्ही त्या गावात नुकतेच आलो होतो. डॉक्‍टरांनी सांगितले, की तुम्ही कुठेही जा आणि काहीही खा, तेथे माझे फक्त नाव सांगा…

डॉक्‍टर आपल्या ऑपरेशनमधून वेळ काढून माझ्याशी बोलत होते. म्हणून मी फार लांबड लावली नाही. जॉन्स आणि मी हॉस्पिटलबाहेर निघालो. तिथल्या रिसेप्शनिस्टने सांगितले, की डॉक्‍टर प्रिंजकेल खूप सहृद असून या खेळाच्या सिझनमध्ये हजारो लोक इथे स्केटिंगला येतात. त्यापैकी शेकडे नवशिके हाडे मोडून घेतात आणि या हॉस्पिटलमध्ये प्रिंजकेल रग्गड ऑपरेशन्स दिवसभर करत असतात.

आमचे व्याख्यान सायंकाळी सहा वाजता सिटी कॉलेजच्या हॉलमध्ये होते. भरपूर वेळ असल्याने आम्ही गावात भटकायला सुरवात केली. गावात जणू काही जत्राच फुलली होती. थोडी भटकंती झाल्यावर पोटात भुकेने कावळे ओरडू लागले. मी जोन्सला म्हटले, चला कुठल्या तरी हॉटेलात जाऊ…

एका हॉटेलात गेलो. तेथे टेबल पकडून बसलो कारण हॉटेलातही प्रचंड वर्दळ होती. मघाशी डॉक्‍टर प्रिंजकेलने “कुठेही जा… काहीही खा. बिल देऊ नका’ हा सल्ला न पाळता ऑर्डर द्यायचे ठरवले. पण जोन्स म्हणाला, “”बघू या तरी गंमत करून!” म्हणून मी ऑर्डर दिली- दोन पिझ्झा, एक ब्लॅक कॉफी, एक ब्लॅक टी वुईथ मिल्क. आणि हो आम्हाला डॉक्‍टर प्रिंजकेलने पाठवले आहे. आम्ही प्रतिक्रियेची वाट बघितली. क्षणार्धात तो वेटर हसून म्हणाला, “”वेलकम टू ब्रेकनब्रिज. तुमचे स्वागत असो. तुम्ही डॉ. पीजेंचे पाहुणे आहात, गुड…”

आम्ही हबकलोच. “पीजे’ म्हणजे डॉक्‍टरांच्या नावाचा शॉर्टफॉर्म. या डॉक्‍टरला इतक्‍या प्रेमळ नावाने ओळखतात ते पाहून आश्‍चर्य वाटले आणि डॉक्‍टरांविषयी आदर दुणावला.
ज्या डॉक्‍टरचे तोंडसुद्धा अजून पाहिलेले नाही त्याचे नाव सांगून पिझ्झावर ताव मारताना मला कसेसेच झाले. पण, जोन्स पिझ्झा हे परब्रह्म समजून यज्ञकर्म शांततेत करताना पाहून मीही बिलाची चिंता न करता आडवा हात मारला. नाष्टा संपवून वेटरला बिल विचारले, तर तो हसून उद्‌गारला, “”तुम्ही पीजेंचे गेस्ट आहात. बिल त्यांच्या अकाऊंटमध्ये पडले आहे. थॅंक्‍यू.”

आम्ही आ वासत बाहेर पडलो. इथून पुढे या गावात यापेक्षाही भले भले धक्के बसणार होते.
वेळ काढायचा म्हणून तेथे एका चष्म्याच्या दुकानात गेलो. कौंटरवरच्या मुलीने स्वागत केले. आम्ही काही गॉगल पाहू लागलो. तिने विचारले, की “”तुम्ही भारतीय आहात काय.” मी म्हणालो. “”होय.” ती म्हणाली, की आज सायंकाळी सीटी कॉलेजमध्ये एका भारतीय डॉक्‍टरचे आयुर्वेदावर व्याख्यान आहे. तुम्ही जरूर या.

मी तिला सांगितले, “”बाई, तो डॉक्‍टर मीच आहे.” ती मोठ्याने किंचाळलीच, “ओ माय गॉड व्हॉट अ सरप्राईज.’ तिने त्या दिवशीच्या स्थानिक वृत्तपत्रातील माझ्या भाषणाविषयीची बातमी दाखवली आणि दुकानात एका बाजूला असलेले कपाट उघडले. त्यात वर्षाअखेरीच्या सवलतीच्या दरातले असंख्य गॉगलचे नमुने होते. खरेदी झाल्यावर कौंटरवर बिल देताना मी फक्त एक सवलतीच्या दरातला गॉगल घेतलेला पाहिला आणि बिल घ्यायचे नाकारले.

“”ही माझ्यातर्फे तुला भेट समज आणि रात्रीच्या व्याख्यानात त्वचेच्या सौंदर्याविषयी खास आयुर्वेदीय टिप्स सांग, मी माझ्या खूप मैत्रिणींबरोबर तुझे भाषण ऐकायला येणार आहे.”
धक्‍क्‍यावर धक्के दुसरे काय. तेथून आम्ही प्रिंजकेलच्या घरचा पत्ता विचारत त्याच्या घरी पोचलो. डॉ. पी.जे. इतका प्रसिद्ध होता, की घर लगेच सापडले. घर कसले मोठा व्हिलाच होता. बाहेर बाग, स्वीमिंग पूल, मोठे किचन, डायनिंग, ड्रॉईंग रूममध्ये मोठा टीव्ही, उंची फर्निचर वगैरे वगैरे.
किचन टेबलावर एक चिठ्ठी होती. “”तुम्हाला हवे ते घ्या, हवे ते करा, घर तुमचेच आहे.” हा एक धक्का.

घरात येताना दार सताड उघडे होते. कुठेही कुलूप नाही. आपल्याकडच्या शनी शिंगणापूरसारखे हे गाव असावे, जिथे चोर नसावेत. फक्त शिंगणापुरात घरांना दारे नाहीत, इथे होती; पण कुलूपबंद नव्हे तर सताड उघडी.

आम्ही किचनमध्ये गेलो. तिथल्या कपाटात “कोल्हापुरी गुळाचे पाकीट दिसले. मग काय, पुढचे काही तास जोन्सला माझे कोल्हापुरी गुऱ्हाळ ऐकत बसावे लागले. माझ्या आधी आमच्या गावचा गूळ इथे पोचला ही थोडी अभिमानाची बाब.

त्यानंतर आम्ही विश्रांती घेतली. पाच वाजता एक गृहस्थ आले. त्यांनी सांगितले. आपण हॉलवर जाऊ. पुढे तयारी झाली आहे. डॉ. प्रिंजकेल काही वेळात हॉस्पिटलमधून परस्पर येतील.
आम्ही त्यांच्या गाडीत बसून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. हॉलमध्ये तयारी पाहिली. आलेल्या लोकांना भेटलो आणि डॉ. प्रिंजकेल यांची वाट पाहत लॉबीत थांबलो.

एवढा मोठा डॉक्‍टर रोज शेकडो ऑपरेशन करतो, मोठ्या घरात राहतो, गावात त्याला शेंबडे पोर ते हॉटेलमालक सगळे ओळखतात. मान देतात. असा डॉक्‍टर आता एखाद्या आलिशान गाडीतून येणार, असे वाटत असतानाच एक उमदा माणूस सायकलवरून सफाईदारपणे लॉबीत येऊन थांबला.
मला पाहून तो हसला आणि म्हणाला. “”हाय, डॉक्‍टर पाटील, मी डॉ. प्रिंजकेल. कसा काय गेला तुमचा दिवस.”
आता मात्र माझी अवस्था कठीण झाली. सकाळपासून धक्‍क्‍यांवर धक्के आणि आताही “जोराचा झटका.’

आपल्याकडे एखादा डॉक्‍टर, एखादा कशाला, साक्षात मी स्वतः जर सायकलवरून दवाखान्यात निघालो, तर लोक म्हणतील बहुतेक यांची प्रॅक्‍टिस आता चालत नसावी. इथे तर प्रचंड बिझी सर्जन एका कार्यक्रमाला चक्क सायकलवरून आला.

माझे व्याख्यान झाले. रात्री एकत्र भोजन करताना प्रिंजकेलशी गप्पा मारताना त्यांच्यातला खरा माणूस, दिलदार व्यक्तिमत्त्व समजून घेताना या गावाला भेट दिली नसती तर… असा विचार मनात येऊन गेला.

आजही डॉक्‍टर प्रिंजकेल नव्हे डॉ. पीजे माझ्या मनात घर करून राहिला आहे. डॉक्‍टर प्रिंजकेलचा निरोप घेऊन डेनव्हरला परतताना गुलाब अलीची गझल ओठावर आली.

“कैसी चली है, अब हवा तेरे शहर में!’

Related posts

भावी काळात शेतीचे महत्त्व वाढणार

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर

आगामी अंतरिम अंदाजपत्रकाकडून असलेल्या अपेक्षां

Leave a Comment