संतोष जगताप यांचा यापुर्वी एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. त्यानंतर दिर्घ कालावधीनंतर ही कादंबरी आली आहे. लेखकाची ही पहिलीच कादंबरी असली, तरी ती अतिशय बांधेसूद झाली आहे. ‘जगू’ या शिकून नोकरी न मिळाल्याने शेतात राबणाऱ्या तरुणाची ही कथा आहे.
-पांडुरंग कोकरे
एक काळ असा होता की अठरा तासांपर्यंत ग्रामीण भागात लोडशेडींग होतं. लाईटीकडे लोक डोळे लावून बसायचे. मनोरंजन तर सोडाच पण पिण्याचं, जनावरांचं पाणी भरणं जमायचं नाही. विहीरीत पाणी असताना सुद्धा तिथं शेतीमधली उभी पीकं डोळ्यांदेखत वीजेअभावी जळून जायची. पाणी हायं पण विज नायं याने झालेले नुकसान हे शेतकऱ्यांसाठी किती दुःखदायक आहे. त्यात पुन्हा थोडंफार वारं पाऊस आला की आठ दहा दिवस वीज गायब व्हायची. पुन्हा वीज आल्यावर एकाचवेळी अनेक मोटरी चालू केल्यानं लोड येवून डीपी जळायचे. ते दुरुस्त करण्यासाठी वर्गणी गोळा करत हिंडायचं आणि दुरुस्त करून आणेपर्यंत पुन्हा खोळंबा.
अशा दुष्टचक्रात ग्रामीण भाग अडकला होता. सध्या यामधे काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. पण ज्यांनी हे भोगलं आहे अशा लोकांचं दु:ख, ससेहोलपट मराठी साहित्य विश्वात आतापर्यंत कधी आली नव्हती. ती पहिल्यांदाच अतिशय ताकदीनं आणि प्रभावीपणे संतोष जगताप यांच्या ‘वीजेने चोरलेले दिवस’ या कादंबरीतून आली आहे.
संतोष जगताप यांचा यापुर्वी एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. त्यानंतर दिर्घ कालावधीनंतर ही कादंबरी आली आहे. लेखकाची ही पहिलीच कादंबरी असली, तरी ती अतिशय बांधेसूद झाली आहे. ‘जगू’ या शिकून नोकरी न मिळाल्याने शेतात राबणाऱ्या तरुणाची ही कथा आहे.
सांगोला या दुष्काळी भागात सततचा दुष्काळ आणि त्यात वीजेच्या लोडशेडींगचा अती प्रभाव पडल्याने शेतकऱ्याचं जगणं किती कष्टमय झालंय याचं प्रभावशाली चित्रण ही कादंबरी करते. लेखकाने वापरलेली सांगोल्यातील रांगडी बोलीभाषा अतिशय गोड आणि मराठी भाषेत अनेक नवीन शब्दांची भर घालणारी आहे. त्याचबरोबर लेखकाने या कादंबरीत ग्रामीण भागात प्रचलित अनेक म्हणी, वाक्प्रचार जे सध्या फारसे ऐकायला मिळत नाहीत ते अतिशय चपखलपणे वापरले आहेत. यावरून लेखकाचा भाषा अभ्यास किती खोलवर आहे याचा प्रत्यय येतो.
लेखक संतोष जगताप हे लोणविरे या सांगोला तालुक्यातील गावात शेती करत नोकरी करतात. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांचं जगणं जवळून अनुभवलं आहे. त्यामुळे कादंबरी वास्तवदर्शी व सुक्ष्म तपशिलासह चित्रीत करण्यात त्यांना यश आले आहे. लोडशेडींगमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे भिषण वास्तव हलक्याफुलक्या पद्धतीने विविध कंगोऱ्यासह चित्रीत करण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.
मलपृष्ठावर आसाराम लोमटे यांनी या कादंबरीची केलेली पाठराखण, ‘महात्मा जोतीराव फुले प्रणीत शेतकरी साहित्य कसे असावे याचे लखलखीत उदाहरण म्हणजे ही कादंबरी’ यथार्थ ठरते.
निसर्ग, व्यवस्था हे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत असे आतापर्यंत कुणालाही वाटत होते. पण व्यवस्थेतीलच एक भाग लोडशेडींग हा देखील शेतकऱ्यांचा नवा शत्रू शेतकऱ्यांना बरबाद करतोय. हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतोय. आणि या लोडशेडींगने गावंच्या गावं अंधाराच्या खाईत लोटले आहेत. रोजचं जगणंच कसं मुश्किल होऊन बसलं आहे . हे अतिशय परिणामकारकतेने अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे. लोडशेडींगच्या नुकसानीचे सर्व पैलू अगदी बारकाव्यानिशी या कादंबरीत उजागर झाले आहेत. चोविस तास लाईटच्या प्रकाशात राहणाऱ्या माणसांना वेडावून सोडणारी ही कादंबरी आहे.
– संपत मोरे
पुस्तकाचे नाव – वीजेने चोरलेले दिवस
लेखक: संतोष जगताप
प्रकाशक: दर्या प्रकाशन, पुणे.
पृष्ठे: १५६
मुल्य: २२०
